उल्लेख तुझा केला पण......

Submitted by वैवकु on 10 September, 2013 - 15:29

काळोख लख्ख दु:खांचा सावळू दिलेला नाही
कंदील तुझ्या स्मरणांचा काजळू दिलेला नाही

इस्टमनकलर लव्हस्टोरी श्वेतश्याम झाली अपुली
आपण विरहाचा टप्पा का टळू दिलेला नाही

दैवाने निर्ममतेचा ऊष्मांक वधारत नेला
पण अश्रूंचा हिमनग मी पाघळू दिलेला नाही

चोरला कुणी आहे का माझा स्वप्नांचा फाया
की गंध सुखांनी त्यांचा दरवळू दिलेला नाही

इतके झाल्यावरसुद्धा मन छान वागते आहे
म्हणजेच पराभव माझा मी कळू दिलेला नाही

हे तुझे काजवेपण तू नंतर गाजव नैराश्या
मी अजुन सूर्य आशेचा मावळू दिलेला नाही

ध्येयाच्या वाटेवरती शंकांची दाटीवाटी
यत्नांनी रोख स्वतःचा गोंधळू दिलेला नाही

मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळोख लख्ख दु:खांचा सावळू दिलेला नाही
कंदील तुझ्या स्मरणांचा काजळू दिलेला नाही>>मतला आवडला, दोन्ही ओळी स्वतंत्ररीत्या फार आवडल्या.

दैवाने निर्ममतेचा ऊष्मांक वधारत नेला
पण अश्रूंचा हिमनग मी पाघळू दिलेला नाही>>> खयाल भारी, पण 'उष्मांक' म्हणजे कॅलरीज बहुधा!

इतके झाल्यावरसुद्धा मन छान वागते आहे
म्हणजेच पराभव माझा मी कळू दिलेला नाही>>> व्वा व्वा

ध्येयाच्या वाटेवरती शंकांची दाटीवाटी
यत्नांनी रोख स्वतःचा गोंधळू दिलेला नाही>>> मस्त

मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही>>> अप्रतिम

एकूण एक छान गझल.

जमीन फार फार आवडली.

शुभेच्छा!

इतके झाल्यावरसुद्धा मन छान वागते आहे
म्हणजेच पराभव माझा मी कळू दिलेला नाही<< मस्त >>

मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही<< व्वा ! >>

खूप प्रगती

अप्रतिम आहे.......नेहमीप्रमाणे...... Happy

काळोख लख्ख दु:खांचा,..........
स्वप्नांचा फाया,..........
हे तुझे काजवेपण तू नंतर गाजव नैराश्या.........

हे सर्व सुंदर आहे Happy

चोरला कुणी आहे का माझा स्वप्नांचा फाया
की गंध सुखांनी त्यांचा दरवळू दिलेला नाही

इतके झाल्यावरसुद्धा मन छान वागते आहे
म्हणजेच पराभव माझा मी कळू दिलेला नाही

हे तुझे काजवेपण तू नंतर गाजव नैराश्या
मी अजुन सूर्य आशेचा मावळू दिलेला नाही

मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही>>>> सर्वच अप्रतिम!!!

अतिशय सुरेख गझल… सगळेच शेर आवडले…

जमीन पण सुंदर आहे

ही गझल 'आवडत्या दहा'त घेत आहे.

खूप खूप शुभेच्छा…

इतके झाल्यावरसुद्धा मन छान वागते आहे
म्हणजेच पराभव माझा मी कळू दिलेला नाही

हे तुझे काजवेपण तू नंतर गाजव नैराश्या
मी अजुन सूर्य आशेचा मावळू दिलेला नाही<<< शेर फार आवडले.

बहुतेक ओळी स्वतंत्रपणे फार आवडल्या.

ईस्टमनकलरमध्ये प्रतीकाचा सुरेख वापर!

शुभेच्छा!

वाह वाह!
एक एक शेर कोट करायचा प्रयत्न केला पण सगळेच कोट करण्यासारखे!
खुपच आवडली
शेवटचा शेर तर अप्रतिमच! खुपच सुंदर! पुन्हा पुन्हा वाचला हा शेर Happy

कणखरजी , डॉ. साहेब विशेष आभार
अरविंदजी , सुप्रियातै , मुग्धमानसी मनःपूर्वक आभार
योगुली व अज्ञातजी धन्स !!! (खूप दिवसांनी येणं केलंत Happy )
फाटक साहेब विशेष आभार Happy
बेफीजी , विशेष आभार ... (तुमच्या प्रतिसादाची वाट पहायला लावलीत Sad )
रिया , भारतीताई , जेडी मनःपूर्वक आभार
____________________________
उष्मांकसाठी उष्मांश सुचला आहे कसा वाटतो ? Happy
(उष्मांकही शब्दशः बरोबरच आहे माझ्यामते पण हा शब्द सहसा ...नै केवळ कॅलरीजसाठीच वापरतात हेही लक्षात घेता बदल आवश्यकच ठरतो )

धन्यवाद

आवडलीच गझल...
मतला, शेवटला शेर अन मनाचा शेर... खरच आरपार आहेत.
मी अजुन सूर्य... इथे (अजून) सूट घेतलीये की माझ्या समजण्यात चूक आहे?

>>>> मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही

बहुतेक विठ्ठलाबद्दल दिसतंय. एवढ्या रचनेत एकदाही चक्क विट्ठलाबद्दल उल्लेख दिसला नाही.
विठ्ठलालाच चुकचुकल्या सारखं वाट्त असेल. Happy

-दिलीप बिरुटे

धन्यवाद दाद आपला प्रतिसाद लाख मोलाचा
अजुन ही र्‍हस्व-दीर्घाची सूटच आहे Happy
___________________________________________
बिरुटे तुम्हाला आढळावा इतका स्वस्त नाही माझा विठ्ठल !!!!
प्रयत्नही करू नका

>>>> बिरुटे तुम्हाला आढळावा इतका स्वस्त नाही माझा विठ्ठल !!!!
प्रयत्नही करू नका

उलट विठ्ठलाला तुम्ही इतकं स्वस्त करु नका असं आम्ही वाचकांनी म्हणायला हवं.

-दिलीप बिरुटे

उलट विठ्ठलाला तुम्ही इतकं स्वस्त करु नका असं आम्ही वाचकांनी म्हणायला हवं. <<<<

अनेक वाचकांनी म्हणून झालय आजवर अनेकदा मीही त्यांच्या बाजूने विचार केलाय पण मला जे प्राप्त करायचे आहे ते मिळवण्याचा पक्का विचारांती केलेला निर्णय जराही डळमळू दिलेला नाही व म्हणून तर अश्या वाचकांच्या हाती लागूच नये असे विठ्ठलाचे शेर करायचा प्रयत्न आहे आजकाल !!! म्हणजे मलाही वाईट नको वाटायला व त्यांनाही Happy एका दगडात दोन पक्षी ...आता बोला !!!

(आयला >>>डळमळू दिलेला नाही<<< गलतीसे हिंट तो नही ना दे दी बॉस्स !!.. Uhoh .)

अतिशय सुरेख गझल...

काळोख लख्ख दु:खांचा सावळू दिलेला नाही
कंदील तुझ्या स्मरणांचा काजळू दिलेला नाही.... दोन्ही ओळी मस्त!!!

चोरला कुणी आहे का माझा स्वप्नांचा फाया
की गंध सुखांनी त्यांचा दरवळू दिलेला नाही...वाह वाह!!

मी तुझे नाव घेण्याचे टाळणे शक्य आहे का
उल्लेख तुझा केला पण आढळू दिलेला नाही...मस्त!