गवत्या - लेखक मिलिंद बोकिल - मौज प्रकाशन

Submitted by दिनेश. on 30 August, 2013 - 03:07

यावर्षी जानेवारी मधे प्रकाशित झालेले, मिलिंद बोकिल यांचे, गवत्या हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले.
त्यांची शाळा आणि समुद्रापारचे समाज हि खुप आवडली होती, त्यामानाने समुद्रने फारच निराशा केली होती.

गवत्या मात्र आवडले. हि आहे आनंद या कथानायकाची कहाणी. पदवी मिळाल्यानंतर कुठल्याही नोकरीत
मन न रमणारा तो सोंडूर या गावी स्थिरावतो. आणि तिथेच त्याच्या जीवनाला एक कलाटणी मिळते, त्याची
हि कथा.

कथा तशी साधीच आहे. अगदी फार घटना नाहीत आणि आहेत त्या फारश्या धक्कादायकही नाहीत. तरी
हे पुस्तक खिळवून ठेवते, ते त्यातील तत्वज्ञानामूळे.

सोंडूर आणि आजूबाजूच्या गावात, आनंदशी स्नेह जोडणारी अनेक माणसे आहेत. धुंडीमाळ, घारपुरे, मुकणे,
जीडी, बकुळाबाई, बाज्या, प्रभाकर, उस्मान, मेहेर, जानकी, श्रीराम, बाळकोबा, नागू, जालिंदर... त्या प्रत्येकाचे
सुंदर शब्दचित्रण यात आहे. हि सर्वच माणसे मनाने चांगली आहेत आणि त्यांचा आनंदवर जीवही आहे. पुस्तक वाचताना आपणही सगळ्यांत गुंतून जातो. गुरुजींच्या व्यक्तीमत्वाने तर आपल्याला भारावल्यासारखे होते.

याशिवाय ते सोंडूर गाव, देवघर, डोह, गुहा आणि गवत्या हि ठिकाणेही आहेत.

मी वर जे तत्वज्ञान म्हणतोय ते या सगळ्या माणसांच्या बोलण्यातून आणि आनंदच्या मननातून जाणवते.
ते सर्वांना पटेलच असे नाही पण वाचायला छान वाटते.

आनंदचे आपल्या तीर्थरुपांशी आणि दोन भावांशी मात्र तणावपूर्ण संबंध आहेत पण पुढे तेही निवळलेत.

आनंदची एकेकाळची प्रेयसी अनु पण सुंदर चितारलीय.

या पुस्तकात हेवेदावे, दुस्वास वगैरे काही नाहीच त्यामूळे पुस्तक वाचताना प्रसन्न वाटत राहते.
रुढ अर्थाने यात निसर्ग येत नाही पण जे काही वर्णन आहे त्यामूळे त्या जागा डोळ्यासमोर उभ्या राहतात.
त्यांनी उभा केलेला परीसर प्रत्यक्षात आहे का नाही, ते कळत नाही. ( तुंगीबाईचे वर्णन, कळसुबाईचे वाटते. )
एका आंब्याच्या झाडाकडे केलेली फळाची याचना, हा प्रसंग तर मला खुपच आवडला.

ज्यांनी आयूष्यातील असा अस्थिर काळ पार केलाय, त्यांनी अवश्य वाचावे.

प्रेम, ज्ञान, शिक्षण याबद्दल त्यांचे विचार खरेच वाचण्यासारखे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांनी आयूष्यातील असा अस्थिर काळ पार केलाय, त्यांनी अवश्य वाचावे.

काळजातून आलेले वाक्य दिनेशदा, छान पुस्तक-परिचय. मी वाचले नाहीय, आता मिळवून वाचेन.

ज्यांनी आयूष्यातील असा अस्थिर काळ पार केलाय, त्यांनी अवश्य वाचावे.
प्रेम, ज्ञान, शिक्षण याबद्दल त्यांचे विचार खरेच वाचण्यासारखे आहेत >>>>>>>

वाचावं लागेल. यादीत अ‍ॅड करतोय.

अनुचे लग्न झाल्यानंतर, तिला बाळ झाल्यानंतर परत एकदा आनंदची आणि अनुची भेट होते.. तो प्रसंग आणि
त्यापुर्वीचे प्रेमाबद्दलचे गुरुजींचे मत. हे इथे लिहायचा मोह होतोय. पण कॉपीराईट मूळे ते शक्य नाही.
मायबोली प्रशासन हे करू शकेल. ( करु शकेल का ? )

मला फारसे आवडले नव्हते हे प्रथम वाचनात. कोसलाचीच आठवण येत होती. पण प्रतिसादात दिनेशदांनी सांगितलेला प्रसंग अप्रतिम लिहिलाय. आनंद आणि गुरुजींचे काही संवादही लक्षणीय आहेत पण बरेच मोठे झाले आहे पुस्तक त्यामानाने शेवटी फार हाती लागले नाही असे वाटले (वै.म.)

हो अमेय, मोठे आहेच पण एका बैठकीत वाचावे असे नाही. पुढे काय, अशी उत्कंठा नाही लागत.
पण ते विचार अबोध वगैरे वाटत नाहीत. अर्थात मी म्हणालो तसे अस्थिर टप्प्यानंतरचे वाचन आहे Happy

वाचायला हवे. छान लिहिलंय.

