मी डोलवत आहे तसा डुलतोय माझा गारुडी

Submitted by वैवकु on 13 October, 2013 - 12:47

दिसतो तसा असल्यामुळे मी वेगळा आहे म्हणे
त्यांच्यातला नसलो तरी मी चांगला आहे म्हणे

जे बोललो मित्रा तुला विसरून जा इथल्याइथे
डोळे नको भिजवूस तू मी मस्करा आहे म्हणे

थोडे अधिक देता मला चिडवायच्या बहिणी तिला
आई तुझा सगळ्यांमधे हा लाडका आहे म्हणे

आधी मला नात्यातला मावस-बिवस वाटायचा
हा देह नावाचा कुणी माझा जुळा आहे म्हणे

संपेल ह्या चिंतेमधे संपून जाते जिंदगी
संपेल ह्या चिंतेमधे हा फायदा आहे म्हणे

मी डोलवत आहे तसा डुलतोय माझा गारुडी
वेडे जगत तो तर तिथे निश्चल उभा आहे म्हणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफलातून गझल.

मतला...जुळा...उभा....फायदा....व्वा!!!!

धन्यवाद डॉ.साहेब

दुसर्‍र्‍या शेराची पहिली ओळ मलाच सपाट वाटल्याने बदलावी वाटते आहे
तरी आवडत्या तज्ज्ञ व्यक्तीस कळवले आहे त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेच मगच काय ते फायनल करीन तूर्तास ती ओळ अशी बदलू पाहतो आहे

गंभीर होशिल आणखी हे माहिती नव्हते मला
डोळे नको भिजवूस तू मी मस्करा आहे म्हणे

अ प्र ति म..............

सापडलास..... इथे सापडलास..!!

जबरदस्त गझल.. एकेक शेर सव्वाशेर.. क्या बात !

मतला फार आवडला, लाडका हा शेरही.

बाकी ठिकाणी सुधारणेस स्कोप आहे. प्रत्यक्ष चर्चा करू तेव्हा सांगेन.

गैन.

छान...... बहुतेक सगळे वेगळेच खयाल.
शेवटचे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
विठ्ठलाचा अप्रत्यक्ष उल्लेख ही शेवटच्या शेराची खासियत वाटली.

आधी मला नात्यातला मावस-बिवस वाटायचा
हा देह नावाचा कुणी माझा जुळा आहे म्हणे >>>> क्लाऽऽसच आहे हा

यासाठी ____/\____

सुंदर

छान आहे... आवडली..

मी डोलवत आहे तसा डुलतोय माझा गारुडी
वेडे जगत तो तर तिथे निश्चल उभा आहे म्हणे

हा शेर वाचल्यापासून वाट पहात होतो...गझलेची

छान गझल. जुळा शेर खूप आवडला.
आणि <<दिसतो तसा असल्यामुळे मी वेगळा आहे म्हणे>> ही ओळ वाचून नकळत व्वा निघून गेले.

दिसतो तसा असल्यामुळे मी वेगळा आहे म्हणे... आहा
<<संपेल ह्या चिंतेमधे संपून जाते जिंदगी
संपेल ह्या चिंतेमधे हा फायदा आहे म्हणे>>... बहुत बहुत खूब.

बाय द वे, हे मस्करा असणे म्हणजे काय हो ?

मला तर ते कुस्करुन / कुस्कारा वगैरे सारखं वाटलं.

-दिलीप बिरुटे

सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार (बिरुटे सोडून ...)

आज प्रतिसाद द्यायचे तसे एक सुखद-धक्का देणारे कारणही आहे काही दिवसांपूर्वी एल्गार आणि झंजावात विकत घेतले होते(स्वखर्चाने ..नोकरी लागली आहे पगारातून घेतले ) आज सहज चाळत असताना एल्गार मध्ये एक शेर वाचला.....

चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यात पाणी
सोड त्याचे बोलणे तो एक वेडापीर होता

आणि अचानक माझा शेर आठवला......

गंभीर होशिल आणखी हे माहिती नव्हते मला
डोळे नको भिजवूस तू मी मस्करा आहे म्हणे

ह्या शेरात रदीफ मला त्रास देत होती मी मस्करा आहे इथवरच भाग मला सांगायचाय असे वाटत होते पण माझ्या मनाला ही ओळ अशीच रहावी असे वाटत होते ('म्हणे' हा शब्द जमीनीसाठीही अनिवार्य होताच)
भटांचा शेर वाचून...ते 'म्हणे' कुठे कोणी म्हटले होते ह्याचे उत्तर सापडल्यागत वाटते आहे !!!

