आनंदाचे डोही

Submitted by सई केसकर on 11 October, 2013 - 03:26

"तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे शोधून काढायचं असेल तर तुमचं मन वारंवार कुठे भरकटत जातं याकडे लक्ष दिलं पाहिजे", या अर्थाचा सुविचार/सल्ला मी आंतरजालावर वाचला होता. आजूबाजूला बघितलं तर हे बहुतांशी खरं वाटतं. कधी कधी आपल्या क्षेत्रातील कामातही आपल्याला खूप अवडणारं एखादं काम असतच. आणि ते आपल्याला करायला मिळेलच याची हमी देत येत नाही. पण या सगळ्या चिंता सोडून आपण पळून जातो तेव्हा कुठे जातो हे बघणे महत्वाचे आहे. आठ तास संगणकासमोर बसलेले लोक पूर्ण वेळ काम करत नाहीत हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते (स्टॅटकाऊंटर जिंदाबाद). त्यामुळे आंतरजालावर तुमचं मन कुठे कुठे भटकायला जातं याची यादी केलीत तर तुमच्या उपजीविकेप्रमाणेच तुमची जीविका कुठे आहे हे लक्षात येईल.

गेलं वर्षभर माझा हा प्रवाह "आनंद शोधाकडे" आहे. आपण आनंदी का आणि कशामुळे होतो, आपल्या आनंदाला आपण आणि आपली परिस्थिती कितपत कारणीभूत असतात? या प्रश्नांचा पाठलाग करताना मला काही उत्कृष्ठ टेड टॉक्स आणि पुस्तकं सापडली. त्याबद्दल हा पोस्ट.

टेड या संकेतस्थळावर जगभरातील नामवंत साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार, समाजसुधारक, तंत्रज्ञ आपापल्या विषयावर भाषणे देतात. हे टॉक्स आपल्याला मोफत ऐकायला मिळतात. त्यातील पॉझिटीव्ह सायकॉलॉजीचे काही टॉक्स रंजक आणि पुन्हा पुन्हा बघावेत असे आहेत. त्यांची व्हॉट मेक्स अस हॅपी ही मालिका नक्कीच वेळ काढून बघण्यासारखी आहे. पण त्यातही बॅरी श्वार्ट्झ यांचा द पॅरडॉक्स ऑफ चॉईस हा टॉक पाहण्यासारखा आहे.

माणसाला खूप सारे विकल्प दिले तर त्याचा आनंदाचा शोध सोपा होईल या तत्वावर आजचा समाज धावतो आहे. भारतात ९०-९१ च्या आधी जी परिस्थिती होती ती आता नाही. तेव्हा "नूडल्स" म्हणजे "मॅगी" आणि वनस्पती घी म्हणजे "डालडा" (पिवळा डबा, विथ नारळाचं झाड) अशी समीकरणं होती. आता आपली सुपरमार्केट्स आणि मॉल्स जगाच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत. त्यामुळे खूप सारे ऑपशन्स असल्यावर कधी कधी संभ्रमात पडायला होतं आणि परिणामी आनंदशोधाच्या हायवेवर गाडी बंद पडण्याचे अनुभव सगळ्यांना येतात (वरसंशोधनातील आमचे अनुभव इथे योग्य ठरतील पण त्याबद्दल नंतर लिहू).

पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या शाखेचा उगम हाच मुळी 'माणसाला आनंद कशाने होतो?' या प्रश्नातून झाला. त्या आधी मानसशास्त्राचा ओढा 'माणसाला दु:ख आणि परिणामी मनोविकार (किंवा मनोविकार आणि परिणामी दु:ख) कशामुळे होतं?' या प्रश्नाकडे होता. या क्षेत्रात जॉनथन हेड्ट यांचं काम मोलाचं आहे. आजकालच्या जगात धार्मिक विचारांचं महत्व कमी झाले आहे. त्यांचं हॅपिनेस हायपोथेसिस हे पुस्तक वाचनीय आहे. त्यात हेड्ट यांनी जगातील सर्वात जुन्या धर्मांच्या शिकवणी आणि त्यातील आपल्या चिरंतन आनंदासाठी कारणीभूत असलेल्या काही रिती/विचार आजच्या पिढीला समजेल अशा भाषेत व्यक्त केले आहेत.

या पुस्तकातील "अ‍ॅब्सोल्यूट फ्रीडम" वरचे त्यांचे भाष्य वाचनीय आहे. सगळी सामाजिक आणि नितीमत्तेची प्रस्थापित मुल्य झुगारून जगण्यार्‍या माणसांमध्ये एकटेपणा येण्याचे प्रमाण जास्त आहे असे दिसून आले आहे. कारण पूर्ण स्वतंत्र्याबरोबर ज्या जबाबदार्‍या येतात त्या पेलणं कठीण असतं. आनंदी राहण्यामागे दुसर्‍याच्या आनंदात सहभागी होणं/दुसर्‍याच्या आनंदाची जबाबदारी घेणं याही गोष्टींचा समावेश होतो.

तसंच एखाद्या गोष्टीत "हरवून जाणे" याचाही आपल्या आनंदाशी जवळचा संबंध आहे. अर्थात हे भारतीय तत्वज्ञानात पावलोपावली वाचायला मिळतं. ईश्वराशी एकरूप होण्याबद्दल किंवा आपल्या कामाशी एकरूप होण्याबद्दल आपल्या पुराणात खूप लिहिले गेले आहे. पण जेव्हा मिहाली चिकसेंटमीहाय सारखा मानसशास्त्रज्ञ त्याचा दाखला देतो तेव्हा अर्थातच त्याला अजून महत्व प्राप्त होतं. Wink
पण याचा अनुभव आपल्याला नक्कीच येतो. एखाद्या कामात पूर्णपणे हरवून गेल्यामुळे जेवण करायला विसरलो तर तो दिवस जास्ती चांगला जातो.

