मी आणि ते.

Submitted by वेल on 19 September, 2013 - 07:00

"तुझ्याकडून केवढ्या अपेक्षा होत्या आमच्या म्हणून आम्ही तुझ्याकडे राहायला येत होतो, तुला आमचा वापर करू देत होतो. पण तू एकदम अपेक्षाभंग केलस आमचा. "

मला ते सगळेच बोलत होते. आणि मी मान खाली घालून ऐकत होते.

खरं होतं ते. ते फार विश्वासाने माझ्याकडे आले होते. खरं तर मीच आर्जव करून त्यांना बोलावून घेतले होते. पण त्यांना बाहेर आणायची वेळ यायची तेव्हा मात्र मी कच खायचे. कधी आत्ता वेळच नाही तर कधी आत्ता खूप थकले आहे, कधी आत्ता शब्द नाहीत तर कधी आत्ता तुम्ही खूप विस्कळीत आहात तर कधी आत्ता सगळं असलं तरी लिहायला काही नाही पेन नाही, कागद नाही.

मी जर त्यांची सरबराई करू शकत नसले तर का बोलवायचं मी त्यांना, का करायचा त्यांचा अपमान? मी जर त्यांना वेळ देऊ शकत नसले तर जाऊ दे ना त्यांना दुसरीकडे कुठेतरी, का हवेत ते मग मला जर मी त्यांचा मान ठेवू शकत नाही.

आता मी ठरवलं आहे, रोज थोडा थोडा त्यांच्यासाठी पण वेळ काढायचा. फार्फार दिवसांनी आलेत ते माझ्याकडे, म्हणजे तसे ते होते सोबत पण खूप विरळ खूप विस्कळीत आणि आता तर मला त्यांच्या इतर भावंडांनीदेखील यावसं वाटतय. आणि जर मला असं वाटत असेल तर जे मुळात माझ्याकडे आहेत त्यांची सरबराई केलीच पाहिजे ना मला, स्वतःला थोडी मुरड घालून. ते जरी विस्कळीत असले तरी त्यांना एका धाग्यात गोवायचं कसब आहे माझ्याकडे असं मला वाटत ना? मग मी प्रयत्न केलेच पाहिजेत.

प्ण तरिही का हवे असतात मला ते? का मी पझेसिव्ह होते त्यांच्या बाबतीत? कारण सोप्पय. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. त्यांचं अस्तित्व माझ्या अस्तित्वासाठी खूप खूप महत्वाचं आहे. खरं तर त्यांच्या शिवाय मी असूच शकत नाही. ते नाहीत तर मी नाही असा साधा हिशोब आहे माझ्या आयुष्याचा. मग तरिही का मी करत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष?

असो, जे झालं ते झालं आता मी त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करणार, खरंतर करूच शकणार नाही. कारण माझ्या हाकेला ओ देऊन त्यांचे भाऊबंद सुद्धा माझ्याकडे आले आहेत. आता सार्‍यांना वापरून घ्यायलाच हव, आता सार्‍यांना कामाला लावायलाच हवं, त्यांना बाहेर पडू न देता, त्यांच्यासाठी शब्द न वापरता नुसतं त्यांना बसू देणं मला परवडणारं नाही, एवधी जागाच नाहीये माझ्या डोक्यात, स्मरण शक्तीत.

म्हणूनच आता सुरुवात केली आहे, तुमच्या साक्षीने, त्यांना, त्या विचारांना शब्दात मांडण्याची. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. कसेही असू देत विस्कळीत, बेशिस्त, अर्धवट, ह्या विचारांना मी नीट मांडलं की मग पुढचे विचार थोडे अधिक शिस्तीत येतील. माझ्याकडे. शेवटी विचार म्हणजे काय, एक प्रकारची एनर्जी. अ‍ॅण्ड एनर्जी कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ह्या विश्वातली अव्यक्त एनर्जी माझ्याकडे विचार म्हणून येते मग मी ती साठवून ठेवण्यापेक्षा जर शब्द ह्या एनर्जी मध्ये कन्व्हर्ट केली तर माझ्याकडे थोडी जागा रिकामी होईल. आणि ज्याप्रमाणे, एनर्जी ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, माझ्याकडच्या रिकाम्या जागेत ती एनर्जी पुन्हा येईल. आणि मला एनर्जी फक्त विचार म्हणूनच अ‍ॅक्सेप्ट करता येते म्हणून ती फक्त विचारांच्या फॉर्म मध्येच येइल.

तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अ‍ॅक्सेप्ट कराल ना ती एनर्जी माझ्या शब्दातून?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users