चिरतरुण आजोबा

Submitted by झंप्या दामले on 27 August, 2013 - 16:17

कुकुल्या वयात असताना काही वाटा आपोआप सुरूच होतात ... म्हणजे त्या न कळत्या वयामध्ये "या वाटेवरून चालायला सुरुवात करायची की नाही" वगैरे प्रश्न पडतच नसतात आपल्याला ! चालणे असो, बोलणे, वाचणे असो - स्वतःहून या वाटांवरून पुढे जायला सुरुवात करतो. वाचन वगळता बाकीच्या मुलभूत गोष्टी आपल्या आपोआप चालूच राहतात. (मी 'वाचणे' असे न लिहिता मुद्दामून 'वाचन' लिहिले आहे.अगदीच नाईलाज म्हणून काही गोष्टी डोळ्याखालून घालणे - यात वाणसामानाच्या यादीपासून अभ्यासाच्या पुस्तकापर्यंत बऱ्याच अपरिहार्य गोष्टी आल्या - म्हणजे 'वाचणे' झाले, आणि मनापासून एखाद्या गोष्टीत रस वाटून ती वाचून संपवणे म्हणजे "वाचन" ). लहानपणी एखादी गोष्ट म्हणजे 'गोष्ट'च असते - 'कथा' वगैरे नसते. लहानपणी प्रत्येकजण हटकून 'गोष्टीची पुस्तकं' वाचत असतो तशी मी पण खूप वाचली आणि सुदैवाने पुढे इतकी छान छान पुस्तकं वाचायला मिळाली, की नकळत चालू लागलेल्या वाटेवर ती सावल्या देणारी झाडंच बनून गेली ..

भा. रा. भागवत असेच केव्हातरी फास्टर फेणेच्या मागून दबकत दबकत आले आणि अक्षरशः गारुड केले. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपला कोणीतरी हिरो असतो - खरा किंवा काल्पनिक - आणि बऱ्याचदा आपला हिरो काल्पनिक आहे हे मानायला मन तयारच नसते ! पाचवीत असताना पहिल्यांदा फास्टर फेणेचे पुस्तक नजरेला पडले. त्याआधी कधीतरी एका दादाने फा.फे. बद्दल पुरेशी उत्सुकता पेरून ठेवली होतीच. आईकडे हट्ट करून समोर दिसणाऱ्या सहा पुस्तकांपैकी कशीबशी दोन झोळीत पडून घेतली 'फास्टर फेणे डिटेक्टीव' आणि 'प्रतापगडावर 'फास्टर फेणे' . बास्स ! मला माझा हिरो मिळाला .... मग तो खरा आहे की काल्पनिक याच्याशी मला घेणे देणे नव्हते. तो खूप जवळचा वाटत होता. तो जे बोलत होता ते कुठेच पुस्तकी वाटत नव्हते. तो जे धावरे धाडस करत होता ते त्या वयातल्या कोणत्याही मुलाला मनापासून करावेसे वाटते तसलेच होते. आणि मुख्य म्हणजे माझं पुणं त्याची 'कर्मभूमी' होती. मला आठवतंय जसा जसा फास्टर फेणेच्या गोष्टी वाचत गेलो तसा तसा त्यात वर्णन केली गेलेली पुण्यातली ठिकाणं डोळ्यासमोर उभी राहू लागली. .. मग कसब्यात गेलो की फा. फे. च्या मामांचा वाडा अमुक एका ठिकाणी असेल असे चित्र रंगवू लागलो. रेसकोर्सपाशी गेलो की डोळे विद्याभवन शाळा शोधायला लागले, बंडगार्डनपाशी गेलो की फा. फे. ने पर्णकुटीपाशी वेड्याशी केलेला सामना दिसायला लागला ... जेव्हा मी पहिल्यांदा पाताळेश्वर पाहायला गेलो तेव्हा माझे डोळे मागची अंधारी गुहा आणि त्यातल्या चीनी हेरासाठी भिरभिरत होते .... एक ना दोन ..... आणि हे वेड पुण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही .... ट्रेनने खंडाळ्याचा घाट ओलांडताना 'नक्की कोणत्या बोगद्यापाशी फा. फे. ने ढाण्या वाघाला मालगाडीत अडकवले असेल' याचीसुद्धा मनाशी खूणगाठ बांधली होती मी ! 'डोळ्यांची निरांजने करून ओवाळणे' म्हणजे काय हे मला फा. फे ची पुस्तकं वाचत असतानाच्या भावना आठवल्या की कळते ( मला माहित आहे की मी लिहिलेले हे शब्द फार पुस्तकी किंवा नाटकी आहेत, पण या घडीला मला दुसरे शब्द आठवत नाहीयेत .. खरंच !).

