स्तब्ध शब्द....

Submitted by झुलेलाल on 28 September, 2013 - 02:23

`भाषा कधी मरत नाही... ती मारली जाते’... भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं हे वाक्य. खूप दिवस मनाच्या गाभ्यात घुमत राहील, असं...
आजवर अनेक भाषा अशाच मारल्या गेल्या. काही अजूनही तरल्या आहेत. कारण भाषेचं मरण असं, अचानक होत नसतं. ते मरण पर्वतासारखं, हळूहळू असतं.
आधी आजूबाजूचे दगडधोंडे अदृश्य होतात, मग माती दूर होऊ लागते.. असं दीर्घकाळ चालतं, आणि ते इतकं सवयीचं होऊन जातं, की डोळ्यादेखत एखादा पर्वत नष्ट झाला तरी ते लक्षातही येत नाही.
हे झालं नैसर्गिक प्रक्रियेच्या बाबतीत! पण काही वेळा, कृत्रिमरीत्याही हे घडवलं जातं.
डॉ. देवी यांचं भाषामरणाचं विश्लेषण वाचतानाही, पर्वताच्या मृत्यूपर्वाची कल्पना डोळ्यासमोर तरळू लागते.
मुंबईच्या आसपास पर्वताच्या काही लहानमोठ्या रांगा बघितल्याचं अनेकांना आठवत असेल. त्यावर अनेकांनी आपल्या बालपणातलं एखादं पिकनिकदेखील केलं असेल.
त्या वाटेवरून आज जाताना, सहज नजर त्या ठिकाणी गेली, तर काहीतरी चुकल्यासारखंही वाटतं.
अशा काही रांगा, डोळ्यादेखत नष्ट झाल्यात... त्या डोंगरांतल्या जंगलात पूर्वी जंगली प्राणीही आढळायचे. वांद्र्याच्या कुठल्याश्या डोंगरावरची कोल्हेकुई म्हणे, संध्याकाळच्या नीरव वेळी खालच्या वस्तीत स्पष्ट ऐकू यायची.
आता हे सारं काल्पनिक वाटतं, कारण ते सारं स्पष्ट अनुभवलेली एक डोंगराएवढी पिढीही आता त्या काळाआड गेलेल्या डोंगरांसारखीच होत चालली आहे...
पवईच्या तलावात आपलं प्रतिबिंब पाहणाऱ्या डोंगररांगा अगदी कालपरवापर्यंत अनेकांना आठवत असतील...
आता तिथून जातायेताना, कधीतरी त्यांची आठवण आली, की तिथल्या भरभराटी नागरीकरणाचं कौतुक करावं, की भुईसपाट झालेल्या त्या रांगांसाठी डोळ्याच्या कडा ओल्या करून घ्याव्यात, हेच समजत नाही...
... मग, पर्वताचा मृत्यूदेखील जिथे नैसर्गिक राहिलेला नाही, तिथे भाषांच्या आयुष्याचा भरवसा कोण देणार, असं उगीचच वाटत राहातं.
... दिल्लीत गेल्या १६ डिसेंबरला झालेल्या बलात्काराच्या निर्दयी घटनेनंतर देशात संतापाचा उद्रेक झाला. गेल्या पंधरवड्यात त्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली, तेव्हा, असे गुन्हे करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. पण त्यानंतरही सामूहिक बलात्काराच्या बातम्या सुन्न करतच आहेत.
असं जेव्हा होतं, तेव्हा या प्रकारांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त व्हायला, शब्द सापडत नाहीत. शब्द अपुरे पडतात...
... अशा वेळी भाषेच्या भविष्याची उगीचच चिंताही वाटू लागते. अशा घटनांचा आणि भाषेच्या भविष्याचा तसा काहीच संबंध नसला, तरी!
व्यक्त व्हायला, शब्द शोधावे लागणं, हे भाषेच्या समृद्धीला ओहोटी लागण्यासारखंच आहे, असं वाटू लागतं...
... हा विचार मनात आला, तेव्हा मला एक जुना किस्सा आठवला. गावाकडच्या एका वकिलाचा. त्यांचं ऑफिस घरातच होतं. कोर्ट, चालत जायच्या अंतरावर... वकील सज्जन, आणि संस्कृतीची शिकवण पाळणारे. आपलं पाऊल कधी वेडंवाकडं पडू नये, याची काळजी घेणारे. त्यामुळे, आपल्या व्यवसायाचीही कधीकधी त्यांना चीड येतच असे.
