संकल्प शिक्षकदिनाचा....

Submitted by श्रीकांत काशीकर on 5 September, 2013 - 09:35

मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्‍या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
शिक्षक जोपर्यन्त ज्ञानसाधनेशी एकनिष्ठ होते, सत्यमार्गावर चालणारे होते, त्यांची शिकवण आणि त्यांचा आचार यात समानता होती, तोपर्यंत समाजात त्यांना आदर होता. एवढंच काय, पण आपला समाज आणि त्याचबरोबर राष्ट्रही जगात गौरवस्थानी होतं. पण आज...
आजही काही शिक्षक चांगले आहेत. त्यांचं जीवन खर्‍या अर्थानं आदर्श आहे. पण लोकशाही राज्यात बहुसंख्येला महत्त्व असतं. त्यामुळे अशा शिक्षकांच्या ज्ञानाची, त्यागाची प्रशंसा न होता 'शिक्षक' या नावाला न शोभणारी कामे करणारे बहुसंख्य शिक्षक आपल्या अशा बांधवांची चेष्टा करणे, टर उडवणे यात धन्यता मानतात. ज्ञानसाधनेपासून दूर राहणं, गटातटाच्या राजकरणात सहभागी होणं, आपलं अपुरेपण लपवण्यासाठी लाचारी, भाटगिरी असे मार्ग चोखाळणं, हे आज अगदी सहज पाहायला मिळतं. यात काही काळ आनंद मिळत असेल, भौतिक सुखाचा लाभही मिळत असेल; पण हे शाश्वत तर नसतंच, शिवाय स्वतःबरोबर राष्ट्राचं भवितव्यही धोक्यात आणणारं असतं याचं भान यायला हवं.
'हेच शिकवलं वाटतं शाळेत?' असे सहज उद्गार एखाद्या मुलानं काही गुन्हा केला की आपल्याला ऐकायला मिळतात. याचं कारण कोणत्याही समाजातील सर्वच समस्यांचं मूळ हे शिक्षणात असतं. म्हणून शिक्षणक्षेत्राचं पावित्र्य कायम राखणं, राष्ट्राच्या आणि स्वतःच्या हिताचं आहे, हे शिक्षकांनी विसरू नये.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच विचारांचं चिंतन करायचं तर त्यांचं एक वाक्य आठवतं - 'माणूस आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहार करायला, माश्याप्रमाणे पाण्यात पोहायलाही शिकला, पण जमिनीवर माणसासारखं चालायला मात्र शिकला नाही.'
जमिनीवर माणसासारखं चालायला शिकवायची जबाबदारी शिक्षकांचीच आहे. ज्ञानाचा वारसा सांगणार्‍या शिक्षकांना यात अशक्य तर काहीच नाही; फक्त त्यांनी मनात आणायला हवं.
तर मग चला, शिक्षकदिनाच्या मुहूर्तावर आपण डॉ. राधाकृष्णन यांची खंत दूर करण्याचा संकल्प करुयात. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, राष्ट्राचा विचार करणारे चंद्रगुप्त निर्माण करण्यासाठी, पर्यायाने आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या तन - मन - धन शक्तीचा शक्य तेवढा सर्व वापर करण्याचा निश्चय करुयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users