आणि हा फास्टर फेणे जसा शब्दात आहे तसा तंतोतंत उभा केला तो राम वाईरकरांच्या अफलातून चित्रांनी. सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये फा.फे. हा एका काटकुळ्या sketches च्या स्वरुपात होता. जसजशी पुस्तकं येत गेली तसतसा तो अधिक सुस्पष्ट आणि ठाशीव होत गेला.... एकुणात काय तर फास्टर फेणेचा प्रभाव फार जबरदस्त होता... इतका, की त्याची बरीच वर्षे 'out of print' पुस्तके मी कॉलेज मध्ये असताना जेव्हा नव्याने प्रकाशित झाली , तेव्हा माझ्याकडे नसणारी उरलेली सगळी पुस्तकं घेऊन अक्खा २० पुस्तकांचा सेट पूर्ण केला !!

अर्थात 'फास्टर फेणे' चे गारुड हे भा.रा. भागवतांच्या झपाट-लेखणीचे आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मुख्यत्वेकरून मराठी मुलांसाठी लिहिलेला असला तरी त्यात हलके फुलके इंग्लिश शब्द चपखलपणे पेरलेले आहेत. त्यामुले आजही ही पुस्तकं कालबाह्य वाटत नाहीत. शिवाय सगळ्या गोष्टी अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या आहेत. या सगळ्यामुळे भा. रां. चे पुस्तक दिसले की वाचायला लागलो. त्यांची अनुवादित आणि रुपांतरीत पुस्तकं सुद्धा तितकीच मंत्रमुग्ध करणारी आहेत. आपण ती वाचतो तेव्हा ती मूळची मराठीत नाहीत यावर विश्वास बसत नाही. Alice in Wonderland चे 'नवलनगरीत जाई' हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण. जगातल्या तमाम बंडखोरांचा 'हिरो' असणारा शरवूडच्या जंगलातला Robin Hood अणि त्याचे यारदोस्त त्यांनी अश्या चटकदार मराठीत रंगवलेत की Robin Hood आपल्याच गावातला कोणीतरी वाटतो ("शिंग वाजता Robin करिता शरवूड जंगल भंगेल - गडी लोटतील रंगेल" अश्या ओळीनेच पुस्तक सुरु होते ते संपेपर्यंत खली ठेववत नहीं). सर्वात अविस्मरणीय रुपांतरीत पुस्तक म्हणजे Charles Dickens च्या The Christmas Carol चा मराठी अवतार - 'भटांच्या वाड्यातील भुतावळ'. मूळच्या पुस्तकातल्या Christmas ची यात दिवाळी होते. कंजूष चिटको शेठजी आणि नरकचतुर्दशीच्या आदल्या एका रात्रीत त्याला वठणीवर आणणारी धमाल भुते .... भा. रा. एका मराठमोळ्या खेड्याचे वातावरण असे काही उभे करतात की गोष्ट एकदम या मातीतली होऊन जाते ! हे पुस्तक मिळाले तर कधीही सोडू नका.

भा.रा.भागवतांनी अक्षरशः शेकड्याने पुस्तकं लिहिली आणि इंग्लिश मधून भाषांतरित, रुपांतरीत, अनुवादित केली. ज्यूल्स व्हर्न ची जवळपास २५ -३० , H G Wales ची काही, Arthur Conan Doyle चा Sherlock Holmes अशी कितीतरी. खऱ्या अर्थाने ते बालसाहित्यातले भीष्माचार्य होते. परदेशात बालसाहित्यालासुद्धा एक वलय असतं. तसं दुर्दैवाने आपल्याकडे नसल्यामुळे एवढे मोठे भा.रा. आज फारसे माहित असावेत असे वाटत नाही. नेटवर शोधल्यावर काही तुरळक forums वगळता फारसे हाती लागत नाही Harry Potter च्या चित्तथरारक कादंबऱ्या वाचताना प्रकर्षाने जाणवते की आज भा. रा. भागवत असायला पाहिजे होते. या अफलातून कादंबऱ्या तितक्याच ताकदीने मराठी मध्ये आणायला भा. रा. भागवत यांच्या इतका समर्थ (आणि मुख्य म्हणजे मुलांचे विश्व जाणून घेऊन लिहिणारा) दुसरा अनुवादक आहे असं वाटत नाही.

