यमे मराठी

Submitted by चाऊ on 28 August, 2013 - 06:55

घर पहावं बांधुन, म्हणुन ना हरकत, मंजुरी वगैरेच्या मागे लागलो.
ऑफ़िसात शिरुन समोरच्या मेजाकडे वळलो,
“यावं महाराज, काय सेवा करु? मावळे, साहेबांना तलवारीचं,.... नको, साधच पाणी पाजा."
शिपाई पाणी घेउन आला, जरा सावरत समोरच्या महोदयांना विचारलं
“माझं थोडं काम होतं, बरेच दिवस रखडलेलं"
“होय, यवनांनी फ़ारच उच्छाद मांडलाय, कामं होतच नाही. पण आपण निश्चिंत असावे, आम्ही आहोत ना? मायभवानीचे कृपेने सारं सुरळीत होईल, आपण जेष्ठ चतुर्थीला यावे"
हैराण होत मी पुढच्या मेजावर दुसय्रा अर्जाची चौकशी करायला गेलो.
“ही नस्ती उठाठेव करायला सांगीतलीय कुणी? इथलं गणगोत, मैत्र संभाळताना कामं कशी होणार? ही खोगीरभरती, अपुर्वाइनं पहात बसा झालं. हा हा हा....."
स्वत:च्याच विनोदावर हसत ते पुढे बोलते झाले,
“ते ह्रावदे,आमाला आमच्या लायणीनं जाऊ दे, अर्जदार कोन? नर्शींव वामन देशपांडे, तुमचं नाव सांगा!"
मी नाव, काम, सगळं सांगितलं. नस्ती म्हणजे फ़ाईल एव्हडं ज्ञान गोळा करुन मी पुढे निघालो.
एका ना हरकत प्रमाणपत्राची चौकशी करायला बाजुच्या खोलीकडे वळलो.
“माझी मंजुरी आली का?" माझा प्रश्न.
“त्याचं असं झालं की आमच्या सुंदराबाई (बहुदा शिपाई) आपल्या नाजुक आरक्त हातांनी ती कागदपत्र हळूवारपणे आमच्या मेजावर देऊ केली. आम्ही आमच्या आरक्त ओठांनी, आरक्त, म्हणजे उष्ण चहापान करत होतो. तोच चहा सांडुन कागद आरक्त झाले, तेव्हा पुन्हा आपल्या कोमल हातांनी अर्ज कराल का?"
भणभणलेल्या डोक्याने मी कसाबसा बाहेर पडत असता समोरुन येणाऱ्य़ा एका भारदस्त व्यक्तीवर जवळ जवळ आदळलोच. ती व्यक्ती हसली, म्हणाली
"काय झालं, काही अडचण आहे का? या माझ्या खोलीत बसुन बोलू."
पाणी पिउन चहाचा आस्वाद घेत मी त्यांना माझे अनुभव सांगितले.
समजुतीने हसत ते म्हणाले,
"हा सगळा मराठी करणाचा परीणाम. तुम्हाला भेटलेले पहिले महाराज, शिवछत्रपतिंवरच्या मराठी साहित्याचा पद्वुत्तर अभ्यास करताहेत. मराठी एम ए केलं तर, नव्या अधिसुचनेनुसार, पगारवाढ मिळणार आहे ना!"
"नस्ती उठाठेव वाले, पु.लं. च्या लेखनाचा विषय हाताळताहेत. हे बाहेरचे ’आरक्त’, काकाका म्हणजे काकोडकरांच्या काही कादंबऱ्यांचा अभ्यास करताहेत."
तेव्हड्यात एक महीला आत आल्या,
"आता जाउ द्याना घरी, आता वाजलेकी बारा"
"ऑ?" इति साहेब,
" आता लौकर घरी जाऊ द्याना, जरा काम आहे"
" हां, ठिक आहे", साहेब
"ह्यांचा विषय, मराठी लोकनाट्य" काहीश्या अनिच्छेने साहेबांनी स्पष्टीकरण दिले.
साहेबांनी घंटी वाजवली आणि कुणाला तरी बोलावलं.आलेल्या व्यक्तीला साहेबांनी माझ्या कामाच्या दिरंगाई बद्दल सांगितलं. लगेच ते म्हणाले,
"राडा करु आपण, काय? काम नाय झालं तर. पन काय हाय, थोडा हात पण मोकळा सोडा भिडु, पेटि, खोका नाय, तर लखोटा तरी? हा, मग काम नाय झाला तर गेमच करु आपण, काय?"
"हे वासुनाका आणि इतर नाके ह्याचे गाढे अभ्यासक आहेत, बरं का!" साहेबांनी तोंडदेखल कौतुकाने सांगितलं.
बाहेर येताच एका गृहस्थाने मला खुणावले,
"साहेब वढाय, वढाय, उभ्या पिकातल गुर
किती हाकला, तरी येतं पैश्यावर"
" खरय", मी म्हंटलं.
हा बहीणाबाईंच्या काव्यप्रतिभेचे मनन करणारा असणार हे कळण्याएवढं मराठी वाचन माझं ही आहे.
बाजुच्या टेबलाकडून उगाचच, झब्बु आला,
" फाईल म्हणजे फाईल म्हणजे फाईल असते
तुमची पटकन हलेल, आमची वेळ खाईल अस्ते".
"पाडगावकर", मी मनातल्या मनात म्हंटलं.
एक वयस्कर गृहस्थ आपल्या आधिकाराच्या टेबलावरुन गुरकावले,
"मी म्हंतो, दिल्यालं काम आवंदा हुनार, का आवसेपातुर थांबावं आमी? च्या.... निस्त फुकाची टकळी, हात चालवा, का ग्येले श्यान खायला?"
ग्रामीण साहीत्याचा हा झणका लागताच मी विचार केला, आता निघावं. मराठी एम ए ने केलेली प्रचंड प्रगति पाहुन माझा उर भरुन आला.
"गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी,
म्हणायचा अन, मिळाली मंजुरी
तर, या जागेवर बाधीन माडी"
हे गुणगुणत मी तेथुन आनंदाने निघालो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy