पत्र सांगते गूज मनीचे- आशूडी

Submitted by आशूडी on 13 September, 2013 - 02:20

श्री. विश्वासराव सरपोतदार,

नमस्कार.

मध्यंतरी बराच काळ गेला आपली गाठभेट नाही म्हणून म्हटलं पत्र लिहावं. तुमचा पत्ता बदलला असल्याची तिळमात्र शंका मनात नाही कारण एखादा बोका जसा ठराविक घर सोडून इतर कुठेही राहत नाही तसे तुम्हीही त्या बंगल्याला बांधलेले आहात. बंगल्याला जनरली कुत्रा बांधलेला असतो. पण कुत्रे हे माणसांवर प्रेम करतात जागेवर नाही. हे मी नाही- तर पुलं म्हणतात. तुमच्या माणसांपेक्षा 'जागा' प्रेमाचे पोवाडे महाराष्ट्रभर दुमदुमत आहेत. तेव्हा हे पत्र तुम्हाला मिळणार अशी पक्की खात्री आहेच. तर, पत्रास कारण की - तुमच्या फायद्याच्या चार गोष्टी पुढे लिहिणार आहे तेव्हा उगाचच डोक्यात राख घालून पत्र फाडून फेकायचा विचार मनातदेखील आणू नका. पस्तावाल.

तुम्ही जेव्हा निर्दयपणे आम्हाला घर सोडायला लावले त्यानंतर आमचे हाल कुत्रे खाणार नाही अशी वेळ आली होती. त्यातच परशा आणि सुध्या हे आमचे आणखी दोन करंटे मित्रही अशाच अडचणीत सापडले होते. एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणतात त्यातली गत. तुमच्या घरातून निघताना ज्यांना काकूंनी हळदीकुंकू लावले होते त्या आमच्या विलक्षण सुंदर बायका वैतागून आम्हाला सोडून गेल्या. पण जे घडते ते चांगल्यासाठीच यावर माझा पूर्ण विश्वास आहे. (म्हणूनच तुमच्यासारखे घरमालक अजूनही शाबूत आहेत.) तुमच्यानंतर आम्हाला श्रीमती लीलाबाई काळ्भोर नावाच्या मालकीणबाई अक्षरश: देवीसारख्या भेटल्या. तुमचा 'मालकवास' सहन करायची इतकी सवय झाली होती की मावशीबाईंचे (बघा - बापाच्या वयाचे असून आम्ही तुम्हाला पत्राच्या मायन्यातही 'काका' लिहू शकत नाही!) प्रेम आम्हाला सुरुवातीला फार जड गेले हो! भिकाऱ्याला अचानक लग्नाचे जेवण मिळाले तर त्याची काय अवस्था होईल? त्यांची फक्त एक विचित्र अट होती जी पूर्ण करता करता आमच्या नाकी नऊ आले आणि पुन्हा आम्ही चाराचे आठ झालो. ती कथा नंतर कधीतरी सांगेनच.

