आता तुझी पाळी, मी वीज, तुला देते टाळी.

Submitted by वेल on 13 September, 2013 - 08:39

"त्या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तू सुटलास. तुझं वय लहान म्हणून तू सुटलास."
कोणीतरी त्याच्याशी बोलत होतं. पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. त्याला त्याचा निकाल लागला तो दिवस आठवत होता.

त्याला सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय जेंव्हा न्यायाधीशांनी ऐकवला तेंव्हा त्याच्या अम्मीने रडून गोंधळ घातला होता. "माझा मुलगा असं करूच शकत नाही. माझ्या मुलाला कोणीतरी खोट्या गुन्ह्यात अडकवतय. न्याय द्या कोणीतरी न्याय द्या." त्याचा बाप दातात काडी घालून दात कोरत बसला होता, जसा ह्या सगळ्याशी त्याचा संबंध नसावा. मात्र त्याच्या आईबापासोबत असलेली त्याची धाकटी बहिण मात्र त्याच्याकडे एकटक बघत होती. ती आज पहिल्यांदाच आली होती न्यायालयात. खरंतर ही घटना घडल्यानंतर तिने त्याला पहिल्यांदाच पाहिले होते. त्याला पोलिस व्हॅनमध्ये बसवता बसवता त्याच्या अम्मीने त्याच्याकडे झेप घेतली त्याला कवटाळून ती रडू लागली. पोलिसांनी त्यांना वेगळे करेपर्यंत तो एक वाक्य त्याच्या अम्मीला बोलून गेला, "मला पकडतात काय एका फडतूस पोरीचा जीव गेला तर, तीनच वर्ष मग बघतो एकेकाला".

आणि त्याची व्हॅन नजरेआड झाल्यावर तिने त्याच्या आईच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली होती, भर दिवसा आणि तेही पोलिस, वकिल, पत्रकार ह्यांच्यासमोर. त्याच्यापर्यंत ही बातमी आज न उद्या नक्के पोहोचणार होती.

