'' पत्र सांगते गूज मनीचे '' : तुमचा अभिषेक

Submitted by तुमचा अभिषेक on 16 September, 2013 - 12:06


Subject --- Hiiiiiiiiiiiiiiiii Bappu Happy

............................................................

हाय बाप्पू, सरप्राईज !!!
साहेबांना एक फोन करायला जड जातो आणि आज चक्क मेल !!

पण जास्त खुश नको होऊस, आणि लाजू तर मुळीच नकोस कारण लवलेटर नाही लिहिलेय.. बस्स असेच, टाईमपास.. चार दिवस झाले तू माहेरी, आणि घरी मी एकटा... तशी तुझी सवत असतेच सोबतीला, तिलाच घेऊन बेडरूममध्ये पडून असतो.. पण तिच्याबरोबर अख्खा दिवस काढायचा म्हणजे.. काही वेळाने वैतागायला होतेच, पण दुसरे काही करायला म्हणून उठून हॉलमध्ये जावे.. तर तुझ्या सासूबाईंचे होणार सून मी या घरची चालू असते.. त्यानंतर मग सुरू होते तू तिथं मी.. पण आपले मात्र तू तिथे आणि मी इथे... मग पुढे तुझं नि माझं जमेना.. आणि मला इथे तुझ्याविना करमेना... नंतरचे सखे ग्ग टाक पुढचं पाऊल बघवत नाही म्हणून मग माझी पावले आपसूक पुन्हा बेडरूमकडे वळतात, आणि आत येऊन पुन्हा तुझ्या सवतीलाच मांडीवर घेऊन बसतो.. आताही तेच चालूय.. ऑर्कुट, फेसबूक, ट्विटर, मायबोली अन सतराशे छप्पन गावे फिरून आल्यावर सहज टाईमपास म्हणून जी-मेल उघडले आणि आपल्या जुन्या चॅटींगचे रेकॉर्ड शोधायला घेतले.. अगदी तेव्हापासूनचे जेव्हा मी फ्रेंडशिप डे निमित्त पहिल्यांदा काहीही ओळख पाळख नसताना तुला ऑर्कुटवर रॅंडमली "हॅपी फ्रॅंडशिप डे" विश केले होते. तुलाच नाही तर कित्येक निवडक प्रोफाईल्सना.. आता ते निवडक प्रोफाईल केवळ मुलींचेच होते हे वेगळे सांगायला नकोच आणि ते निवडण्याचा निकषही अर्थातच आकर्षक प्रोफाईल फोटो हाच होता.. अन त्यावेळी तू देखील नेमका छानसाच फोटो लावला असल्याने माझी नजर तुझ्यावरही पडली होती.. आता हे दुर्दैवाने की सुदैवाने तुझे तूच ठरव.. Happy

त्यावेळी जवळपास ४०-५० सुंदरींना मी "हॅपी फ्र्यांडशिप डे" चा स्क्रॅप पोस्ट केल्यानंतर ३०-३५ निर्दयींनी सरळ इग्नोर मारले होते, तर १२-१५ जणींनी औपचारीकता म्हणून "सेम टू यू" वगैरे परतवलेले. ज्यात तू देखील एक होतीस, मग मी तुमच्यावरच फोकस करून तुमचे नाव-गाव-फळ-फूल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यात परत ८-१० कटल्या आणि ज्या ४-५ उरल्या त्यांचेही त्रोटक त्रोटक रीप्लाय आले. पण मी काही हिंमत सोडली नव्हती. ज्यांचे रिप्लाय आले नाहीत त्यांच्या नशीबी आपली मैत्री नव्हतीच असा सकारात्मक अर्थ काढून उरलेल्या मुलींकडे खर्‍याखुर्‍या मैत्रीचा हात पुढे केला. त्या चार-पाच जणी आणि माझा मैत्रीचा एकच हात, किती वेळ प्रत्येकी एकेक बोट पकडून तग धरणार होत्या. त्यांचा एकेक हात निसटत गेला आणि माझ्या एकेका बोटावरील भार कमी होत गेला.. जोक्स अपार्ट, पण शेवटी एक आणि एकच उरली जिच्याशी माझी आयुष्यभराची अशी ट्युनिंग जमली की ती झाली माझी आजवरची सर्वात बेस्ट ऑर्कुटफ्रेंड, माझी बेस्टेस्ट बेस्ट नेटफ्रेंड आणि माझ्या खर्‍याखुर्‍या आयुष्यातील देखील माझ्या आईनंतरची माझी सर्वात सुंदर मैत्रीण................... अर्थात, आणखी कोण, तूच तर ती लकी गर्ल Happy

मस्कापाणी नाही करत आहे, पण बस्स असेच, जे काही तुला आज सांगायचे आहे त्यासाठी या प्रस्तावनेची गरज भासली..

तर आज अगदी त्या काळापासून आपली चॅट वाचत होतो.. तुझ्याशी फ्रेंडशिप करायला म्हणून विचारलेले सतरा प्रश्न अन तुझी तीच तशीच चारचार दिवसांनी येणारी तुटक तुटक उत्तरे.. चाळता चाळता मला सापडली ती आपली पहिली भलीमोठी चॅट.. जे माझ्या रोजच्या प्रश्नांना वैतागून तूच मला चॅटींगला इन्वाईट केले होतेस....... आणि तिथेच फसली होतीस Happy

