राहुल सांकृत्यायन- वोल्गा ते गंगा -पांडित्यातील प्रतिभा

Submitted by भारती.. on 4 September, 2013 - 14:21

राहुल सांकृत्यायन- वोल्गा ते गंगा -पांडित्यातील प्रतिभा

आधुनिक,स्वतंत्र भारताचा महापंडित होता तरी कसा ?

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक स्वातंत्र्यसेनानी आपापल्या परीने अन प्रतिभेने महापंडितच होते असे म्हणावे लागेल,पण त्यांचे अग्रक्रम वेगळे होते. या अशा नक्षत्रसमूहात केवळ पांडित्यमय प्रतिभेच्या तेजाने तळपणारा एक तारा उदयास आला, देशाला विस्मित करणारा अभ्यासाचा अन नवनिर्मितीचा पसारा उजळवून विस्मृतीच्या अंधारात लोपलाही.राहुल सांकृत्यायन. त्याच्या ग्रंथसंपदेतील एक अद्भुत निर्मिती- 'वोल्गा से गंगा '(व्यं.श.वकील यांनी केलेला व लोकवाङमय गृहाने प्रकाशित केलेला 'वोल्गा ते गंगा ' हा अनुवाद खरे तर, त्यातील विस्तृत लेखक परिचयासह) वाचनात आली. तिचे शब्द-जागरण पुनः करावेसे वाटले.

तर अल्पपरिचय. ज्या व्यक्तित्वाची कार्यकक्षाच अफाट त्याचा अल्पपरिचय करून देणे कर्मकठीण !

राहुलजींचा जन्म १८९३,जिल्हा आझमगड ,उत्तर प्रदेश.मूळ नाव केदारनाथ पांडे. पुढे बौद्धधम्माच्या स्वीकारानंतर राहुल (बुद्धाचा पुत्र) सांकृत्यायन हे नाव त्यांनी स्वीकारले.घरातून अमर्याद ज्ञानाच्या ओढीने पळून गेलेल्या या मुलाने दुकानात किरकोळ नोकर्‍या करत प्रथम अनेक वेदांत्यांबरोबर ओळख वाढवून संस्कृत व्याकरण व काव्याचे अध्ययन केले व आयुष्याच्या अखंड ज्ञानयज्ञाचा आरंभ केला. १९१२ मध्ये अवघ्या विशीत हा कुशाग्र बुद्धीचा मुलगा वैष्णव साधू झाला इतकेच नाही तर बिहारमधील एका मठाच्या महंतांच्या मर्जीतील पट्टशिष्य व भावी मठाधिपती म्हणून ओळखला जाऊ लागला.

पण राहुलजींच्या रसायनात सत्यान्वेषी वृत्तीतून पोसली गेलेली स्फोटक द्रव्ये ठासून भरली गेली होती.मठाधिपती म्हणून या मुलाचे आयुष्य जायचे नव्हते. मठाच्या जमीनदारीतून मठाचे व शेतकर्‍यांचे नेहमी खटके उडत.कायदा जमीनदारांना (येथे मठाला )अनुकूल.पण राहुलजी मठाचा कार्यभार सांभाळताना शेतकर्‍यांची बाजू घेत. .मठाच्या कार्यासाठी मुक्तपणे भारत भ्रमण करताना राहुलजी आग्र्याला आर्य समाजाच्या संपर्कात आले . त्यांच्या सश्रद्ध पण बुद्धीनिष्ठ पिंडाला आर्यसमाजी कर्मकांडमुक्त विचार मानवले. ते आर्यसमाजी झाले. आता आर्यसमाजाच्या प्रचारमोहिमेचा भाग म्हणून त्यांनी इस्लामचा व अरबी भाषेचा अभ्यास केला ! याच काळात ते जहाल क्रांतीकारकांकडे आकृष्ट झाले.लोकमान्यांबद्दल , राजकीय प्रवाहातील जहाल विचांराबद्दल त्यांना फार प्रेम वाटत होते.या वेळपावेतो वयाची अवघी पंचविशीच आली होती.

आयुष्याच्या प्रवाहाला येथून पुढे अजूनही वेगळी वळणे मिळायची होती. १९१७-१८ मध्ये रशियन क्रांतीच्या बातम्या हिंदी भाषिक राहुलजींपर्यंत पोचल्या. कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी व शोषणाचा मनापासून तिरस्कार करणारे राहुलजी या नव्या जगाच्या कल्पनेनेच थरारून गेले.१९२४ मध्ये 'बाईसवी सदी' ही सुंदर कल्पनारंजनात्मक कादंबरी त्यांनी 'विश्वबंधू' या नालंदा विद्यालयातील अध्यापकाला केंद्रस्थानी ठेवून लिहिली.. हा १९१४ मध्ये झोपतो व २११४ मध्ये जागा होऊन समाजातले क्रांतीकारी बदल पहातो अशी 'रिप व्हॅन विंकल' वर आधारित स्वप्नकथा होती ही.