घराबाहेर पडून कोर्टात जाईपर्यंतचा रस्ता, आडव्यातिडव्या वळणावळणांचा... पण वकील महाशयांनी मात्र, आपल्या सोयीचा एक मार्ग निवडलेला. त्या रस्त्यावरचं कुठलंही डावीकडचं वळण घ्यायला लागू नये, म्हणून... फक्त, कोर्टाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना त्यांना डावीकडे वळावंच लागायचं.
पण ते त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं होतं.
या साऱ्यामागचं कारण, सरसकटपणे समजणारं नव्हतंच. जवळचा रस्ता सोडून, वेड्यावाकड्या रस्त्यानं ते कोर्टात का जातात, हे त्यांच्या अशीलांनाही कोडं असायचं.
एकदा त्यांनी कुणाला तरी हे कारण सांगितलं. रस्त्यावरच्या कुठल्याही वळणावर, डावीकडे वळायची वेळ येऊ नये, म्हणून आपण हा रस्ता निवडला, असं ते म्हणाले.
कारण, त्यांच्या डोक्यात, वाममार्गाची कल्पना घट्ट रुतलेली होती. वाममार्गाला जायचं नाही, असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. त्या निश्चयाची आठवण रहावी, म्हणून त्यांनी उजव्या वळणांचा रस्ता स्वीकारला होता...
हे वास्तविक जगणं, आणि तसं करणं म्हणजे सदाचरी वागणं नव्हे, हे त्यांनाही माहीत होतं, पण यामुळे आपल्याला आपल्या विचारांशी नातं राखता येतं, अशी त्यांची समजूत होती.
मग, कोर्टाच्या प्रवेशद्वारावरचं ते डावीकडचं वळण?...
तेही त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं होतं. कारण तो व्यवसाय त्या मार्गाशीच जुळणारा होता, तिथं डावंउजवं करावंच लागतं, असं त्यांचंच मत होतं.
... ही आठवण झाली, आणि मला तो शब्द छळू लागला. `वाममार्ग !’
आणि, अलीकडे अनेक वर्षांत हा शब्दच आपण कुठे वाचलेला, ऐकलेलाही नाही, असं जाणवू लागलं.
कुठे गेला हा शब्द? अचानक गायब झाला, की त्या, नष्ट होणाऱ्या पर्वताशेजारच्या अगोदर गायब होणाऱ्या दगडधोंड्यांसारखा, नकळत अदृश्य झाला?
अचानक समोर आलेल्या अशा एखाद्या, जुन्या शब्दाच्या आठवणीनं उगीचच बेचैनी येऊ लागते. खरं म्हणजे, चारदोन अक्षरं एकत्र येऊन तयार झालेला एखादा शब्द असतो. तो असला किंवा नसला, तरी आपल्या व्यवहारांचं काही फारसं अडत नसतं.
वाममार्ग हा शब्द ज्या भाषेतच नसेल, ती भाषा बोलणारी माणसं सदाचारी नसतील असं थोडंच असतं?
पण आपल्या भाषेशी नातं सांगणारा हा चार अक्षरी शब्द, केवळ भाषेपुरता नसतो, तर त्याचं नातं थेट जीवनशैलीशी जोडलं गेलेलं असतं. या शब्दाला जीवनशैलीचे संस्कार जोडलेले असतात.
म्हणून हा शब्द अदृश्य झाल्याची खंत आणखीनच बेचैन करू लागते.
खरं म्हणजे, असा एखादा शब्द नष्ट झालेला नसतो. त्याचा वापर मात्र खूपच कमी झालेला असतो. म्हणजे, त्या शब्दाला `स्थगिती’ दिली गेलेली असते?...
की तो शब्दच स्वतःहून `स्तब्ध’ झालेला असतो?...
असं जर होत असेल, एखादा शब्दच स्वतःहून भाषेच्या वापरातून स्तब्ध होत असेल, तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर होऊ शकत असेल?
असा शब्द स्तब्ध झाला असेल, तर वाममार्गाची संकल्पनादेखील विरत चालली असेल?
असे विचार डोक्यात घोळू लागले, की शब्दांची गरज लक्षात येऊ लागते. आपल्या भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत, अशी अवस्था होते...
शब्दांचं नातं जीवनशैलीशी असेल, तर असे शब्द जपलेच पाहिजेत...
(लोकप्रभा, )

Group content visibility: 
Public - accessible to all site users