काय गोडगोड बोललो होतो यार मी तुझ्याशी. पक्का फ्लर्ट होतो ना मी तेव्हा... Happy

पण तेव्हा मी जे तुझ्याशी बोलायचो त्याला फ्लर्टींगही नाही म्हणता येणार.. उलट सुरुवातीच्या दिवसांतील ते एवढे अदबशीर बोलणे, मला आता वाचताना पचायलाही जड जात होते आणि हसायलाही येत होते कि हे असे बोलणारा तो मीच होतो.. आणि ते ही तुझ्याशी बोलताना.... कदाचित मी एका लेक्चरर मुलीशी बोलत आहे याचे मला भान असावे किंवा असे असते ना, काही जणांबद्दल जाणून घ्यायच्या आधीच एक सेन्स जागृत होतो की समोरची व्यक्ती कशी असावी अन आपण तिच्याशी कसे वागावे... बस्स तसेच काहीसे असावे.. पण मग त्यानंतरची प्रत्येक चॅट मी वाचायला घेतली.. सुरुवातीला आठवड्यातून एखाद दुसरा दिवस काय ती होणारी, मग हळूहळू दर दुसर्‍या दिवशी अन बघता बघता रोजच, दिनरात चोबीसो घंटे.. अहोजाहो वरून अरेतुरे आणि बघता बघता अभीचा अबड्या आणि सुवर्णाचा सुवड्या कसा झाला ते समजलेच नाही.. पण काय ग्ग शहाणे, फोन नंबर एक्स्चेंज करताना किती नखरे केले होतेस तू.. किती तंगवले होतेस मला.. आणि एकदा शेअर केल्यावर मग काय उलटेच.. विचारायलाच नको, आठवतेय ना सकाळ-संध्याकाळ ट्रॅवलिंग करताना, लंचटाईम - टी ब्रेक, कुठेही फुरसत नसायची.. नशीब रिलायन्सने मला फुकटचा फोन दिला होता म्हणून परवडायचे तरी..... अर्थात, पैसे पडले असते तरी आपले बोलणे काही कमी झाले नसते ती गोष्ट वेगळी..

त्यानंतर मग पुढच्या चार-सहा महिन्यांत आपली मने कशी जुळत गेली ते सगळे चॅट बाय चॅट उलगडत होते.. फुल्ल टू फिल्मी स्टाईल.. आणि त्यातच मग एक दिवस तू आपले मन मोकळे केलेस, मी भाव खातच होकार दिला, खरेतर सुरुवातीला ठामपणे होकारही दिला नव्हता, आपले लग्न होणे तसे कठीणच होते याची जाणीव होती मला.. पण तरीही ठाम नकारही देऊ शकलो नव्हतो.. त्यानंतर मात्र बघता बघता बदललेली चॅटींगची लॅंगवेज आणि त्यातले विषय.. मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाऊन त्यात आलेला एक हळूवार रोमॅंटीकपणा, आजही वाचताना मनाला गुदगुल्या करून जात होता..

पुढच्या घडामोडी तुला ठाऊक आहेतच, आपल्या लग्नाला दोघांच्या घरून झालेला विरोध.. माझ्या घरून जरा जास्तच, कारण आम्ही सो कॉलड उच्चजातीय ना.. रोज तू तुझ्या घरच्यांना समजवायचीस आणि मी माझ्या घरच्यांना.. रोज रात्री चॅट वर तोच तो विषय.. आज घरी काय बोलणे झाले, तुझे बाबा काय म्हणाले, माझ्या आईने काय प्रतिक्रिया दिली.. एकमेकांना रोजची प्रगती विचारायचो आणि आजही परिस्थिती जैसे थे च आहे हे समजूनही एकमेकांना लव यू टू, सेम टू यू, गूडनाईट आणि स्वीट ड्रीम्ज ..

एकेका दिवसाची चॅट वाचत होतो आणि आपल्या आयुष्यातील एकेक पान उलगडत होते.. कुठे आयुष्याच्या गाडीचा टायर चिखलात रुतला की काय असे वाटायचे तर कधी हा एवढा पडाव पार केल्यास बस चार पावलांवर सुखाचे डेस्टिनेशन आहेसे वाटायचे.. आणि सरते शेवटी तो मार्ग निघालाच.. आपण घरच्यांना न जुमानता रजिस्टर लग्न करायचे ठरवल्यावर त्यांचा विरोध तोकडा पडलाच.. तरीही समाजाच्या भितीने त्यांनी थोडीशी कच खाल्लेली.. त्यांच्या पुरेश्या संमतीशिवाय का असेना किमान बिनविरोध एकदाचे आपले रजिस्टर लग्न झाले, पण तरीही जोपर्यंत चार लोकांच्या साक्षीने होत नाही तोपर्यंत मी माझ्या घरी आणि तू तुझ्या घरी.. अगदी साथिया स्टाईल !

त्या दिवसांतली चॅट खासच होती.. वेगगवेगळे का राहत असेना आपण नवराबायको होतो.. ईंटरनेटच्या माध्यमातून भेटलेले दोन अनोळखी जीव, आधी ओळख, मग जुळलेली मैत्री, फुलणारे प्रेम ते थेट नवराबायकोचे नाते अन त्यानुसार बदलत गेलेली चॅटींग.. कधी लाडात येणे तर कधी रुसवे फुगवे अन काय काय नि काय नाय....... बस्स त्याच दिवसांतली आपली चॅट वाचत असताना तुझा एक मेल हाताला लागला.. विस्मरणात गेलेला..!!

जणू काही तो मेल माझ्या हाती लागावा म्हणूनच मला आज हे भूतकाळात डोकावायची सुबुद्धी झाली असावी..

