विषय क्र. २ - जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे

Submitted by kanksha on 25 August, 2013 - 14:19

१३ ऑगस्ट १९९३ - स्टॉकहोममधील नगर सभागृह एका देखण्या समारंभात रंगलं होतं. गेली कित्येक वर्षे नोबेल पुरस्कार समारंभाचं साक्षीदार असलेलं हे सभागृह्. सी. व्ही. रमणांनंतर ६३ वर्षांनी एका भारतीयाचा या सभागृहात स्वीडनच्या राजाच्या हस्ते सन्मान होत होता. ही भारतीय व्यक्ती म्हणजे जलतज्ज्ञ डॉ. माधव आत्माराम चितळे. चाळीसगावसारख्या एका छोट्याशा गावात डॉ. चितळे यांचा जन्म झाला. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हीलची पदवी प्राप्त करून चितळे यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा इतर अनेकांसारखाच. मुंबईत नेहमीप्रमाणे आयुष्य सुरळीतपणे सुरु होतं आणि ११ जुलैला अचानक पुण्यात पानशेत धरण फुटल्याची बातमी आली. पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था झाली नाही तर संपूर्ण पुणं रिकामं करण्याची वेळ आली असती. अशा परिस्थितीत मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून चितळे यांची नेमणूक झाली आणि त्यांनी आपलं कौशल्य दाखवून दिलं. सरकारी लाल फितीत न अडकता दिवस-रात्र काम करून भराभर निर्णय घेत त्यांनी पुण्याला पाणीपुरवठा करणारी नवी यंत्रणा कार्यान्वित केली. आणि मग हा प्रवास असाच सुरु राहिला.
वेळेत काम तडीस लावण्याचं चितळे यांचं कौशल्य बघून अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगरच्या मुळा प्रकल्पावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नदीपात्रातील गाळाच्या आणि वाळूच्या थरांमुळे धरणाचा पायाच पक्का करणे अशक्य होते. फ्रेंच तज्ज्ञांच्या मदतीनं राबवलेला वाळूच्या थरांमध्ये सिमेंटचे मिश्रण भरण्याचा ग्राऊटिंगचा प्रयोगही अयशस्वी ठरला होता. अशा परिस्थितीत २८ वर्षाच्या चितळे यांनी स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यायचं ठरवलं. भूविज्ञान विषयाचे अभ्यासक प्रा. गुप्ते आणि आपले काही सहकारी यांना बरोबर घेऊन नदीच्या उगमापासून धरणापर्यंत ९० किमी पायी जाऊन वाटेतल्या भूस्तर रचनांचा त्यांनी अभ्यास केला आणि सुदृढ धरण उभं केलं. पुढे कोलकात्याला झालेल्या राष्ट्रीय भूविज्ञान परिषदेत या कामाची तज्ज्ञांकडून प्रशंसा झाली. तत्कालीन केंद्रीय मंत्री के. एल्. राव हे देखील दिल्लीहून येऊन ह्या धरणाचं काम बघून गेले. साहजिकच या कामाची पावती म्हणून वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी अधीक्षक अभियंता म्हणून त्यांची नाशिकला बदली झाली. तरीदेखील मुळा धरणाचं काम त्यांच्याकडे ठेवण्यात आल्याने शनिवार - रविवार ते नगरला येत. आठवड्याचे सातही दिवस काम करणारा असा सरकारी अधिकारी हा दुर्मिळच.
नाशिकला आल्यावर जेमतेम सहा महिन्यांतच चितळे यांची मुंबईला भातसा प्रकल्पावर नेमणूक झाली. पुणे, नगरनंतर आता मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्याची जबाबदारी चितळे यांनी उचलली. मुंबईत मंत्रालयात कार्यालय दिलं गेलं असतानाही धरणाच्या प्रत्यक्ष जागेजवळ कार्यालय असावं म्हणून शहापूरमधील वनवासी भागातील एका जुन्या बंगल्यात त्यांनी कार्यालय स्थलांतरित केलं. इतकंच नव्हे तर ६ फूट उंचीच्या गवतानं वेढलेल्या त्या बंगल्याच्या उरलेल्या भागातच त्यांनी पत्नी आणि ३ लहान मुलींसह रहायला सुरुवात केली. मोरी, अंगण इतकंच नव्हे तर टेबलाच्या खणात सापडलेला नाग, पाली, बेडूक, डास यांच्या सानिध्यात राहून प्रकल्पाचं काम त्यांनी आपल्या लौकिकानुसार वेळेत मार्गी लावलं.