तो सतरा वर्षाचा आणि ती पंधरा. त्याने शाळा कधीच सोडून दिली होती आणि ती दहावीत होती.
हुषार होती ती आणि तिच्या सोबतच्या तिच्या मैत्रिणी तिच्या हुषारीमुळेच पुढे शिकत होत्या नाहीतर आजपर्यंत त्यांच्या आईवडिलांनी त्यांची लग्नं लावून टाकली असती. पण तिने जबाबदारी घेतली होती, मैत्रिणींच्या अभ्यासाची. तिच्याच घराबाहेर बसून सगळ्या अभ्यास करायच्या. त्याला संताप यायचा ह्या सगळ्या मुलींचा. कारण तो आला की सगळ्या जणी चिमण्यांसारख्या भुर्र उडून जायच्या कोणी त्याच्या आजूबाजूला पण फिरकत नसे. त्यातलीच तिची एक मैत्रीण रेखा. दिसायला सर्वसाधारण आणि तिच्या पाठिंब्याने खूप अभ्यास करणारी.
त्या दिवशी तो घरात एकटाच होता आणि ती आईला घेऊन दवाखान्यात गेली होती. दोन खोल्यांचं छोटंसं घर. तो घराबाहेर लोळत पडला होता. शाळेची वेळ झाली होती ती आईला घेऊन अजून आली नव्हती आणि रेखा जाताना तिला बोलवायला आली होती.
"भैया, नजमा आहे?"
"मी तुझा भैया आहे काय?"
"नाही. नजमा आहे?" तिने मान खाली घालून विचारलं.
"ती बघ आत रोटी खातेय. जा तिला सांग लवकर शाळेत जा. बाप शिकवतोय आणि लेक रोती खात बसली आहे. आळशी."
रेखाला खरे वाटलले आणि ती घरात गेली. ती घरात शिरल्या शिरल्या तो तिच्या मगोमाग घरात शिरला आणि त्याने दार लावून घेतले. तिचे तोंड गच्च दाबले आणि तो तिच्या शरीराशी खेळू लागला. त्याने तिच्या अंतःवस्त्रांना हात घातला असेल नसेल तर तितक्यात दार वाजले.
"भाईजान दरवाजा उघडा, अम्मीला झोपायचं आहे." त्याने नाईलाजाने रेखाला सोडले आणि दार उघडले, तितक्यात कपडे ठीक ठाक करून रेखा बाहेर पळून गेली.
"भाईजान रेखा आत काय करत होती? तुम्ही दार का लावलं होतं?"
"जास्त शाणपणा करायचं कम नाय. तीच लाईन देते मला कळ्ळं? आमच्यामधे पडायचं नाय आणि तिला काय विचारायचं नाय. अम्मी सांगून ठेव हिला."
"नजमा, तुझ्या भाईजानचं ऐकायचं. तो पुरुष आहे. तो करतो ते बरोबर असतं. तीच पोरगी भाव देत असेल, नाहीतर काय तुझा भाई असं काही करनारा नाही. आणि तुला कशाला ग पंचायती?"
ती तेंव्हा गप्प बसली. पण दोनच दिवसात रेखाला तिच्या आत्याच्या घरी पाठवून दिलं आणि तिथे तिचं त्याच आठवड्यात लग्न होणार होतं हे नजमाला तिच्या इतर मैत्रिणींकडून कळलं.
त्यानंतर ती गप्पच होती, भावच्या पुढ्यात यायचं नाही आणि मैत्रिणींना घरी बोलवायचं नाही हे तिने ठरवून ठेवल होतं. घरात अम्मीला मदत करायची, अभ्यास करायचा आणि वस्तीमधल्या लहान मुलांना शिकवून दोन पैसे कमवायचे, कॉलेजसाठी हाच तिचा दिनक्रम होता. आता तिची दहावीची परिक्षा तोंडावर आली होती आणि तितक्यात तिच्या भावाला पोलिसंनी अटक झाल्याचे तिला कळाले. घरी येऊन पाहते तर काय अम्मी गळा काढून रडत होती. बाप विड्या फुंकत बसला होता. मग वस्तीतल्या लोकांनीच सांगितले त्याच्यावर बलात्कार आणि खूनाचा आरोप होता. तिने जळजळीत नजरेने अम्मीकडे पाहिले. तिच्यामते आज ही वेळ येण्यासाठी तिची अम्मीच जबाब्दार होती. त्याच्या प्रत्येक चुकीला अम्मीने पाठीशी घातले होते. अगदी लहानपणापासून.

सुधाररगृहात तो आणखी खुनशी बनत होता आणि बाहेर नजमा आणखी शिकत होती. पण तरिही जगात ती उघड्या डोळ्याने वावरत होती. तिला आपल्या भावाच्या इतर अनेक कृत्यांची माहिती झाली आणि ते ऐकून तिचं मन विषण्ण झालं होतं. अजूनही अनेक मुलींचा विनयभंग त्याने केला होता. खूनाची धमकी देऊन अनेकांना लुटलं होतं.

आता तो अठरा वर्षांवरचा होता. सुधारगृहात एका मारामारीचं निमित्त झालं, त्याची कोणीतरी तक्रार केली. त्याच्याकडे चाकू आणि काही ड्रग्ज सापडले आणि त्याला मोठ्या तुरुंगात ठेवलं. त्याची शिक्षा आता वाढली होती. तीन वर्षाऐवजी नऊ वर्ष. तरीदेखील तो सत्तविसाव्या वर्षी तो बाहेर पडणार होता. त्याची तक्रार करणार्‍या सगळ्यांचाच त्याला सूड घ्यायचा होता. त्याच्या अम्मीच्या थोबाडीत मारणार्‍या नजमाचादेखील. अम्मीकडून त्याला नजमाबद्दल फारसं कळत नसे. ती काहीतरी शिकते आहे अभ्यास करते आही आणि शादीला नाही म्हणते आहे एवढंच अम्मी त्याला संगत होती. त्याला कळत नव्हतं अम्मी नजमाला घाबरते की नजमा अम्मीपासून काही लपवते आहे.

शेवटी तो दिवस आला, त्याच्या सुटकेचा. त्याची शिक्षा वधल्यापासून तो खूप सतर्क झाला होता. अवैध काम करायचा पण न पकडला जाता. स्वतःचा राग ताब्यात कसा ठेवायचा ते त्याला चांगलच समजलं होतं.

