‘कास’ची ‘आस’

Submitted by ferfatka on 1 October, 2013 - 12:53

DSCN4586.jpg
रविवार साप्ताहिक सुट्टीचा वार अर्थातच घरी बसणे शक्य नव्हते. नवीन कुठेतरी हिंडायला जाणे ओघाने आलेच. बरेच वर्षांपासून ‘कास’ पठारचे नाव ऐकून होतो. तेव्हा कुटुंबकबिला घेऊन कास पठारावर जाण्यासाठी निघालो. लवकर निघाता निघाता सकाळचे ९.३० वाजले. सातारा मार्गे जाताना कात्रजचा १२० रुपये टोल व आणे येथील ८० रुपये जाऊन येऊन असा २०० रुपये टोल भरून आम्ही पुढे निघालो. एवढा टोल घेऊन सुद्धा रस्त्याची अवस्था काही सुधारत नाही. वाटेत थोडी पेटपूजा करून साताºयात पोहचलो. नेहमीप्रमाणे वाट चुकून थोडे सातारा हिंडलो. थोडी विचारपूस केल्यानंतर कास कडे जाण्याचा मार्ग सापडला. कात्रज सोडल्यापासून आधे मधे पावसाची रिमझिम सुरू होतीच. येवतेश्वराचा डोंगर चढून कास पठाराकडे जाण्यासाठीचा मार्ग तसा छानच होता. छोटी छोटी वळणे घेत. उजव्या बाजूला सातारा शहराचे वाढते विस्तारीकरण पाहत. मागे अजिंक्यतारा किल्ला एकंदरीत छानच वातावरण होते.

DSCN4588 copy.JPG

पुण्याहून सातारा साधारणपणे १२५ किलोमीटर. तेथून २२ किलोमीटरवर कास पठार. तेव्हा ११.३० पर्यंत आम्ही कास पठारावर येवतेश्वरमार्गे पोचलो. येवतेश्वराच्या डोंगरावर सर्वत्र फुललेली पिवळी पाहून यापुढे कास पठार अजून सुंदर असल्याचे लक्षात आले. एव्हाना पाऊस थोडा भुरभुरच होता. पठाराकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा पर्यटक उत्साहाने या काहीच दिवस फुलणाºया फुलांचे स्वागत करण्यासाठी मैदानावर पसरलेली होती. अर्थात हातात कॅमेरे घेऊनच. कोणी मोबाईल कॅमेरा, कोणी महागडे डीएसएलआर कॅमेरे तर कुणी साधे कॅमेºयातून हे सौंदर्य बंदीस्त करण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही थोडो फोटो सेशन करून कासकडे जाण्यासाठी निघालो. पाऊसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली.

