वीरुचे बसंतीस ई-मेल

Submitted by अमेय२८०८०७ on 12 October, 2013 - 23:42

फ्रॉम : वीरुटायगर@जयवीरु.कॉम
टू : बसंती१२३धन्नो@लीलामौसी.कॉम
--------------------------------------------------------------------------

प्रिय बसंती,
केवळ एका भेटीतच तुला प्रिय म्हणण्याचे डेरिंग(जयच्या भाषेत आगाउपणा)करतो आहे. खरं सांगायचं तर एका भेटीतच आपण तुझ्यावर टोटली फिदा आहे. टांग्यातच 'फ्रेंडशिप' विचारणार होतो पण जयने बडबड करून प्रायवसीचा सत्यानाश केल्यामुळे मूड गेला. जय आपला दोस्त आहे त्यामुळे माफ किया. मी कोल्हापूरचा आणि तुझ्या धन्नोची आई पण कोल्हापूरची हे कळल्यावर एकदम बेष्ट वाटलं, ओळख निघालीच की! सांगायची गोष्ट अशी की तू दिलेल्या टांग्याच्या तिकिटावर तुझी वेबसाईट आणि ई-मेल होता म्हणून हा टेस्ट मेल.
तुमचं रामगड मात्र फारच बोरींग आहे. मॉल, के एफ सी, पिझ्झा हट सारख्या बेसिक सुविधाही नसाव्यात हे पाहून वाईट वाटलं. मोबाईल रेंजपण सगळीकडं नाही. ठाकूरच्या घरात फक्त त्या तिजोरीच्या खोलीजवळ रेंज येते म्हणून नेहेमी तिकडं जावं लागतं तर ठाकूरला वाटलं आम्ही तिजोरी फोडतोय. श्या.... यापेक्षा जेल बरं. सगळ्या मोबाईल कंपन्यांचे स्पेशल टॉवर आहेत जेलजवळ आणि काही कंपन्या तर पोस्टपेडसोबत अन्लिमिटेड डेटा प्लॅन फ्री देतात दोन महिन्यांसाठी.
एकूण जयलासुद्धा रामगड हे, जी. ए. म्हणून कोणी लेखक आहेत म्हणे, त्यांच्या कथांमधल्या वातावरणासारखं "गूढ आणि दु:खाची उदास छाया पसरलेले" अशा टाईपचं वाटलं (जयचे शब्द, आपुन काय येडे नाही असल्या भाषेत बोलायला). आपण कथाबिथा वाचून फाल्तू टाईमपास करत नाही त्यामुळे ते जी.ए. काळे का गोरे माहिती नाहीत ते सोड! मला फ्रँकली विचारशील तर 'वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट' म्हणून एक भारी वेस्टर्न पिच्चर जेलमध्ये बघितला होता, डिट्टो त्यातल्या गावासारखं आहे रामगड.
तुला माहीतच असेल या हवेलीत ठाकूर, रामलाल आणि ठाकूरची विधवा सून राहतात. सून दिवसभर नेटवर पडीक असते त्यामुळे अजिबात बाहेर येत नाही. कविता पण करते असे जय बोलत होता. तरीच जरा सटकच वाटली मला. जय उद्या तिला एका डेंजर कवीच्या कविता वाचून दाखवणार आहे. जयपण येडचॅपच आहे. पोरगी आवडली तर बिन्दास लाँग ड्राईवला जावं, मल्टीप्लेक्समध्ये पिच्चर बघावा, बागेत धतिंग करावं ते सोडून कविता वाचून दाखवतोय. या कवीचं जयकडेच एक पुस्तक बघितलं होतं 'राजपुत्राची डार्लिंग' का असंच कायतरी नाव होतं. नाव भारी वाटलं, गोड गुदगुल्या करणारी लवसाँग्ज लिहिली असतील म्हणून पान उघडलं तर काय...…. आता हाय का राव! आम्हीच सापडलो होय. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात 'मनोरंजक' मासिकं घालून वाचताना पकडल्यावर 'बा'नं गच्च कानाखाली मारल्या होत्या. त्याच्यानंतर दोन तीन दिवस नुस्ता सूं - सूं आवाज येत होता तसं वाटलं त्या कविता वाचून. काय कळायलाच तयार नाही. आपलं तर डोकं बाबा गरमच झालं. तू घाबरू नकोस, तुझ्याबरोबर कविताबिविता असा टाईमवेस्ट आपण अजिबात करणार नाही.
ठाकूरची ट्रॅजेडी ऐकून कसतरीच वाटलं. बिचार्‍या रामलालची पण कमाल आहे. ठाकूरची 'सगळी' कामं करतो. त्याला बड्डे गिफ्ट म्हणून नेटवरून सुगंधी वेट वाईप टिश्यू पेपर मागवले आहेत. ठाकूरने पहिल्या दिवशी स्मॉल पार्टी ठेवली होती. बर्फ संपला म्हणून किचनमध्ये गेलो तर रामलाल हात बुचकळून भज्यांचे पीठ कालवत होता. आपली तर भूकच उडाली ते बघून. नेटशॉपिंगची डिलीवरी येईपर्यंत फळांशिवाय काही खायचं नाही असंच ठरवलंय. नाहीतरी जेलमध्ये वजन वाढलं होतं ना, म्हणून एकदा जी एम डाएट करायचंच होतं. प्यायलापण मिनरल वॉटर फक्त. जय कसा जेवतो चापून कोण जाणे! पण त्याला ती कवितावाली करून घालते म्हणे खास. असं असेल तर ठीक आहे.
बाकी कामाचं म्हणशील तर ठाकूरचे सिप्पी, सलीम जावेद अँड कंपनी म्हणून अ‍ॅस्ट्रॉलॉजर आहेत, ते आल्यावर सांगतील तसंच करायचं असं ठाकूर म्हणतो. आम्हाला काय, भारी सॅलरी आणि गब्बरच्या अड्ड्याची टेहेळणी करायच्या दिवशी एक्स्ट्रा टी.ए.डी.ए. विथ ओवरटाईम मिळणार आहे त्यामुळे नो टेंशन.
चल, आता लॅप्टॉपची बॅटरी संपत आलीय आणि इथे रात्री लाईट जाते त्यामुळे थांबतो. हा जयपण मोठ्याने, 'संपत इथे घाबरत नाही, मला तुझी आठवण येते' कायतरी बोर गाणं म्हणून राहिलाय मगापासनं. कोण संपत कोण जाणे, 'ये जो है जिंदगी'वाली स्वरुप संपत असेल, आपल्याला जाम आवडते ती! त्यातलं 'तुझी आठवण येते' हे मात्र आपल्याला आवडलं. असं डायरेक्ट पाहिजे. आपल्यालापण तुझी आठवण येते.

