नसून खोळंबा असून...

Submitted by दाद on 2 October, 2013 - 04:12

रोज सरळ सूत असलेली भांडी, उपकरणं अंगात आल्यासारखी भूत होतात का तुमच्यात?. का माझ्याच बाबतीत हे?

एकाच किंवा वेगवेगळ्या साईजच्या डब्यांचे सेट नेहमीच घेतो आपण. स्टीलच्या अशा डब्यांचं तर एक "इटालियन" भरगच्चं कुटुंब आहे माझ्याकडे. इटालियन अशासाठी की असे खूपच आहेत... एकाच मापाचे आणि एकात एक बसतील असेही.
पण एखाद्या दिवशी डबे आणि त्यांची झाकणं एकमेकांचा संबंध नसल्यासारखी का वागतात ते काही कळत नाही. कालपर्यंत सुखनैव झाकण लावू देणारा डबा, एकदम एल्गार करतो. डब्याच्या गळ्यापर्यंत येईल असं तूप (अजून पातळच) मी दुपारीच गाळलय त्यात. मीठाची कणीही टाकलीये. आता छान कणी धरेल तुपाला.. थंडही झालय म्हणून त्याचं म्हणून जे झाकण असतं ते लावायला जाते आणि...
आणि काही नाही. ह्या झाकणाचा आपल्याशी दूरान्वयेही काहीही संबंध नसल्यासारखा डबा आणि झाकण दोघेही एकदम एकमेकांशी फटकून. ’खाईन तर तुपाशी...’ असल्या आगाऊ आवाजात "लावून घेईन तर "तेच" झाकण..." असली अचरट म्हण माझ्यावर तोंडावर फेकल्यासारखा डबा मख्खं उभा.
झाकण ’ते तू आणि डबा काय ते बघून घ्या’ असल्या अविर्भावात उताणं निवांत.

आता "तेच" म्हणजे कुठलं? ते त्या इटालियन वंशावळीतून मी शोधायचं. केलं. ते ही केलं. मेल्याला एकही झाकण पसंत नाही. सगळं अगदी उंची, साईझ जुळवूनही... नाहीच!

बरं... हा तूपाचाच डबा. तूप ह्या डब्याला काही नवीन नाही... झाकणही नाही अशी माझी खात्री आहे... पण डोकंच फिरलं म्हटल्यावर काय करणार?

इतरवेळी थोडा तिरपा करून, दामून दपटून, तोंड दाबून बुक्क्यांचा वगैरे देत मी लावलं असतंच "हे" ही झाकण. पण तुपाचं निमित्तं मिळाल्यावर मलाच कोपर्‍यात घेतल्यासारखं केलय डब्यानं.

इतकच नाही... झालच तर प्रेशर कूकरची रिंग, दरवाज्याचा नॉब किंवा अख्खा दरवाजाच, मिक्सर/ग्राइंडर, कॅन ओपनर, सायकलची किंवा पॅन्टचीही चेन... एखाद्या दिवशी लयच ऍटिट्यूड दाखवतात.
तुमच्यात होतं असं काही? का माझ्याच बाबतीतच आहे हे?
आत्ता ठीक होतं.. आत्ता काय झालं? अशा वागतात का तुमच्याशी वस्तू?
(मुद्दाम वस्तू म्हटलय बायको, नवरा, मुलं, मैत्रिणी, मित्रं वगैरे सजीव ह्यात शक्यतो आणू नका)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, मी पण सिंह..
पण माझ्या बाबतीत सहसा असे होत नाही, माझा एक दणका पुरेसा असतो.
आमच्या बिल्डींगची एक लिफ्ट आमच्या मजल्यावर उघडत नाही. पण मी आतून आणि बाहेरूनही असा काही ठोसा लगावतो, कि गुमान उघडते.

आणि काही नाही. ह्या झाकणाचा आपल्याशी दूरान्वयेही काहीही संबंध नसल्यासारखा डबा आणि झाकण दोघेही एकदम एकमेकांशी फटकून. ’खाईन तर तुपाशी...’ असल्या आगाऊ आवाजात "लावून घेईन तर "तेच" झाकण..." असली अचरट म्हण माझ्यावर तोंडावर फेकल्यासारखा डबा मख्खं उभा.
झाकण ’ते तू आणि डबा काय ते बघून घ्या’ असल्या अविर्भावात उताणं निवांत.

Lol मस्तच.

