आयटम साँग पुरतीच अश्लीलता?

Submitted by KattaOnline on 21 September, 2013 - 00:56

आपण सर्वजण किती ढोंगी, खोटारडे आणि दुटप्पी वागणारे आहोत याचा अश्लील गाण्यांना टीव्हीवर बंदी घालण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. "मुन्नी बदनाम हुई", "शीला कि जवानी" , "हलकट जवानी" अशी काही उत्तान व बीभत्स गाणी टीव्हीवर दाखवू नयेत अशी सेन्सॉर बोर्डाने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात प्रक्षोभक जाहिराती व स्त्री-देहाचे भडक दर्शन घडवण्यात टीव्हीने आता इतकी पुढची पायरी गाठली आहे कि अशा गाण्यातली अश्लीलता त्यापुढे अगदीच मवाळ ठरेल.

itemsong.jpg

एकीकडे चित्रपटात उत्कट प्रेमाचा आविष्कार दाखवणाऱ्या चुंबनाही बंदी आहे. परंतु अत्यंत सूचक लैंगिकता आणि वासनेचा धगधगता आविष्कार याचे मात्र वावडे नाही. पुरुषांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिराती, "डीओडरंट", "पुरुष शक्तिवर्धक औषधे" या आणि अशाच वस्तूंच्या मार्केटिंगसाठी स्त्री मॉडेल्सचा मर्यादहीन वापर केला जातो त्याचे काय? अमेरिकन संस्कृतीचे अनुकरण करायला हरकत नाही पण त्यासाठी सगळीच "सिस्टीम" तशी बनवावी लागेल. आपण सोपा मार्ग काढून फक्त वासनांध कामुकतेचे प्रदर्शन घडवत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचे मुक्त अनिर्बंध समाजजीवनही नाही आणि सभ्य भारतीय संस्कृतीही नाही अशा एका भ्रष्ट, बांडगुळासारख्या उपऱ्या जगण्यातच आपण विकृत आनंद घेत आहोत.

गुंड, गुन्हेगार लोक "बिग बॉस" सारख्या कार्यक्रमात मिरवत आहेत, देणग्या देवून धनिक लोक प्रतिष्ठा विकत घेत आहेत, त्यांचे कौतुकाचे सोहळे वृत्तपत्रात - टीव्हीवर रंगत आहेत हाही अश्लीलतेचाच भाग नाही का? आपल्या केजी - नर्सरीतल्या मुलींना तोकड्या कपड्यात नाचताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या आधुनिक माता, अंगातले जमेल तेवढे कपडे काढून पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांना खाद्य पुरवणाऱ्या मादक नृत्यांगना आणि हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत.

अश्लील आयटम सॉंगवर बंदी घातल्यामुळे सर्व आलबेल होईल असा आशावाद बाळगणे म्हणजे कोंबडा झाकण्यासारखे आहे. सर्वत्र भ्रष्टाचाराचे आणि नैतिकतेचे उन्ह रणरणत असताना दोन - चार गाण्यांवर बंदी आणून सभ्यतेची सावली समाजाला मिळणार नाही.
[मूळ लेख: कट्टा ऑनलाईन:]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक"

नक्की का? मला वाटतं भारतात आधिची पिढी लैंगिकदृष्ट्या जास्त वैफल्यग्रस्त आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, वारीच्या दिवसात पुण्यात बुधवार पेठ गर्दीने ओसंडून वहात असते. त्यात बहुतेक मंडळी साठीच्या आसपास असतात. योनीशुचीता, ब्रम्हचर्य यांचं धार्मिक खुळचट अवडंबर यासाठी कारणीभूत आहे.

अवांतरः आपल्याकडे शेकडो उघडे नागडे महात्मे-बाबा-बुवा-अवलिया-स्वामी होउन गेले. या सो कॉल्ड संतांपैकी किती स्त्रिया होत्या? अणि त्यात एकही अल्पवस्त्रातील स्त्री-संत पाहिल्याचं स्मरत नाही.

