मखमली धिरडी - तिखट - मंजूडी

Submitted by मंजूडी on 16 September, 2013 - 14:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य जिन्नस
पनीर
मक्याचे दाणे

चवीचे जिन्नस
आलं मिरचीचे वाटण
जिर्‍याची पूड
मीठ

इतर जिन्नस
बाऽऽरीक रवा
पाणी

क्रमवार पाककृती: 

योगायोग! केवळ योगायोग!

काही कुकारणांनी घरी आणलेलं दूध नासावं आणि सुलेखाची घावनं आठवावीत हा योगायोग.
त्याच दिवशी संयोजकांनी पूर्णब्रम्ह स्पर्धा जाहिर करावी आणि फ्रिजात मक्याचे दाणे सापडावेत हा तर मणीकांचनयोग!
लगेचच दुसर्‍या दिवशीच्या नाश्ता मुहुर्तावर ही धिरडी केली आणि तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडला - 'अहाहा! मखमली धिरडी!'

कृती अगदी सोप्पी आहे. पाणी काढून टाकलेलं पनीर अर्धी वाटी घेऊन ते मिक्सरमधे अगदी छान गुळगुळीत वाटून घ्यायचं. त्यात वाटलेलं आलं, मिरची आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे घालून भरडसर वाटून घ्यायचं. मग त्यात एक भांडभर पाणी, अर्धी वाटी बाऽऽरीक रवा, मीठ आणि जिर्‍याची पूड घालून साधारण दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं. रवा उमलून आल्यावर चांगल्या तापलेल्या तव्यावर धिरडी घालायची आणि चटणी, लोणी किंवा सॉसबरोबर खाऊन टाकायची.

वाढणी/प्रमाण: 
अर्धी वाटी पनीर आणि अर्धी वाटी मक्याच्या दाण्यांची साधारण चार ते पाच धिरडी होतात.
अधिक टिपा: 

१. पनीरमुळे ही धिरडी इतकी स्निग्ध होतात की तव्याला अजिबात तेल/ तूप लावावं लागत नाही. खातानाही पनीरचा अलवारपणा मस्तपैकी जाणवतो. मी घरचंच पनीर वापरलं, बाजारच्या पनीरचं काही माहिती नाही.

२. यात बाईंडिंगसाठी कुठलंही पीठ घालू नका, धिरडी गिच्च होतात. रवाऽऽच वापरा, तोदेखिल बाऽऽरीकच.
मध्यम/ जाड रवा मक्याची शान घालवतो.

३. ही धिरडी जरा उरपतायला नाजूक होतात, त्यामुळे धिरडी करताना घिसाडघाई, धसमुसळेपणा इत्यादी पंचाक्षरी, षडाक्षरी कृती करू नका. पीठाची कन्सिस्टन्सी हुकमी ठेवा.

संयम राखी तो चविष्ट धिरडी चाखी

M Dhiradee.jpg
माहितीचा स्रोत: 
अर्थातच सुलेखा.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
नाहीच जमली तर त्यातच कणीक घालून पराठे लाटता येतील. (अर्थात हवे तेवढे पंचाक्षरी षडाक्षरी नाच करता येतील. :P)

षडाक्षरी>>> थँक्यू गं स्वाती Wink
ओ संयोजक, एवढं बदलते हां मी वरती.

स्वाती, लाट पराठे लाट, पण कणकेत 'ते' घाल. त्यात कणीक घातलीस तर घरातच डिस्कोदीवानेऽऽ आहा! Proud

Lol

पाककृती सांगायची पद्धत आणि प्रेझेंटेशन दोन्ही आवडलं. इंटरेस्टिंग वाटतेय, मुहुर्त लागला की करून बघणार.

मस्त वाटतय.
एकंदर लिहिण्याच्या स्टाईलवरुन मंजुडीने नाचत नाचत ही धिरडी केलीत हे जाणवते. (डो.मा)

ही "मुला" "यम" धिरडी आमच्यात कधी घडतिल तेव्हा घडतिल...
पण ही पाकृ आणि ती लिहायची इष्टाईल... लsssय (बाsssरिक च्याच तालात) भारी.
मंजुडे... झक्कास

लिहायची स्टाईल खूपच आवडली आणि पाकृ मस्त दिस्तिये अगदी!... यम्मी!! नक्की करून बघेन! (असे योगायोग घडण्याची वाट न बघता! :डोमा:)

तिखट मंजूडी, पाकृ लिहायची पद्धत फक्कड जमलीये तुला आता Lol

सुलेखाच्या कृतीने धिरडी खरंच मुलायम होतात. त्यात मक्याची अ‍ॅडिशन चांगली आहे. बाऽऽरिक रवा आहे घरात. करेन लवकरच.

पाककृती सांगायची पद्धत आणि प्रेझेंटेशन दोन्ही आवडलं. इंटरेस्टिंग वाटतेय, मुहुर्त लागला की करून बघणार>>> हेच म्हण्ते

वा! छानच लागतील ही धिरडी. नक्की करणार. सांगितलीयेस पण एकदम खुसखुशीत स्टाईलनी.
घरातले लोक पनीर खात नाहीत, आता यातून खायला घालता येईल.

मी आईला करायला सांगेन Proud
अगदी टिपांसह Proud Wink

सई, घरातले लोक पनीर खात नाहीत, आता यातून खायला घालता येईल.>>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! मला बोलवत जा मग जेवायला पनीर करशील तेंव्हा Proud

लिहायची स्टाईल मस्तय. Happy

पण मी तशीही घावनं /धिरडी याबाबतित थोडी ढ आहे आणि त्यातनं तूझी टिप नं ३ अजूनच घाबरवतेय. Happy

Pages