भातसा प्रकल्पाची गाडी रूळावर आली आहे असं वाटत असतानाच कोयनेचा भूकंप झाला आणि कोयनेची वसाहत भुईसपाट झाली. साहजिकच बहुतेक अधिकारी मंडळी पुण्याला स्थलांतरित झाली. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तडकाफडकी चितळे यांची बदली कोयनेच्या तिस-या टप्प्यातील कामासाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली. दोन खोल्यांच्या एका तात्पुरत्या डागडुजी केलेल्या घरात चितळे यांचा संसार सुरु झाला. आधी कामगार, कर्मचारी आणि कार्यकारी अभियंते यांच्यासाठी भूकंपप्रवण नवी घरे बांधून झाल्यानंतरच चितळे यांनी स्वतःसाठीचा अधीक्षक अभियंत्याचा बंगला बांधून घेतला. तोपर्यंत मोठे साहेबच कुटुंबासमवेत आपल्यात राहायला आले आहेत हे पाहून लोकांच्या मनातील भूकंपामुळे निर्माण झालेली असुरक्षितता कमी झाली आणि वसाहत पुन्हा बहरू लागली. चितळे यांच्या प्रोत्साहनाने तिथे आठवडी बाजार सुरु झाला. पुढे बालकमंदिर, शाळा, टपालघर अशाही सुविधा उपलब्ध झाल्या. कामगारांच्या मुलांबरोबरच चितळे यांच्या मुली देखील आपली सतरंजी घेऊन याच शाळेत जात. चितळे व इतर अभियंत्यांच्या पत्नी, मुले यांच्या पुढाकारातून गणेशोत्सव, महिला मंडळ अशा अनेक उपक्रमांमधून वसाहतीचा सांस्कृतिक विकासही झाला. त्यामुळेच चितळे यांच्या निरोपसमारंभात 'विद्यमान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतील समता वास्तवात पहायची असेल तर आमच्या वसाहतीत यावे', असे उद्गार तेथील कामगार नेत्यांनी काढले.
याच प्रकल्पांतर्गत वासिष्ठी नदीखालून बोगदा काढून काम चालू होते. एका मध्यरात्री मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. पुराचे पाणी बोगद्यात शिरल्यामुळे बोगद्यात काम करणारे रात्रपाळीचे कामगार आत अडकले. हे कळताच चितळे व त्यांचे सहकारी अभियंता श्री. सावंत पुराच्या पाण्यात बुडालेल्या पुलावरून जीप घेऊन निघाले. पाण्यामुळे जीप बंद पडल्यावर अंधारात धावत बोगद्यापर्यंत पोहोचले. बोगद्याच्या तोंडाशी ठेवलेल्या होड्या पाण्याच्या रेट्यामुळे उलट्या झाल्या होत्या. सावंतांनी पाण्यात उडी मारून त्या होड्या सरळ केल्या आणि हातानं वल्हवत बोगद्यात जाऊन त्यांनी एक एक करत सातही कामगारांना सुखरूप बाहेर आणलं. सावंतांच्या या शौर्याची माहिती चितळे यांनी शासनाला सविस्तर कळवली. सावंतांना या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींकडून शौर्यपदक मिळालं. 'गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः' असं सुभाषितकारांनी म्हटलं असलं तरीही स्वतः गुणी असणा-या चितळे यांची गुणग्राहकता आणि सहका-यांबद्दलची कळकळ या प्रसंगातून दिसून येते.
त्यानंतर चितळे यांची बदली झाली ती मुंबई येथे. आजवर नेहमी प्रकल्पस्थानी निवासस्थान असल्यामुळे रात्रंदिवस कार्यरत असणारे वडीलच चितळे यांच्या मुलींना माहित होते. मुंबईत पहिले २-३ दिवस ६.३० वाजता घरी परतणारे वडील बघून तुम्हाला इथे काम नाही की काय असा प्रश्न मुलींनी विचारला. यावरुन त्यांचं स्वतःला कामात गुंतवून घेणं घरच्यांच्या किती अंगवळणी पडलं होतं ते दिसून येतं.