हे स्वप्न पहाणारे मन तरुण होते, बुद्धीमत्ता, प्रज्ञा अन देशभक्तीचे अंगार त्यातून उडत होते. त्यातच आत्मशोधाची सततची तळमळ होती. त्यांच्या पहिल्या कथानायकाच्या नावातले विश्वबंधुत्व वृत्तीत अगदी भिनून गेले होते.एकीकडे अखंड भारत व नेपाळही पिंजून काढताना राहुलजींचा परिचय बौद्धधम्माशी झाला. त्याच वेळी वेदांताचा अभ्यासही दक्षिणप्रवासात चालला होता. मनात मोठे मंथन चालू होते. या वेळपर्यंत देशाच्या राजकारणात असहकारितेच्या चळवळीने मूळ पकडले होते. जहालमतवादी राहुलजींना गांधीजींच्या विचाराचे आकर्षण नसले तरी गांधीजींनी केलेल्या जनजागरणाचे मात्र होते.ते त्यात सामील झाले व सहा महिन्यांसाठी कारावासात गेले.तेथून सुटल्यावर शेतकर्‍यांचे संघटन करत बिहारमधल्या खेडोपाडी शेतकर्‍यांशी भोजपुरी भाषेत बोलत हा ज्ञानयोगी फिरू लागला.पूर्वी मठात झालेला शेतकर्‍यांचा जनसंपर्क असा कामी आला.केवळ भाषण नाही तर पूर ,प्लेग आदि संकटसमयी सेवा असा कार्यक्रम होता. यातच काँग्रेस कमिटीचे सभासद म्हणून केलेल्या एका जहाल भाषणासाठी त्यांना दोन वर्षांचा कारावासही झाला.कारावासात अनेक हिंदी कादंबर्‍यांचे लेखन, भास्कराचार्य व युरोपियन गणितज्ञांचा, उच्च गणितशास्त्राचा व खगोलशास्त्राचा अभ्यास त्यांनी केला.

पुनः पायावर चक्र. पंजाब, सरहद्द प्रांत , काश्मीर, तिबेट, लंका. लंकेत संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून गेलेल्या राहुलजींनी पाली व पुढे संशोधनांती तिबेटी भाषेचे अध्ययन केले.१९२९मध्ये तिबेटमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत चोरटा प्रवेश मिळवून त्यांनी १५ महिने काढले व त्यावर 'तिब्बत मे सवा वर्ष' हे पुस्तक लिहिले. बावीस खेचरांवर लादून त्यांनी आपले तेथले संशोधन भारतात परत आणले व पाटणा म्यूझियमला देऊन टाकले ! पुन; लंका.वर्ष १९३०. या वेळी राहुलजींनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.एकीकडे बौद्धमत, एकीकडे साम्यवाद! राहुलजींचे तळमळणारे मन या दोन्ही विचारधारांनी दोन वेगळ्या पातळ्यांवर -आत्मशोध अन सामाजिक न्यायाचा शोध- शेवटपर्यंत भारले गेले,त्यात स्थिरावले. एकीकडे राजकारणातले गुप्त कार्य चालू होतेच.

यातच यूरप यात्रा झाली, अनेक पश्चिमी विद्वानांचा सहवास त्यांना लाभला, तसेच त्यांचा सहवास युरोपीय व जर्मन विचारवंतांना लाभला.प्रो.सिल्वा लेव्ही हे इंडोलॉजिस्ट, डॉ. श्चेर्बात्स्की ,डॉ. वोस्त्रोकोवसारखी बुद्धधर्माचे अभ्यासक त्यांच्या बौद्धग्रंथांच्या मूलभूत संशोधनाने दिपून गेले होते.१९३५ मध्ये जपान, कोरिया,मांचूरिया,चीन व शेवटी त्यांना नेहमीच असलेला प्रिय सोविएत रशिया असा दौरा करून पंडितजी इराणमार्गे भारतात आले.त्यानंतर पुनश्च तिबेट. तेथून परतल्यावर १९४० मध्ये भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करताना अडीच वर्षांचा कारावास भोगला. या कारावासातच (-१९४०-४२- )'वोल्गा ते गंगा 'व अन्य पाच पुस्तके (ज्यात चार खंडातील एका ज्ञानकोशाचा समावेश आहे) राहुलजींनी लिहिली.याच कारावासात ते साम्यवादी नेत्यांच्या विशेष संपर्कात आले व पुढे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले.

राहुलजींची जीवन व ज्ञानयात्रा पुढेही याच ऊर्जेने १९५९ पर्यंत अव्याहत चालू राहिली. शेवटच्या काही मोजक्या वर्षांत ते झपाट्याने थकत गेले, १९६२ मध्ये त्यांनी देह ठेवला. एक ज्ञानवादळ शमले.

त्यांची एकूण ग्रंथसंपदा सुमारे १२५,पृष्ठसंख्या सुमारे ४४००० (याअंतर्गत कादंबर्‍या,अनुवाद,चरित्रे,कोश,प्रवासवर्णने,धर्म,राजकारण,साम्यवाद तत्त्वज्ञान, साहित्य, इतिहास,संस्कृत व तिबेटी भाषा व व्याकरण आणि विश्वरचना असे बहुआयामी विषय, व संस्कृतात ताडपत्रीवर लिहिलेली तत्त्वज्ञान व धर्मावरील आठ पुस्तके येतात !!)!

त्यांना इंग्लिश,फ्रेंच,रशियन,जर्मन,चिनी,पर्शियन,अरबी व तिबेटी भाषा उत्तम येत, भारतीय भाषांमध्ये बंगाली, गुजराथी, मराठी ग्रंथ ते वाचू शकत होते्. मातृभाषा हिंदीच्या ३३ बोलीभाषांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता.

त्यांचा परिचय मराठीत श्री शं.वा. देशपांडे व इंग्लिशमध्ये श्री आर्.एम्.शर्मा यांच्या लेखनात आला आहे.

हा अल्पपरिचय येथे संपवून 'वोल्गा ते गंगा 'या आगळ्यावेगळ्या कथासंग्रहाकडे आपण आता येतो आहोत. या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य असे की ख्रिस्तपूर्व ६००० ते इ.स.१९२२ पर्यंतच्या हिंदी-युरोपीय मानववंशांच्या राहणीमानांचे कथारूप यथार्थ चित्रण १९ कथांमधून अवघ्या २७५ पानांत लेखकाने केले आहे. जवळजवळ आठ सहस्त्रकांच्या या माणसांच्या महायात्रेच्या व्यामिश्र प्रगतीची सर्व अंगे, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक- त्यात लेखकाने एखाद्या संशोधकाच्या अलिप्ततेने (जे लेखक स्वत: आहेच) केले आहे. त्याच वेळी हे चित्रण ललितलेखकाला साजेशा अनलंकृत पण धीट अन स्पष्ट शैलीने काळाच्या कितीतरी पुढे जाऊन केले आहे व या लेखनाचा डौल वाढवला आहे.

