आधुनिक सीता - 2

Submitted by वेल on 30 August, 2013 - 15:44

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930

********************

"अहो काकू, रामकाका, केशव आणि मीनावहिनी, अहो वहिनी हातातलं काम ठेवून इथे या. भास्कर, तुसुद्धा बस इथे येऊन. आणि सरिता तुझ्याबद्दल बोलतोय, तेंव्हा तू पण बस इथेच. तुझ्या काकूची, एक मैत्रिण आहे, शर्मिला साने, तिचा मुलगा सर्जन आहे, त्याच्या लग्नाचं पाहता आहेत, काकू म्हणाली तुम्ही सगळे हो म्हणालात तर आपण त्यांच्याकडे जाऊन बोलू."
मी विषय बदलण्यासाठी म्हटलं, "हे पैसे खर्च करण्याचं काय म्हणत होतात?"
"अगं, सगळयांना मान्य असेल तर लग्नासाठी खर्च नाही का करायला लागणार?"
"आणि नदी समुद्र ते काय होतं?"
"अग तू सरिता म्हणजे नदी, आणि तो सागर म्हणजे समुद्र. तुझं आणि त्याचं लग्न म्हणजे नदीला समुद्राकडे घेऊन जाणं नाही का?"
मी वैतागून डोळे फिरवले. " काका तुमची मस्करी म्हणजे ना ... अहो पण मला इतक्यात " आणि आईने माझं बोलणं मध्येच थांबवलं. "सरिता, मुलगा चांगला असेल तर आपण विचार करायचा आहे. तू सव्वीशीची आहेस, काही लहान नाही. आणि लग्न ठरवून साखरपुडा, हॉल मिळणे ह्यात एक वर्ष सहज निघून जाईल. मुलगा तुला आवडला नाही तर आम्ही काही जबरदस्ती करणार नाही पण न पाह्ताच नाही म्हणायचं नाही."
"अगं आई पण तो सर्जन मी फक्त एम.ए. कसा पसंत करेल तो मला?"
"भाऊजी स्थळ घेऊन आलेत, त्यांना माहित नसेल का ह्याबद्दल?"
"वहिनी, हे मात्र बरोबर, त्यांना डॉक्टर मुलगी नको आहे. आणि फक्त करियर करणारी मुलगी सुद्धा नको आहे. सागर सध्या सौदी मध्ये असतो. तो अजून तीन वर्ष तिथे असेल. त्यामुळे त्याच्या सोबत जाऊ शकेल अशी मुलगी हवी आहे."
"मला सौदी बिदीला नाहीच जायचं."
"अगं तो फक्त तीन वर्षाकरता आहे ना तिथे अजून. थोडा वेळ तिथे राहा, मधे मधे इथे येत राहा. प्रभाकर सांग त्यांना आम्ही भेटायला तयार आहोत." आजी म्हणाली.
" आजी सौदी म्हणजे काय पुणे मुंबई आहे का? आणि तिथले कायदे बायकांसाठी किती कडक आहेत माहीत आहे का?" इति दादा. मी अभिमानाने दादाकडे पाहिलं.
" जगची माहिती आम्हालासुद्धा आहे भास्कर. तिथेसुद्धा शिकलेल्या नोकरी करणार्‍या बायका राह्तात." आजोबा " थोडी बंधनं असतील जास्त, पण तिथेच का हिला कायमचं राहायचं आहे?"
"आपण त्यांना भेटून तर घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून तर घेऊया" बाबा म्हणाले. "छकुली, अगं आम्ही फक्त भेट म्हणून सांगतोय. नाही पसंत पडला तर पुढची प्रॅ़क्टीस समज आणि भास्कर तोपर्यत तू सौदी मधल्या कायद्यांची माहिती काढ."
"मी काय म्हणतो केशव, आपण त्यांना उद्याच भेटूया का? आत्ता मुलगा सुट्टीवर आला आहे. जर एकमेकांना यांनी पसन्त केलं तर थोडा जास्त वेळ मिळेल. आणि नाही पसंत केलं तर सागर इतर मुली पाहायला मोकळा. "
शेवटी पाच विरुद्ध दोन मत पडलं आणि ठरलं त्यांना भेटायचं अगदी दुसर्‍याच दिवशी संध्याकाळी.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45054

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते स्पष्टीकरण का काय लिहिलंयत आधी त्याने पूर्ण कथेचा गाभा आधीच कळल्यासारखा झालाय!

आहे मस्तंच! पण भाग थोडे मोठे येऊ द्या ना!

पुलेशु

.

भानुप्रिया, मान्य आहे, कथेतली उत्कंठा कमी झाली आहे, परंतु, ज्या मूळ कथेवर माझी कथा अवलंबून आहे तिचा उल्लेख न करणं चूकीचं ठरलं असतं म्हणून.....

परंतु, ज्या मूळ कथेवर माझी कथा अवलंबून आहे तिचा उल्लेख न करणं चूकीचं ठरलं असतं म्हणून.....

>> मान्य आहे. पण मग कथेचे नाव आणि लेखकाचे नाव लिहिणे पुरेसे झाले असते..

उदा. "अबक" यांच्या "कखग" या कथेवर आधारीत !!

पन लेखन शैली एकदम १९५० - ६० मधली आहे. २५ च्या मुलीला छकुली कोण म्हणते आजकाल? सागर्-सरिता इज टू फनी फॉर वर्ड्स.

भानुप्रिया, पियु,

राधिकाने मला मूळ कथा शोधून दिली, आता फक्त तिचा उल्लेख टाकला आहे. मूळ कथानकाचा सारांश काढून टाकला.

अश्विनीमामी,

हा माझा पहिला प्रयत्न आहे कथा लिहिण्याचा, बाळ्बोध आहे, गोड मानून घ्या.

अमा, तिचं घरचं नाव असेल ते Wink
माझ्या बहिणीला आम्ही अजुनही पिंकी म्हणतो
आई बाबा मला अजुनही मन्या म्हणतात Wink Happy