.....मजा आली !!!!! मस्त मजा आली Happy

थोडक्यात ...दोनही शेर तंतोतंत एकाच भावभूमीतून आले आहेत की काय असे वाटते आहे ..असे म्हणायचे आहे . अर्थात काफियांमध्ये अर्थाच्या दृष्टीनेही प्रचंड प्रचंड तफावत आहे भटांचा काफिया शेरात बेमालूमपणे मिसळून जात आहे
अवांतरासाठी क्षमस्व .
पुनश्च धन्स

वैवकु,

तुमची गजल मला खूप आवडली. त्याचं कारण म्हणजे सर्व द्वीपदी इतर 'मान्यताप्राप्त' शायरांच्या गजलांपेक्षा पूर्णतः वेगळ्या स्वरूपाच्या आहेत.

<<थोडक्यात ...दोनही शेर तंतोतंत एकाच भावभूमीतून आले आहेत की काय असे वाटते आहे>>

हो. दोनही शेर तंतोतंत एकाच भावभूमीतून आले आहेत.

<<अर्थात काफियांमध्ये अर्थाच्या दृष्टीनेही प्रचंड प्रचंड तफावत आहे भटांचा काफिया शेरात बेमालूमपणे मिसळून जात आहे>>

जमीन, काफिया, रदीफ वगैरे गणिताच्या गोष्टी झाल्या. त्या पाळल्याच पाहिजेत. तरच एखादी काव्यरचना गजल म्हणवू शकते. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक द्वीपदी वेगळी उचलून स्वतंत्र कविता म्हणून वाचता आली पाहिजे; म्हणजेच गजलेतील पहिली द्वीपदी सोडून इतर द्वीपदींची अदला-बदल केली तरी त्यांच्या अर्थांवर परिणाम होता कामा नये.

>>> सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार (बिरुटे सोडून ...)

Happy

दीपावली आणि पाडव्याच्या आपणास खूप खूप शुभेच्छा.

'' जे बोलतो वेड्या तुला विसरून नको इथल्या इथे
कागदं नको खराब करू तू मी नाव ठेवणार आहे म्हणे''

वाहवा. वाहवा. वाहवा. वाहवा.

-दिलीप बिरुटे

हेमांगी शरदजी धन्यवाद
शरदजी विशेष आभार आपले द्विपदींच्या अदलाबदलीबाबतचे मत पटले
माझ्या गझलेबाबत स्तुतीपर लिहिलेत त्यासाठीही पुनश्च धन्यवाद

आधी मला नात्यातला मावस-बिवस वाटायचा
हा देह नावाचा कुणी माझा जुळा आहे म्हणे..........अफलातूनच !

मतला अन गारूडीही क्या बात !

खयाल आणि शेराची मांडणी, सफाई वाखाणण्याजोगी.

पुलेशु वैवकु.

-सुप्रियातै Happy

मस्कराचा अर्थ ठाऊक आहे का? पापण्यांना लावतात किंवा पोरी गाल लाल करून घेतात तो मस्करा. र ला ट जुळ्वले म्हणजे झाले अशी तुमची समजून आहे काय?

काय वात्तेल ते काय लिहायचं?

र ला ट जुळ्वले म्हणजे झाले अशी तुमची समजून आहे काय?<<< Proud
काय वात्तेल ते काय लिहायचं?<<<:हहगलो: !! आधी "वाट्टेल ते" ह्या शब्दात ट ला ट अस्तं हे जाणून घ्या मग मला शिकवा (तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून सांगतो.. प्रस्तुत गझलेत र ला ट वाले काफिये (यमके )नाहीतच मुळी !..आकारांत स्वरकाफिये आहेत ते ..र आणि ट चा संबंधच नैयेय मुळी Wink

मस्करा बद्दल : मस्करा म्हणजे आपण सांगत आहात ते हा एक अर्थ मलाही आधीपासून माहीत आहे पाशा पण गालावरदेखील मस्करा लावतात अशी माझीही समजूत होती खरेतर हा पदार्थ पापण्या काळ्या करण्यासाठी लावतात आणि हा 'मस्करा' शब्द मास्कारा/मस्कारा ह्या इंग्रजी लॅटीन वरून आला असावा असे मला वाटते

त्या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे मस्करी करणारा तो मस्करा आता मस्करी म्हणजे काय तर तुम्ही आत्ता करू पाहिली आहे पण तुम्हाला जमलेली नाहीयेय ती !! Lol

आपण काढू पाहत आहात त्या अर्थानेही खालची ओळ वाचून पहा त्याही परिस्थितीत एक निश्चित असा अर्थ लागत आहे >>>डोळे नको भिजवूस तू मी मस्करा आहे म्हणे <<< डोळे आणि मस्कारा /मस्करा चा संदर्भ लावून पहा .....

(आणि हो या पुढे आपण कोणता दगड उचलून दुसर्‍यावर मारत आहोत ते आधी तपासून पाहत जा नाहीतर हाताला वास लागेल तुमच्याच ......;) )

Pages