काकडीचे सांदणं

Submitted by सुलेखा on 26 August, 2013 - 10:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

माझ्या लहानपणी आम्ही गुजरात मधे रहात असताना माझी आई हे सांदणं नेहमी करीत असे.पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या हिरव्या आणि पांढर्‍या सालीच्या दुधीभोपळ्याच्या आकाराच्या काकड्या भरपूर प्रमाणात व स्वस्त मिळायच्या या काकडीला "बालम काकडी" म्हणतात.काकडी चिरल्यावर आतुन पांढरी दिसणारी काकडी नेहमीच्या काकडी सारखीच चवीला पण फोड खाताना करकरीत नसुन मऊ असते.तसेच चिरल्यावर आतुन पिवळी दिसणारी काकडी चवीला मस्त आंबट गोड लागते.
.ही काकडी किसुन त्याचे थालीपिठ व धिरडी करतात तसेच फोडी चिरुन मीठ-जिरे-मिरेपुड घालुन लिंबु पिळुन खायला छान लागत असे.तसेच .तूप-जिर्‍याची फोडणी,वरुन दाण्याचे कुट घालुन केलेली उपवासाची भाजी आम्हा सगळ्यांच्याच आवडीची..मिरचीचे मोठाले तुकडे व धणे-जिरेपुड् घालुन केलेली काहीशी रसदार भाजी वेगळीच लागायची.यात गरम मसाला अजिबात घालायचा नाही.ही पथ्याचीअगदी साधी भाजी रुचकर लागायची.
हे सर्व जिन्नस एकत्र कालवुन एका डब्याला तेलाचा हात लावुन कूकरमधे शिटी न लावता वाफवायचे .थंड झाल्यावर वड्या कापायच्या.वरुन.माझी आई या काकडीचे गोड व तिखट सांदण करायची. त्यासाठी मोजकेच साहित्य अंदाजपंचे घ्यायचे आहे.
काकडी सोलुन त्यातील,बियांचा भाग काढुन ,किसुन घ्यावी.या काकडीच्या किसाला बरेच पाणीसुटते kakadi che sandan.. 1111111111111.JPG

गोड सांदण साठीचे साहित्यः-
काकडीचा किस,किसलेला गूळ्,खवलेला ओला नारळ,वेलची पूड्,तूप

क्रमवार पाककृती: 

किसलेल्या काकडीत मावेल इतका तांदळाचा रवा घालुन भिजवावे..
आता त्यात किसलेला गूळ घालुन मिश्रण कालवावे.आता मिश्रण पातळ झालेले दिसेल.अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवावे.त्यातील रवा मुरेल.व मिश्रण सरसरीत दिसेल[जर मिश्रण घट्ट् झालेले दिसले तर त्यात थोडे पाणी घालावे..त्यात खवलेले ओले खोबरे आणि थोडी वेलची पूड घालावी.आता एका डब्याला तूपाचा हात लावुन त्यात हे मिश्रण कूकरमधे ठेवुन २ शिट्या होईपर्यंत वाफवावे.डब्यातील मिश्रण थंड झाल्यावर वड्या कापाव्या.खायला देताना त्यावर थोडेसे तूप घालावे.
आता तिखट सांदण,
साहित्यः--काकडीचा किस .तांदुळाचा रवा किंवा जाड रवा किंवा मक्याचे पिठ
हळद चवीप्रमाणे ,मीठ,ओवा,हिरवी मिरची-आले बारीक वाटलरस,,लिंबाचा रस,.चिमुटभर खाण्याचा सोडा.
लागेल तसे थोडेसे पाणी.
हे सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यायचे मिश्रण सरसरीत असावे.आता एका डब्याला तेलाचा हात लावुन त्यात हे मिश्रण ओतुन कूकर मधे १० ते १२ मिनिटे वाफवावे.थंड झाल्यावर मिश्रणाच्या वड्या कापाव्या. हिंग-मोहोरी--जिरे घातलेली खमंग फोडणी घालायची.

अधिक टिपा: 

हे दोन्ही प्रकार इडलीपात्रात ही करता येतात.

माहितीचा स्रोत: 
माझी आई.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. सुलेखाताई, हे सांदण धिरड्यासारखं असतं असं वाटलं होतं. बहुतेक रुचिर किंवा पाकसिद्धी मधे तसे दिले असावे. म्हणजे काकडीचा किस, गुळ, तां पिठी, नारळ एकत्र करून केलेले धिरडे बहुतेक. हे माहीत असल्यासही कळवाल का प्लीज?

सुलेखा यांनी दिलेल्या साहित्याचे दोन्ही प्रकार करतात. धिरडी आणि सांदण. कोकणात केकसारखापण प्रकार करतात ह्याच साहित्याने एका बाजूने भाजून त्याला बहुतेक 'धोंडस' असे नाव आहे, तिखट, गोड दोन्ही प्रकारे करतात.

छान प्रकार.
गुजराथमधेही या काकड्या मिळतात हे माहीत नव्हतं.
कोकणात शक्यतो गोडच धोंडस करतात. रवा पण जाडाच असतो.

दिनेशदा, तिथे भिलडे /भिल्ल टोपल्यातुन किंवा गाठोडे बांधुन बालम काकड्या.,लहान लहान हिरवी व पांढरी कारली.हिरव्या मिरच्या,करटुले/कंकोडे,महुआ ची फळे व फुले ,चणी-मणी व थोडी मोठी आंबट्गोड बोरं आमच्या कॉलनीत विकायला येत असत.लहान काकडी १० पैसे तर मोठी काकडी ५० पैसे..ते लोक पांढर्‍या मक्याचीच भाकरी खायचे त्यामुळे गव्हाच्या पिठाऐवजी हे जिन्नस द्यायचे पैसे नको म्हणायचे..तिथे पांढरी पिकाच पिकत असे.पिवळ्या मकी च्या भाकरी पेक्षा पांढरी मका जास्त गोड असते तेव्हा अमेरीकन [पिवळा] स्वीट-कॉर्न "आम्हाला" माहितच नव्हता.अमेरिकन लाल गहू मात्र रेशनिंगच्या काळात माहिती झाला.आमच्याकडे मकीचे पिठ बहुतेक असायचेच त्यामुळे बेसन रव्या ऐवजी बर्‍याच पदार्थात आई वापरत असे.तिथे फणस भाजीचाच मिळायचा त्यामुळे गरे/पिकलेला फणस विकत मिळायचे नाहीत.क्वचित कुणाच्या परसदारातल्या बागेत लावलेल्या फणसाचे गरे "खायला मात्र" मिळायचे.

ह्याच साहित्याने एका बाजूने भाजून त्याला बहुतेक 'धोंडस' असे नाव आहे, >>> बरोबर तेच आहे...आणि अलिबाग मधे माझ्या गावी त्याला रवळी म्हणतात...ती दिवाळीच्या पहिल्या दिवशी खासकरुन केली जाते