DSCN4611_0.jpg
रांगच - रांग

येवतेश्वरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतर पुढे गेलो असू नसू तर पुढे ४० ते ५० फोर व्हिलरच्या रांगा दुतर्फा लागलेल्या दिसल्या. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. एका ठिकाणी हॉटेलच्या बाहेर फोर व्हिलर लावलेल्या दिसल्या. गर्दी चांगलीच असल्याचे आता जाणवायला लागले. हळूहळू तेथूनही आम्ही पुढे गेलो. कासकडे जाणारा रस्ता दुतर्फा हिरवळ व पावसाने चिखलमय झाला होता. साधारणपणे दोन फोरव्हिलर गाड्या शेजारून जेमतेम जाईल एवढच रस्ता असल्याने वाहने सावकाश हाकावी लागत होती. येवतेश्वरावर पोहोचोस्तोवर आम्हाला १२.३० झाले होते. तेथून गाडी हळूहळू पुढे सरकत होती. वाटेत पायी चालत येणाºया पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसायला लागते. पठाराकडून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर विचित्रच भाव होते. जो तो ‘परत मागे फिरा’, पुढे तीन ते चार किलोमीटर रांग आहे. पुढे हजार एक गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. शहाणे असला तर परत गाडी फिरवा असे प्रत्येकजण सांगत होता.
तरीही ‘कास’ची ‘आस’ काही कमी होत नव्हती. गोगलयगायीच्या गतीने आम्ही मार्ग पुढे ढकलत होतो. एव्हाना दुपारचे २.३० वाजले होते. गाडीत बसून, आता वैताग व चिडचिड व्हायला लागली होती. पण कासला काहीही करून जायचे असे ठरवून हळूहळू गाडी पुढे रेटत होतो. वाटेत एका ठिकाणी रस्त्यावर खाली चिखलात रुतलेली क्वॉलीस पाहिली. तिची दुरवस्था पाहून भीतीही वाटली.
गाडीत बसूनबसून माझ्या लहान मुलाने चुळबूळ करायला सुरूवात केली. कधी पोहचणार फुलं बघायला. चला ना घरी. अशी बडबड सुरू केली. समोरून येणाºया माणसाला अजून पुढे किती गर्दी आहे हो? असे विचारले तर शहाणे असलात तर मागे फिरा. ‘च्यायला’ फुल ट्र्ॅफिक जॅम आहे?’ असे म्हणून गावरान शिवी हासडत हे महाशय पुढे गेले. अस्सल सातारकरांच्या भाषेत रांगडे उत्तर मिळाल्याने आजूबाजुचे प्रवासीही हसू लागले. येणाºया-जाणाºया प्रतिक्रिया पाहून मुलानेही ‘‘बाबा चला ना मागे जाऊ या. एवढी लोक सांगाताहेत ना? मग मागे का घेत नाही?, एक नंबरचे हट्टी आहात (बहुधा बायकोचे शब्द मुलाच्या तोंडात) अशी ट्याँव ट्याँव सुरू केली. पावसाचा जोर एव्हाना चांगलाच वाढला. रिमझिम पडणाºया पावसाने आता धो-धो बरसायला सुरूवात केली होती.

कसली फुलं पाहायची मला मेलेलीला? :
एवढ्या लांब येऊन फक्त काही किलोमीटरवर असणारे कास पठार न पाहण्याचे मन काही धजवेना. घरून आणलेले फराळाचे सामान, बिस्किटे आता संपली होती. तेवढ्यात एका बार्इंंनी आमच्या गाडीच्या काचेवर हात मारून दार उघडण्यावी विनंती केली. ‘या आजींना जरा बसू देता का? आमची गाडी मागे ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. आम्ही चालत पुढे आलो आहोत. पण आम्ही पुढे जाणार असल्याचे सांगितल्यावर त्या चालेल म्हटल्या. मी ही मदत करण्याच्या भावनेने ठिक आहे असे म्हणून बसण्यास जागा देऊन पाणीही दिले. विचारपूस करता आजीबार्इंनी सांगितले की प्राधिकरणातील (निगडी) महिला बचत गटाच्या ५० महिलांबरोबर ७०० रुपये देऊन एका टुरिस्टवाल्याबरोबर येथे आले. मात्र, वय झाल्याने आता पुढे चालवत नाही. दमही लागला आहे. मी गाडीतच बसते असे पहिल्यांदा म्हटले होते. मात्र, या बार्इंनी ऐकलेच नाही. मला ही घेऊन त्या निघाल्या. कसली फुलं पाहायची या वयात माझ्या सारख्या मेलीला.’ आम्ही विषयांतर केले. आजी बाई कुठे राहतात असे विचारून घरी कोण असते? मग त्यांनीही तुम्ही कोण? कुठून आला? असे प्रश्न विचारून जरा आमचाही वेळ गेला. दहाच मिनिटात थोडे ट्रॅफिक पुढे सरकारली. समोरून मघाशी आजीबार्इंना सोडून गेलेल्या बाई परत आल्या व आम्ही माघारी जात आहोत. असे सांगून या आजीबार्इंना घेऊन गेल्या. गाडी एव्हाना दोन किलोमीटर अंतरावर पुढे गेली होती. दुपारचे तीन वाजले होते. पावसाची रिमझिम सुरूच होती.