काय अन कसलं लिहिलेलेस ग्ग तू.. अगदी काळजाच्या आतून.. वाचताना आजही माझ्या डोळ्यातून पाणी काढलंस.. पण कदाचित तेव्हा आले होते की नाही शंका वाटते.. खरेच अशी परिस्थिती माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात उद्भवावी असे वागलो होतो का मी.. अर्थात, असेलच.. पण आज वाचताना विश्वास ठेवायला कठीण जात होते.. त्यावेळी मी त्याला काय उत्तर दिले होते ठाऊक नाही.. मेलला तरी नक्कीच रिप्लाय केलेला दिसत नव्हता.. कदाचित दुसर्‍या दिवशी बोलून समजूत काढली असावी.. अन कदाचित ती देखील पोकळ आश्वासने देऊन.. अर्थात ते ही आता आठवत नाही... पण आज तीन-साडेतीन वर्षांनी का माहीत नाही त्या मेलला उत्तर द्यावेसे वाटतेय.. पण आधी तू तो मेल वाचून तर घे.. कदाचित तुला आठवत असेल..... त्यातील शब्द न शब्द..!

-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_

टू माय डियरेस्ट हसबंड अभी.........

हाय !
मेल लिहायला घेतली आणि खूपच ऑड वाटले !!
पण खरेच रे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता माझ्याकडे, कारण तुला यावर बोलायचे नाही आणि मला असे गुदमरायचे नाही...
हो राईट, करेक्ट ओळखलेस ! आपलाच नेहमीचाच कटकटीचा टॉपिक आहे !!
सॉरी !! बट हॅव टू डिस्कस रे ..
मी जेव्हा पण हा टॉपिक काढते ती माझी मजबूरी असते.... अ‍ॅण्ड फॉर युअर काईन्ड इन्फो, माझ्या घरी हा टॉपिक रोज असतो, मग मला त्याचा किती त्रास होतो याचा कधी विचार केलास का?? मी कधीतरी हा टॉपिक काढते तर तू लगेच बंद करतोस, चिडतोस, आणि तुला हि कटकट वाटते....... पण मला सारखी कटकट करायला आवडते असे का वाटते तुला??
अभी आपण कोर्ट मॅरेज केले असले तरी हे आपल्यालाच माहित आहे...... तुला, मला आणि आपल्या पॅरेंटसना बस्स... मी तुला असे कधीच नाही म्हणत की लगेच माझ्याशी लोकांसमोर लग्न कर, बट आय एक्स्पेक्ट की आता तरी तुझ्या पॅरेंट्सने माझ्या पॅरेंट्सना भेटावे... भेटून काहीतरी बोलणी करावी.... काहीतरी निघेल त्यातून..... आता नाही करायचे तरी ४ महिन्यानंतरची मिळून डेट तर फिक्स करूया... तुला हे चुकीचे वाटते का..
आणि हो, लेट मी मेक इट वेरी क्लीअर हा माझा स्वताचा विचार आहे.... तुला नाही का वाटत की आतातरी आपल्या पॅरेंटस नी भेटून डेट फिक्स करावी??? मग ती दोन या चार महिन्याने तो त्यांचा प्रॉब्लेम आहे.. बट भेटणे इम्पॉर्टंट आहे !
मी हेच तुला दरवेळी सांगत असते पण तू टाळाटाळ करतोस....

अभी मला कळते की अजून तुझे पॅरेंटस समाजाला घाबरतात पण जरा माझ्या पॅरेंटसचा पण विचार का नाही करत तू??? त्यांचे मन नाही का? त्यांना टेन्शन नाही का?
फ़क्त एकदा तुझ्या घरून फोन आला होता आणि त्यावर काहीच डेवलेपमेंट त्यांनी सांगितली नाही..... अभी तुझे बाबा म्हणाले होते की दिवाळीत एंगेजमेंट करून ठेऊ आणि मग डिसेंबर मध्ये या फेब्रुवारी-मार्च मध्ये लग्न करू....... याचे नंतर काय झाले?? माझ्या पॅरेंटसनी तुमच्या जागेची अडचण समजून घेतली होती पण तुम्ही एकदातरी फोन करून या भेटून त्यांना विश्वास का नाही देत??

अभी १ विचारू......................... तुझ्या मनात पण नेमके काय आहे? तुला स्वताला काय करायचे आहे? तू कधी माझ्या साईडने विचार केलास का रे? कधी माझ्या पॅरेंटसचा विचार केलास का?
मी तुला नेहमी सांगते की अ‍ॅटलीस्ट फोन या भेटू दे आणि थिंग्स क्लीअर होऊ दे, पण तुम्ही फोन या भेटायला टाळाटाळ करत आहात? याचा अर्थ चुकीचा नाही का निघत??

आता तुला वाटेल की लग्न केलेय मग काय नखरे आहेत, पण असे नाहिये...... लग्नाचा निर्णय दोघांचा होता आणि घरच्यांचा सपोर्ट पण होता...... अभी माझ्या तर्फेचा डिसीजन मी स्वता नाही घेऊ शकत आहे कारण मी तुझ्यावर डिपेंड झाली आहे..... मी तुम्हा सगळ्यांच्या हाताखाली अक्षरशा कटपुतली झाली आहे....

तु बिनधास्त सांगतोस की घरचे त्रास देत असतील तर सोड आणि जा हॉस्टेलमध्ये......... पण तू माझा नवरा आहेस तर ये घरी आणि ने मला सगळ्यांसमोरून आणि ठेव हॉस्टेलमध्ये..... जर घरी न्यायची हिंमत नसेल तर तेवढी हिम्मत तरी दाखव !!