"रोझेस आर रेड व्हायोलेट्स आर ब्ल्यू
बसंती आय लव यू, युवर्स ओन्ली .. वीरू"
नादखुळा हाय का नाय आपली पोएम ? रीप्लाय लवकर पाठव. तोपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करून घे.

तुझा
वीरु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

... हा प्रश्न इथे लिहिल्याबद्दल सर्वप्रथम क्षमायाचना

मी मायबोलीवर नवीन सदस्य आहे.
काही दिवासान्पूर्वी विनोदी लेखन या सदरात मी एक धागा लिहिला आहे. .. अजुन एक फु बाई फु या नावाने.
पण मला अस वाटतय की तो या सदरात दिसत नाही आहे.
मी लोगिन केले असता मला तो धागा इथे दिसतो .... पण लोगिन केले नसेल तर दिसत नाही...
पण लोगिन केले नसतानाही इतरान्चे धागे वाचता येतात.....
क्रुपया मार्गदर्शन करा की तो धागा इथे कसा दिसेल?

धन्यवाद

बहुतेक लेखक( खात्री नाहीये का लेखक असल्याबद्दल) ती विनोदी कथा सार्वजनिक केली होती का? किन्वा काय अडचण आली? की चूकुन डिलीट झाली ते तपासा. नाहीतर अ‍ॅड्मीनच्या विपुमध्ये विचारा.

धन्यवाद रश्मी

मर्गदर्शनाबद्दल धन्यवाद ....

...अगदी खरे बोललात .... अजून खरच खात्री झाली नाही...
ज्या दिवशी ती होईल त्या दिवशी "बहुतेक" ला कात्री..

Pages