कास पाहण्याची खुमखुमी :

कासपठार अजूनही पुढे २ ते ३ किलोमीटरवर होते. अजुन अंगात चांगलीच खुमखुमी होती. गाडी थोडी साईडला लावून पुढे चालत जाण्याचा निर्णय मी घरच्यांना सांगितला. त्यांनीही जरा बिचकतच होकार दिला. छत्री घेऊन गाडीतून बाहेर आलो. कासकडे पायी जाणाºया पर्यटकांबरोबर आम्हीही निघालो. एवढी जत्रा कशासाठी चाललेली आहे याचा विचारही मनात आला. आता पर्याय नव्हता. कासवर जाणे व तेथील फुले पाहणे हे मनात निश्चित केले होते. समोरून येणारे पर्यटक हातात पिवळी फुले दाखवून ‘पुढे अशीच फुले आहेत कश्याला तंगडतोड करताय असा सल्ला देऊन पुढे जात होती. रिमझिम सुरू असलेला पाऊसाने आता मात्र, जोरात बरसायला सुरूवात केली. वाºयापुढे आमची नाजुक छत्री थोडीच टिकणार. एकदा उलटी सुलटी होऊन छत्रीने आपला पराक्रम दाखविलाच. तसे थोडे अंतर पुढे चालत गेलो. पाठीमागून संपूर्ण पाठ व पॅन्ट भिजली होती. कॅमेरा सांभाळत पुढे जात असतानाच चिखलात पाय सटकून पडणारे पर्यटक ही पाहिले. क्षणभर हसू आवरेना. इतर पर्यटकही याचा पुरेपूर आनंद घेत होते. आपलीही अवस्था अशीच काहीशी होऊ नये म्हणून बिचकतच पुढे चालत होतो. एका हातात छत्री दुसºया हातात मुलाचा हात असा तोल सांभाळत चिखलातून पाय तुडवूत आम्ही जात होतो. पुढे एका ठिकाणी स्वयंघोषित काही कार्यकर्ते रिटर्न जाणाºया फोर व्हिलरला जागा करून देत होते. कोणाची गाडी चिखलात अडकलेली दिसली की काही तरुण टू व्हिलरवरून उतरून धक्का देऊन रस्त्यावर आणत होते. चिखलामुळे गाडीची चाके जागेवरूच फिरत होती. त्यात भर म्हणून टुरिस्ट घेऊन आलेल्या मोठमोठ्या गाड्या अंदाजे २० ते २५ गाड्या पाहून हे एवढे मोठे धुड कसे काय येथपर्यंत घेऊन आले याचे आश्चर्य वाटले. तेही गाड्या रिटर्न घेत होते. त्यामुळे अजूनच कल्ला होत होता.

धीर खचला :
सोसाट्याचा वारा, वरून पाऊस, हातात छत्री आणि लोकांनी घाबरवून सोडल्यामुळे आता मात्र, बायकोचा धीर खचला व परत जाण्याचे आदेश देऊन आम्ही आमची पायपीट थांबवून परत माघारी येण्यासाठी सुरूवात केली.
या आधीही पावसात ट्रेक केले. परंतु लक्षाजवळ जाऊन माघार घेणे कधीच नाही. मात्र परिवार असल्यामुळे माघार घेणे गरजेचे होते. कासला लांबूनच रामराम घेऊन आम्ही परत फिरलो खरं परंतु परतीच्या मार्गावर सुद्धा चांगलीच ट्रॅफिक जॅम होती. मात्र, खाली साताºयाकडे जाण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही. ५ वाजेपर्यंत सातारा गाठला. गरमागरम चहा, भजी खाल्ली थोडे ताजेतवाने होऊन परतीचा मार्ग धरला. मनात ‘कास’ची ‘आस’ तशीच होती. आज नाही परंतु पुन्हा कधीतरी नक्की कासला जाऊ असा निश्चिय करून परत फिरलो.