तुझ्या पॅरेंटसने अ‍ॅक्सेप्ट केले हे खूप चांगले झाले पण नुसते अ‍ॅक्सेप्ट करने आणि त्यापुढे काही करने यात किती फरक आहे !!
आपल्याला त्यांचा सपोर्ट आणि साथ हवी आहे म्हणून आपण त्यांच्या कलाने घेत आहोत पण यार काही डिसिजन घेत नाहीत तर मग कसे होणार आणि अश्या तुझ्या वागण्याने मी काय करू.... तुझ्यावर माझी लाईफ डिपेंडंट आहे आणि तू मला काहीच ठाम सांगत नाहीस, अभी असे कसे रे चालणार???

दर वेळी मी हा टॉपिक काढला की मनात एक भिती असते की यार काही जमायच्या आधी बिघडेल............. पण अश्या भितीखाली मी किती दिवस मरू??? आय स्वेअर...... रीअली गॉड स्वेअर की मला तुला खरेच कटकट ऑर त्रास द्यायचा नसतो, कारण तुला त्रास झाला तर त्याच्या कितीतरी पट त्रास मला होतो पण कधीतरी माझा पेशंन्स पण संपतो..... मला फक्त फर्म स्टेप्स हवेत, काही डिसिजन हवेत, काही निर्णय हवेत..... आणि हे सगळे तू घ्यायला हवेत......... कारण माझी लाईफ माझ्या हातातून कधीच निघून गेली आहे...... ज्या दिवशी आपले लग्न झाले ना त्या दिवशी......

अभी मी तुझी बायको आहे रे, जरी हे कागदोपत्री असले ना तरी हेच सत्य आहे आणि राहणार आहे त्यामुळे तू डिसिजन घ्यायला हवेत.... आपल्या सगळ्यांसाठी....
तू तुझ्या पॅरेंटसना फर्मली का नाही रे सांगू शकत??? भले लग्न नको पण काहीतरी........ अ‍ॅटलीस्ट डेट वगैरे तरी फिक्स करू नाही का शकत????
इतकी तुमच्या लोकांची आणि तुमच्या समाजाची काळजी आहे का??? माझ्या घरच्यांना ती नाही का???
जर तुझा तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे तर तू का नाही गोष्टी घडवून आणत??

अभी खुप त्रास होतो रे आणि त्यामुळे खूप चिडचिड पण होते आणि त्यामुळे दोघांना पण त्रास होतो पण तू खरेच का रे असा वागतोस??? तुझ्या या अश्या वागण्यामुळे तू खूप लोकांच्या मनात दुरावा निर्माण करतोयस, मिसअंडरस्टॅंडिंग पण.... माझ्या पॅरेंट्सच्या, तुझ्या पॅरेंटसच्या, माझ्या स्वताच्या....
आपले लग्न हा नुसता पोरखेळ नव्हता रे...

मी माझ्या परीने प्रयत्न करते पण मला तुझी साथ कधीच नाही मिळत आणि आपल्या लाईफ मध्ये असे कितीतरी क्षण येतील ज्यात तू मला एकटे पाडशील अशी भिती मला आता वाटू लागली आहे..... माझा कॉन्फिडन्स डळमळू लागला आहे यार....

आपल्या पॅरेंटसना एकदुसर्‍यांबद्दल शंका कुशंका येणार जोपर्यंत त्यांच्या गाठीभेटी नाही होणार..... मी पुढाकार घेतला होता माझ्या पॅरेंटस ना पटवून, नाऊ आय एक्स्पेक्ट की तू मला साथ देशील.... अभी रीलेशन टिकवने एकट्याच्या हातात किंवा त्याची एकट्याची जबाबदारी नसते पण दोघांची असते, आपल्या लाईफ मधले सगळे डिसिजन दोघांना पण इंफ्ल्युअन्स करणार आहेत.....
तू माझ्याशी लग्न केले आहेस सो तू माझ्या लाईफचे डिसिजन घ्यायला हवे आहेत, नॉट माय पॅरेंटस.. आणि जर तुला ती घ्यायची हिम्मत नसेल तर मला सांग तसे....... मी बघेन काय करायचे ते........ कारण आधी पॅरेंट्स आणि नंतर नवरा लाईफचे डिसिजन घेणार आहेत माझ्या आणि मला कोणाच्याही हातची कटपुतली बनायची इच्छा नाहिये..... मी पण एक ह्युमन आहे यार.... मला पण मन आहे !!

माझे नशीब खरेच चांगले आहे की मला तुझ्यासारखा लविंग, केअरींग, सेन्सिटीव, अंडरस्टॅंडिंग एक्सेट्रा..... हसबंड मिळाला, पण तो विश्वास प्लीज तसाच ठेव, त्याला जाऊ देऊ नकोस....
माझे तुझ्यावर जितके प्रेम आहे ना तेवढे जगात कोणावरही नाही हे मजाक जरी वाटले तरी इट्स ट्र्यू... त्यामुळे काही गोष्टी मी तुझ्याकडून एक्स्पेक्ट करते, तू आपल्या लाईफचे निर्णय घ्यावेस, तू डिसाईड करावे कि मी कुठे रहावे, कसे रहावे, आपले लाईफ कसे असावे........... एक्सेट्रा, पण तुला तुझ्या पॅरेंटसना काही छोट्या गोष्टींसाठी कन्विन्स करायला जमत नसेल तर फरगेट अबाऊट माय एक्स्पेक्टेशन्स....

हा विचार करून फार वाईट वाटते आणि मग फ्युचर मध्ये पण असेच होणार का याची चिंता होते...
तू मला साथ देशील असे वाटते पण पण लगेच आताची परीस्थिती डोळ्यासमोर आली की लाईफ मध्ये काहीच नाही उरले असे वाटते..... अगदी फ्रस्ट्रेशन येते रे..