तर लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या आयुष्यात पुन्हा खऱ्याखुऱ्या सुंदर सुशील बायका मिळाल्या (बायकोचे अनेकवचन. आम्ही चौघेही चतुर्भुज झालो) आणि आमची परिस्थिती सुधारली. देव दयाळू आहे. लवकरच मावशीबाईंना देवाज्ञा झाली. (म्हणून नाही देव दयाळू! पुढे वाचा). स्वत:चे मुलगे समजून त्यांनी त्यांचा बंगला, संपत्ती आमच्या नावे केली. अर्थात आणखी एक विचित्र अट घालूनच. आम्हाला गरज असताना जशी त्यांनी मदत केली तशी आम्हीही मदत करून एखाद्या गरजवंताचे उर्वरीत आयुष्य सुकर केले आहे हे वकिलाला सिद्ध करून दाखवले तरच आम्हाला ही सगळी संपत्ती मिळणार आहे. आता गरजवंताला अक्कल नसते. त्यामुळे पटकन गरजवंत म्हणून तुमचेच नाव डोळ्यापुढे आले. तुमची आणि काकूंची अर्धी लाकडे पुढे गेली (अशी बोलायची पद्धत आहे, नाहीतर हल्ली बटणावरच काम होते). एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही दोघे भुतासारखे राहता. त्यात तुमचा स्वभाव! उद्या तुम्हाला अचानक काही झाले तर काळं कुत्रंही फिरकणार नाही विचारायला अशी तर तुमची प्रसिद्धी. त्याला काही इलाज नाही. पण काही झालं तरी आम्ही चोरून का होईना तुमचं मीठ ( तूप, दूध, दही) खाल्लं आहे. तुमची काळजी घेणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तेव्हा तुमचा तो फालतू जुनाट बंगला तुम्ही आम्हाला विकून टाका. आता आमच्या चौघांचीही परिस्थिती सुधारली असल्याने तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि बंगल्याच्या किंमतीपेक्षा जास्तच पैसे तुम्हाला मिळतील. तुमची बोका(ळलेली चिवट) वृत्ती लक्षात घेता तुम्हाला काही तो बंगला सोडून जायला आम्ही सांगणार नाही. एकदा बंगला विकालात की त्या आमच्या कुबट कोंदट खोलीत (ज्याचे चक्क पस्तीस रुपये भाडे दरमहा तुम्ही (दरवाजा) वाजवून घेत होतात! प स्ती स रु प ये !!) तुम्ही म्हातारा म्हातारी मरेपर्यंत सुखात राहू शकता. दर महिन्याला भिकाऱ्यासारखे दारात पैसे मागायला येणारे या:कश्चित नाममात्र 'मालक' आम्ही नाही. दरमहा भाड्याचे पैसे आम्ही बंगल्याच्या किंमतीतच वळते करून घेऊ. तिथे आम्ही चौघे आपापल्या बायकामुलांसह एकत्रच राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आमचा आधार राहील. तुमचा भार आमच्यावर येणार आहे ते सोडा. आता एकदा सत्कार्य करायला घेतलं की मागेपुढे पाहत नाही मी. शिवाय शंतनूसारखा डॉक्टर घरात असणं तुम्हाला किती फ़ायद्याचं आहे! त्याची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना तुम्ही आम्हाला बेघर केलं असलंत तरी तो त्याच्या कर्तव्यात कसूर करणार नाही. फारतर इंजेक्शन जरा जास्त दुखेल कदाचित इतकंच. परशा आणि पार्वतीचे वगनाट्यप्रयोग जोरात सुरु आहेत. तुम्ही तिकीट खिडकीवर बसलात तर विंगेत उभं राहून बघायलाही मिळण्याची आशा आहे. सुधीरचं नाव तुम्हाला एव्हाना ऐकून माहीत झाले असेलच. त्याच्यासारख्या प्रख्यात गायकाच्या घरात तुम्ही राहताय म्हटल्यावर तुमचा सध्या अजिबातच नसलेला भाव किती वाढेल कल्पना करा. आणि माझ्याबद्दल काय सांगू? माधुरीचं डिपार्टमेंटल स्टोअर आता माझंच असलं तरी उधारी बंद आहे हे लक्षात असू द्या. मात्र तुम्हाला केरसुणी, वर्तमानपत्र यांसारख्या जीवनावश्यक वस्तू फुकट पुरवल्या जातील. बागेला पाणी घालायचे तुमचे आवडीचे काम आम्ही तुमच्याकडून हिरावून घेणार नाही. काकूंनाही त्यांच्या नव्या सुनांना काही हौसेने बनवून खाऊ घालायचे असेल- अगदी रोजही, तर स्वयंपाकघर त्यांचेच आहे.

बघा, इतके प्रेमळ मालक पुण्यात दिवा घेऊनही सापडणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो. तुम्हीही मनातल्या मनात कौतुक करतच आहात हे मला माहितेय. काही नाही, तर शेवटी चार खांदे तर प्रत्येकाला लागतातच. आम्हीही अनायासे चारच आहोत. काकूंचा विचार करा. त्या कुणाला शोधत बसतील ऐनवेळी? सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

आणि हो, तो इस्त्रायलला गेलेला मित्र पैशासकट अजूनही वारलेलाच आहे. त्याबद्दल चौकशी करू नका, फार यातना होतात हो! तिथून जायच्या आधी कॉटखाली एक फ़ोर्स्क्वेअरचे पाकीट विसरले होते तेवढे आणून ठेवा. लवकरच पुढची बोलणी करायला येतो. काळजी घ्या.

तुमचा भावी घरमालक
श्री. धनंजय माने.

********************
********************

माने,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हा हलकटपणा आहे माने!

- श्री. विश्वासराव सरपोतदार

********************
********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बनवाबनवी पाहिल्याचं पुसटसं आठवतंय.. पण यातले सगळे संदर्भ नीट लागण्यासाठी ते पुन्हा पहायला हवंय. तरीही मर्म पोहोचतं आहेच.. शैली छान आहेच आणि उत्तर तर एकदम भारी!

तथास्तु, तुमची कविता खुपच मन हेलावून टाकणारी आहे. पण ती टाकण्याची ही जागा नव्हे... नवीन धागा काढून तिकडे तिला हलवा आणि प्रकाशित करा.

Rofl

>>नाहीतर हल्ली बटणावरच काम होते
>>आम्हीही अनायासे चारच आहोत. काकूंचा विचार करा. त्या कुणाला शोधत बसतील ऐनवेळी?
>>हा हलकटपणा आहे माने!
Lol

अफाट अफाट मस्तं.

भारी आहे..
मूळ सिनेमा तर अफलतून आहेच, तसेच तुमचे हे पत्र पण धमाल आहे...
:ड

हा हलकटपणा आहे माने! >>>>>> हसून हसून गडबडा लोळण या पलिकडे उत्तर असूच शकत नव्हतं, दिलं असतं तर व्यक्तीरेखेला शोभलं नसतं >>>=++ ११११११

खुपच मस्त. लक्ष्या आणि सुधीर जोशी नाहीत हे अगदी पटतच नाही.

जबरी चित्रपट... त्याच्या आधी आणी नंतरही बरेच असे प्रयोग झाले पण यासम हाच. Happy

Pages