कथा एकूण १९ आहेत हे आलेच , प्रत्येक कथेत एक केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे. काळाचा अन भूभागाचा जो आव्हानात्मक पट पंडितजींच्या समोर आहे तो पहाता प्रत्येक कथा एक-एका प्रसंगापेक्षा या व्यक्तीकेंद्राचे चित्रण, विकसन व त्याच वेळी भोवतालात घडणार्‍या घटनांशी कधी समन्वय, कधी विरोध साधत झालेला त्याचा/तिचा जीवनप्रवास यावर आधारलेली आहे.

त्यांतील सत्यांशांचे समीक्षण मानव-वंशाचे अभ्यासक जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील ,एक सामान्य वाचक म्हणून मी इतकेच म्हणेन की ही संकल्पना पंडितजींनी थरारक प्रकारे राबवली आहे. जे अभ्यासक-संशोधक नाहीत, सामान्य पण चोखंदळ वाचक आहेत ,त्यांना आपल्या अस्तिवाचे धागे-दोरे कुठून कुठे विस्तारले आहेत याची जाण या वाचनाने येईल, त्यांचे जाणीव-विश्व समृद्ध होऊन बदलेल व आपल्या अज्ञानावर आधारित पूर्वग्रह-दुराग्रहांवर त्यांना फेरविचार करावासा वाटेल इतका परिणाम या लेखनातून लेखकाने निश्चित साधला आहे व हे यश फार मोठे आहे.

कथाविषय झालेल्या व्यक्ती स्त्री आहेत किंवा पुरुष. वानगीदाखल 'निशा' या पहिल्याच कथेतील नायिका निशा (इ.स. पूर्व ६००० वर्षे, वोल्गाकाठचा वरचा प्रदेश, जाती हिंदी-युरोपियन) गुहांमधून रहाणार्‍या स्त्रीसत्ताक आद्य टोळ्यांपैकी एका टोळीची-परिवाराची प्रमुख आहे. आद्य-अश्म हत्यारे वापरणारे,शिकारीवर जगणारे, बर्फाच्छादित सूचीपर्ण वृक्षांच्या प्रदेशातील हिवाळ्यात कसेबसे तग धरणारे, थंडीपासून बचाव म्हणूनच केवळ चामड्यांची वस्त्रे धारण करून अन्यथा दिगंबर असणारे समूह आपल्या डोळ्यांसमोर तरळतात.स्त्री ही परिवाराचे पोषण व प्रत्यक्ष संवर्धनही मुलांना जन्म देऊन करते. जवळजवळ पशूपातळीवर व मुक्त संबंधात रहाणार्‍या या टोळ्यांमध्ये सत्तासंघर्ष आहेच, त्याला आधुनिक नैतिक विधीनिषेध नाहीत (तसेही सत्तासंघर्षाला ते नसतातच) .इथे आई (कथानायिका निशा ) तिचीच मुलगी रोचना आपल्यापासून सत्ता हिरावून घेईल म्हणून असुरक्षित वाटून तिच्या घाताचा प्रयत्न करते व त्यात स्वतःच मारली जाते.

यापुढील 'दिवा ( इ.स.पूर्व ३५०० , मध्य वोल्गा तट , जाती हिंदी-स्लाव ) कथा निशाचाच २५०० वर्षांनंतरचा उत्तरकाळ घेऊन रंगवली आहे . अजूनही स्त्रीसत्ताच आहे, येथेही स्त्रीसत्तेतही क्रौर्याला,विकारवशतेला सीमा नाही, सत्तासंघर्षात अटळपणे येणार्‍या त्या आदिम दुष्प्रवृत्ती आहेत हे त्यात रंगवले आहे. मनुष्यांच्या राहणीमानात सुधारणा आहे , जनस्थाने व त्यांचे अंतर्गत नियम तयार होत आहेत.या दोन्ही कथांमध्ये संवादसाधन भाषेचा वापर मात्र आहे, त्यावर राहुलजींनी काही भाष्य केले नाही किंवा भाषाविकसनाची मीमांसा केलेली नाही ही मला एक महत्त्वाची त्रुटी वाटली.

तिसरी कथा 'अमृताश्व' ही मध्य आशिया, पामीर (उत्तर कुरु ) येथे घडते. जाती हिंदी -इराणी, इ.स.पूर्व ३००० वर्षे.जनपदांमध्ये पुरुषसत्ता, बहुपत्नीप्रथा , स्त्रियांना गुलाम बनवण्याची कुठेकुठे सुरुवात झाली असली तरी अजूनही कैक समूहांमध्ये स्त्रिया समान ,शक्तीमान, निर्भर आहेत. समाजाला विवाहबंधनात मुक्तसंबंध मान्य आहेत.ग्रामांच्या पाणी ,रस्ते आदि सार्वजनिक कामांची सूत्रे महानायक-महापितर हलवतात. वांशिक टोळ्यांमध्ये उग्र युद्धे सततची, त्यात स्त्रिया अजूनही भाग घेतात. अमृताश्व हा कौरवांचा महापितर आहे, वृत्तीने उदार व समानतावादी आहे. पुरुंचा संहार करून तो कुरुंचे वर्चस्व स्थापतो.