मुंबईत आल्यानंतर काही दिवसांनी प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं. १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. ९वी, ७वी, ४थी अशा इयत्तांमधील मुली आणि अडीच वर्षांचा मुलगा यांना एकटीने सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चितळे यांना प्रिन्स्टनला जाण्यास प्रोत्साहन देण्याचा त्यांच्या पत्नीचा निर्णय १९७४ साली निश्चितच स्पृहणीय होता. घरात निरोप द्यायला सारी नातेवाईक मंडळी जमलेली असतानादेखील विमानतळावर जाण्याच्या एक तास आधीपर्यंत चितळे दुष्काळावरच्या अहवालावर काम करत होते. प्रिन्स्टनमध्येही प्राध्यापकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक अभ्यासक्रम उत्तमरीतीने पार पाडून त्यांनी 'सर्वोत्तम पर्विन फेलो' हा सन्मान पटकावला. या अभ्यासक्रमामुळे जागतिक व्यवहार, प्रशासन, पर्यावरण, वित्तीय व्यवस्थापन अशा अनेक विषयांमध्ये त्यांना रुची निर्माण झाली, जी पुढे सतत अभ्यासातून विकसित होत राहिली.
या सर्व पार्श्वभूमीवर सेवाज्येष्ठतेचे तत्त्व डावलून केवळ गुणवत्ता या निकषावर त्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे साहजिकच अनेक खात्यांतर्गत विरोधकही निर्माण झाले. पुढे आणीबाणीच्या काळात चितळे यांचे वडील, भाऊ यांना अटक झाली. सर्वत्र भीतिचे वातावरण होते. परंतु, सरकारी नोकरीत असूनही चितळ विचलीत झाले नाहीत. तत्कालीन पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील यांच्याबरोबर कोयनेहून पुणेमार्गे मुंबईला परत येताना, तुमचं पुण्यातील काम होईपर्यंत मी येरवड्याला वडिलांना भेटून येतो, हे सांगताना चितळे कचरले नाहीत. वसंतदादांनीदेखील फक्त मुख़्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी तुम्हाला सावध रहायला सांगितलं आहे एवढा इशारा दिला. त्याकाळचे राजकारणी देखील वैयक्तिक राजकीय मतांपेक्षा कर्तृत्वाला जास्त महत्त्व देत हेही यातून दिसून येते.
याच कर्तबगारीमुळे काही दिवसांत चितळे यांची सचिव पदावर नियुक्ती झाली. इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असणा-या तरुण मुलीच्या आकस्मिक निधनाचं दुःख पचवून जवळपास ३ वर्षं सचिवपदावरही त्यांनी तितक्याच झपाट्यानं काम केलं. परंतु, सरकारी नोकरीतील पदोन्नतीच्या नियमांसंदर्भातील केस कोर्टात सुरुच होती. मोठ्या मुलीचं लग्न जेमतेम एक महिन्यावर आलं असताना त्यांना सचिवपदावरील नियुक्ती रद्द झाल्याचे आदेश मिळाले. चार महिन्यांची रजा घेऊन, मुलीचं लग्न पार पाडून त्यांनी पुढ़ील योजना आखण्यास सुरुवात केली. सुदैवाने केंद्रातील नदीखोरे आयुक्त हे महाराष्ट्रातील सचिवाच्याच दर्जाचे पद रिक्त असल्याची माहिती त्यांना मिळाली. रीतसर अर्ज करून निवडप्रक्रियेतून त्यांची या पदासाठी निवड झाली. ज्या पाटबंधारे खात्यासाठी जीवाचं रान केलं, त्या खात्यातील सहका-यांचा निरोप न घेताच चितळे यांना दिल्लीला रवाना व्हावे लागले.
दिल्लीतही चितळे यांच्या कर्तृत्वाचा वेल बहरत राहिला. केंद्रीय जल आयोगाचे सदस्य बनण्यापूर्वीच मुलाखतीतून त्यांची जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मुलाखतीला आलेल्या २० अधिका-यांमध्ये महाराष्ट्रातील चितळे यांच्या पदोन्नतीवर आक्षेप घेणारे ३ ज्येष्ठ अधिकारीही होते. खरंतर इतर १९ जण हे ज्येष्ठता यादीत चितळे यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर होते. तरीदेखील मुलाखतीत चितळे यांची निवड झाली, जी त्यांनी पुढे आपल्या कामाने सार्थ करून दाखवली. ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करून चितळे यांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे वाढत वाढत भारतभरात १२०० ठिकाणी साजरा होऊ लागला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९८८ साली शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठं जल प्रदर्शन त्यांनी दिल्लीत भरवलं. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या राजीव गांधींनी प्रभावित होऊन राहूल गांधींना हे प्रदर्शन पाहण्यासाठी पाठविले होते.
