शुभंकरोति

Submitted by vaiju.jd on 28 September, 2013 - 09:06

||श्री||

एके दिवशी दहा महिन्यांच्या युगंधरला कडेवर घेऊन आमची म्हणजे माझी आणि युगंधरची सायंप्रार्थना ‘शुभंकरोति’ म्हणून झाली तेवढ्यात मेधा, माझी सून मला म्हणाली ,’ किती बरे आहे नां आई, तुम्ही इथे घरी आहात! म्हणून युगंधरला संध्याकाळी हे सगळे म्हणायचे आणि करायचे असते, हे कळेल आणि तो पण म्हणेल, त्याला सवय पण होईल. पुढच्या आयुष्यात आई कितीवेळा गरज पडते प्रार्थनेची! देवाला काही सांगण्याची! आम्हाला कळते पण आम्ही ऑफीसमध्ये! पण तुम्ही आहात, मला युगंधरची काळजी नाही! त्याला कधी एकटे वाटले तर तो देवाशी दिवा लावून त्याच्याशीच बोलेल!’

रोज संध्याकाळी सातच्या सुमाराला मी देवजवळ दिवा उदबत्ती लावते तेव्हा युगंधर कडेवर असतो. आम्ही दिवा लावून ‘शुभंकरोति’ म्हणतो. मग उदबत्ती घेऊन घराच्या कानाकोपर्‍यात फिरवताना ‘रामरक्षा’, ‘ भीमरूपी’ स्तोत्रे म्हणतो. सगळे म्हणून झाल्यावर देवाजवळ उभी राहून, मी दिव्यावरुन हात फिरवते. तो युगंधरच्या डोक्यावरून मग चेहेऱ्यावरून, मग हातावरून, मग छातीपोटावरून, मग पायावरून शेवटी परत डोक्यावरून पाठीकडे फिरवते.

हे करताना प्रत्येकवेळी,’ बाप्पा माझ्या बाळाला शहाणा कर, बाप्पा माझ्या बाळाला हुशार कर, बाप्पा माझ्या बाळाला देखणा कर, बाप्पा माझ्या बाळाला बुद्धी दे, बाप्पा माझ्या बाळाला शक्ती दे, बाप्पा माझ्या बाळाला औक्षवंत कर !’ असे म्हणते. युगंधर दिव्याकडे बघत हे सगळे करून घेतो. म्हणून झाले की उदबत्तीची रक्षा मी त्याला अंगारा म्हणून लावते आणि एक बोट चाटवते. तो चोच उघडूनच असतो. एवढे झाले की तो हसतो. त्याचे चिमुकले हात माझ्या चेहेऱ्यावरून फिरवतो. त्याच्या अगम्य भाषेत काहीतरी बोलत असतो.

त्याला या सगळ्याची इतकी सवय झाली आहे की त्या वेळेच्या सुमारास मी स्वयंपाकघरात इतर काही कामासाठी उभी राहीले तरी तो घाईने येऊन माझ्या पायांना धरून उभा राहतो आणि त्याच्या भाषेत ‘वेळ झाली आहे ना?’ असे बहुतेक विचारतो. युगंधर आठ महिन्यांचा झाला आणि मेधा, माझी सून ऑफीसला जायला लागली. ती सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने सुरवातीचा महिनाभर बरेचदा साडेपांच – सहाला घरी येत असे. चारदोन दिवस हे पाहिल्यावर त्या वेळेला तो दाराकडे मधून मधून पाहत तिची वाट बघायचा. तिची कामाची वेळ हळू हळू वाढते आहे. तिची परतण्याची वेळ लांबेल, संध्याकाळच्या वेळेला युगंधरला त्याची आई घरी नाही हे जाणवेल.

दिवसा आजूबाजूला झाडे, पक्षी, माणसे, वाहने आणि इतर गोष्टी दिसत असतात, वेळ निघून जातो, पण सायंकाळी अंधार पडायला लागल्यावर दिवसभराचे हे सगळे जीव रमवणारे जग झाकोळते. एकटे वाटायला लागते.कुणीतरी जीवभावाचे, प्रेमाचे जवळ असावे असे वाटायला लागते. ही दिवस आणि रात्रीच्या संधीकाळाची वेळ कठीण असते म्हणून तिला ‘कातरवेळ’ म्हणतात. एकदा पूर्ण अंधार झाला की दिव्याच्या प्रकाशात जे उजळते तेवढ्या मोजक्या विश्वात जीव रमवतो. त्यामुळे ह्या कातरवेळी देवाजवळ असावे, त्याच्याशी संवाद साधावा असे आपल्याला पूर्वापार सांगितले आहे. म्हणजे माणसाला एकटेपणाच्या क्षणी, कुणी जवळ आहे असे वाटून आधार वाटेल आणि आपल्या संकल्पनेनुसार देव ‘सर्वव्यापी’ आहेच त्यामुळे कुठेही असतोच, आपल्याजवळ सुद्धा!

