मखमली धिरडी - तिखट - मंजूडी

Submitted by मंजूडी on 16 September, 2013 - 14:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य जिन्नस
पनीर
मक्याचे दाणे

चवीचे जिन्नस
आलं मिरचीचे वाटण
जिर्‍याची पूड
मीठ

इतर जिन्नस
बाऽऽरीक रवा
पाणी

क्रमवार पाककृती: 

योगायोग! केवळ योगायोग!

काही कुकारणांनी घरी आणलेलं दूध नासावं आणि सुलेखाची घावनं आठवावीत हा योगायोग.
त्याच दिवशी संयोजकांनी पूर्णब्रम्ह स्पर्धा जाहिर करावी आणि फ्रिजात मक्याचे दाणे सापडावेत हा तर मणीकांचनयोग!
लगेचच दुसर्‍या दिवशीच्या नाश्ता मुहुर्तावर ही धिरडी केली आणि तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडला - 'अहाहा! मखमली धिरडी!'

कृती अगदी सोप्पी आहे. पाणी काढून टाकलेलं पनीर अर्धी वाटी घेऊन ते मिक्सरमधे अगदी छान गुळगुळीत वाटून घ्यायचं. त्यात वाटलेलं आलं, मिरची आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे घालून भरडसर वाटून घ्यायचं. मग त्यात एक भांडभर पाणी, अर्धी वाटी बाऽऽरीक रवा, मीठ आणि जिर्‍याची पूड घालून साधारण दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं. रवा उमलून आल्यावर चांगल्या तापलेल्या तव्यावर धिरडी घालायची आणि चटणी, लोणी किंवा सॉसबरोबर खाऊन टाकायची.

वाढणी/प्रमाण: 
अर्धी वाटी पनीर आणि अर्धी वाटी मक्याच्या दाण्यांची साधारण चार ते पाच धिरडी होतात.
अधिक टिपा: 

१. पनीरमुळे ही धिरडी इतकी स्निग्ध होतात की तव्याला अजिबात तेल/ तूप लावावं लागत नाही. खातानाही पनीरचा अलवारपणा मस्तपैकी जाणवतो. मी घरचंच पनीर वापरलं, बाजारच्या पनीरचं काही माहिती नाही.

२. यात बाईंडिंगसाठी कुठलंही पीठ घालू नका, धिरडी गिच्च होतात. रवाऽऽच वापरा, तोदेखिल बाऽऽरीकच.
मध्यम/ जाड रवा मक्याची शान घालवतो.

३. ही धिरडी जरा उरपतायला नाजूक होतात, त्यामुळे धिरडी करताना घिसाडघाई, धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी, षडाक्षरी कृती करू नका. पीठाची कन्सिस्टन्सी हुकमी ठेवा.

संयम राखी तो चविष्ट धिरडी चाखी

M Dhiradee.jpg
माहितीचा स्रोत: 
अर्थातच सुलेखा.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

मंजूडी आता धिरडी दिसली की तू डोळ्यासमोर दिसतेस कारण मागे पण आंबोळ्या मी तुझ्याकडून शिकले Happy

भारी लिहीलयस Happy

माझ्यात पेशन्स नामक गोष्ट तशी कमीच. तेव्हा सुचना माझ्यासाठीच मानून कमालीचा पेशन्स ठेवून करायला लागेल मला

पाककृती सांगायची पद्धत आणि प्रेझेंटेशन दोन्ही आवडलं. इंटरेस्टिंग वाटतेय, मुहुर्त लागला की करून बघणार>>> +१

धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी, >> Lol

बाऽऽरीक रवा >>> Lol

नुसत्या रव्याची घावनं पालटण्याजोगी होईपर्यंत मंद गॅस ठेवून वाट पहायची हे फार पेशन्सचं काम आहे! Proud

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!!

सायोने ही धिरडी केली का? कशी झाली होती?

सिमन्तिनी, मापं लिवलीयेत की... पनीर अर्धी वाटी घेऊन, अर्धी वाटी मक्याचे दाणे, एक भांडभर पाणी, अर्धी वाटी बाऽऽरीक रवा इत्यादी.. क्या आप भी Wink

अग, जिन्नस मध्ये ग ... जिन्नस मला उगीचच नेहमी १ वाटतो. साहित्य म्हटल की ३/४, आतपाव असले अपूर्णांक वाटत, उगीच ह!

मंजूडी,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

>>सायोने ही धिरडी केली का? कशी झाली होती?>> हो, परवा केली होती पण काल इथे डोकावायला जमलंच नाही आणि सांगायच राहिलंच.
मी रेडीमेड पनीर वापरलं. मिक्सरमध्ये टाकल्यावर गुळगुळीत वाटलं जाण्याऐवजी पावडर व्हायला लागली मग त्यात धुतलेले कॉर्न वगैरे घातल्यावर मिळून आलं. मी आरतीच्या रेसिपीचे कॉर्न आप्पे, कॉर्न डोसे करते तसंच लागलं चवीला. पनीरमुळे उलटताना तेल मात्र लागलं नाही.

मस्तं रेस्पी मंजूडे!

सगळ्यांवर खेकसून वगैरे झाल्यावर जीव शांत, निवांत असताना करून बघणेत येतील. तेव्हा अलगद- अलवार मोड जमेल. Proud

मस्त आहेत ही धिरडी. लिहिलंयही खुप छान. फक्त मी केल्यावर मखमली होतील की घोंगडी माहित नाही.... Happy

मस्त रेसिपी, सगळ्या वयोगटातल्यांना आवडेल अशी आहे.. नक्की करणार Happy

मी आरतीच्या रेसिपीचे कॉर्न आप्पे, कॉर्न डोसे करते तसंच लागलं चवीला <<< सायो, असं म्हणून तिची रेसिपी काही विशेष नाही असं सांगते आहेस की बरोबरच चव लागली म्हणजे चांगली आहे असं सांगते आहेस ? Proud

झटपट कृती आहे. करून पाहण्यात येईल.

मखमली आणि धिरडी हे दोन्ही शब्द एकत्र वाचवत नाहीत. इये राकट, कणखर, दगडांच्या देशी धिरडीसाठी मखमली नाव नाही एखादे?

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

Pages