अ‍ॅलन द बॉटन यांचा यशस्वी होण्याच्या व्याख्यांबद्दल बोलणारा हा टॉकदेखील अंतर्मुख करणारा आहे. त्यांची खुमासदार शैली आणि मुद्देसूदपणा यामुळे तो अधिक प्रभावी ठरतो. जगातील आपली प्रतिष्ठा किंवा आपल्याला मिळणारं प्रेम हे आपल्या ऐहिक आणि सामाजिक प्रगतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कित्येक वेळा आपण आपल्याला जे मनापासून आवडत नाही ते केवळ त्यामागे असलेल्या प्रतिष्ठेसाठी करतो. आणि त्यातून नेहमीच आपल्याला आनंद मिळेल अशी खात्री देता येत नाही.

शेवट मात्र माझ्या आजोबांच्या दोन आवडत्या कवितांनी करावासा वाटतो. आजोबा नेहमी दोन परस्परविरोधी कविता म्हणायचे.

पहिली म्हणजे शूर शिपाई

मळ्यास माझ्या कुंपण पडणे कधी न मला साहे
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे (केशवसुत)

आणि दुसरी

असे मी करावे तसे मी करीन
वृथा वल्गना मानवाच्या अजाण
स्थितीचा असे किंकर प्राणीमात्र
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र (माधवानुज)

पण थोडा विचार केला की लक्षात येतं की योग्य वेळी योग्य कविता आठवून मनाची समजूत घालण्यातच खरी आनंद यात्रा आहे. आपल्याला हवं तेच होईल किंवा आपल्याला हवं तसं कधीच होणार नाही हे दोन्ही पर्याय पूर्णपणे बरोबर नाहीत. आणि या पर्ययांकडे बघण्याआधी आपल्याला काय हवंय हे समजणं आनंदी होण्यासाठी (राहण्यासाठी) अधिक महत्वाचं आहे.

ब्लॉग लिंक : http://saeechablog.blogspot.in/2013/10/blog-post_11.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आपली सुपरमार्केट्स आणि मॉल्स जगाच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत. त्यामुळे खूप सारे ऑपशन्स असल्यावर कधी कधी संभ्रमात पडायला होतं आणि परिणामी आनंदशोधाच्या हायवेवर गाडी बंद पडण्याचे अनुभव सगळ्यांना येतात >> +१

टेड वर शीना अयंगार यांचे या बद्दलचे भाषण पण ऐकण्यासारखे आहे
http://www.ted.com/talks/sheena_iyengar_on_the_art_of_choosing.html

मायबोलीवर प्रसिद्ध सोशल सांयटिस्ट म म टण्याशास्त्री बेडेकर यांची झुमु थेअरी पण हेच सांगते नाही का ?

योग्य वेळी योग्य कविता आठवून मनाची समजूत घालण्यातच खरी आनंद यात्रा आहे.>> कवितेची आनंदयात्रा प्रताधिकार मुक्त मात्र नाही सई Proud

त्यामुळे खूप सारे ऑपशन्स असल्यावर कधी कधी संभ्रमात पडायला होतं>>जितके पर्याय जस्ती तितके पावलोपावली निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय आज पालकाची भाजी करावी की मेथीची हा असो किंवा ह्या मुलाशी लग्न करावे की त्या असा असो निर्णयप्रक्रिया ताण निर्माण करते आणि आनंदयात्रेत अडथळे निर्माण करते.

>> खूप सारे ऑपशन्स असल्यावर कधी कधी संभ्रमात पडायला होतं आणि परिणामी आनंदशोधाच्या हायवेवर गाडी बंद पडण्याचे अनुभव सगळ्यांना येतात

खरं आहे. Happy

पण सुखाला काही फॉर्म्यूला असेल का? मुळात पूर्ण सुख अशी काही स्थिती शक्य आहे का? 'पुन्हा पुन्हा दिसत राहिली न घेतलेली तीच वाट' - याला औषध नाही, आणि नसावंही. कमतरतेची जाणीवच मार्गक्रमणेचा 'मोटिव्ह' असते ना? नाहीतर ठप्पच की! असो. एक आपलं मुक्त चिंतन. Happy

बाकी लिंका बघते.

शूम्पी | 11 October, 2013 - 05:59
आणि निर्णय आज पालकाची भाजी करावी की मेथीची हा असो किंवा ह्या मुलाशी लग्न करावे की त्या असा असो ...
>>> बरोबर आजकाल ऑप्शन्स वाढले आहेत मुलाशीच लग्न कराव का मुलीशी. आणि इतर बरेच Wink

सई केसकर | 11 October, 2013 - 07:38
@ शूम्पी

हा हा. आजोबा नेहमी कवीचं नाव सांगायला विसरायचे!

>>पहिली केशवसुत, दुसरी माधवानुज.

लेख छान आहे.

हा शोध न संपणाराच. कारण आज ज्या गोष्टीने आनंद होतो आहे त्याने अजून पाच वर्षांनी होईल याची खात्री नाही. कधी कधी वाटतं सुखाला फारच फाटे फुटलेत त्यामुळे पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनीं होणारा आनंद हिरावून घेतला गेला आहे. नवनवीन आकर्षणे, सुविधांनी आनंदाच्या व्याख्येवर कुरघोडी केली आहे. Sad