शाळाची गोष्ट डोंबिवलीच्या एका शाळेतीलच आहे. स्वतः लेखक त्या शाळेत शिकत होते (खूप वर्षांपूर्वी), लेखकांच्या जवळपासच्या batchच्या एका ओळखीच्या असलेल्या व्यक्तीकडून समजले.(अवांतर माहिती).

परवा ग्रंथालयातून पुस्तक आणले, काल रात्री बसून पूर्ण वाचून काढले.

सुरवातीला वाचायला चांगले वाटले पण नंतर नंतर नायकाची तीच ती दीर्घ स्वगते कंटाळवाणी वाटली.

या प्रकारच्या कथा वाचलेल्या आहेत हे वाचायला सुरवात केल्यावर लगेच स्पष्ट झाले होते पण शेवट कसा आहे हे माहीत नसल्याने शेवटी जरी तेच ते वाचायचा कंटाळा आला तरी नेटाने पूर्ण केले. पूर्ण करावेसे वाटणे यावरून पुस्तक वाचनिय आहे हा तर्क मी तरी बांधला, कित्येकदा असा कंटाळा आला की मी पुढे वाचायचे सोडून देते.

कुठल्याही गोष्टीत मन न रमणे, प्रत्येक कामाचा कंटाळा येणे, काम सुरू करताना उत्साहाने करणे पण नंतर हे का करतोय ह्या विचाराने डोक्याचा ताबा घेऊन सगळे अचानक संपणे हे आजच्या पिढीला नवीन नाही. माझे आजही कित्येकदा असे होते , त्यामुळे पुस्तक जरी जुने असले तरी त्यात मांडलेल्या ह्या व्यथा आजही तशाच आहेत म्हणायला हरकत नाही.

प्रत्येक व्यक्तिरेखा जशी सुरवातीला बांधली तशीच शेवटपर्यंत ठेवली. उगीच आधी बोधामृत तोंडी घालायचे व शेवटी पाय मातीचे दाखवायचे किंवा वाल्याचा वाल्मिकी करायचा हे केले नाही हे आवडले. गांधीवादी विचारांनी प्रेरित माणसे असली तरी तेही प्रॅक्टिकल वागू शकतात.

गुरुजी व धुंदीमाळ ह्या दोन्ही व्यक्तिरेखा आवडल्या. खेड्यापाड्यात एखादी योजना राबवायची असेल तर काय करायचे याची धुंडीमाळांची योजना भारी वाटली.

कथेपेक्षा मला त्यात वर्णन केलेला निसर्ग जास्त आवडला. पुस्तक पूर्ण वाचायचे एक कारण त्यातला हा निसर्गही असू शकेल. हिरव्यागार कोकणी निसर्गापेक्षा वेगळा असा देशावरचा खडकाळ निसर्ग यात आलाय. पावसाळ्याचे यात जे वर्णन आलेय नेमका तोच तसाच पावसाळा मी आंबोलीत अनुभवला आहे. आता तो पावसाळा आंबोलीत उरला नाही.

नायक जिथे जाऊन तासनतास बसून राहतो त्या जागा म्हणजे गुहा, डोह, कोकणकडा प्रत्यक्ष पहावयास मिळाव्या असे उगीचच वाटायला लागले. बोलणारे सोबती सोबत तर नसावेच पण आपल्या डोक्यात काही विचार आलेच तर त्यांचाही त्रास व्हावा अश्या या जागा. त्या सगळ्या जागी जाऊन तसेच तासनतास घालवत मीही आरामात बसू शकेन.

देवघराला जायचा रस्ता, गवत्याचे विविध ऋतूंतले दर्शन जिवंत उतरलेय.

काही महिन्यांपूर्वी वाचले होते.एका दमात वाचू शकले नव्हते.वाचत वाचत गेल्यावर असा एक टप्पा आला की हातातले पुस्तक पूर्ण वाचून काढले.दिनेशदा म्हणतात तसे वाटले. खुप शांत शांत वाटतं हे पुस्तक वाचून झाल्यावर.

नुकतच 'गवत्या' वाचलं. मिलिंद बोकीलांच्या पुस्तकांमधली निसर्गाची वर्णनं आणि गोष्ट सांगायची शैली हे नेहमीच आवडतं. गोष्टींमध्ये वर्णन केलेली परिस्थिती वास्तववादी असते पण अतिवास्तवावादी आणि त्यामुळे उगीच आव आणलेली नसते. ह्या ही पुस्तकात निसर्गाची अतिशय सुंदर वर्णनं आणि त्या अनुषंगाने नायकाच्या मनस्थितीची वर्णनं आहे. गावातली माणसं आणि दृष्य मस्त उभी केलेली आहेत. आनंदच्या पूर्वायुष्यातली प्रेमकहाणी अतिशय संयतपणे कुठेही ड्रामॅटीक न करता मांडली आहे.
वरच्या चर्चेत कोसलाचा उल्लेख आला आहे. पुस्तकातल्या एकंदरीत सकारात्मक सुरामुळे कोसलापेक्षा मला हे पुस्तक जास्त आवडले.