दिल्ली काबीज केल्यानंतर चितळे यांनी झेप घेतली ती आंतरराष्ट्रीय विश्वात. १९९२ साली स्टॉकहोमच्या जल महोत्सवात निमंत्रित वक्ते म्हणून त्यांना बोलावण्यात आलं. गंगा शुद्धीकरण प्रकल्पावरील त्यांचं अभ्यासपूर्ण विवेचन सर्वत्र गाजलं. त्यावेळी पुढ्ल्या वर्षी याच सोहळ्यात आपल्याला याहूनही अधिक सन्मानाने सहभागी होण्याची संधी मिळणार आहे याची चितळे यांना कल्पनाही नव्हती. ऑगस्ट १९९२ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चितळे यांनी महाराष्ट्रात परतण्याची तयारी सुरु केली होती. त्याचदरम्यान इंग्लंडमधील सिंचनतज्ज्ञ जॉन हेनेसी यांनी चितळे यांना आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाचे सरकार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारण्याविषयी विचारणा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांपैकी दिल्लीत मुख्यालय असणारी ही बहुदा एकमेव संस्था. पं. नेहरूंनी त्यांच्या काळात दूरदृष्टीने या संस्थेला दिल्लीत कार्यालय बांधून दिले होते. ही जबाबदारी स्वीकारून १ जानेवारी १९९३ रोजी चितळे यांचा ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश झाला.
१९९३ सालच्या तिस-या स्टॉकहोम वॉटर प्राईज या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणा-या पुरस्कारासाठी इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी चितळे यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळचे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. वसंत गोवारीकर यांनी त्यांच्या कामाचे प्रमाणपत्र दिले, आणि या पुरस्कारासाठी चितळे यांची निवड झाली. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी काळा सूट व बो/टाय परिधान करावा लागेल असे कळल्यानंतर मी भारतीय असल्याकारणाने बंद गळ्याचा कोट हा भारतीय परिवेश परिधान करू इच्छितो, असे त्यांनी पुरस्कार समितीला कळवले. त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळे स्वीडनच्या राजानेही या मुद्दयाचा विचार केला आणि येथून पुढे 'स्वीडनचा काळा परिवेश अथवा त्या देशाचा राष्ट्रीय परिवेश' असा बदल नियमावलीत केला. ७ ते १३ ऑगस्ट १९९३ या जलमहोत्सवाच्या काळात स्वीडनमधील अनेक वृत्तपत्रे व जनमानसात या भारतीय जलतज्ज्ञाचे नाव इतके गुंजत होते की स्वीडनमधील भारतीय राजदूताने या अनुभवांवर 'स्टॉकहोममधील भारत सप्ताह' या शीर्षकाचा लेख दिल्लीतील वृत्तपत्रासाठी पाठविला.
यानंतर मग जपान, भूतान, इंग्लंड, इटली, फ्रान्स, इस्राएल इत्यादी असंख्य ठिकाणी जल परिषदांमधून चितळे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सरकार्यवाहपदी नेमणूक झाल्यानंतरच्या पहिल्याच परिषदेत विदेशी अनुवादकांऐवजी भारतीय अनुवादक नेमले. याचाच पुढचा टप्पा होता तो आयोगाला ख-या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देणे. स्थापनेपासून ४० वर्षे या आयोगाचा अध्यक्ष हा युरोपीय होता. चितळे यांनी सरकार्यवाहपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा विसंवाद दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. परिणामी, सप्टेंबर १९९३ साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मलेशियाचे शहारिझैला निवडून आले आणि आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष ठरले. पाच वर्षे ही धुरा समर्थपणे सांभाळल्यानंतर मात्र आता निवृत्त होऊन सामाजिक कामात झोकून देण्याचा निर्णय चितळे यांनी घेतला.