IMG_2919 copy.jpg‘कास’ आहे तरी काय?
निसर्गाचा चमत्कार म्हणजे ‘कास’चे पठार. या पठारावर वर्षातील काहीच महिने म्हणजे जून ते सप्टेंबरपर्यंत पृथ्वीतलावावर कुठेच न उगविणारी फुले उगवतात. कास पठार व परिसरात ८५० प्रजातींपेक्षा जास्त फुले असणाºया वनस्पती आढळतात. यामध्ये दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमधे समाविष्ट असणाºया सुमारे ४० विविध जातीतील फुलांचा समावेश आहे. येथील प्रत्येक फुले जास्तीत जास्त १५ ते २० दिवसांचे मेहमान असते. त्यानंतर त्याच्या जागी दुसºया जातीची फुले फुलतात. तांबड्या लाल मातीत फुलणारी हे फुले म्हणजे खरोखरोच निर्सगाचा चमत्कारच. महाबळेश्वर मधील पाचगणीचे पठारही विविध फुलांनी फुलते. तसे राजगड, रायगडावरही व अन्य किल्ल्यांवरही हा चमत्कार पाहायला मिळतो. मात्र, कासची तुलना इतरांशी होऊ शकत नाही.

मनातील

  • सातारा सोडून घरी परत येत असताना मनात खरंच कास पाहण्याचे गरजेचे होते काय? आपणाला तेथे जाऊन काय फायदा होणार होता? असे विचार सुरू झाले. माझेच प्रश्न माझीच उत्तरे असा संवाद होऊ लागला. त्यातून काही गोष्टी मला सुचल्या त्या येथे सांगावयासे वाटतात.
  • कासचे पठार हा निर्सगाचा चमत्कार वर्षातून काही दिवसच फुलणारी ही फुले पाहण्याचा मोह कुणालाही आवारणार नाही हे नक्की. फेसबुक, विविध टिव्ही चॅनल्सवरती कासचे दर्शन लोकांना घडू लागले. नेहमीची लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणांना आता पर्यटक कंटाळू लागले आहेत. तेव्हा काही तरी नवीन ठिकाणी एनजॉयमेंट करण्यासाठी कासकडे लोकांनी मोर्चा नेलेला आहे. मी त्यातलाच एक.
  • हा एक पर्यटनाचा भाग होऊ शकतो. असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, खरोखरच येथे जाणे प्रत्येकाला गरजेचे आहे काय? अभ्यासकांनीच येथील पुष्पांचा अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. शक्यतो अभ्यासकांनीच येथे जाणे गजरेचे आहे.
  • ‘वर्ल्ड हेरिटेज'च्या यादीत ‘पठारा'चा समावेश झाल्याने हंगामात पर्यटकांचा आकडा लाखांपर्यंत पोचतो आहे. पठाराला प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच पर्यटकांचा ओढा इकडे जास्त वाढत असल्याच्या बातम्या ही पेपरात वाचायला मिळतात.
  • वनविभागाने पर्यावरण संरक्षणासाठी येथे संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. पर्यटनकर लावण्यात आला आहे. मोठी बस १५०, कार ४० रुपये, प्रति माणसी १०, ट्यू व्हिलर १० रुपये, फोटो ग्राफीसाठी व्यावसायिक छायाचित्रकारांना १०० रुपये, पर्यटक कॅमेरे ५० रुपये असा कर बसविला आहे.
  • येथील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीही अनेक ठिकाणी होते. पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून आल्याने वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजनही यामुळे नक्कीच ढासळते. पोलिसांना गर्दी आवरत येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे. एवढे करून देखील फुले पाहण्यासाठी अनुकूल वातावरण असले तर ठिक नाहीतर धो-धो पावसात फुले काय दिसणार

. हा अनुभव ज्यांना घ्यायचा असले त्यांनी आवर्जुन कासाला जावे अन्यथा ‘दूरून डोंगर साजरे’ या प्रमाणे लांबूनच दर्शन बरे.