तू मनाने खूप चांगला आहेस रे पण मी नाही इतकी चांगली आणि समजूतदार.. तू देव असलास तरी मी एक साधी मनुष्य आहे रे....
मला असे मनात नाही ठेवता येत, गुदमरायला होते, खूप बोलायचे असते पण तुला ऐकायचे नसते.... आणि तसे ही न ऐकलेलेच बरे कारण मी चिडून आणखीन काहीतरी बिघडवेन... पण मला हे खरेच सगळे नाही सहन होत, गुदमरते आणि जीव जाईल माझा असे वाटते....

इतके सारे लिहून मी माझे मन हलके केले असेल पण तुझ्यावर प्रेशर आले असेल.......... पण अभी रीअली रीअली रीअली सॉरी......... मी स्वताला माफ नाही करू शकत तुला त्रास झाला तर..... बट काही गोष्टी असतात त्या आपल्या हातात नसतात कारण त्या दुसर्‍यांच्या हातात असतात... म्हणून तुला हे कसेपण करून मला सांगायचे होते.....

प्लीज याचा चुकीचा अर्थ काढू नकोस, जस्ट प्रॅक्टीकली विचार कर, सगळ्या बाजूनी, स्वताला त्या त्या ठिकाणी ठेव आणि मग जर तुला माझे चुकीचे वाटत असेल तर मग आय अ‍ॅक्सेप्ट माय डिफीट... डिफीट दॅट आय कूल्ड नॉट क्लॅरीफाय मायसेल्फ आणि तू मला चुकीचा समजतोस...

आता यावर तुझी रीअ‍ॅक्शन काय असेल देव जाने.... तू चिडशील, बडबडशील, भांडशील.. व्हॉटेवर, अ‍ॅम रेडी फॉर ऑल..... कारण हे आज नाहीतर उद्या कधीतरी होणारच आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर बरे...

तुझी तब्येत आज बरी नाही म्हणून आज पोस्ट नाही करत, उद्या वाच आणि होप तू नीट विचार करशील आणि या टॉपिक वर माझ्याशी व्यवस्थित बोलशील..... न टाळमटाळ करता...

मी तुझ्याबरोबर खूप खुष आहे, तुझ्या प्रत्येक टच मध्ये फीलींग्स असतात, प्रत्येक शब्दात असतात, आणि मला माहीत आहे कि तुझे पण खूप प्रेम आहे माझ्यावर, जरी ते मी तुझ्यासमोर कबूल करत नसेल तरी.... आपण एकदुसर्‍याबरोबर खूप खुष आहोत.... फक्त लग्नाचा टॉपिक निघाला कि खटके उडतात, आधीपण उडायचे आणि आतापण उडतात.....

जर जास्त बडबड केली असेल जी तुला आवडली नसेल तर आधीच सॉरी....... माझ्या मनात कोणाबद्दल राग नाही, मला तुमचे घर तोडायचे नाहीये, मुळीच नाही आणि याचे टेंशन तर मुळीच घेऊ नकोस कारण मी कशीही असले तरी मला काही संस्कार आहेत... जस्ट मला पण तुमच्या घरात जागा हवी आहे... मला पण तुमच्यात सामील व्हायचे आहे....

मी सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करायला रेडी आहे... तुझे पॅरेंटस, रिलेटिवस, तडजोड, पण मला फक्त तुमच्याकडून एका फोन या भेटीची अपेक्षा आहे ज्यामुळे आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, आपली कटकट संपेल, आणि आपली लाईफ चांगली होईल..... नॉट ए ड्रीम लाईफ, बट अ‍ॅटलीस्ट पीसफुल लाईफ... काही नाही म्हटले तरी नेहमीच काहीतरी एक्स्पेक्ट करतेच मी..... हावरट आहे ना !!

मला फक्त एक सुखी संसार हवा आहे, माझी साथ देणारा, जीवापाड प्रेम करणारा नवरा आणि प्रेमळ, केअरींग, अंडरस्टॅंडींग सासर......... बाकी काय लागते मुलीला??????

देशील का रे मला हवे ते??? करशील का माझ्या आशा पुर्ण??? लाईफमध्ये कधी माझी साथ तर नाही ना सोडणार????? माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू बोलतोस ते पण बरोबरच आहे.... वेडी आहे तुझ्या प्रेमात, पण तू मला खरेच वेडे नाही ना करणार या सगळ्यामुळे???

वाचताना तुला डायलॉग वाटतील आणि यावर तू हसशील पण, बट या माझ्या खर्‍या फीलींग्स आहेत...
बरेच काही लिहिलेय.... काही मनाविरुद्ध असले तरी ते लिहावेसे वाटले, आय बिलीव्ह की मनात असे काही ठेऊन उगाच मिसअंडरस्टॅडिंग्स नकोत, उलट ते बोलून क्लीअर केलेले बरे....

हेच आपल्या लाईफचे मेन असेल, कधी काही मनात ठेवायचे नाही... इन्फॅक्ट मी नाही ठेऊ शकत काही आणि फट करून बोलते, बर्‍याचदा हर्ट होते पण आय वॉंन्ट एवरीथिंग टू बी क्लीअर.. लाईफ मध्ये असेच काहीतरी सिच्युएशन येणार आणि यातच आपली खरी कसोटी आहे...

अभी वाचून कंटाळला असशील ना??? पण रोजच्या ऐवजी एकदाच हि कटकट संपव.....
मेल वाचून नीट विचार कर आणि मग मला सांग..... तू काय करणार आहेस? मी काय करावे?? माझ्या पॅरेंटस ने काय करावे? तुझ्या पॅरेंटसने काय करावे?
कारण सगळे डिसिजन तुझ्या एकट्यावर आहेत....

bbyeeeeeeeeeeeeeeeeeeeeee!
sweetheart...................
loadz of luv..................................