त्याची अम्मी त्याला घ्यायला आली होती. त्याचा बाप आणि नजमा कामावर गेल्याचे अम्मीने सांगितले. तो डोक्यात विचारच करत होता नजमाला काय शिक्षा द्यायची, सुरुवात तो तिच्यापासूनच करणार होता.

रात्री नऊची वेळ होती ते घराजवळच्या स्टेशनवर उतरले आणि रिक्षात बसले.

त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर एक नदीचा पूल होता तिथे नेमकी रिक्षा बंद पडली. काही केल्या चालू होईना, त्याने रिक्षावाल्याला शिव्या घातल्या आणि अम्मीसोबत तो पुढे चालू लागला. पूल संपता संपता पायात काहीतरी येऊन तो अडखळून पडला. त्याने सणसणीत शिवी हासडली आणि तो उठू लागला, तर त्याला उथताच येईना, त्याच्या पाठीवर कोणीतरी पाय ठेवून उभं होतं. अम्मीला हाक मारायला त्याने तोंड उघडलं तर त्याच्या तोंडावर खिळे लावलेल्या बूटाची लाथ बसली, दोन दात पडले होता आणि रक्त वाहत होतं आणि त्याला काही कळण्यापूर्वीच त्याचे हात पाठीमागे हातकडीत अडकवले गेले. त्याचे केस खेचून त्याला कोणीतरी उभं केलं आणि पुन्हा एकदा, खटाक्, दोन पायांच्या मध्ये नाजूक जागी जोरात एक लाथ पडली होती, कळवळला तो. तितक्यात त्याला अम्मीचा आवाज आला, "सोडा सोडा माझ्या मुलाला, सोडा आम्हाला." म्हणजे ज्यांनी कोणी पकडलं होतं त्यांनी अम्मीलासुद्धा पकडून ठेवलं होतं. त्याचा संताप वाढू लागला, पण तो काही बोलण्यापूर्वी त्याच्या तोंडावर जबरदस्त ठोसा पडला. अगदी जबडा हलला त्याचा. जे कोणी होते त्यांनी त्याला खेचत नेऊन त्याचे सगळे कपडे काढून पुलाच्या टोकाला असलेल्या खांबाला त्याला बांधून टाकले. हात आणि पाय दोन बाजूला ताणून बांधले होते. त्याला अधांतरी बसवलं होतं. बाजूच्याच खांबाला त्याच्या अम्मीला बांधल्याचे त्याला कळले होते. अम्मी ओरडायचा प्रयत्न करत होती मात्र आवाज निघत नव्हता.