DSCN4615.jpgउपाययोजना :
१) कास पठाराच्या सुरूवातीलाच पर्यटकांकडून वसुली करावी. यासाठी ठिकठिकाणी वसुली बुथ उभे करून वेळ वाचवता येईल.
२) अवजड मोठ्या वाहनांना येथे जाण्यास बंदी करावी. यासाठी वनविभागाकडून स्वतंत्र्य वाहतूक योजना राबविल्यास ट्रॅफिक जॅमसारखे प्रश्न सुटून सर्वांनाच आनंद घेता येईल.
३) फुले तोडणाºयांवर दंड आकारावा.
४) येथे जाण्यासाठी आॅनलाईन सुविधेद्वारे नावनोंदणी करावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. हंगामात शनिवार व रविवारी २००० गाड्यांपेक्षा जास्त वाहनांना परवानगी देऊ नये.
५) येथे जाणे खरोखरच गरजेचे आहे काय? याचा विचार प्रत्येकाने करावा.

http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मनातले लिहीले आहे....
गेली काही वर्षे या कास ने जाम वैताग आणलाय...
जो तो उठतो तो कास ला जातो आणि कासला जुळणारे यमक टाकून फेसबुकवर पाच पन्नास फोटो टाकतो....आणि सगळ्याना टॅग करतो
गेल्या वर्षी तर मी सबंध पावसाळा भरून कासचीच फुले पाहिली फेसबुकवर..शेवटी कासची फुले असतील मला कृपया टॅग करू नका असे लिहावे लागले चक्क.
हे खरे तर सध्याचे फॅशन स्टेटमेंट झाले आहे...आम्ही कासला जाऊन फुलांचे फोटो काढून आलो...
बर्याच लोकांना फुलांची नावे पण माहीती नसतात आणि त्याहून कहर म्हणजे आपल्या प्रिय मैत्रिणींना तिथे बसून त्यांचेही फोटोसेशन करतात....

खरेच कासला जाणार्या संख्येवर मर्यादा घातली पाहिजे

छान अनूभव लिहिला आहे .यातून काहीजण बोध घेतील तर बरे होईल .मी तिकडे २००८ आणि २०१०मंबईहून रेल्वेने आणि नंतर एसटीने कास ,ठोसेघर ,सज्जनगड असे दोन दिवस शुक्रवार रात्री निघूते रविवारी संध्याकाळी कोयना गाडीने परत असा कार्यक्रम केला होता . त्यावेळी कोणीच नव्हते .पाचशे रुपये खर्च आला होता . आता परिस्थिती हाता बाहेर गेली आहे .*============================डिमांड मागणी वाढली की प्रवासी कंपन्या फायदा उठवत आहेत .मुंबईहून प्रत्येकी तीन साडेतीन हजाराचे पैकेज आहे .सर्वांचा आराखडा एकच आहे .शनिवारी (दुसरा चौथा) सकाळी निघणे .दुपारी एक सातारा ,हॉटेल चेक इन .रविवारी नाश्ता करून चेक आऊट .नउ ते बारा फुले पाहाणे .बारा ते दोन ठोसेघर पाहून परत रात्री आठला . ============================सर्वांच्याच बस एकाच वेळी येणार !ईतर पर्यटकही याच वेळी येणार .

हायला.
दोन वर्षामागे होता त्यापेक्षा जास्त धुडगुस आहे म्हणा की मग..
आमचं नशीब म्हणा किंवा आणि काय.
पण आम्ही मात्र दोन वर्षामागे सर्व बघु शकलो होतो.

तेव्हाही गर्दी होतीच.
छोटुकल्या रस्त्यावर गाडी पार्क करणे अलाउड नसताना (खरतर कासला वर गाडी घेवुन जाणेच अलाउड नव्हते. खाली पार्किन्ग होतं तिथुन वनविभागाने आणि एसटी महामंडळाने एसटीची व्यवस्था केलेली तरिही ), बामणोलीला जातोय असं सांगुन चार चाक्या पार्क करुन रस्ते अडवणारे महाभाग होते.
वेफर्सची पाकिटं, मोबाइलवरचा स्पीकर फोन लावुन गाणे ऐकणे वै वै वै बरच काही.