खरेतर भा.रा. भागवतांनी मोठ्यांसाठीचे साहित्यसुद्धा लिहिले. विज्ञानकथा लिहिल्या. 'हाजीबाबाच्या गोष्टी' सारखे इराणच्या सुल्तानशाहीच्या पार्श्वभूमीवरचे पुस्तक लिहिले. पेरू देशातली इनका संस्कृति नष्ट करणार्या पिझारो या Spanish आक्रमकावरचे 'पिझारोचे थैमान' लिहिले. भरपूर विनोदी कथा लिहिल्या. छगन नावाचे गमतीदार पात्रसुद्धा निर्माण केले (राम कोलारकर संपादित 'निवडक मराठी विनोद कथां'चे २० खंड प्रकाशित झालेत त्यातल्या जवळपास प्रत्येक खंडात भा.रा. भागवतांची एक ना एक कथा आहेच). एवढे असले तरी ते मनापासून रमले लहान मुलांमध्येच.

मुलांसाठी छान छान साहित्य सादर करावे यासाठी भा.रां.ची कायम धडपड चालायची. १९४० च्या दशकात सुमारास त्यांनी 'बालमित्र' नावाचे मासिक सुरु केले. मुलांनी केवळ जादूच्या गोष्टीमध्ये रमून न जाता चटपटीत,प्रसंगावधानी आणि आजच्या भाषेत 'dashing' बनावे अशी त्यांची खूप इच्छा असायची. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या बाजाच्या गोष्टी, वैज्ञानिक कुतूहल शमवणाऱ्या गोष्टी, साहसकथा, संस्कारक्षम कथा अशा अनेक प्रकारांनी अंक सजवला. त्यावेळच्या मोठ्या लेखकांकडून लिखाण करून घेतले. बऱ्याचदा स्वतः वेगवेगळ्या टोपणनावांनी एकाच अंकात गोष्टी, लेख लिहिले. परवडत नसूनही पदराला खार लावून , नाना खटपटी करत मासिक चालू ठेवले.(सुदैवाने अलीकडेच 'निवडक बालमित्र' नावाचे ७ भाग प्रकाशित झाले आहेत. ते पाहून हे अंक किती सुंदर असायचे याची कल्पना येते.) बाल - कुमार गटातल्या मुलांची नस त्यांना बरोब्बर सापडली होती.... त्यामुळेच तुडतुडीत फास्टर फेणे, पुस्तकातला किडा असूनही वेळप्रसंगी विजू-मोना या छोट्या दोस्तांना घेऊन साहसात उडी घेणारा बिपीन बुकलवार, थापाड्या तरीही निरागस असणारा नंदू नवाथे अशी वेगवेगळ्या जातकुळीची (आणि तरीही सारखीच वाचनीय असणारी) पात्रे कायमच जवळची वाटत राहतात. भा.रा.भागवतांच्या पुस्तकांमधे साहस हे समान सूत्र असले तरी पार्श्वभूमी वेगळी असते.त्यामुळे वाचताना दरवेळेस आपण वेगळ्या विश्वात जातो. मग 'भुताळी जहाज' मध्ये आपण एका गूढ धुक्यात गुंतत जातो तर 'ब्रह्मदेशातला खजिना' मध्ये १८५० च्या आसपास च्या काळातली अनोखी शोधकथा अनुभवता येते. 'जयदीपची जंगलयात्रा' मध्ये जयदीप बरोबरच आपणसुद्धा ब्राझीलच्या जंगलात हरवतो तर 'तैमूरलंगचा भाला' मध्ये १९४२ च्या लढ्यामध्ये भगतराम या क्रांतिकारकासोबत लता आणि किरण या भावंडांनी बेभान होऊन केलेलं साहस अनुभवतो.... भा.रा.भागवतांची पुस्तके जितकी वाचावी तितकी कमीच आहेत !!! प्रत्येकाबद्दल लिहायला लागलो तर वेळ पुरायचा नाही. सुदैवाने माझ्या संग्रहात त्यांची पन्नासेक पुस्तके आहेत . अजूनही प्रदर्शनात त्यांचे पुस्तक दिसले की मी ते घेतोच. अगदी अलीकडे मला एका प्रदर्शनात त्यांची 'काशाची काशीयात्रा' नावाचे ८-९ वर्षापर्यंतच्या मुलांनी वाचावे असे पुस्तक मिळाले तेही मी घेतले Happy

३१ मे १९१० ला इंदोरला भा.रा.भागवतांचा जन्म झाला. त्यांच्या लिखाणाचा काळ लक्षात घेतला तर त्यांचे बरेचसे लिखाण १९६० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशी - साठी नंतर झालेलं आहे. एवढे असूनही ते अगदी ताजे आणि चटकदार आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख मला आठवत नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही. माझ्यासाठी ते चिरतरुण असणारे आणि आजसुद्धा पुस्तकांच्या पानापानातून मिश्किलपणे भेटत राहणारे जानी दोस्त आहेत.

मी काही पुस्तकांची नावे देतोय जी मी केव्हाची शोधतोय. सध्या यातली बरीचशी आउट ऑफ प्रिंट आहेत. ही ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्या कोणाच्या पुस्तकाच्या कपाटात यातले एखादे पुस्तक असेल तर मला नक्की कळवा
१) भाराभर गवत - भा.रां.चे आत्मचरित्र
२) दीपमाळेचे रहस्य
३) जयदीपची जंगलयात्रा
४) समुद्र सैतान

ता.क. : इकडे तिकडे भटकताना आजूबाजूच्या लोकांच्या सतराशे साठ प्रकारच्या T - Shirts वर नेहमी परदेशी characters (Dennis, मिकी - डोनाल्ड इत्यादी ) आणि व्यक्तिमत्वं (Che Guevara, Kurt Cobain इत्यादी ) दिसत असतात. म्हटले - एवढे सगळेजण T -Shirt वर झळकत आहेत मग आपला मराठमोळा फास्टर फेणे का नाही !! त्यामुळे मी लवकरच फास्टर फेणेचे चित्र असणारा T -Shirt प्रिंट करून घेणारे - Sweat Shirt प्रिंट करून घेतो तसा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे...........दामले कुठल्याकुठेच नेऊन सोडलंत!
खरं आहे भा. रां. नी "भारा"वलेलं बालपण होतं खरं +१००
टॉम सॉयर आणि हकलबरी फिन ची मराठी भाषांतरेही "भारां" चीच का?
आणि हॅन्स अ‍ॅन्डरसनही मराठीत वाचल्याचं पक्कं स्मरतंय!

मस्तं लेख!
फुरसुंगीचा फास्टर फेणे, त्याचे ट्टॉक सहीच.
ब्रह्मदेशाचा खजिना वाचलेले माझ्याशिवाय माझ्या परिचयात कुणीच नव्हते.
आता इतक्या सगळ्यांनी वाचलेय बघून मजा वाटतेय.
ज्यूल वर्नच्याकादंबर्‍यांची नावेही भारी असायची.

फा.फे माझा अगदी हिरो होता. माझ्याकडची त्याची पुस्तकं जीर्ण अवस्थेत फार सांभाळून ठेवली होती. "वाक्यात रचना करा" च्या प्रत्येक वाक्यात फा.फे असायचा.

एकदा भा.रा.भागवत आमच्या इमारतीत कोणाकडेतरी येणार होते. संध्याकाळी उशीरापर्यंत मी त्यांची एका गाडीमागे लपून (बोलायची हिंमत नव्हती) वाट बघत होते.
त्यांना बघून जरा निराशाच झाली. कारण आजोबा किड्कीडीत आणि तुड्तुडीत तर नव्हतेच पण चौकडीचा शर्ट पण त्यांनी घातला नव्हता Proud

फारच छान लेख. माझेही बालपण "भारा"वलेले होते. लीलाबाइन्चे आत्मचरित्र वाचायचे आहे. कसे मिळेल?

Still practising the font. Need more practice. The childhood of kids in our era was made wholesome by authors like Bha. Ra. Bhagwat, Sane Guruji, Pandit Mahadev Shastri Joshi etc.
It was such a rich experience to read them! It was far more enriching to the psyche than today's materialism-infused atmosphere.