मामी.. कहर आहे हा
वत्सला... Lol

एकदा ऑफीसमधुन उशीरा आले.. ठरवलं की पट्कन एका कुकरमधे मुग शिजवु नि दुसर्यात भात करु .. पण कुठचं काय.. स्टील कुकर सूं सूं करत वाफ सोडु लागले मधेच.. मग सरळ दोन्ही मिसळुन मुग भात केला .. हाकानाका
वर आईला नवीन रेसिपी म्हणुन खपवली Wink

कुकर चांगले असतात बिचारे... झाकणं आणि रिंगा.. नतद्रष्टं.
पावाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीला लावलेला टॅग.. तो नेमका मी काढताना... दोन तुकडे. (आमचं कसं होत नाही असं? ह्या प्रश्नाचा मला निव्वळ राग राग आहे).
मग पाव खाताना ... 'आता पिशवीला टॅग?' असा एक तलवार प्रश्नं डोक्यावर टांगलेला असतो.

ऑफिसात डिप डिप करून घ्यायचा चहा... किती निरुपद्रवी कृती आहे.
नाही... ती चहाची पिशवी फाटकी(च) असते. मग तो चहा... चहाला धक्का न लावता कपात बघत बघत प्यायचा.

आमच्या बिल्डींगची एक लिफ्ट आमच्या मजल्यावर उघडत नाही. पण मी आतून आणि बाहेरूनही असा काही ठोसा लगावतो, कि गुमान उघडते. >>> Lol हे धमाल आहे. दिनेशदा, याचा एक व्हिडिओ हवाच!

मिक्सर तर नेहेमीच मोक्याच्यावेळीच बंद पडतो. यावेळी दुसर्‍या दिवशी ट्रिपला जायचे होते. तिकडे नेण्यासाठी १० माणसांसाठी भरपुर होईल अशी पाव भाजी करायची होती. म्हटले मिक्सर / फु प्रो असल्यावर कितीसा वेळ लागणार? सगळे आवरुन (अर्थातच रात्री उशीरा) भाजी चिरायला घेतली आणि फु प्रो ने राम म्हटले.

सकाळी डबे भरायच्या गडबडीत तर सगळ्याच डब्यांच्या अंगात येतं, अगदी नित्यनेमाने. तेच डबे संध्याकाळी शहाण्यासारखे वागतात.

तुमच्यात होतं असं काही?

यात तुमच्यात आमच्यात, तुमच्याकडे, आमच्याकडे, १० वर्षांपूर्वी, असे काही नसते

यावच्चन्द्रदिवाकरौ, हे असेच चालणार. कालनिरपेक्ष आहे.

त्यात फक्त नवीन गोष्टींची भर पडत असते - कार, काँप्युटर, फोन,

कंटाळा येऊ नये म्हणून मधून मधून लागलेले झाकण उघडतच नाही. माझ्या बाबतीत तर आत्ता इथे ठेवला होता चष्मा, (किल्ल्या, कागद, अमुक, तमुक) एवढ्यात कुठे गेला असेहि होत असते.

सारा मायेचा प्रभाव आहे हो. वृथा शोक करू नका!!

देवनागरीत टाइप करायच्या मजकुराचा उल्लेख झालाच आहे. मला अन्य कुणासाठी असा काही मजकूर टाइप करून द्यावा लागतो. (त्याचे मराठी बोलायचे वांदे आहेत, टाइप करेपर्यंत युगे लोटतील.) त्याने त्याच्या पीसी+प्रिंटरवर ते प्रिंट करावे म्हणून पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करुन नेले. मजकूर मॉनिटरवर अगदी नेटका दिसत होता. पण प्रिंट काहीतरी अगम्य आले. नेमका एक तंत्रज्ञ त्याचवेळी तिथे हजर होता. त्याने कशावर टाइप करता? बरहावर कशाला करता ? गुगलचे सॉफ्टवेअर /अ‍ॅड ऑन्स डाउनलोड करून वापरा, असे बसल्या जागेवरून सांगितले. आता मी माझ्याच काँपवरून प्रिंट करून देतो

प्रिंटर कार्ट्रिज बदलणे हाही ब्लडप्रेशर वाढवण्यासाठी उत्तम व्यायाम आहे. नवा प्रिंटर आणला, तेव्हा रंगीत आणि कृष्णधवल कार्ट्रिजमधली जी पहिली लावली ती चुकीच्या स्लॉटमध्ये. काही केल्या निघेना. हेल्पसेंटरला फोन केला तर म्हणे बोरिवलीहून अंधेरीला घेऊन या. कार्ट्रिज काढायला जोर लावला तर प्रिंटरला नुकसान पोचेल म्हणे. ते कसेबसे माझे मीच निस्तरले.
आता प्रत्येक वेळा कार्टिज बदलली की टेस्ट प्रिंट घ्या, ते स्कॅन करा. त्याशिवाय तुमचे कामाचे प्रिंट काढून देणार नाही म्हणजे नाही. परवाच कार्टिज बदलली. टेस्ट प्रिंट आले. कामाचे प्रिंट काही येईना. शेवटी सगळे तंत्रज्ञ सांगतात तो हमखास उपाय केला. सगळ्या वायरी काढून परत लावणे. प्रिंटर दुसर्‍या पोर्टला कनेक्ट केल्यासरशी सुतासारखा सरळ.