अनेक वर्षे दिल्ली - मुंबईसारख्या महानगरांमध्ये वास्तव्य केल्यानंतरही निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे स्थायिक होण्याचा निर्णय चितळे यांनी घेतला. जलक्षेत्रातील सामाजिक कार्याची मराठवाड्यात अधिक गरज आहे, असे त्यांचे मत होते. पण आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मात्र त्यांना मुक्त करण्यास राजी नव्हते. जागतिक जलसहभागिता या नव्याने सुरु झालेल्या संस्थेच्या स्टॉकहोम येथील मुख्यालयात सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची विनंती चितळे यांनी नम्रपणे नाकारली. पुढे याच संघटनेच्या दक्षिण आशिया विभागाच्या बैठकीकरिता तरी कोलंबोला या, अशी त्यांना गळ घालण्यात आली. आणि या बैठकीत दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्षपद चितळे यांनी स्वीकारावे म्हणून या विभागाचे कार्यालय औरंगाबादच्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी)हलविण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला. हीच कथा महाराष्ट् जलसिंचन आयोगाच्या बाबतही घडली. त्यामुळे सामाजिक कामांबरोबरच या जबाबदा-याही त्यांना रूढार्थानं निवृत्त झाल्यानंतरही स्वीकाराव्या लागल्या. पुढे मुंबईतल्या पुराच्या वेळी अहवाल तयार करण्याची जबाबदारी सरकारने त्यांच्यावर सोपवली होती. आजही सिंचन सहयोग, जलसंस्कृती मंडळ, ऊर्जा सहयोग, सरोवर संवर्धिनी अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य वयाच्या ८० व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने सुरु आहे. आजवर दोन विद्यापीठांकडून डॉक्टरेट, एका विद्यापीठाकडून डी. लिट्., वसुंधरा सन्मान यांनी चितळे सन्मानित झाले आहेत.
या सर्वात त्यांना साथ दिली ती त्यांच्या पत्नीने. स्वतः उत्तम खेळाडू, संगीत विशारद, सुवर्णपदकविजेती असूनही त्यांनी पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला. शिवाय चितळे यांनीही घरातील जबाबदा-या देखील तितक्याच निष्ठेने सांभाळल्या. जेवताना मुलांना विविध विषयांवरील माहिती देणे, मुलांना चांगल्या कार्यक्रमांना घेऊन जाणे, मुलांच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून त्यांच्या सम्पर्कात राहणे या गोष्टी चितळे दांपत्यानं आवर्जून केल्या. प्रिन्स्टनला असतानादेखील डॉ. चितळे दर आठवड्याला ५-६ पानी पत्र लिहून तेथील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक्रम यांची माहिती घरच्यांना कळवत. साहजिकच आज त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मुलगा हर्षवर्धन तर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कमी वयात जबाबदारीची पदे सांभाळतो आहे.
या सगळ्याबरोबरच जपलेल्या वाचन, मननाच्या छंदामुळे आज डॉ. चितळे यांचा पाण्याबरोबरच इतरही अनेक क्षेत्रांचा व्यासंग आहे. छोट्या मुलांच्या कार्यक्रमात गोष्टी सांगणारे, अष्टपैलू विद्यार्थ्यांच्या संमेलनात त्यांना आपल्या अनुभवांमधून हसतखेळत योग्य दिशा देणारे, गणितज्ज्ञांच्या संमेलनात गणिताचं समाजातील स्थान विद्वत्तापूर्णरीत्या विशद करणारे, मंदिरात सलग ८८ महिने संपूर्ण वाल्मिकी रामायणावर प्रवचन देणारे, सिंचनाबरोबरच राष्ट्रीय सौर कालगणनेचा प्रसार करणारे, आणि वय माहित असलं तरी विश्वास बसणार नाही इतक्या उत्साहानं समाजात रमणारे विनयशील डॉ. चितळे यांना पाहिलं की वाटतं, खरंच सात जन्म घेतले तरी इतकं सगळं करणं आपल्याला जमेल का; आणि मनात येतं -
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके|
चांदणे ज्यातून वाहे, शुभ्र पा-यासारखे||