आपल्या केजी - नर्सरीतल्या मुलींना तोकड्या कपड्यात नाचताना पाहून टाळ्या पिटणाऱ्या आधुनिक माता, अंगातले जमेल तेवढे कपडे काढून पुरुषांच्या वखवखलेल्या नजरांना खाद्य पुरवणाऱ्या मादक नृत्यांगना आणि हे सर्व प्रकार हताशपणे पहात बसलेले ज्येष्ठ नागरिक हे सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत.>>>>
ज्येष्ठ नागरिकांना असा किती मान आहे आपल्या नव्या पिढिच्या मनात??? वर उल्लेखलेल्या वाक्यातील आधुनिक माता त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. या मातांनी स्वतःच तोकडे कपडे घातलेले असतात त्या स्वतःच्या मुलांना काय शिकवणार कपडे कसे घालावेत ते???

एक उदा: नणंदेच्या सासरच्या नात्यातील एकाची मुलगी kidzee मध्ये शिकतेय. kidzee तर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला सहकुटुंब जाण्याचा योग आला. तिथे आलेल्या आधुनिक मातांपैकी एकीने मुलाला लाँग जीन्स घालुन आणलं होत आणि स्वतः हाफ पॅन्ट घालुन आली होती. आता अशा आईचा मुलांनी काय आदर्श समोर ठेवावा?? मी आधुनिकतेच्या किंवा फॅशनच्या विरोधात नाही, पण आयुष्यात आपण पार पाडत असलेल्या भुमिकेनुसार आपल वागण असाव अस माझ ठाम मत आहे.... फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली होणार आणि केल जाणार अंगप्रदर्शन मला अजिबात मान्य नाही.

तिथे आलेल्या आधुनिक मातांपैकी एकीने मुलाला लाँग जीन्स घालुन आणलं होत आणि स्वतः हाफ पॅन्ट घालुन आली होती<<< Lol

=====================

एक उदाहरण माझेही:

आमच्यायेथे एक रस्सा एक्स्प्रेस म्हणून बर्‍यापैकी आऊटलेट झालेले आहे. परवा पार्सल आणायला गेलो तर एक विवाहीत मुलगी, ज्याला शुद्ध मराठी भाषेत चड्डी असेच म्हणता येईल, ती घालून एका टेबलपुढे बसली होती. ती तेथील कस्टमर होती. तिचा नवरा फोनवर बोलत बाहेर फिरत होता. ती स्त्री / मुलगी अजिबात भान नसल्याप्रमाणे पायावर पाय वगैरे टाकून प्रदर्शन हाच हेतू असावा तशी आरामात होती आणि वेटरपासून इतर गिर्‍हाईकांपर्यंत सगळे फक्त बघत बसलेले होते. मला मायबोलीवरील अनेक चर्चा आठवल्या तिला पाहून!

कपड्यांच नाही ओ.

अय्या तुझ्या मम्मीकडे कपडे नाहीत की कॉय्य? की अदलाबदली केलीस अस कोणी विचारु नये इतकच !

साती, नीधप तुम्ही माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला आहे. माझा विरोध अंगप्रदर्शनाला आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या संपर्कात येता तेव्हा प्रथम तुमच पेहरावाच दर्शन होत विचार, मानसिकता ही नंतरची स्टेप आहे, जेव्हा तुम्ही बोलायला तुमच तोंड उघडता तेव्हाची.... मनाने, विचाराने आधुनिक आहात ना मग पेहराव हाफ पॅण्ट असला काय किंवा अंगभर साडी असली काय फरक काय पडतो???

मी आधुनिकतेच्या किंवा फॅशनच्या विरोधात नाही, पण आयुष्यात आपण पार पाडत असलेल्या भुमिकेनुसार आपल वागण असाव अस माझ ठाम मत आहे.... फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली होणार आणि केल जाणार अंगप्रदर्शन मला अजिबात मान्य नाही.
ही प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी परत टाकते....

माबोवरच मुलींसाठी ड्रेसकोड या अर्थाच्या लेखनाच्या धाग्यावरील माझी प्रतिक्रिया आपण वाचु शकता.

मनाने, विचाराने आधुनिक आहात ना मग पेहराव हाफ पॅण्ट असला काय किंवा अंगभर साडी असली काय फरक काय पडतो??? <<
हो ना. मग ज्याचं त्याला ठरवू द्या की. तुमचं काय गेलं?