-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_

.
.
.
टिक टॉक टिक !!!!
सेंटी झाली असशील ते दिवस आठवून तर बाहेर ये त्यातून.. डोळ्यात पाणी वगैरे आले असेल, स्वताच लिहिलेले वाचून, तर घे पुसून.. Happy

याला उत्तर द्यायचे म्हणून ठरवले तर होते, पण काय द्यावे ते खरेच समजत नाहीये, त्या नादात या मेलची दहाबारा पारायणे मात्र झाली.. पारायणे म्हणजे दहाबारा वेळा वाचला मी तो मेल, पण कदाचित नाही जमणार उत्तर द्यायला, दिले तरी ते तोकडेच पडणार, कदाचित तुला आजच्या तारखेला माझ्याकडून उत्तराची अपेक्षाही नसेल.. पण तरीही, बस्स माझे मन हलके करण्यासाठी म्हणून.. काहीतरी लिहावेसे वाटतेय, पण काय लिहू हा खरेच प्रश्न पडलाय.. मात्र एक गोष्ट तरी आज प्रामाणिकपणे कबूल करतो की जेव्हा हा मेल तू मला लिहिलेलास.. जेव्हा तू एवढे टेंशनमध्ये जगत होतीस.. त्या काळात मी मात्र निश्चिंतपणे सुखाने माझे जीवन जगत होतो.. नाही म्हणायला त्या आधी टेंशन होते मला, आपल्या लग्नाचे टेंशन.. कारण आपला विवाह नुसता आंतरजातीय विवाहच नव्हता तर आपल्यात अगदी काही काहीही साम्य नव्हते.. ना आपल्या जाती एक होत्या ना प्रांत-प्रदेश.. मी सो कॉलड उच्चजातीय तर तू कमी लेखले जाणार्‍या जातीतून... मी कोकण किनारपट्टीवरचा तर तू कराड-सातार्‍याची.. तू शुद्ध शाकाहारी तर मी शाकाहाराला घासफूस समजणारा.. तू पेश्यानेच नाही तर स्वभावानेही लेक्चरर, तर मी लास्ट बेंचर्स असोशिएनचा सन्माननीय सभासद... एवढेच नाही तर एखाद्या जोडप्यात जग जे सुरुवातीला बघते त्या रंगरुपाच्या निकषावर तरी कुठे जुळत होतो आपण.. मी सिंगल पसली तर तू हेवीवेट चॅंपियन, बाजूला उभे राहिल्यास दहाचा आकडा वाटावा अशी आपली जोडी.. मागच्या पिढीच्या पचनी न पडणारे ईंटरनेटवर जुळलेले प्रेमप्रकरण.. अन हे देखील काय कमी म्हणून जेव्हा आपल्या पत्रिका जुळवल्या गेल्या, तेव्हा त्यात मृत्युयोग निघाला..!

मृत्युयोग !! आमच्या घराण्यात आधीही पत्रिकेतल्या या योगाने आपला करिष्मा दाखवून झाला होता.. माझे काका-काकी गेले होते त्यात.. भले मी या सार्‍याला मानत नसलो तरी घरच्यांच्या श्रद्धेला आव्हान देणे कठीणच होते, अन अश्यात आपल्या लग्नाला परवानगी मिळणे म्हणजे... अशक्यप्रायच ! अन तरीही ती मिळाली.. कदाचित मी एकुलता एक असण्याचा हा फायदा..! बस्स माझे टेंशन जे काही होते ते तिथेच संपले होते..!

आमच्या जागेच्या अडचणीमुळे लग्न तुर्तास पुढे ढकलावे असे माझ्या घरच्यांनी ठरवले आणि तुम्हा लोकांना शाश्वती मिळावी म्हणून रजिस्टर लग्न ठरवलेल्या तारखेला उरकून घेऊया म्हणाले.. कबूल आहे कि तेव्हाही माझ्या घरचे किंचित नाराजच होते वा समाजालाही घाबरत होते, पण त्यांनी लग्नाला परवानगी देणे हेच त्यावेळी माझ्यासाठी खूप होते. त्यामुळे त्यांच्यावर आणखी अतिरीक्त दबाव टाकावा किंवा आणखी मागण्या कराव्यात असे त्याक्षणी नव्हते वाटत मला, वा त्याची गरजही वाटत नव्हती.. मला खात्री होती कि आता ते आपली फसवणूक नाही करणार आणि योग्य वेळी देवाब्राह्मणांच्या साक्षीने आपले लग्न होईलच.. आता याउपरही त्यांना काही विचारणे किंवा त्यांच्यामागे टुमणे लावणे म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखेच होते.. ज्या तुझ्या मागण्या होत्या, ज्या तुझ्या अपेक्षा होत्या त्या मान्य करणे म्हणजे माझ्यादृष्टीने बनलेला खेळ बिघडवण्यासारखेच होते...... आणखी काय सांगू, तू समजून घेतलेस तर हेच स्पष्टीकरण पुरेसे आहे, नाहीतर सारे नुसते शब्दांचे खेळ आहेत..

पण एक मात्र मी मान्य करतो, की माझी एक चुकी झाली... चुकी झाली ती त्यावेळची तुझ्या घरची परिस्थिती समजून घेण्यात.. अन कदाचित तुलाही समजून घेण्यात.. अन या मागे कारण होते ते..........

ते म्हणजे, मी नव्हतो तेव्हा तुझ्यावर तेवढे प्रेम करत जेवढे तू माझ्यावर करत होतीस.