कोण आहेत हे लोक, काय चाललंय हे? मी तुरुंगात असताना कोणाशी दुश्मनी तर केली नव्हती मग हे काय चाललय? तो विचारात गुंगत असतानाच कोणीतरी दिवा लावला, प्रकाश असा की त्यात फक्त तो दिसत होता आणि मारणार्‍यांच्या सावल्या. कोणीतरी त्याच्या अंगावर जोरात चाबूक ओढला. चाबकाला जणू सुया टोचल्या होत्या एकाच चाबकाच्या फटक्यात त्याच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या. आणि कोणीतरी त्याच्या अंगावर पाणी ओतलं, जळालं, आतून बाहेरून जळालं. त्या पाण्यात लाल मसाला मिसळला होता. पुन्हा एक चाबकाचा फटका ... 'अरे का करताय असं सगळं' त्याचं मन किंचाळलं, पण फक्त मन, तोंडावर इतके जबरदस्त आघात झाले होते की तोंडातून शब्दच निघेना.
आणि तितक्यात कोणीतरी ... कोणीतरी बाजूच्या लोखंडी खांबावर आवाज केला. म्हणजे समोर जो कोणी होता त्याचा हातात दउसरा लोखंडी बार होता. आता लोखंडी बाराने मार खायचा तो मनाची तयारी करत होता. तितक्यात ... तो विव्हळला, आवज न येता विव्हळला. तो बार कोणीतरी त्याच्या शरीरात घुसवला होता आणि त्याला जोरात घुमवला होता. तो बार त्याच्या शरीरात असतानाच कोणीतरी त्याला पुन्हा एकदा लाथ मारली होती जोरात. आता त्याच्या तोंडात कोणीतरी बारीक बारिक खिळे भरले होते आणि पुन्हा एकदा तोंडावर जोरात ठोसा बसला होता, ते खिळे घशातून पोटात गेले असणार एव्हाना. त्याच्या तोंडातून, त्याच्या प्रायव्हेट भागातून रक्तस्राव होत होता, त्याची शुद्ध हरपत होती. पुन्हा एकदा तोंडावर मसाल्याचं पाणी फेकलं कोणीतरी, तो पुन्हा शुद्धीवर आला, अम्मीला दिसत असणार हे सगळं त्याच्या मनात विचार आला आणि लाज वातली त्याला प्रथमच आयुष्यात. आत कोणीतरी त्याच्या पोटात ठोसा मारला. आणि आळीपाळीने त्याला मार बसतच राहिला. हळूहळू त्याची शुद्ध हरपत गेली. मारणारेसुद्धा निघून गेले. रात्रभर तो त्या अवस्थेत आणि त्याची अम्मी बांधल्या अवस्थेत होते. पहाटे पहाटे कोणीतरी त्यांना पाहिलं. पोलिसांना फोन करून हॉस्पिटल मध्ये नेलं थोडी धुगधुगी होती अंगात. डॉक्टरांच्या प्रयत्नाने तो शुद्धीवर देखील आला. त्याची अम्मी त्याच्याशेजारीच बसली होती. त्याला शुद्धीवर आला हे पाहून रडू लागली. पोलिसांनी त्याचा अम्मीचा जबाब घेतला. पण त्याला मारणार्‍या लोकांचा ना त्याला चेहरा दिसला होता ना आवाज ऐकू आला होता. शुद्ध - बेशुद्ध असा प्रवास करता करता तब्बल सत्तावीस दिवसांच्या वेदनांपासून त्याची मुक्तता झाली तीदेखील मृत्युमुळे.
गेले सत्तावीस दिवस बातम्यांना ऊत आला होता. निर्भयावर अत्याचार करणार्‍या वयाने लहान म्हणून सुटणार्‍याचे काय हाल झाले ते सगळ्या देशाला कळले होते. कोणालाही त्याच्याबद्दल सहानुभूती नव्हतीच. आज त्या बातम्या थंडावल्या होत्या.

निर्भयावर ज्या स्थानावर अत्याचार झाला त्या स्थानावर पुन्हा एकदा तिचा फोटो, आणि त्यासमोर हजारो मेणबत्त्या लागल्या होत्या आज दहा वर्षांनी. परंतु हा फोटो इथे ठेवला कोणी? पहिली मेणबत्ती लावली कोणी?

फोटो ठेवणारी रेखा, पहिली मेणबत्ती लावणारी नजमा, रेखाचा पहिलवान नवरा, त्याच्या तालमीतले इतर बॉडी बिल्डर प्रार्थना करणार्‍या जनतेच्या मागे उभे राहून डोळे पुसत होते. त्यांच्या गेल्या नऊ वर्षाच्या मेहनतीचं आज फळ आलं होतं. त्यांच्या पर्फेक्ट प्लॅनिंगमुळे "तो" आज त्याच वेदना सहन करत मेला होता. एका स्त्रीचं दु:ख स्त्रीनेच समजून घेतलं होतं आणि इतर स्त्रीवादी पुरुषांच्या मदतीने त्या स्त्रीला तिने खरा न्याय मिळवून दिला होता. आणि आता इतर स्त्रियांना न्याय निळवून देण्यासाठी ती तिची बुद्धी, तिचं वकिली शिक्षण वापरणार होती, जिथे ते कमी पडेल तिथे होतच त्यांचं पर्फेक्ट प्लॅनिंग.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली,

मला नजमाला वकिल झालेलं दाखवायचं होतं म्हणून जरा जास्त वेळ दहा वर्ष. नाहीतर तीन वर्षात बाहेर पडल्या पडल्या ..... पण कोणी केल असतं तेंव्हा ती फक्त १८ वर्षाची असती ना.

खरच एकदम परफेक्ट.. अशीच शिक्षा मिळाली पाहिजे प्रत्येक गुन्हेगाराला... मग तो मोठा असो किंवा अल्पवयीन...

Pages