तुर्रमखान,

>> आपल्याकडे शेकडो उघडे नागडे महात्मे-बाबा-बुवा-अवलिया-स्वामी होउन गेले. या सो कॉल्ड संतांपैकी
>> किती स्त्रिया होत्या? अणि त्यात एकही अल्पवस्त्रातील स्त्री-संत पाहिल्याचं स्मरत नाही.

माझ्या अंदाजाप्रमाणे कोणी योगी उघडानागडा बसतो तो लोकसंग्रह टाळण्यासाठी. हेच जर स्त्रीयोगीने केलं तर आंबटशौकीन पुरूष गर्दी करतील आणि हेतू असफल होईल.

अवांतर :

एक कथा आठवली. पिपरिया गावात घडलेली. गाव गुजरातेतलं की मध्यप्रदेशातलं ते माहीत नाही. एके दिवशी त्या गावात एक योगी स्त्री भणंगावस्थेत आली. चावडीवर बसून राहिली. गावातून निघायचं नाव नाही.

दिवसभर मंदिराबाहेर पडून असायची. देहभान नव्हतेच तिला. सदैव उघडी असायची. भिक्षा मागत नागव्यानेच हिंडायची. मुलांनी दगड मारले तरी चिडायची नाही. सहन करत बसायची.

मात्र तिचं बोलणं ऐकून ती वेडी नाही हे सगळ्यांना कळत असे. तिच्यापायी बारीकसारीक चमत्कार होऊ लागले. तसतशी तिची ख्याती पसरत चालली. गावातल्या लोकांनी तिला कपडे घालायला सुचवलं, तर म्हणाली की "इथे गावात पुरूष आहेतंच कुठे! ही सगळी जनावरं आहेत. त्यांच्यासमोर कसली आलीये लाज मला."

असेच काही दिवसांनी त्या गावी एक तपोधन सत्पुरुष आला. त्याची तिच्याशी नजरानजर होताच तिची मान लज्जेने खाली झुकली. (का बरं झालं असं? ओळखा पाहू!)

त्याच्या विनंतीवरून तिने कपडे घालायचं मान्य केलं.

आ.न.,
-गा.पै.

आपण सोपा मार्ग काढून फक्त वासनांध कामुकतेचे प्रदर्शन घडवत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्यांचे मुक्त अनिर्बंध समाजजीवनही नाही आणि सभ्य भारतीय संस्कृतीही नाही अशा एका भ्रष्ट, बांडगुळासारख्या उपऱ्या जगण्यातच आपण विकृत आनंद घेत आहोत.

व्वा. काय जबरदस्त भाषा आहे!! मी आपले काहीतरी मुळमुळीत लिहिले होते - भारतीय मन अत्यंत गोंधळून गेले आहे. पाश्चिमात्यासारखे रहावे असे वाटते एकीकडे तर दुसरीकडे भारतीय संस्कृति (चुकलो, उच्च भा. सं.) आठवते.

जरा धीर धरा. पुढच्या पिढीपर्यंत पाश्चिमात्यांची नवलाई ओसरेल नि एक छान संस्कृति तयार होईल.तोपर्यंत अशी भांडणे, ( नव्हे, विचारप्रवर्तक वादविवाद ) चालू ठेवा.

तशी विकृतता जगात सगळीकडेच पसरली आहे. त्यातली हळू हळू जेव्हढी कमी करता येईल तेव्हढी करावी. बाकी भारतातच काय, सबंध जगातच मनुष्यस्वभावात थोडी विकृति असतेच, तिला काबूत ठेवायला अनेक परिश्रम करावे लागतात. जेव्हढी मदत मिळेल तेव्हढी बरीच. पूर्वी लोकांचा धर्मावर विश्वास होता. परंपरेवर विश्वास होता. दोन्हीतहि काही चांगले काही वाईट होतेच. पण वाईटाबरोबर चांगलेपण फेकून देण्यात आले, धर्माच्या जागी आता कायद्याची भीति दाखवून वाईट वागण्याला आळा घालायचा प्रयत्न. तो कायदाहि नीटपणे अंमलात आणला नाही तर मग काय?

सध्या उरलाय नुसता गोंधळ! प्रचंड गोंधळ!