मानुषी : टॉम सॉयर गन्गाधर गाड्गीळ यान्नी मराठीत आण्ले होते 'धाड्सी चन्दू' नावाने, 'भारां'नी आणले असेल तर कल्पना नाही

.अदिती : आजोबा किड्कीडीत आणि तुड्तुडीत तर नव्हतेच पण चौकडीचा शर्ट पण त्यांनी घातला नव्हता >>>> फिदीफिदी

दाद : पुण्यात डेक्कन वर 'उत्कर्श' मधे सगळी पुस्तके मिळतात

वाह...मस्त लेख. अगदी आठवणींचा चोरकप्पा उघडलात.

मी फक्त ३ पुस्तके वाचली भारांची. पण पारायणे १००-१०० वेळा तरी नक्कीच केली असतील.

फास्टर फेणेची काश्मिरी करामत
गुलमर्गचे गुढ आणि फास्टर फेणे
फुरसुंगीचा फास्टर फेणे.

गमतीचा भाग म्हणजे मी आता फुरसुंगीतच रहातो आणि हा प्रतिसादही फुरसुंगीतूनच देत आहे!!!

कसला मस्तं लेख आहे! मझा आया!

दुकानात उपलब्ध असलेलं प्रत्येक फास्टर फेणे अ‍ॅड्वेंचर संग्रही असावं एवढा हट्ट पूर्ण केल्याबद्दल आई-वडलांना बर्‍याच गोष्टींसाठी माफ केल्याचं आठवतं. Proud

'उत्तम टण्णू' हे पात्र यातलंच का? फार वर्षं लोटली.

होय. टॉसॉ आणि हफि या माझ्या पुस्तकांची भाषांतरं भागवतांनी केली आहेत.
शिवाय R.L. Stevenson च्या Black Arrow चं 'काळा बाण' नावाने केलेलं भाषांतर मस्त होतं.

Tshirt zale ka print?

faafe mazaasuddha fav aani bhaaraa - kaay bolloo, maaza baalpan samruddha kela tyaannee

लहानपणी फाफेची पुस्तकं सगळ्यात फेवरिट होती माझी! फाफेपेक्षा त्याचं बन्या हे नाव जास्त आवडायचं!
गंमत म्हणजे तेव्हा लहानपणी माझ्यासाठी पुणे म्हणजे गाव, डेक्कन, स्वारगेट इतकंच होतं. फुरसुंगी आणि हडपसर, मांजरी वगैरे कधी न बघितलेली रम्य गावं वाटायची तेव्हा. पुढे मोठेपणी कळलं की हा एरिया आता आयटी पार्क्स, रेसिडेन्सियल प्रोजेक्ट्स यांनी टेकओव्हर केलाय..तेव्हा वाईटही वाटलं होतं!
आता आठवणाऱ्या फाफेच्या गोष्टी म्हणजे पुण्याच्या पुराबद्दलची, सायकल रेसची, पुण्यातल्या ॲडमिशनची, कॉफी पाजून चिनी हेर पकडल्याची वगैरे!

मस्त लेख.. खूपच आवडला.. फा.फेने काय गारूड केलं होत लहानपणी मनावर.. लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल झंप्या दामले तुम्हाला मनापासून धन्यवाद Happy

काय आठवणी जाग्या केल्यात राव......

मला फा.फे. फार काहि वाचायला नाहि मिळाला. बिपीन बुकलवारने मात्र एकाच पुस्तकात वेड लावलं. 'अक्काचे अजब ईच्छासत्र' हे आजहि ऑल टाईम फेवरेट आहे.

भा. रां. नी बहुतेक लिटल हाउस सिरिजचाही अनुवाद केला आहे.

भा.रा. भागवतांची फार आठवण आली म्हणून सर्च दिला आणि चिरतरुण आजोबा गवसले Happy

मी सुद्धा भारावलेल्यांच्या कंपूत ( कोण नसेल म्हणा ? Happy ) त्यांच्या किशोर मासिकातल्या गोष्टीही अफलातून असायच्या !

मस्त लिहिलंय. माझे आवडते लेखक. त्यांची लहान मुलांसाठी असलेली सगळी पुस्तकं वाचलेली आहेत आणि संग्रही पण आहेत. भुताळी जहाज, ब्रह्मदेशचा खजिना, खजिन्याचा शोध, सूर्यावर स्वारी, मुक्काम शेंडेनक्शत्र (हे मात्र प्रिंट उपलब्ध असेल तर हवं आहे), चंद्रावर स्वारी, ल्यूथर बरबँक, शिंगी आणि अशी बरीच. फास्टर फेणे आणि मंडळी तर आहेतच. आयुष्यातला रम्य खजिना आहे तो.

Pages