फुलं तुडवणारे पाहिले, फुलं आणि त्याची चिमुकली रोपटी तोडुन घरी नेणारे पाहिले आणि कळालं की अवघड आहे. सांगुन देखील फरक पडत नव्हता लोकाना...

असो.

https://plus.google.com/photos/113685262669821816210/albums/567296799271...

इथे काहि फोटो आहेत.
तरि आम्ही बरेच लेट गेल्याने कमीच मिळाले फोटो.

अरेरे!
त्यातल्या त्यात वीकडेजना कास प्रवास सुसह्य असतो!

याचा सगळ्यात जास्त त्रास सातारा-बामणोलीच्या नियमित प्रवाश्यांना होतो

एकूण कासला जाणार्‍या रस्त्याची रुंदी, पुढच्या गावांची होणारी गैरसोय लक्षात घेता नियंत्रित प्रवेश हाच एकमेव उपाय दिसतो.... सुरुवातीला तसा काहीतरी प्रयन्त झालेलाही पण नंतर सगळे का गंडले कुणास ठाऊक?

माझी तरी मानसिक तयारी नाही, कासला जाऊन हे सगळे प्रत्यक्ष बघायची.
त्यापेक्षा रोरायमा वर जाईन म्हणतो.

खरंच अगदी मनातलं लिहिलंय.

कास वाचवायचं असेल तर तिथं न जाणं हेच आपल्या हातात आहे. आमच्या पुरतं तरी आम्ही हेच ठरवलं आहे.>>>>>शांकली +१. मीही काहि वर्षापासुन कासला जाणं बंद केलंय. Happy

बाप रे! एवढी गर्दी असते का हल्ली? गर्दी वाढलीये असे ऐकत होतो, तुझ्या फोटोवरून प्रत्यक्ष कल्पना आली. मी गेलो होतो तेंव्हा तो खरच स्वर्ग होता. फुले तोडणे, त्यावर बसून फोटो काढणे असले प्रकार तेंव्हाही होते पण वहानांची गर्दी एवढी नव्हती. खूप हळहळलो हे वाचून.

एखादी व्यक्ती फुलांमध्ये बसली आहे असे फोटोत दाखवायचे असेल तर त्या व्यक्तीला खरोखरीच फुलांमध्ये बसवायची गरज नसते. कॅमेर्‍याच्या अँगलने ती किमया अगदी सहज साधता येते. आणि तेवढे फोटोग्राफीचे ज्ञान नसेल तर कासचे फोटो काय काढणार? नुसती नासाडीच होणार.

फुलांचा वर्षाव तेंव्हाच चांगला जेंव्हा ती फुले वार्‍याच्या झुळकीने आपल्या अंगावर पडतील. फुले तोडून ती अंगावर ओतणे हा प्रकार तर अत्यंत हिडीस आहे. कासवर फुले इतक्या मोठ्या प्रमाणात फुलतात कारण तो सडा झाडांकरता अत्यंत प्रतिकुल आहे. अशा प्रतिकुल परिस्थीतीत तगून रहायचे तर खूप मोठ्या प्रमाणात प्रजनन झाले पाहीजे आणि त्याकरता त्या झाडांकडे फक्त २-३ महीनेच असतात. असे असताना ती फुले तोडणे कीती जिवघेणे ठरू शकते हे फारच कमी जणांच्या लक्षात येते Sad

आपल्या प्रतिक्रियेबद्दल सर्वांनाच धन्यवाद.
मित्राला माझा कासचा अनुभव सांगितला. त्याने कासच्याजवळील ठोसेघरचा अनुभव सांगितला. तेथे ही ट्रॅफिक जॅम होती.
आशुचँप यांचे म्हणणे बरोबरच आहे. >>>जो तो उठतो तो कास ला जातो आणि कासला जुळणारे यमक टाकून फेसबुकवर पाच पन्नास फोटो टाकतो....आणि सगळ्याना टॅग करतो >>>

मला तर वाटते अशा निसर्ग सुंदर ठिकाणांची माहिती नेटवर, फेसबुकवर न टाकता कमीत कमी लोकांना कळेल याची काळजी निसर्गप्रेमींनी घ्यायला हवी. सह्याद्रीत असे चमत्कार अनेक ठिकाणी आहेत. मात्र, यातील काही ठिकाणे दुर्गम व चालत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने अद्याप तरी उत्साही पर्यटकांच्या कचाट्यातून वाचली आहेत.

