आठवणीतला 'दसरा'

Submitted by अनिल७६ on 13 October, 2013 - 10:29

पुर्वी ग्रामीण भागात दसर्‍याचा एकुण थाट मोठा असायचा,त्यातही कर्नाटक सीमा लगत असणार्‍या आपल्या राज्यातील गावात तर दसरा जोरात साजरा केलेला बघायला मिळायचा, त्या दिवशी सगळा गाव गोळा व्हायचा, आम्हा मुलांना आकर्षण म्हणजे वर्षातुन एकदाच बघायला मिळणार्‍या त्या बंदुकीच्या फैरी,मग ते सोनं लुटणं,साध्या आपट्याच्या पानासाठी होणारी गर्दी,चेंगरा-चेंगरी. त्या गर्दीत आम्हा मुलांना एखादा आपट्याची फांदी मिळाली कि खरं सोनं मिळाल्याचा आनंद व्हायचा.बहुतेक वेळा पानेच मिळाली.
दरवर्षी दसर्‍याला आम्हा मुलांकडुन मग गावातील सगळी ८-१० मंदीरे आणि ओळखीच्या १०० एक घरात जाऊन हे सोनं (फ्री मध्ये) वाटलं जायचं.
नदीकाठच्या बहुतेक गावांमध्ये आपट्याची झाडे खुप कमी प्रमाणात असल्याने तसेच या दिवसांत सहज उपलब्ध होत असल्यामुळे दसर्‍याला मोठ्या प्रमाणात ज्वारीचा म्हणजे शाळुचा (चार्‍यासाठी लावलेला) पाला 'सोनं' म्हणुन वाटला जायचा,बहुतेक लोक याचाच वापर करायचे,मग जवळच्याच शाळुच्या शेतात जाऊन पाला घेतला जायचा,मी ५ वीत असेन,त्या वर्षी मित्रांबरोबर शेजारच्या ज्वारीच्या शेतात गेलो,घाईमध्ये (सोनं) पाला काढताना शेंड्याजवळची पालाही काढला गेला आणि वरती असलेलं हिरवं कणीस शेंड्यासकट मोडलं, माझ्यामुळे त्या कणसात ज्वारीचे दाणे न भरता वाया जाणार होतं, नंतर ते झाड त्या कणीसाच मोडणं हे मला खुप दिवस आठवायचं आणि आपण केलेल्या त्या चुकीबद्दल खुप वाईट वाटायचं.याचा परिणाम म्हणुन त्यानंतर माझ्याकडुन असा पाला (सोनं) पुन्हा काढला (ओरबाडला) गेला नाही.
पुढे मी (वयाने) मोठा होताना, माझ्या हे लक्षात आलं कि शेतकर्‍यांकडुन चार्‍यासाठी किंवा अशा इतर कारणांसाठी अशा झाडांचा,पिकाचा पाला,पाने योग्य प्रमाणात,नियमांनुसार काळजीपुर्वक काढला जातो, कारण मुळात ओरबाडण त्याच्या स्वभावात नाही आणि ही झाडं,पिकं,पानं आणि माती यांच्याशी त्याचं नातं तर अतुट आहे,यांच्यामुळेच त्याच सगळं जीवन अवलंबुन आहे याची मोठी जाणीव त्याला नक्कीच आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आठवण आहे!

पुर्वी लहानपणी आम्ही घरोघरी जावून सोनं लुटायचो प्रत्येक घराची बेल वाजवून.. काय मजा वाटायची कोण जाणे.. पण करायचो.

पुर्वी लहानपणी आम्ही घरोघरी जावून सोनं लुटायचो प्रत्येक घराची बेल वाजवून.. काय मजा वाटायची कोण जाणे.. पण करायचो. खरय! आताची मुलं या साध्या साध्या गोष्टींना पारखी होताहेत.
आज मुले सोनं द्यायला आली होती. छान वाटले.