हो, हे खरे आहे.. अगदी रजिस्टर मॅरेज करताना देखील माझ्या डोक्यात हेच होते की मी एका अश्या मुलीशी लग्न करतोय जिचे माझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझे मात्र तिच्यावर तितकेसे प्रेम नाही... तरीही मी तिच्याशी लग्न करतोय कारण ती माझी आजवरची बेस्ट फ्रेंड आहे....... कि मी चुकीचा होतो.. ज्याला मी मैत्री मैत्री समजत होतो तेच तर खरे प्रेम होते.. बस्स, मला ओळखता येत नव्हते..... नाही सांगू शकत मी आज, त्यावेळी मला तुझ्याबद्दल वाटणार्‍या भावना नक्की काय होत्या.. त्या नक्की कश्यात मोडत होत्या.. पण तरीही लग्न मात्र मला तुझ्याशीच करायचे होते.. कारण तू माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची मला कदर होती.... तेव्हाही आणि आजही..!

खरे तर तेव्हा कधी तुला आयुष्यातून गमावण्याची भिती वाटावी असे माझ्याशी काही घडलेच नव्हते, आणि म्हणूनच कदाचित तुझ्यावर माझे किती प्रेम होते ते जाणवलेच नव्हते...
पण आज.....
आज जेव्हा मी माझ्या भावी सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवतो तेव्हा त्यातील प्रत्येक फ्रेम तू व्यापलेली असतेस..
आज जेव्हा मी सुख सुख म्हणजे आणखी काय असते याचा विचार करतो तेव्हा तो विचार तुझ्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही..
आज माझा प्रत्येक दिवस तुझ्याबरोबर सुरू होतो आणि तुझ्या साथीनेच मावळतो..
आज जेव्हा मी माझ्या स्वत:बद्दल विचार करतो तो देखील तुझ्यापासूनच सुरू होतो..
आज...... हा माझा आज कदाचित काल नव्हता, पण हाच आज उद्या ही कायम असणार याची खात्री आहे मला आज..
कालपर्यंत तू माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची कदर होती मला... पण आज तुझ्या डोळ्यात डोळे घालून मी खात्रीने सांगू शकतो की तेवढेच प्रेम मी सुद्धा तुझ्यावर करतो आज..
आणखी काय बोलू.. सारेच तर तुला ठाऊक आहे.. बस्स समजून घेशील ना मला आज.. !!

तुमचा, अंह,, तुझा...
आणि फक्त तुझ्झाच अभिषेक !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदरणीय संयोजक,
स.न.वि.वि

एका मेल मध्ये मी दुसरा मेल गुंफुन त्याला प्रत्युत्तर दिलेय ज्यात मूळ मेल बायकोचा असून त्याला प्रत्युत्तर देणारा मी आहे.
हे नियमात बसत नसेल तर कृपया वेळीच सांगा म्हणजे पुन्हा बायकोतर्फे एक छोटासा परतीचा मेल (पत्र) आणखी लिहून त्याला नियमात बसवेन. Happy

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

हरकत नाही तुमचा अभिषेक. याबाबतीतले नियम शिथिल केलेले आहेत. पत्रव्यवहारातील सौंदर्य ,लालित्य ,त्यातली गंमतही यानिमित्ताने जागवावी हा मूळ उद्देश आहे.

अभिषेक, एवढं मोठ्ठं पत्र-पत्रोत्तर, म्हणून वाचायला टाळाटाळ करत होते, पण एकदा सुरुवात केली, आणि गुंतूनच गेले त्यात... सुरुवातीला अजिबात न आवडलेलं तुझं पत्र जस-जसं नेटाने वाचत गेले, तस-तसं जे काही उलगडत गेलं, त्याच्याशी तादात्मिकरण होत गेलं आणि तेच फार म्हणजे फार आवडत गेलं. खुप लोक तुझ्या या वास्तवातल्या/कल्पनेतल्या अनुभवाशी रिलेट करू शकतील, याची खात्री आहे मला.. मस्त मस्त मस्त!!!! Happy

प्रेमात पडल्यावर अशी लांबलचक पत्र इमेल फारच छोटी वाटतात आणि मग अगदी पारायणे होतात. Happy

मस्तच रे !!!

बाकी हे खरच की ........ Happy

पूर्णपणे रिलेट झालीय.. लिंक पाठवतेय पुढे Happy Wink

प्रेमात पडल्यावर अशी लांबलचक पत्र इमेल फारच छोटी वाटतात आणि मग अगदी पारायणे होतात. >> कितीदा याची गणती नसते Happy

खूप छान अभिषेक !! आमची प्रेमकथा पण खूप खूप जुळती आहे फक्त parties विरुद्ध होत्या. माझा नवर्याने त्याचा घरी सांगितले आणि माझ्या घराचे अडून बसले होते मानायला तयारच नाहीत. नवरा त्या वेळेस खूप मानसिक त्रासातून गेला, career मध्ये त्याला तड-जोड करावी लागली..असो आता सारे काही आठवले पत्र वाचून. आज हि पूर्वी चा त्रास आठवला तर नवरा अस्वस्थ होतो कधी कधी त्याला हे पत्र दाखवेन नक्कीच. हे पत्र वाचून मला relate होत आहे के त्याला किती त्रास झाला झाला होता.खूप खूप आवडलं !!

सर्व प्रतिसाद अन मायबोलीचे देखील धन्यवाद जे मला इथे यावर लिहायला सुचवले..