धर्माच्या जागी आता कायद्याची भीति दाखवून वाईट वागण्याला आळा घालायचा प्रयत्न. तो कायदाहि नीटपणे अंमलात आणला नाही तर मग काय?

सध्या उरलाय नुसता गोंधळ! प्रचंड गोंधळ!<<<

पोस्ट आवडली

फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली होणार आणि केल जाणार अंगप्रदर्शन मला अजिबात मान्य नाही. >>> ठीकये, मग खजुराहोतील पुतळी प्रमाणे त्या आईला शाळेत यायला सांगू या, हाय काय नि नाय काय??!!

आयुष्यात आपण एका वेळी एकच भूमिका फार क्वचितवेळा पार पाडत असतो. आई असतो तेव्हा त्याच वेळी कुणाची मैत्रीण ही असतो, कुणाची कधी पत्नी असतो, कधी वर्किंग वूमन, कधी मल्टी टास्कर. एका समारंभांहून आलेलो असतो, हायकिंग ला चाललेलो असतो. प्रत्येकीची जीवनशैली निराळी. आपल्याला ज्या भूमिकेत व्यक्ती दिसतीये तीच तिची त्या दिवसाची भूमिका आणि तीच तिला पार पडायची असेल हा आग्रह कशाला?

परवा पार्सल आणायला गेलो तर एक विवाहीत मुलगी, ज्याला शुद्ध मराठी भाषेत चड्डी असेच म्हणता येईल, ती घालून एका टेबलपुढे बसली होती. >> सोबत एक पुरुष बाहेर फोनवर बोलत होता हे बघून ती विवाहित होती हे कस कळल? का मंगळसूत्र होत गळ्यात? आता गळ्यात मंगळसूत्र असतानाही ज्यांची नजर त्या स्त्रीच्या कमरे कडे, पायाकडे जाते तो दोष त्या वेटर इ इ चा नाही तर त्या स्त्रीचा "हेतू"??!! कठीण आहे.

श्री झक्की यांची तर्कशुद्ध पोस्ट पटली. मला या प्रकारच्या चर्चेत कधीच मत देता येत नाही हे सुरुवातीलाच कबूल करतो.
माझ्या मते जिथे सुरक्षितता आहे तिथेच स्वातंत्र्य आहे. यात त्या महिलेच्या / मुलीच्या मानसिकतेला दोष देण्याचा विचारसुद्धा मनात येत नाही. संस्कृतीरक्षणाचा संबंध नाही. एका सुरक्षित जगात कुणाच्या कपड्यावरून शेरेबाजी करणं वेगळं आणि असुरक्षित वातावरणात काळजीने सांगणं वेगळं असावं. कपडे कसे असावेत हे ठरवू देणं हा तिचा हक्क आहे हा मुद्दा मान्य आहे. पण आपण आपल्या हक्काच्या माणसाला काळजीने आज या रस्त्याने जाऊ नकोस, दंगल चाललीय उशीर लावू नकोस, अरे त्या गुंडांच्या नादी लागू नकोस, वर्गणीवरून लेक्चर देऊ नका.. देउन टाका वर्गणी, आपण गाव सोडून आलो इथं कशाला जळात राहून माशाशी वैर असे अनेक सल्ले देतच असतो तसं म्हणता नाही का येणार ? अगतिकता, असहाय्यता आणि परिस्थितीची असलेली जाणीव याचा भाग मोठा असावा असं वाटतं. आपला समाज कसा आहे, लोक कसे आहेत याबाबतचं प्रत्येकाचं काहीतरी आकलन असणारच. वेळ येताच आपापल्या अनुभवातून आपण कसं वागणार आहोत हे सर्वात महत्वाचं वाटतं. एखाद्याची किंवा समाजाची मानसिकता बदलणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याबद्दल कुणाची काही मतं असतील तर वाचायला आवडतील.

पेहरावाचा मुद्दा बाजूला ठेवूयात. धोक्याची, संकटांची जाणीव होणे \ असणे, प्रसंगावधान बाळगणे हे गरजेचंच आहे. संकटं ओढवून न घेणं हे कुठेही, कधीही आणि कुणासाठीही महत्वाचं आहे. त्यासाठी अनेकदा आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींना, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांना वेळोवेळी मुरड घालावी लागते.