माधव, व्यक्तीला फुलात का बसवायचे ? काय कल्पना निघतात ना एकेक !
साधारणपणे उंच कड्यांवर किंवा कुठल्याही ठिकाणी, जिथे बाहेरच्या जगाशी असणारा संबंध अगदी कमी असतो, तिथे ज्या प्रजाती निर्माण होतात त्या एकमेव असतात. इतर प्रजातींची जीन्स न मिसळल्याने आणि त्या प्रजाती बाहेर जाऊ न शकल्याने, त्यांचा प्रसार त्यांच्या क्षेत्राबाहेर होत नाही. पण जर इतकी वर्दळ वाढली तर टायर आणि बूट याद्वारे अनेक आक्रमक बियाणे तिथे पोचतील. कदाचित ती प्रक्रिया सुरुही झाली असेल.

अभयारण्यात जसे कोअर सेक्टर असते, जिथे पर्यटकांना प्रवेश नसतो तसे कासला करायला पाहिजे.
पण तरी परागकणांवर आधारीत फुलांची दुनिया, फार काळ सुरक्षित ठेवता येईल, असे वाटत नाही.

रोरायमा पर्वत, लेक मालावी, मादागास्कर, न्यू झीलंड अश्या ठिकाणी अश्या एकमेव प्रजाती आहेत. न्यू झीलंड
हा पूर्ण देशच त्यांच्या जैविक संपत्तीचे रक्षण करतो.

पुढच्यावर्षी सात वर्षांनी फुलणार्‍या कारवीचा ऋतू असणारेय बहुतेक.. तेव्हा तर मग बघायला नको.. यावर्षीही कासला एक दोन ठिकाणी आढळली आहे..

बाप रे! एवढी गर्दी असते का हल्ली?>> माधवा.. आहेस कुठे.. नविन पिकनीक स्पॉट झालाय.. अभ्यासकांना संशोधकांना ही गर्दीच मोठा अडथळा ठरू पाहतेय.

मात्र, खरोखरच येथे जाणे प्रत्येकाला गरजेचे आहे काय? >> +१

मलाही जायचे होते पण सगळ्यांचे फोटो बघुन नि हा लेख वाचुन प्लॅन कॅन्सल!!
आजच्या टाईम्सला - कास - भारताचे स्वित्झर्लंड या नावाचा लेख आहे

सहमत, आम्ही २ वर्षापूर्वी कासला गेलो होतो. गुरुवारी गेल्याने आम्ही १०-१२ जणच होतो, आणखी ५-६ लोकं नंतर आली तेवढच. त्यावेळी कुंपण नव्हते, प्रवेश कर नव्हता, पाऊस नव्हता.

सकाळी ७ ला कास पठारावर पोचून २-३ तास तिथे फिरून परत पुण्याला फिरलो. अजिबात गर्दी नाही, स्वच्छ्/सुंदर वातावरण, कचरा नाही / केलापण नाही.
पण आत्ता तू लिहिलयस तसं खरच फॅशन स्टेटमेंट झाली आहे 'कास' भेट म्हणजे. Sad

उपाय म्हणजे आप्ल्याकडून शक्य तेवढं प्रयत्न करायचं लोकांना सांगायचं, अर्थात पब्लिक वेगळ्याच मूड मध्ये असतं, वाईट म्हणजे ठोसेघर धबधब्याला पण आत्ता गर्दीचं ग्रहण लागलयं. अशा स्थळांना लोकांनी भेटी द्यायलाच पाहिजेत पण विकृतीकरण करता कामा नये धिंगाणा घालून.

माझ्या ऑफिसला येण्याच्या वाटेवर इतकी सुंदर रानफुले फुलतात की कासला जाण्याची गरज नाही असेच वाटते. Happy