मानवी जीवनात किवा सजीवांच्या जगात स्पर्शाला फार महत्व असते.जन्माला आलेल्या नवख्या जीवाला स्पर्शबोलीच फक्त कळत असते. नंतरही शाबासकीची थाप, तणावात पाठीवरचा आश्वासक हात, दु:खप्रसंगी अश्रू पुसणारे हात, डोक्यावरचा आशीर्वादाचा हात आणि हो कधीतरी शिक्षा करणारा वडिलकीचा हात . हे सगळे स्पर्श त्या त्या वेळेला अतीशय गरजेचे असतात, निरोगी सशक्त मनासाठी! स्पर्शातून प्रेम कळते, संवादातून भावना पोहचतात. पण संवाद फक्त शब्दांचा नसतो. तो शब्दांशीवाय चेहेऱ्यावरचे भाव, देहबोली यातून होतो आणि सगळ्यात महत्वाची असते आपल्याजवळ कुणीतरी आहे ही भावना!

हे सगळे यांत्रिक इलेक्ट्रॉनिक युगाने बदलून टाकले आहे आणि माणूस फार एकटा होतो आहे. सायंकाळ, कातरवेळ नसतानाही एका माणसाला दुसरे माणूस भेटण्याची गरज मूठभराचे ‘फोन नावाचे यंत्र’ कसे भागवू शकेल? एखाद्या घरात खोलीत समवयस्क चार मुले बसलेली असतात आणि ती आपापल्या हातातल्या मोबाइल फोनवर, टॅबलेटवर, लॅपटॉप वर गेम खेळत असतात. त्यांचा एकमेकांशी काही संवाद नसतो. पूर्वी पत्ते, सापशिडी, व्यापार, काचाकवड्या, यांसारखे खेळ दोघेचौघे खेळत होतो. जिंकण्याचा आनंद, हरण्याचे दु:ख, चढाओधीच्या गप्पा संवाद व्हायचा. आता हे चित्र दिसत नाही. आणि रोज येणार्‍या नव्या उपकरणांमुळे पुढे दिसणारही नाही. त्यामुळे हे एकाकीपण मात्र वाढत जाणार आहे. विशेषत: वाढीच्या अर्धकच्च्या वयात हे फारच जाणवणार आहे. यातून विकृत, अनैसर्गिक, अविचारी अशा अनेक गोष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे, होऊ लागल्याही आहेत. परिणाम रोजच्या जीवनात दिसत आहेत.

युगंधर मोठा होत असताना त्याला कधीतरी कदाचित असा एकटेपणा वाटेल. सायंकाळी घरात एकटा असताना कुणाशीतरी बोलावेसे वाटेल तेव्हा ही देवाजवळच्या दिव्याची ज्योत त्याला सोबत करेल. उदबत्तीचा गंध मन प्रसन्न करेल. एक आश्वासक विश्वास या सगळ्यातून त्याला मिळावा, असे मला वाटते.

माझ्या घरातले चित्रच हल्ली बहुसंख्य घरात दिसते आहे. मुली करियर करत आहेत. रोजचे जगणे इतके खर्चिक होऊन बसले आहे की दोन्ही चाकांना सतत धावावेच लागते. त्याशिवाय रोजच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या गरजाही भागणे शक्य नाही त्यामुळे ह्या चित्राची अपरिहार्यता निश्चित आहे. मग जे बदलता येत नाही ते जास्तीत जास्त सुखाचे, आनंदाचे, सोयीचे करून घ्यावे लागणारच!

दिसणार्‍या परिस्थितीवर उपाय म्हणून नव्हे पण आपण आपल्या बाजूनी काहीतरी प्रयत्न प्रत्येकाने करायला हवाच! तो आपल्या घरापासून, कुटुंबापासून , स्वत:पासून करायला हवा, असे वाटते.

त्याचीच सुरूवात माझ्या मनाने, माझ्या बाजूने युगंधरला घेऊन ‘सायंप्रार्थना‘ म्हणण्यापासून केली आहे. छोट्या गोष्टीपासूनच मोठ्या साध्याची सुरूवात होते.

आणि खरे सांगायचे तर, सगळ्याच्या शेवटी युगंधर जेव्हा त्याचे चिमुकले हात माझ्या चेहेऱ्यावरून फिरवतो तेव्हा तो देवाचा स्पर्श आहे आणि युगंधर अगम्य भाषेत जे काही बोलतो तो देवाने दिलेला आशीर्वादच आहे, असा विश्वास मला वाटतो. कारण आशीर्वादाची गरज नेहेमीच असते आणि देवाचे सगळेच नेहेमीच अगम्य असते, हो की नाही?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users