आज या रस्त्याने जाऊ नकोस, दंगल चाललीय उशीर लावू नकोस, अरे त्या गुंडांच्या नादी लागू नकोस, वर्गणीवरून लेक्चर देऊ नका.. देउन टाका वर्गणी, आपण गाव सोडून आलो इथं कशाला जळात राहून माशाशी वैर असे अनेक सल्ले देतच असतो तसं म्हणता नाही का येणार ? >>> नाही अजिबात नाही. कारण हे सल्ले लिंगनिरपेक्ष असतात. पेहरावाची गोष्ट आली की तिथे लिंगनिरपेक्षता आधी सुटते कारण लाज, पोशाख आणि स्त्री हे ३ शब्द आम्ही एकमेकाहून सुटे करून वापरून बघितलेले नाहीयेत. अर्धी चड्डी घालून पुरुष हॉटेलमध्ये बसला तर त्याला कधीही कुणीही म्हणणार नाही की असा का बसलास (जरी आकडेवारी सांगते की १०% पुरुषही बलात्कार/ अब्युज पिडीत असतात). अनेक बाबा शाळेत शोर्टस घालून येतात, ते काय नटसम्राट प्रमाणे आपल्या आयुष्यातील भूमिका चोख बजावतात का? पण त्याची चर्चा कुणीही करीत नाही कारण काय?

एखाद्याची किंवा समाजाची मानसिकता बदलणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. >> ही पण शुद्ध पळवाट आहे. आपल्या फायद्याच्या गोष्टी कुठल्याही समाजाला पटकन आत्मसात करता येतात. दुसर्या व्यक्तीच्या (ती/तो/ट्रान्सजेंडर कुणीही सज्ञान व्यक्ती) संमतीने शरीरे एकत्र आली तर त्यातील जी काही गोडी हे जोवर पुरुष दुसर्या पुरुषाला समजून सांगत नाहीत तोवर हे स्त्रीवरील बंधने चालणार.

ही पण शुद्ध पळवाट आहे. >>

मला जास्त कळत नाही. मी कुणी आमदार, खासदार, नगरसेवक, गुंड, बडा उद्योगपती, पोलीस अधिकारी नाही. पत्रकार नाही. फिल्मस्टार नाही. माझीम्कुठलीही तक्रार नोंदवून घेतली जात नाही. रात्री बेरात्री धिंगाणा सुरू असतो तेव्हां फोन केला तर पोलीस येत नाहीत. वर्तमानपत्राकडे कुठलीही कैफियत मांडली तर ओळख नसल्याने ती छापत नाहीत. कुठेही आवाज नसलेला असा एक असहाय्य पालक / नागरीक आहे इतकं कळतं.

आपल्याकडे शहाणपण असल्याने एक पालक म्हणून विचारावंसं वाटतं कि काय सांगावं मुलींना ? बिनधास्त कुठेही, कसंही फिरा ? एक पालक म्हणून काळजीने वरच्या पोस्टीतले सल्ले देण्याचा अधिकार मला नसेल ? कि आधी समाज सुधारल्याशिवाय वरचे सल्ले देण्याचा अधिकार मला नाही ? दिल्लीच्या घटनेत त्या बसमधल्या सहा जणांनी ती घटना घडण्याआधी एका माणसाला त्याच बसमधे लुटले होते. ठार मारायची धमकी दिलेली.बसमधून उतरल्याबरोबर त्याने पेट्रोलिंगवरच्या पोलिसांना त्या बसवर कारवाई करायला सांगितली होती. त्याचं ऐकलं असतं तर पुढचं प्रकरण घडलं नसतं. ही बेफिकिरी असलेल्या ठिकाणी मुलींना काळजी घ्यायला सांगायची कि तत्त्वज्ञान सांगत बसायचं ?

चर्चेसाठी आणि मुद्याला मुदद्यासाठी हे फोरम आहेत. डिस्कशन्स आहेत. पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना हे कळत नसेल का ? तुम्ही असहाय्यता, अगतिकता वगैरे मुद्दे विचारातच घेतले नाहीत म्हणून उत्तर देणारच नव्हतो. पण पळवाट म्हणताय म्हणून कुठे चुकतंय हे जाणून घ्यावंसं वाटलं.