कुकरचे झाकण आणि रिंग : आताच्या कुकरच्या हँडलला एक झिरो प्रेशर डिव्हाइस आहे. कुकर लावताना ते पुढे ढकलायचे. झाकण अडकवले जाते. प्रेशर पुरेसे उतरल्याशिवाय ते डिव्हाइस मागे होत नाही. झाकण उघडता येत नाही. एकदा वरणभाताचा कुकर लावताना झाकण नीट लावले गेले नाही. ते डिव्हाइस अर्ध्यात अडकले. झाकणाशी बराच वेळ भांडण केले. कुकर-मिक्सर इ. रिपेअर करणार्‍याला , तुम्ही घरी येऊ शकता का? विचारले. (भरलेला कुकर कसा घेऊन जाणार म्हणून). अर्थातचच तो येणार नाही. मग कुकरमधले सगळे पाणी ओतून, मिळेल त्या फटीतून (झाकण नीट न लागल्याने राहिलेल्या) पक्कड(किचनमधलीच) खुपसून एकदाचे सोडवले.

झक्कीकाका, अहो हवा नका काढून घेऊ... इथे तिरिमिरीने तावातावाने "त्यां"च्या विरुद्ध चार गोष्टी बोलून मन मोकळं करायचं आहे. (त्या'च्यापैकी कुणीही मायबोलीवर येत नसल्याची खात्री असल्यानेच).
तुमचा चष्मा ना?... घाला चार शिव्या इथे... आपणच सुतासारखे होतो मग (तो नाहीच).

मला नुक्ताच लागलाय, वाचायला. एकदा वापरायला लागलो आणि सवय झाली की त्याच्या अंगात येतं. लपाछपी. आत्ता इथे होता...
ह्याचं उत्तर सध्या डोक्यावर आहे असंही येऊ शकतं. माझी कलीग आहे, माया (नावाची)... तिच्या प्रभावाने सापडला.. पण एकदाच... माझ्याच डोक्यावर चढवलेला.
तुमच्याकडे माया कोण?
(काका, चिडू नका प्लीज).

ऐन थंडीत रात्री उशिरा ऑफिसमध्ये थांबलेलो असताना ऑफिसच्या पार्किंग लॉट मध्ये टायर पंक्चर होणे. स्नोच्या तडाख्यात गाडी घसरणे आणि मोबाईल त्यावेळी चार्ज नसणे.
घरातली कुठलीही गोष्ट बायकोने आणायला सांगितली की शोधूनही न सापडणे आणि तिला एका मिनिटात सापडणे. दूरदर्शन संचाचा रिमोट शोधायला गेलो की असतील नसतील ते रिमोट सापडणे. रिमोट सापडलाच तर त्यातले सेल पोराच्या खेळण्यात गेलेले असणे, सगळं व्यवस्थित झाल आणि छान आरामात बसून टी व्ही लावायचा प्रयत्न करावा तर टी व्ही वरून बंद असणे. असं झालाय ते चटकन न समजणे. ज्याला समजेल त्याने दुसऱ्याची जाम टिंगल करणे.
आणि अशा गोष्टी वारंवार होऊनही (त्या गोष्टींनी) न सुधारणे.

दाद.............मस्तच! शेवटची टीप भारी!
हे धमाल आहे. दिनेशदा, याचा एक व्हिडिओ हवाच!>>>>>>>>>>+100

दाद, मी पण सिंह..
पण माझ्या बाबतीत सहसा असे होत नाही, माझा एक दणका पुरेसा असतो.
आमच्या बिल्डींगची एक लिफ्ट आमच्या मजल्यावर उघडत नाही. पण मी आतून आणि बाहेरूनही असा काही ठोसा लगावतो, कि गुमान उघडते.>>>>>>>>>>>>>>>>>>

सिंह आहे हो ते मामी, त्यांनी नुस्ता आवाज केला तरी मुकाट उघडेल लिफ्ट बिचारी. बाकी तुम्हाला त्यांचा आवाज हवा असेल, तर रेकॉर्ड करुन घ्या आणि मलाही पाठवा. आमच्याही लिफ्टसाठि कामात येइल. Happy