तीखा ढोकळा.

Submitted by सुलेखा on 8 September, 2013 - 04:07
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गुजरातमधे ढोकळा विविध प्रकारे करतात.तांदुळ व विविध डाळी भिजवुन किंवा तयार पिठे वापरुन करतात.करण्याची पद्धत थोडीफार वेगळी तसेच प्रत्येकाची चव ही वेगळी असते.प्रदेशानुसार यात विविधता आहे.
तीखा ढोकळा करण्यासाठी लागणारे साहित्य :--
अर्धा कप तांदुळ व पाव कप उडिद डाळ पाण्यात अर्धा तास भिजवुन मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यावे.
अर्धा कप मका पिठ,
अर्धा कप जाड रवा /सोजी,
४ टेबलस्पून आंबट दही,
१ टी स्पून खाण्याचा सोडा,
१/४ टी स्पून हळद,
१/४ टी स्पून हिंग,
१ टी स्पून साखर,
मीठ चवी नुसार,
१ टी स्पून लाल तिखट,
१ टी स्पून तीळ,
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली,
१ टी स्पून तेल,
पाणी आवश्यकतेनुसार.
चटणी साठी साहित्यः---
२ ते ३ टेबलस्पून डाळे,
२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,
२ते३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या,
१/४ टी स्पून जिरे ,
१/४ टी स्पून हिंग,
१/४ टी स्पून हळद,
१ टी स्पून लिंबाचा रस,
२ टी स्पून दही,
अर्धी वाटी पाणी .

क्रमवार पाककृती: 

अर्धा तास पाण्यात भिजवुन मिक्सरमधे बारीक वाटलेले डाळ्-तांदुळ , मका पिठ,जाड रवा, दही,हळद,बारीक चिरलेली हिरवी मिरची व लागेल तितके पाणी घलुन सरसरीत पिठ भिजवा .त्यात चवीप्रमाणे मीठ व अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालुन मिश्रण फेटुन घ्या.१५ मिनिटां करीता झाकुन ठेवा.या वेळेत चटणी साठीचे सर्व जिन्नस एकत्र करुन पातळसर चटणी वाटुन घ्या.
आता गॅसवर प्रेशर पॅन मधे भाड भरुन पाणी टाकुन त्यात लहान रिंग/लंगडी ठेवा ..एका लहान ठाळीला तेल लावुन घ्या..
आता एका लहान पातेलीत पाव वाटी पाणी गरम करा.पाणी उकळले कि त्यात उरलेला अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घालुन हे पाणी चमच्याने ढवळुन लगेच ढोकळा मिश्रणात ओता .सर्व मिश्रण छान फेटा.मिश्रण ओतता येईल असे सरसरीत असावे.हे मिश्रण तेल लावलेल्या थाळीत ओता.त्यावर चिमटीने आवडी प्रमाणे लाल तिखट व तीळ पसरवा .
tikha dhokala 002.JPG
थाळी पॅन मधे ठेवा वर प्रेशर पॅन च्या झाकणाची शीटी काढुन झाकण लावा.मध्यम आचेवर १० ते १२मिनिटे वाफवा.
ढोकळा थाळी बाहेर काढुन त्यावर लगेच १ टी स्पून तेल चमच्याने पसरवा .सुरीने चौकोनी वड्या कापा.
.tikha dhokala 004.JPG
गरम ढोकळा चटणी बरोबर खायला घ्या.
या ढोकळ्यावर वरुन फोडणी घालायची नाही त्याऐवजी एक टी स्पून कच्चे तेल थाळीतील तयार वाफवलेल्या ढोकळ्यावर पसरवुन लावायचे आहे.
ढोकळ्याचा आस्वाद घेतल्यावर गरम वाफाळलेला सुंठ-वेलची -लवंग च्या संमिश्र चवीचा मसालेदार चहा हा हवाच !!

अधिक टिपा: 

१]भिजवुन वाटलेल्या डाळ+तांदुळा ऐवजी इडलीचे पिठ किंवा तयार वाटलेले मिश्रण घेतले तरी चालेल.
२]ढोकळा पिठ व मका पिठ+ जाड रवा/सोजी किंवा
३]मूग,मसुर डाळी भिजवुन वाटलेले पिठ व मका पिठ+ जाड रवा किंवा
४] फक्त मका पिठ व+ जाड रवा असे घेतले तरी चालेल.
५] खाण्याच्या सोड्या ऐवजी १ सपाट चमचा इनो [एकुण] वापरला तरी चालेल.[मी इनो वापरला आहे.]
६] हा ढोकळा पातळ वडी सारखा असतो. तसेच मका पिठामुळे मऊ लागतो.
७]भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या,लसुण,शेंगदाणे यांची चटणीही छान लागते..चटणी शिवाय तसाच किंवा सदाबहार टोमॅटो सॉस चालेल.
८]आवडत असल्यास ताजा हिरवा लसुण किंवा लसुण हिरवी मिरची चिरुन /बारीक वाटुन घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
रंग रंगिलु मारु गुजरात !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतोय.हे व्हेरिएशन ऐकलं/पाहिलं नव्हतं.

डाळ-तांदूळ कोरडेच वाटायचे का? तसे असेल तर थोडे भाजून वाटायचे का?

<ढोकळा थाळी बाहेर काढुन त्यावर लगेच १ टी स्पून चमच्याने पसरवा> १ टी स्पून काय पसरवायचे?

भरत,
पाण्यात अर्धा तास डाळ-तांदुळ भिजवुन मिक्सरमधे वाटुन घ्यायचे आहेत.
वाफवलेल्या तयार ढोकळ्यावर एक टी स्पून कच्चे/साधे तेल [गरम फोडणी करुन नाही]पसरवुन लावायचे आहे.
अनवधानाने नेमके लिहीले गेले नाही.लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद..
वरील पाककृती मधे योग्य तो बदल केला आहे.

पिन्कि ८०,
या ढोकळ्यावर तेल-मोहोरी-हिंग यांची फोडणी द्यायची नाही.पण तयार वाफवलेल्या ढोकळ्यावर कच्चे तेल १ टी स्पून पसरवुन लावायचे आहे.

छान मस्तच, माझी आई बडोद्याची असल्यामुळे हा ढोकळा थोड्या वेगळ्या प्रकारे करायची म्हणजे मक्याचे पीठ घालायची नाही आणि हळद पण नाही, पांढ-या रंगाचा करायची (आले,लसूण,मिरची ठेचा घालायची). आमच्या शेजारी ठक्कर-भाभी म्हणून कच्छी राहायच्या त्या असा ढोकळा नाश्त्याला आम्हाला द्यायच्या, त्यात पण मक्याचे पीठ नसायचे, तोपण पांढरा असायचा, वरतून लाल तिखट भुरभूरलेले असायचे.

मला आवडली तुमची कृती मक्याचे पीठ घालून करण्याची. आता मी याप्रकारे करून बघेन.