चौथी कथा 'पुरुहूत' ताजिकिस्तानात हिंदी इराणी वंशात इ.स. पूर्वी २५०० वर्षे घडते.एका भटक्या तरुण तरुणीच्या भेटीतून निसर्गाच्या कुशीत कथा उलगडते.परिचय वाढतो. मधुर बासरीवादन, संगीताच्या आस्वादात हरवणे, मनातले आर्त व्यक्त करणे आता अधिक विकसित होत आहे. मेंढपाळीचा पशुपालनाचा व्यवसाय रूढ झाला आहे. सात हजार फूट उंचीच्या पर्वतप्रदेशात करणारे मद्र-जन तांब्याशी , सोन्याशी, लोखंडाशी परिचित होत आहेत. शस्त्रनिर्मिती, शस्त्रस्पर्धा, वाणिज्य वाढते आहे कृषिसंस्कॄती नांगराच्या फाळांबरोबर उदयास येत आहे. या बदलांमुळे वृद्ध बेचैन आहेत , त्यांना हे सर्व अधर्माचे वाटते. मेंढपाळी करत नव्या गवतांच्या भूमीकडे सरकत जाणे शिकार व पशुपालनावर, जंगलातली फळे, तृणधान्ये खाऊन रहाणे यापलिकडचे नवे जगणे माणूस चाचपून पहात आहे.अश्मयुगाचा अस्त होत आहे.

पाचवी कथा 'पुरुधान' , देश वरचा स्वात , जाती हिंदी -आर्य काल इ.स. पूर्व २००० वर्षे.पुरुधान हा एक आर्य नागरिक आहे पण व्यापारी तांड्याचे नेतृत्व करणारा. कपाशीच्या वस्त्रांचा वापर सुरू झाला आहे. इंद्रदेवाला खुष ठेवण्यासाठी यज्ञाचं आयोजन आहे, समारंभाचं वातावरण आहे.स्त्रियांच्या अलंकारांचे, वस्त्राभूषणांचे तपशीलवार वर्णन लेखक करतो. मांसाशन, मद्यपान व सणापुरते अनिर्बंध जीवन समाजाला मान्य आहे. पुरुधान पिवळ्या केसांचा व निळ्या डोळ्यांचा आर्य, व्यापारामुळे तो चतुर असुरांच्या संपर्कात येतो. हे असूर कुरुप पण भोगविलासी, दास्यप्रथा मानणारे, पण दागिने, वस्त्रे, कलाकुसरीत हुशार म्हणून आर्यांना वरचढ व आर्यांना पशुमानव समजणारे आहेत.संघर्ष वाढत चालला आहे, पुरुधान व्यापार सोडून युद्धनेत्याच्या भूमिकेत शिरतो. पहिला देवासूर संग्राम छेडला जातो आहे, आर्यांचा त्यात विजय झाला आहे.

'अंगिरा ' ही सहावी कथा गंधार (तक्षशिला) येथे हिंदी-आर्यांमध्येच, इ.स.पूर्वी १८०० वर्षे घडते.आर्य-असूर संग्रामाला आर्यांच्या अंतःकलहाचे व असूरांना सामील होऊन विलासी जीवनात मग्न होऊन आपले घरदार मागे सोडून देणार्‍या आर्यांचेही नवे परिमाण आहे. पासष्ट वर्षांचे अंगिरा ऋषी कथेच्या केंद्रस्थानी आहेत. ते सम्यक विचार करून नव्या जगाचे भान आपल्या शिष्यांना देत आहेत.

सातवी कथा 'सुदास' कुरुपंचाल देशात वैदिक आर्यांमध्ये इ.स.पूर्वी १५०० वर्षे घडते.पंचाल (रोहिलखंड)जनपदात मानवाचं मोल नाही, स्त्रीला स्वातंत्र्य नाही म्हणून खिन्न झालेला तरुण सुदास सियालकोट येथे मद्रांच्या मानवभूमीत, जेथे स्वतंत्र्य व समानता आहे अशा लोकांमध्ये आश्रय घेतो, आश्रयदात्या अपालेच्या प्रेमात पडतो पण तो असतो पंचाल राजकुमार ! दूरदेशात, खरे तर त्याच्या स्वदेशात राहिलेली आपली आई अन प्रेयसी यांच्यामध्ये हेलकावे घेणारे त्याचे मन त्याला पुनः आईकडे घेऊन जाते . त्याला कुठे माहिती असते की पुढे अपालाचा चिरवियोग त्याच्या नशिबात आहे, तो तिला नेण्यासाठी परतून येईपर्यंत तिचे प्राण या जगात रहाणार नाहीत! अभिषिक्त राजा सुदास आर्य व अनार्यांची सेवा करू इच्छितो, त्यासाठी त्या पुरोहित-ऋषींची व ब्राह्मणांची संमती मिळवावी लागते. आपल्या पवित्र हेतूसाठी, पण मनात या सर्वांचा तिरस्कारच करत तो खूप दाने देतो ज्यांचे उल्लेख आजही ऋग्वेदात सापडतात असे लेखक म्हणतो.

आठवी कथा 'प्रवाहण' पंचाल संयुक्त प्रांतात, इ.स.पूर्वी सातशे वर्षे घडते.मामेबहीण लोपेच्या प्रेमात पडलेला युवराज प्रवाहण शास्त्रांचा अभ्यास करताना त्यातील दंभ व अंधश्रद्धांनी अस्वस्थ आहे.पुरोहितांचा ज्ञानव्यापार त्याला समजतो.पुढे तो उपनिषदांचा उद्गाता होतो. आत्मज्ञानाचा अभ्यासक होतो. पण कार्यभाग साधण्यासाठी लोकांना मुठीत ठेवून धन ,सत्ता मिळवण्यासाठी आता त्याने चक्क कपोलकल्पित पुनर्जन्माचा ,पितरांच्या सृष्टीचा आविष्कार केला आहे, त्यात त्यालाही काही गैर वाटत नाही ! पुनर्जन्माच्या भरवशावर जनता सामंतशाहीतील विषमता, दारिद्र्य साहील, पितरांना मोक्ष मिळावा म्हणून पुरोहितांना दाने देईल हा त्याचा विश्वास !