संदर्भः
१. सुवर्णकिरणे - सौ. विजया माधव चितळे - साकेत प्रकाशन
२. विज्ञानयात्री डॉ. माधव चितळे - अ. पां. देशपांडे - राजहंस प्रकाशन
३. http://en.wikipedia.org/wiki/Stockholm_Water_Prize
४. http://en.wikipedia.org/wiki/Harsh_Chitale

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर ओळख करुन दिलीत कांक्षा ! खरचं अशा लोकांचे अनुभव वाचले की आपलं खुजेपण प्रकर्षाने जाणवु लागतं.

श्री. चितळे यांच्या कामाबद्दल माहिती होती, पण त्या कामाची व्याप्ती एवढी असेल हे आजच कळलं. फार छान लिहीलं आहे तुम्ही कांक्षा!

एकदा राज ठाकरेंकडुन ऐकलं होतं, पण पुरेशी माहीती नव्हती. खरच खुप चांगला परिचय आणि लेख.
अजुन लिहित रहा. शुभेच्छा !.

मायबोली स्पर्धा समितीमधील सार्‍याच सदस्यांचे खास असे अभिनंदन करावे लागेल. कारण त्यानी आयोजित केलेल्या अशा स्वागतार्ह स्पर्धेत असे काही निबंध नित्यदिनी अवतरत आहेत की ते वाचत असताना आपण जणू काही अल्लाउद्दीनच्या गुहेत जाऊन तेथील रत्नांचे झळझळीत रुपडे पाहात आहोत.... डॉ.माधवराव चितळे हे असेच एक रत्न या महाराष्ट्रातील ज्यांच्या विषयी अशी प्रेरणादायक माहिती लेखिकेने इथे उलगडून दाखविली आहे की एकदा नव्हे तर दोनवेळा वाचूनही त्यांच्या कर्तृत्वाचा प्रचंड आवाका लक्षात येणे केवळ अशक्य.

शब्दमर्यादेचे भान ठेवून निबंध लिहिला गेला असल्याने अजून बर्‍याच काही बाबी निबंधात आलेल्या नसतील पण जितक्या आल्या आहेत त्यावरून डॉ.चितळे हे सरकारी सेवेत असूनही जनमानसावर आपली स्वतंत्र अशी छबी उमटविण्यात यशस्वी ठरले आहेत.

लेखिकेने सन २००० नंतरचा डॉक्टरांचा प्रवास चितारलेला दिसला नाही. वाचकाला वाटेल की १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर विविध समित्यावर तज्ज्ञ म्हणून त्यानी काम केले असेल. पण वयाच्या ८० नंतरही त्यानी महाराष्ट्र सरकारने बराच गाजावाजा झालेल्या Special Investigation Team चे अध्यक्षपद स्वीकारून इरिगेशन खात्यात चाललेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली होती....साल होते २०१२. म्हणजे या वयातही त्यांची कामातील तडफ वाखाणण्याजोगीच. त्यातही विशेष म्हणजे का कोण जाणे पण त्यांच्या नियुक्तीला मेधा पाटकर यानी विरोध केला होता व त्यांचे प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याना भेटले होते. तरीही मेधा पाटकर यांचा विरोध मुख्यमंत्रानी बाजूला सारला, कारण त्यांचाही डॉ.चितळे यांच्या कार्यावर गाढ विश्वास आहे.

एक सुंदर निबंध वाचायला मिळाला याबद्दल कांक्षा यांचे आभार.