आपण केलेल्या त्या चुकीबद्दल खुप वाईट वाटायचं.याचा परिणाम म्हणुन त्यानंतर माझ्याकडुन असा पाला (सोनं) पुन्हा काढला (ओरबाडला) गेला नाही. >>>> ही खरी संवेदनशीलता .....

सुरेख आठवण .....

प्रतिक्रियेबद्द्ल सर्वांचे मनापासुन आभार !

शहरात तर वेळे अभावी हे कमी झालं असेल, पण गावाकडच्या माणसांमध्ये पुर्वी जो निर्मळपणा, नि:स्वार्थीपणा होता, त्यामुळे सगळा गाव त्याला आपला वाटायचा, गावाला तो आपला वाटायचा,आता राजकिय पक्ष,जात,आर्थिक स्थिती अशा भिंती नक्कीच उभ्या राहिल्या आहेत,पैशा मागे धावणं वाढलं आहे,त्यामुळे दुरावा वाढत आहे.

अनिल७६,

छान लेख!

आमच्या लहानपणी चाळीसमोरच्या मैदानात एका खांबाला आपट्याच्या फांद्यांची जुड्या बांधून ठेवत. संध्याकाळी ज्येष्ठ माणसे त्याची पूजा करत. त्यांची पूजा झाली, की सगळी मुले त्या खांबाबर तुटून पडत. शब्दशः ते सोने लुटले जात असे.

माझ्या आठवणीतला दसरा म्हणजे मोरगावचा. आत्तेभाऊ माझ्याच वयाचा असल्यामुळे आमची खुप गट्टी होती. दसर्‍याची तयारी खुप आधीपासुन केली जाते. मोरगावात घरटी शोभेच दारूकाम करतात. दसर्‍याच्या दिवशी संध्याकाळी मी आणि आत्तेभाऊ मंदीरासमोरील मोक्याची जागा पकडून बसलो जेणेकरून सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येइल. दसर्‍याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येकजण घरी बनवलेल शोभेच दारूकाम मंदीरापुढे घेऊन येतात. मंदीराबाहेरील पहिल्या पायरीपासुन जी दारूकामाला सुरूवात झाली ती पुढची बाजारपेठ संपेपर्यंत. कितीतरी लोक डोक्यावर गोणपाट घेऊन त्यावर १-२ पाऊस लावुन पेटवत होते. अक्षरश: दिवस वाटावा असा प्रकाश कितीतरी वेळ पसरला होता.
मग, गावतील तरूणांनी २ ओळी केल्या आणि फक्त "मोरया-मोरया" या शब्दांवर ताल धरला. मला पण खुप वाटलेल कि जाऊन त्यांच्यात मिक्स व्हाव पण भाऊ नको म्हणाला. Sad

मोरगावच्या दसर्‍याची खरी गंमत आली ती हिंगनाच्या मारामारीने. हिंगणाच्या झाडाला जी फळे येतात ती तोडून त्यातील गर काढुन ते कवच वाळवल जात. मग त्यात स्फोटकाची दारू भरली जाते. एका काडीला ही हिंगण बांधली जातात. थोडक्यात दिवाळीला जो बाण असतो तसलाच प्रकार पण याला वात नसते.

मग टोळक्या - टोळक्याने फिरायचे गावाबाहेरच्या मंदिरांत, मोकळ्या परिसरात. समोर एखाद टोळक आल कि हिंगण सोडायची त्यांच्या अंगावर. थोडक्यात लढाईच कि Happy

मी पण त्या दिवशी खुप हिंगण सोडली. समोरून पण हिंगणांचा मारा होत होता. त्यामुळे पळता भुई थोडी होत होती.
जेजुरीला पण दसर्‍याच्या दिवशी खुप दारूकाम होत, पण तिथे सर्व विकतचे फटाके असतात.

पुन्हा काही जमल नाही जायला मोरगावला, पण तो दसरा कायम लक्षात राहील Happy

छान अनुभव.
हे पाला वापरायचे माहीत नव्हते.
कोल्हापूरच्या विजयादशमीच्या सोहळ्याबाबत आई सांगत असते. अजून होत असणार तसाच तो.