नववी कथा 'बंधुल मल्ल' इ.स.पूर्वी ४९० वर्षे घडते.बंधुल मल्ल तक्षशिलेवरून युद्धविद्या शिकून कुसीनाराच्या प्रजातंत्रात उपसेनापती होतो.त्याच्यावर जळणारे त्याच्या विरुद्ध कपट करतात तेव्हा तो कुसीनारा सोडून आपल्या प्रेयसीबरोबर मल्लग्रामात (गोरखपूर ) येथे येतो, कोसलांचा सेनापती होतो.कोसल राज्यातील शाक्यकुळात गौतमबुद्धांचा जन्म झाला आहे ! मोठे सामाजिक-धार्मिक मंथन चालू आहे. त्यांचा विचार जनमानसात मूळ धरत आहे. यज्ञवाद-ब्रह्मवाद-उपनिषदे यांनंतर आता गौतमांचा अनात्मवाद -जो जडवादाकडे झुकूनही चेतनाप्रवाहाचा पुनर्जन्म मानणारा म्हणून लोकप्रिय होत आहे. दगाबाजीने राजाचे कान येथेही भरून बंधुल मल्लाला कपटाने मारले जाते . त्याची प्रेयसी-पत्नी बुद्धाची नि:सीम भक्त आहे, धैर्याने ती हा आघात सहन करते.. सामाजिक विषमता दासप्रथा खूप वाढलेली आहे, श्रीमंत व्यापारीवर्ग शिरजोर आहे त्यातच बौद्धधर्मविचार बळावत आहे असा हा काळ.

या तिन्ही कथांत धर्मविचारांत बळावणारा अधर्म, थोतांड याचा विचार राहुलजींनी आपल्या शैलीने केला आहे. अनेक कथांमधून त्यांचे विषमतानिर्मूलनासाठी तळमळणारे मन त्यांना भावलेल्या सत्यासहित प्रकट होते.दहाव्या कथेची ('नागदत्त' इ.स्.पूर्वी ३३५ वर्षे) सुरुवातच ''धर्म हा परधनाचा अपहार करणार्‍यांसाठी आहे'' अशा स्फोटक विधानाने होते करुणामयी, स्वातंत्र्यप्रिय तक्षशिला-गंधारराज्याच्या पार्श्वभूमीवर व्यवसायाने वैद्य पण मनाने तत्त्ववेत्ता नागदत्त आणि विष्णुगुप्त चाणक्य या दोन मित्रांचा हा संवाद आहे.इराण कडून येणार्‍या पारतंत्र्याच्या छायेत उत्तर भारतातील छोटी गणराज्ये एकत्र येऊ पहात आहेत.संघराज्याची संकल्पना मूळ धरत आहे.त्यातील स्वप्नविलास नागदत्ताला हास्यास्पद वाटतो. शिवाय सर्व गणराज्ये सारखी नाहीत.मगधासारख्या गणराज्यात पाशवी अन्याय आहे. गरिबांचे दमन आहे. नागदत्त पार्शवांचा (इराण्यांचा ) व यवनांचा (ग्रीकांचा ) राज्यकारभार पाहू इच्छितो, विष्णुगुप्त येथेच राहून अन्यायी नंदराजाचे उच्चाटन करून दुसर्‍या चक्रवर्ती राजाच्या आधिपत्याखाली संघराज्य कसे एकत्र येईल, परचक्रापासून भारताला कसे वाचवता येईल याच्या चिंतनात गढून जातो.
भ्रमणप्रिय नागदत्त वैद्यविद्येच्या बळावर पारशी क्षत्रपाच्या अंतःपुरात व अंतर्मनातही प्रवेश मिळवतो. निसर्गाने दरिद्री मरुभूमीत मानवी कर्तृत्वाने निर्माण केलेली पर्शुपुरीतील समृद्धी अनुभवतो. तेथेच यवनांची भाषा शिकून मसिडोनियाला जाऊन वस्तुस्थिती हाच सत्याचा निकष मानणार्‍या थोर तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टोटलला भेटतो. येथे लेखक जगातील विद्वान तत्त्ववेत्त्यांचे विचारांचे आदानप्रदान देशाच्या सीमा लंघून कसे चालू होते ते दाखवतो .स्वप्नांना देशाची सीमा नसते. हे तत्त्ववेत्ते महान सत्तांचे सिंधूकाठी मीलन होईल असेही स्वप्न रंगवतात.

अकरावी कथा 'प्रभा' इ.स.पूर्वी ५० वर्षे घडली आहे. चंद्रगुप्त आणि मौर्य वंशाच्या नि:पातानंतर अयोध्येला व्यापारी व राजकारणातील महत्त्व आले आहे.अयोध्येचे नाव मात्र साकेत आहे. समृद्ध अशा ब्राह्मणकुळात जन्मलेला कवीमनाचा तरुण अश्वघोष कथेच्या केंद्रस्थानी आहे.साकेतात सर्व वंशाचे लोक व्यापार-उदीमामुळे एकत्र आल्याने सांस्कृतिक वातावरण संपन्न आहे, समाज मोकळ्या विचारांचा आहे.येथे स्थायिक झालेल्या यवनांचे भारतियीकरण झाले असले तरी म्लेंच्छ म्हणून त्यांची सुप्त हेटाळणीही आहे.उदार बौद्धधर्मात मात्र त्यांचे स्वागत आहे. प्रभा नावाच्या एका सुंदर यवनीच्या प्रेमात पडून कवी अश्वघोष यवनांच्या नाट्यशालेत सामील होऊन अभिनयाचे धडे घेतो,'उर्वशी-वियोग' हे नाटक ग्रीकांच्या नाट्यकलेच्या प्रभावाखाली लिहितो नेपथ्यात पडदे रंगवायची कला शिकून घेतो व यवनांच्या (ग्रीकांच्या )स्मरणार्थ त्या पडद्यांचे नाव यवनिका ठेवतो ! त्याचे आणि प्रभेचे प्रेम वंशभेदामुळे सफल होत नाही, प्रभा आत्महत्या करते, तो भिक्षू होऊन बौद्धांना ग्रीक तत्त्वज्ञानातून विचार घेणे शिकवतो..मध्य-आशियातील गोबीमध्ये त्याची अमरकाव्ये 'बुद्धचरित' 'सोन्दरानन्द' सापडली आहेत ज्यात त्याने स्वतःचा उल्लेख 'साकेतक आर्य सुवर्णाक्षीपुत्र अश्वघोष' असा केला आहे !

