Submitted by चाऊ on 3 October, 2013 - 03:52
सुख अतिच जाहले
सुख सोसवत नाही
भरुन वाहुन चालले
हाती मावतही नाही
केली माया गोळा
मोठे इमले बांधले
गेली पिले उडुनिया
घर एकटे राहीले
धन जाळाया नवे
नको नको ते उपाय
खोवूनिया मोरपिस
काक लागले नाचाया
लोभ सत्ता संपत्तीचा
सर्व हवे फक्त मला
सारा कल्लोळ उत्सवाचा
मुका, आवाज आतला
चहुकडे मांडला
सुखासिनतेचा बाजार
कष्ट नाही शरीराला
भेटे नवा नवाच आजार
नाही थांबायाला वेळ
उरीपोटि धावताना
हे सारं कशासाठी
स्वत:लाच विचाराया
मला काय आवडते
मनाला ठाऊक नाही
हवे हवेच्या ध्यासात
दूसरे काही सुचत नाही
ह्या वेगाच्या वेडात
सुखामागे लागायचे
लक्ष्मीच्या उपासनेत
सरस्वतीला विसरायचे
आहे घरी सर्व काही
रात्री शांत झोप नाही
विवंचना हव्यासाची
सुखे जगु देत नाही
मोठ्या उजेडाच्या पायी
वात मोठी ढणाढणा
खेळ संपे वेळेआधी
आवर रे वेड्या मना
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोठ्या उजेडाच्या पायी वात
मोठ्या उजेडाच्या पायी
वात मोठी ढणाढणा
खेळ संपे वेळेआधी
आवर रे वेड्या मना
छान लिहिलेय.
धन्यवाद.
धन्यवाद.
छान मांडलंय. अती सुखलोलुपतेचं
छान मांडलंय.
अती सुखलोलुपतेचं पर्यवसन अखेर दु:खात होतं हे शेवटच्या कडव्यात छान मांडलंय.