कि काय सांगावं मुलींना ? बिनधास्त कुठेही, कसंही फिरा ?>>> ठिक आहे. नका सांगू मुलीना बिनधास्त फिरा, सातच्या आत घरात बोलवा. आपली पालक म्हणून काळजी पोहोचली माझ्यापर्यंत. असहाय्य आहात, अगतिक आहात म्हणून किंवा आपण सांगितलेल्या मार्गाने मुलगी चालली तर ती सुरक्षित राहील ह्याबद्दल आशावादी आहात म्हणून - कोणत्याही कारणाने का असेना आपल्याला आपल्या मुलीला मार्गदर्शन करायचा हक्क आहे. पळवाट अनुसरणारा माणूस चूक असतो असे अजिबात नाही. शेवटी प्रत्येकाला आपल्या आयुष्याची आणि आपल्या पाल्याच्या आयुष्याची वाट आखायचा तितकाच हक्क आहे जितका शाळेत शोर्ट घालून येणारी, टेबलावर चड्डी घालून बसणाऱ्या बाईला आहे.

सिमन्तिनीजी मनापासून धन्यवाद.
तुम्ही माझ्या पोस्टमधल्या ज्या ओळी कॉपी पेस्ट केल्या आहेत त्या आधीच्याच तीन ओळी काय आहेत हे वाचलंत का ? त्याच तुम्ही शब्द फिरवून लिहील्यात असं नाही वाटत ? मायबोलीवर निवडक कॉपी पेस्ट करताना मूळ पोस्टीची कशी वाट लागते याबद्दलही चर्चा झालेली आहे. या चर्चेतून आपली रजा घेतो. काही चुकलं असल्यास क्षमस्व !

( मी सांगितलेल्या मार्गाने मुलगी सुरक्षित असेल याबद्दल आशावादी आहे असा क्लेम कुठे केलाय का ? समोरून चुकीच्या लेनमधून ट्रक येत असताना आपणच बाजूला व्हावं या प्रकारच्या काळजीबद्दल विचारलंय. जेव्हां समाज सुधारेल तेव्हां सुधारेल, तोपर्यंत काय याचं सोल्युशन तरी सांगा. निरुत्तर करणा-या पोस्टींपेक्षा त्याचीच गरज आहे. )

हे कस कळल? का मंगळसूत्र होत गळ्यात? आता गळ्यात मंगळसूत्र असतानाही ज्यांची नजर त्या स्त्रीच्या कमरे कडे, पायाकडे जाते तो दोष त्या वेटर इ इ चा नाही तर त्या स्त्रीचा "हेतू"??!! कठीण आहे.<<<

दोघेजण नवरा बायको आहेत हे समजायला काय लागते? तो नवरा नंतर आता आला, एकमेकांशी ते बोलले, एका वाहनावरून निघून गेले. आणि ते नवरा बायको आहेत की नाहीत ह्याला ह्या चर्चेच्यासंदर्भात नेमके काय महत्व आहे? म्हणजे नवरा बायकोच असले तर तिने असे कपडे घालणे चालते वगैरे म्हणायचे आहे की काय? एकुणच कठिण काम आहे.

तर त्या स्त्रीचा हेतू?<<< जाऊदेत हो! अनेकदा झाले हे इथे. पुरुषांची मानसिकता वाईट आहे हे कधीच कोणी अमान्य केलेले नाही. असोच, या चर्चांचाच उबग आलेला आहे.

माझी पण काडी :
<दोघेजण नवरा बायको आहेत हे समजायला काय लागते? तो नवरा नंतर आता आला, एकमेकांशी ते बोलले, एका वाहनावरून निघून गेले.>

ती त्याची बायको आहे,(म्हणजे त्तिच्यावर त्याच्या मालकीचा शिक्का बसला आहे) तरीही ती अशा कपड्यांत होती याला आक्षेप आहे का? समजा ते दोघे नवराबायको नसतील, तरीही एका दुचाकीवर बसून गेले असतील, तर त्याच कपड्यांना आक्षेप असणार नाही का?

गामा पैलवान,

"माझ्या अंदाजाप्रमाणे कोणी योगी उघडानागडा बसतो तो लोकसंग्रह टाळण्यासाठी."