खरे तर वर पत्रात उल्लेखलेल्या आमच्या रजिस्टर लग्नाचा चौथा वाढदिवस परवा म्हणजे १९ सप्टेंबरला आहे.. मागच्या वर्षी जेव्हा मला लिखाणाचा नवीनच छंद लागलेला तेव्हाच मनात होते की बायकोला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून जसे ग्रीटींग देतात तसे एखादे पत्र लिहून द्यावे, पण ते राहिलेच.

पण यावेळी मात्र अनायासेच संधी मिळाली ती साधली.. हे पत्र परवा तिला नक्की वाचायला देईन.... इथेच देईन किंवा मेल करेन..

या वरच्या पत्रव्यवहारातही मी दिलेल्या उत्तरापेक्षा माझ्या बायकोच्या वतीने मी लिहिलेले पत्र जमतेय की नाही याची जास्त उत्सुकता होती, जरी ते मीच लिहिले असले तरी ते सारे शब्द अन भावना तिच्याच आहेत, होत्या, ज्या मी त्यावेळच्या आमच्या चॅटमधून संकलित करून तिच्याच शैलीत इथे मांडल्या..

मागे कुठेतरी वाचलेले की कोणीतरी सांगितलेले,
बायकांना स्पष्टीकरण किंवा उत्तराची अपेक्षा नसते तर समोरच्याने आपल्या भावना समजून घेणे यातच त्या समाधानी असतात... बघू आता परवा मला समजेलच यात मी कितपत यशस्वी झालो .. जरी हे पत्र मी इथे स्पर्धेला म्हणून टाकले असले तरी मी यात जिंकलो का नाही हे आता परवाच समजेल..

आतापर्यंतच्या सर्व प्रतिसादांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद Happy

अभिषेक , अगदी भरभरून लिहिले आहे, खरंच गूज मनीचे हा हेतू साध्य झालाय. कधी प्रत्यक्ष कधी छुपा असा खूप स्तरांवरचा विरोध अजूनही असतो आंतरजातीय प्रेमविवाहाला ,जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे Happy

हो झालेय खरे भरभरून.. लिहून झाल्यावर माझ्याही लक्षात आले की भले माझ्यासाठी हे मायने ठेऊन असले तरी एखाद्याशी हे रिलेट नाही झाले तर एवढे चर्हाट वाचत बसेल का.. पण त्यात एडिटेबल किंवा काटछाट करण्यासारखेही काही सापडले नाही..
अगदी सुरुवातीचेही तिला सांगणे गरजेचे होते कारण माझ्या लॅपटॉपला ती आपली सवत समजते अन ती माहेरी महिनाभर जरी राहिली तरी मला काही फरक पडणार नाही अस तिला वाटते.. फरक पडतो, पण खरं तर पुरुषांना सवय नसते की आठवण आली तर लगेच फोन करा.. बस्स इतकेच..

अभिषेक,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पत्र सांगते गूज मनीचे' असा बदल करा.

अभिषेक, एवढं मोठ्ठं पत्र-पत्रोत्तर, म्हणून वाचायला टाळाटाळ करत होते, पण एकदा सुरुवात केली, आणि गुंतूनच गेले त्यात... >>>> अनेकानेक अनुमोदने Happy
आणि अभिषेक माझ्या दृष्टीने तरी तू "समोरच्याने आपल्या भावना समजून घेणे" ह्या मधे नक्की जिंकलाहेस.... स्पर्धेचं काय ते संयोजक बघून घेतील Happy

अभिषेक कसे वाटले पत्र वाहिनी ला ..लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! तुमच्या साठी तर वर्षातून २ वेळा celebration आहे.

हो, दोन दोन सेलिब्रेशन हे खरेय... अन ते करतही आलोय.. दोन लग्नाचे वाढदिवस अन दोन आम्हा स्वताचे जन्मदिवस असे वर्षातले चार दिवस आम्ही दोघेही आजवर सुट्टी टाकत आलोय, फक्त यंदाचाच अपवाद.. माझे ऑफिसचे कामच तसे निघाले म्हणून सेलिब्रेशन संध्याकाळी लेट सुरू अन रात्री उशीरापर्यंत चालले..

असो, दुपारी तिला याची लिंक मेल केलेली अन वाचायला सांगितलेले, पण त्या दिवशी वेळ नाही मिळाला आणि त्यात काय आहे हे माहित नसल्याने तिने पुढच्या दिवशीही वाचले नाही.. आता मुहुर्त तर टळलाय म्हणून पुढच्या २-३ दिवसात रूटीन नुसार जेव्हा सहज उघडेल तेव्हा अचानक सरप्राईज म्हणून वाचू दे म्हणून आता पुन्हा पुन्हा आठवण करायचे टाळतोय..

अभिषेक __/\__ ग्रेट आहेस. अप्रतिम लिहिलयस यार!!! बायको जाम लकी आहे तुझी Happy आणि हे वाचुन नक्कीच तुझ्या परत एकदा प्रेमात पडेल ती Happy

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

आदिती __ ती माझ्या प्रेमात आहेच, फक्त मी देखील तिच्या आहे हे दाखवून देण्यासाठी हे माझे उपद्व्याप चालू असतात..... आणि हो, लकी ती नाही तर मी आहे, तिच्यासारखी आहे म्हणून तर तिच्याविषयी आणि तिच्यासाठी लिहावेसे वाटते.. Happy

दाद्या, थँक्यू सो मच! आणि का ते वेळ आल्यावर सांगेन किंवा कदाचित सांगणारही नाही... कारण ते फारसं महत्वाचं नाहीये Happy
अगदी देवाशपथ, हे पत्र स्पर्धेच्या वेळेला वाचलं नव्हतं.... आत्ता वाटतंय बरं केलं... हे पत्रं आजच वाचलं गेलं पाहीजे होतं माझ्याकडुन Happy