बारावी कथा 'सुपर्ण यौधेय' इ.स. पूर्वी ४२० वर्षे घडते. कथानायक अवंतीमध्ये क्षिप्राकाठी ब्राह्मणकुळात जन्मला आहे. पण हे कच्चे ब्राह्मण- यवनकुळसंकरातून जन्मलेले ब्राह्मण- म्हणून हिणवले जात आहेत ! उंच, भरदार, गोरेपान, गोमांसाहारी, मद्यपानप्रिय अशा या सात ब्राह्मण घरांचा उपहास इतर ब्रह्मवृंदाकडून केला जातो.हे चंद्रगुप्ताने केलेल्या वंशविच्छेदानंतर सतलज आणि यमुनेचा दुआब सोडून भारतभर पसरले. वर्णभेद नसलेल्या राजा रंतीदेवाच्या समकाळात एकाच बापाची दोन मुले ब्राह्मण किंवा क्षत्रिय होऊ शकत, अशा पार्श्वभूमीवर झुंजार यौधेयांची काही कुळे ब्राह्मण झाली.येथे राहुलजींनी वनपर्व-शांतीपर्व- द्रोणपर्वातील उतारे दाखले म्हणून तळटीपेत दिले आहेत.या सामाजिक संदर्भामुळे अस्वस्थ असलेला सुपर्ण उज्जयिनीला जाऊन कविकुलगुरु कालिदासांचे शिष्यत्व पत्करतो, त्याचा त्याला अभिमान आहे. गुप्तांच्या चोख पण कर उकळणार्‍या राजवटीत तो निर्धास्त प्रवासाला निघतो. आगरे-निगमे-गावे, तेथील कलाकार, सामान्य लोक आणि दासांचे जीवन पहातो.गुप्तांच्या राजवटीतून विस्थापित झालेल्या विदेशी भिक्षू दिड्नाग याच्य सहवासात येऊन यौधेयांच्या मृतभूमीचे पुनरुत्थान करण्याची शपथ वहातो.

तेरावी कथा 'दुर्मुख' इ.स. पूर्वी ६३० वर्षांआधी घडताना रंगवली आहे. तिचा नायक साक्षात शातवाहन वंशी चक्रवर्ती राज्यकर्ता शीलादित्य (सदाचारसूर्य ) हर्षवर्धन ! विक्रमादित्य दुसर्‍या चंद्रगुप्ताचा वंशज.महाराज प्रभाकरवर्धनाचा पुत्र,क्षमामूर्ती महाराज राज्यवर्धनाचा (जे कपटाने मारले गेले )बंधू, राजकन्या राज्यश्रीचा भाऊ. दर पाचव्या वर्षी राजकोषातलं धन ब्राह्मण व बौद्ध श्रमणांना वाटणारा उदारधी.या लोकविलक्षण कल्याणकारी राजाला विद्यादान श्रेष्ठतम वाटतं म्हणून तो नालंदा विद्यापीठाची समृद्धी वाढवतो,सर्व धर्मांच्या विद्वानांचा सत्कार करतो.या कथेत त्याचे अन आद्य कादंबरीकार (''कादंबरी'' या त्याच्या दीर्घकथेवरूनच कादंबरी हा साहित्यप्रकार अस्तित्वात आला )बाणभट्टाचे गुंतागुंतीचे नाते चितारले आहे हे या कथेचे वैशिष्ट्य. हर्षचरित गुपचुप लिहिणारा बाणभट्ट त्याची प्रच्छन्न निंदा सूक्ष्मपणे आपल्या लेखनातून करतो व इतिहासाचा विपर्यास होईल असे साहित्य निर्माण करतो आहे असे हर्षवर्धनाचे दु:ख आहे ! 'कादंबरी' कथेत हर्षवर्धनाचेच व्यक्तिगत आयुष्य बाणभट्टाने चितारले आहे, त्याची पारशी राणी त्या कथेतील महाश्वेता आहे, व सौराष्ट्री राणी कथेत कथानायिका कादंबरी झाली आहे असा त्याचा आरोप आहे !कथेत बाणभट्टाचीही बाजू अलिप्तपणे मांडली आहे. हर्षवर्धनाने त्याच्याकडून घोस्ट रायटिंग करून घेतले आहे, त्याच्या सद्गुणातही दांभिकतेचा देखावा आहे असे मोकळ्या पुरोगामी आचारविचारांच्या बाणभट्टाचे म्हणणे आहे ! कटू सत्य स्पष्ट बोलल्याने त्याला 'दुर्मुख' ही पदवी मिळाली आहे!