हे तर अजिबात पटण्यासारखं नाहिये. ही (संत)लोक लोककल्याण करत असत असं मान्य केलं तर लोक संग्रह का टाळत असत? नागडे दिगंबर साधू रस्त्यावरून मिरणुक काढून का हिडतात? थांबू-थांबून बायकांकडून पाया पडून का घेतात? (पाया पडून उठताना त्यांच्या डोक्याने शिश्नाला स्पर्ष झाला तर तो काँप्लिमेंटरी प्रसाद समजला जातो. हे पहिल्यांना ऐकल्यावर मला अगदी कैच्याकै वाटलं होतं. पण एक दोन जैन मित्रांनी हे शपथेवर सांगितलं होतं. खरंखोटं तेच जाणे.)

"हेच जर स्त्रीयोगीने केलं तर आंबटशौकीन पुरूष गर्दी करतील आणि हेतू असफल होईल."

का बरं? म्हणजे या संतमंडळीचा स्वार्थी हेतू फक्त एकटं रहाण्याचा होता का? ही सगळी हिमालयात किंवा जंगलात का नाही जाउन राहिली? मग तसं असेल तर लोकांना तरी या लोकांचं कौतुक का असावं? जे काही थोडं संत चरीत्र वाचलंय त्यातले फुटकळ चमत्कार आणि 'गण गण गणात बोते' वगैरे अर्थहीन बडबडीतून ओढून ताणून त्यातून काहीतरी गहन अर्थ काढणे हे जरी सोडून दिलं तरी ही संत मंडळी अध्यात्मिक तत्वज्ञान पाजळत फिरत असत असं वाटतं. तू मला शरण ये मग तूझं भलं होइल या कडे दुर्लक्ष केलं तरी ते 'जगावं कसं?' हे शिकवत असत. मग तसं असेल तर सुधारण्यासाठी उलट अशी आंबटशोकीन वासनांध पुरुषी गर्दी जास्त इलिजीबल आहे असं वाटत नाही का? Happy

बाकी ती कथा माहीत आहे.

समोरून चुकीच्या लेनमधून ट्रक येत असताना आपणच बाजूला व्हावं या प्रकारच्या काळजीबद्दल विचारलंय. जेव्हां समाज सुधारेल तेव्हां सुधारेल, तोपर्यंत काय याचं सोल्युशन तरी सांगा. >> मुलींवर कपड्यांचे बंधन सांगितले त्याचा आपले मत म्हणून मी आदर करते. पण त्याने प्रश्न सुटेल हे वाटत नाही. आपल्या उदाहरणात आपण म्हणजे आपण नसून आपली मुलगी, आपली महिला कलीग इ इ आहेत. माझा ह्या वृत्तीला पाठींबा नाही. जोवर स्त्रीने/पिडीत पुरुषाने काही काळजी घेतली तर हा प्रश्न मिटेल हि मानसिकता आहे तोवर हा प्रश्न मिटणार नाही. पुरुष एकत्र होवून व्यवस्थितपणे जोवर स्त्री विषयी आदर कसा व्यक्त करावा हे दुसर्या पुरुषाला सांगत नाहीत तोवर प्रश्न सुटणार नाही. उदा: राधा ओन डान्स फ्लोर हे गाण्यातील शब्द धार्मिक कारणाने लोकांनी बदलण्यास भाग पाडले. स्त्रीसन्मान म्हणून कधी ४ पुरुष एकत्र आले? त्यांनी कधी कुठल्या डीओ कंपनीला इमेल केली कि तुमची जाहिरात ओफेन्सीव आहे? उघडी बाई जाहिरातीत आली आणि सेल वाढला तर तो त्या बाईचा दोष कसा?? दुसऱ्यावर ठपका ठेवणे सोपे आहे - जाहिरातीतील बाई, सेन्सोर बोर्ड, शाळेतील माता, जेष्ठ नागरिक, चड्डीतील विवाहिता, दिल्लीची मुलगी, मुंबईची मुलगी इ इ- वुई जस्ट लव टु पास दि बक.

विस्मया: विषय तोच आहे, मुद्दे हि तेच आहेत पण व्हेअर दि बक स्टॉपस?

Pages