अशोक पाटील

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! Happy

@ अशोकाका: तुमचं म्हणणं बरोबर आहे. शब्दमर्यादेमुळे त्यांच्या अलीकडच्या कार्यावर फारसा प्रकाश टाकता आलेला नाही. शिवाय अलीकडच्या बातम्या वृत्तपत्रामुळे वाचनात येतात. म्हणून विस्मृतीत गेलेल्या भागावर सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय.

काही लेखांना शब्दमर्यादेमुळे विस्तार आटोपता घ्यावा लागला आहे. माझा लेख १२०० शब्दांमध्येच बसल्यामुळे माझ्याकडे शब्द उरले आहेत. इकडचे तिकडे ट्रान्स्फर करता आले असते तर ज्यांना कमी पडले त्यांना देऊन टाकले असते Happy

कांक्षाजी,
ओघावत्या भाषेत अतिषय उत्तम ओळख करुन दिलीत. माधरावांविषयी नेहमीच वाचत आलो आहे. परंतु त्यांच्या बद्दल इतक्या विस्तृतपणे माहीत नव्हते. शुभेच्छा!!

कांक्षा....

माझ्या लक्षात तो शब्दमर्यादेचा मुद्दा होताच म्हणा. किंबहुना त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जडणघडणीचे पैलू सविस्तरपणे चितारण्यास मर्यादा ह्या पडतातच. मी एसआयटी चे जे उदाहरण दिले त्याचवेळी मेधाताईंचा विरोध प्रदर्शीत झाल्याने त्यावेळी माधवरावांच्या कर्तृत्वाविषयीही टाईम्स ऑफ इंडियामध्ये वाचण्यास मिळाले तसेच भा.ज.प. या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यानीही माधवरावांच्या नियुक्तीचे केलेले स्वागत वाचले होते.

सरकारने केलेली एखाद्या तज्ज्ञाची नियुक्ती आणि त्याला विरोधी पक्षाने दिलेला एकमुखी पाठिंबा ही घटना नेहमीच घडते असे नाही, पण डॉ.चितळे यांच्याबाबतीत ती घडली होती.

अशोक पाटील

धन्यवाद लाल टोपी आणि रैना. Happy
@ के अश्विनी: कल्पना उत्तम आहे Wink संयोजकांना विचारायला हवं.. Wink
खरंय अशोककाका, असं पक्षातीत मोठेपण लोकशाहीत फार कमी लोकांना मिळतं.

सुरेख लेख. डॉ. चितळ्यांच्या कामाचा आवाका एव्हडा मोठा आहे हे माहित नव्हतं !! धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.
स्पर्धा संपल्यानंतर बाकीची माहिति दुसर्‍या भागात लिहा.

उत्तम लेख.
मला औरंगाबादेतील बीई -सिविल झालेल्या एका मित्राने सांगितले होते कि तास दीड तासाचे तांत्रिक विषयावरील भाषणात त्यांनी एकही इंग्रजी शब्द वापरला नाही आणि तरीही उत्तम विवेचन केले.

सुंदर ओळख करुन दिलीत कांक्षाजी..आवड्लं
मायबोली स्पर्धा समितीमधील सार्‍याच सदस्यांचे खास असे अभिनंदन करावे लागेल. कारण त्यानी आयोजित केलेल्या अशा स्वागतार्ह स्पर्धेत असे काही निबंध नित्यदिनी अवतरत आहेत की ते वाचत असताना आपण जणू काही अल्लाउद्दीनच्या गुहेत जाऊन तेथील रत्नांचे झळझळीत रुपडे पाहात आहोत.... >> +१००

डॉ. चितळ्यांच्या कामाबद्दल माहिती होती पण इतकी विस्तृत माहिती नव्हती.
ते माझ्या लहानपणापासूनच्या मैत्रिणीचे काका. आत्ताच त्या मैत्रिणीला लेखाची लिंक पाठवली.
सबंध चितळे कुटुंबच अतिशय कर्तृत्ववान, गुणी आणि खूप मोठं सामाजिक भान असणारं आहे.

उत्तम ओळख. स्पर्धेसाठी शुभेच्छा!