पुढची कथा ‘चक्रपाणी’ आपल्याला एकदम इ.स. नंतर १२०० वर्षे पुढे आणते.कनोज या समृद्ध शहराच्या पार्श्वभूमीवर ही कथा इस्लामच्या रक्तरंजित प्रसाराची घोडदौड हिंदुस्तानच्या सीमेशी धडक देत आहे हे दाखवते.एकजूट नसलेले आत्मतुष्ट भारतीय राजवंश, दुही, अंधश्रद्धा या पार्श्वभूमीवर इस्लामला येथे विजय मिळवणे सोपे गेले आहे.वृद्ध विलासी राजा जयचंद्र तरुण शूरवीर पृथ्वीराजाचा द्वेष करतो.त्याच्या मरणानंतर राजवैद्य चक्रपाणी युवराज कुमाराला वाचवून तुर्कांचे आक्रमण थोपवून जातीभेदविरहित हिंदू राज्यलक्ष्मी परत आणण्याची स्वप्ने पहातो.

पंधरावी कथा 'बाबा नूरदीन'' इ.स.१३०० इस्लामी सल्तनतीत गुण्यागोविंदानं एकत्र रहाणार्‍या, हिंदू संताबरोबरच मुस्लीम पीरांचाही आदर करून तरीही आपल्या धार्मिक अस्मिता सांभाळणारा मिश्रधर्मी सामान्यांचा समाज. ही कथा अशा हिंदू मुस्लीमांचे चित्रण करून त्या राजवटीतला, काळातला सकारात्म भागही दाखवते. मुस्लीम पीरही समनी (बौद्ध ) व तसव्वूफ (वेदांत) विचारधारांनी प्रभावित आहेत. असंतोष नको म्हणून येथे स्थिरावलेले मुघल राज्यकर्ते सक्तीची धर्मांतरे, मंदिरविच्छेद निदान आपल्या राज्यांतर्गत तरी करत नाहीत.शरियत, धर्मप्रसार, हिंदूं-बौद्धांचे काफर असणे, त्यांच्यात धगधगणारी इस्लामविरोधी अस्मिता व त्यासकट त्यांना घेऊन राज्यकारभार करणे व इस्लामी सत्ता मजबूत करणे या सर्वांवर बाबा नूरदीनबरोबर उहापोह करणारा खिलजी शासक या कथेत आहे.

सोळावी कथा सुरैया इ.स. १६०० मध्ये घडलेली एक हिंदू मुस्लीम प्रेमकथा. अकबराच्या दरबारातील अबुल फजलची तरुण सुंदर कन्या सुरैया अन अकबराच्याच मर्जीतील सधन शेतकरी टोडरमलचा पुत्र कमल. अकबराची ती सर्वसमावेशक राजवट. अकबर बिरबलाचे-इतर विचारवंतांचे ज्ञानसंवर्धक संवाद.यातून प्रोत्साहन मिळून हे प्रेमी जीव सर्वसंमतीने एकत्र येऊन सहजीवनासाठी प्रवासाला फ्लॉरेन्सला जातात, पण सुरतेला परतण्याआधी चाच्यांच्या हल्ल्याला बळी पडतात अशी ही थोडी स्वप्नविलासी अंगाने जाणारी कथा आहे.

सतरावी कथा रेखा भगत इ.स.१८०० .ईस्ट इंडिया कंपनीचं आगमन,लॉर्ड कॉर्नवॉलिसने येथील जमीनदारांना हाताशी धरून सुरू केलेली लूट त्यातच दुष्काळ.जमीनदारांचे वाढते अत्याचार.त्यातच नवविचारांचे सामान्यांपर्यंत पोचणारे वारे. स्वाभिमानी रेखा भगत जमीनदाराला मानत नाही, त्याच्या मागण्या पुरवत नाही म्हणून जमीनदार त्याच्या पत्नीला विटंबित करतो. सूडाने भडकलेला रेखा त्याचा कर्दनकाळ बनतो..

अठरावी कथा इ.स.१८५७, मंगल सिंह. इंग्लंडमध्ये नवे शिक्षण घेण्यासाठी आलेला मंगल सिंह नव्या क्रांतीकारक शोधांच्या त्या जगामुळे प्रभावित आहे. अ‍ॅनी रसेलच्या प्रेमात आहे.सती व अशा अन्य अन्यायी प्रथांमुळे हिंदूधर्माचा तिरस्कार करून त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. आता तो मार्क्सच्या वैचारिक प्रेमात पडतो आहे, आपल्या देशाच्या दुर्दशेने तळमळतो आहे.भारतात विलायती शिक्षण घेऊन परतल्यावर मंगल सिंह १८५७ च्या धुमाळीत उडी घेतो तेव्हा डुकरा-गायीच्या मांसाची काडतुसे या मुद्द्यापेक्षाही त्याचे लक्ष इंग्रज भांडवलदार व भारतीय सामंतशाहीच्या पकडीतून या निमित्ताने सामान्य जनतेला बाहेर काढणे याकडे आहे..बंडाचे बारकाईने चित्रण, नेत्यांची संभाषणे व शौर्य या कथेत आहे. मंगलसिंहाच्या हौतात्म्याचा एक विशाल संदर्भ त्यातून स्पष्ट होतो.

एकोणिसावी कथा 'सफदर' , काळ इ.स. १९२२. बॅरिस्टर सफदरजंग आणि त्यांची स्वेच्छेने निपुत्रिका राहिलेली मेमसाहेब बेगम सकीना . स्थळ लखनौ. त्यांचा जिवाभावाचा राजपूत मित्र शंकर. स्वाभिमानी, साधाभोळा, प्रेमळ. युरोपातील सत्तासमीकरणे बदलत आहेत. सफदरजंग आंतरराष्ट्रीय राजकारणातले बारकावे, त्यांचा हिंदुस्तानच्या राजनीतीवर होणारा परिणाम यांची सखोल चर्चा शंकरबरोबर करत असतात. कर्झनने केलेला वंगभंग भारतीयांमध्ये एक नवा त्वेष निर्माण करून गेला आहे.

''जगाचे धागेदोरे एकत्र गुरफटले गेले आहेत.''

भारतात लाल, बाल पाल यांचा प्रभाव आहे,स्वातंत्र्ययुद्धाने टिळकांनंतरचा गांधीयुगाचा टप्पा गाठला आहे. सफदरजंग व शंकर आपले आरामदायी जीवन त्यागून गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत उडी घेण्याचा निर्धार करतात. तुरुंगात जातात. गांधीजींनी सत्याग्रह मागे घेतल्यावर त्यांचा भ्रमनिरास होतो.
'' क्रांतीचा शक्तीस्त्रोत जनताच आहे, गांधीजींची बुद्धी नाही '' या वाक्यावर आठ हजार वर्षांचा अफाट प्रवास, विलक्षण माणसे,परिस्थिती चितारणारे राहुलजी आपल्या लेखनाचा शेवट करतात.

एकोणीस कथांचा हा पट अत्यंत गुंतागुंतीच्या तपशीलांनी ठासून भरलेला आहे. प्रत्येक कथेत एका कादंबरीचा ऐवज आहे. त्यातले मुद्दे अभ्यासकांच्या दृष्टीकोनानुसार आस्थेच्या निकषावर विवाद्य ठरू शकतात.या सर्वांवर थोडक्यात लिहिणे कठीण आहे.

पण असे कुणीतरी कथा या माध्यमाचा वापर करून लिहिले आहे हेच आश्चर्यकारक आहे. ही पांडित्यातील प्रतिभा आहे. आपल्या चिमुकल्या अस्तित्वामागे केवढे खोल-गहन प्रवाह,विचार-संस्कृतीसंकर आहेत, केवढी उलाढाल झाली आहे कालखंडांची अन अगणित जीवनांची ज्यामुळे आपण आज इथे असे आहोत त्याचे भान केवळ विस्मित विस्मित विस्मित करते आपल्याला.

ते भान जागवण्यासाठी तुमचे आभार महापंडितजी.

-भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या धन्यवाद. अमेरिकेतून लोक वाङ्मय गृहाशी संपर्क करायला घाबरतो मी. उगाच नक्षलवादी सहानुभुतीदार म्हणून सरकारी डेटाबेस मध्ये नाव जायचं.

मला तर आता अशिक्षीत, निरक्षर आणि असंस्कृतही असल्यासारखे वाटत आहे. वाचनाच्या तोकडेपणाच्या मर्यादा जाणवून....

खडीसाखर, माझ्याही मनात असे येऊन गेले.
राहुल सांकृत्यायन यांचे नाव लहानपणापासून कानावर पडत होते. पण पाठ्यपुस्तकात असलेल्या एक दोन कथांपलीकडे वाचन झाले नाही. आता या लेखामुळे त्यांचे लेखन वाचण्याची इच्छा बळावली आहे.
या संदर्भात धर्मानंद दामोदर कोसंबी(थोरले कोसंबी) यांची आठवण आली. तीच प्रगाढ विद्वत्ता, तसाच बौद्धप्रभाव, मार्क्सिज़म, सहा वर्षांचा कारावास, बहुभाषाकोविदत्व, देशविदेशी प्रवास, बौद्धधर्मस्वीकृती, सगळे तसेच समान्तर. यांचीही विपुल ग्रंथरचना. मात्र धर्मानंद कोसंबी ललितसाहित्यिक नव्हते.अपवाद म्हणून गौतम बुद्धाच्या जीवनावर एक नाटक त्यांनी लिहिले आहे.

'वोल्गा ते गंगा 'हा कथासंग्रह नक्की वाचणार.
लखनऊ, दिल्लीत असताना राहुल सांकृत्याय यांचे साहित्य वाचले आहे पण हा कथासंग्रह वाचायचा राहुन गेला.
कुठले ही साहित्या वाचुण त्यावर इतके सुंदर लिहता येणे हे सगळ्यांना जमत नाही.

धन्यवाद भारती

अरे, इतका सुंदर लेख वाचायचा राहुनच गेला होता. पुन्हा वरती काढल्याबद्दल धन्यवाद ख.सा.
भारतीताई, अप्रतिम जमलाय लेख. राहुल सांकृत्याय यांचा थोडक्यात पण मुद्देसुद परीचय आवडला. त्यांचा येवढा व्यासंग पाहुन आश्चर्यचकित व्हायला होते. येवढे क्ष्रम घेउन इथे लेख दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
रॉबीनहूड यांच्या प्रतीक्रीयेला अनुमोदन. अशोकमामांच्या टिप्पण्या म्हणजे तर मेजवानी असते. एखाद्या लेखकाला असा एखादा भरभरुन प्रतिसाद देणारा वाचक मिळाला कि लिहीण्याचे श्रम सार्थकी लागल्या सारखे खचीतच वाटते.

आभार पुनश्च हीरा , निसर्गचित्र , रांचो !
लिहिण्याचे श्रम सार्थकी लागले ! या पुस्तकात अनेक कादंबर्या आणि चित्रपटांचा ऐवज ठासून भरला आहे ! पांडित्य खूपदा रटाळ शिकवणूकबाज दुराग्रही होतं .. इथे ते घटनांच्या गर्भात शिरून कालप्रवाहाचा वेध अलिप्तपणे घेत आहे . हा अनुभव संपन्न करणारा आहे .)

आपल्या चिमुकल्या अस्तित्वामागे केवढे खोल-गहन प्रवाह,विचार-संस्कृतीसंकर आहेत, केवढी उलाढाल झाली आहे कालखंडांची अन अगणित जीवनांची ज्यामुळे आपण आज इथे असे आहोत त्याचे भान केवळ विस्मित विस्मित विस्मित करते आपल्याला.- सम्यक् सूत्र. छान परिचय करून दिला आहे.

Pages