विषय क्रमांक दोन - स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - एक न झुकलेला माणूस अर्थात ‘टी. एन. शेषन’

Submitted by किंकर on 25 August, 2013 - 02:12

सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी त्यांच्या एका लेखात-"कुणीतरी म्हटले आहेच कि, आणि हो! कुणीतरी कशाला म्हणायला हवे, खरे ते खरेच की" असे म्हणत,त्यांनी आपल्या मनोवृतीवर अचूक बोट ठेवले आहे. कारण एखादे वाक्य किंवा एखादा संदेश काय आहे किंवा त्यातील बोध काय यावर आपण आपल्या मनाशी जो विचार करतो तो, त्या वाक्यात किंवा संदेशात काय सामावले आहे याबाबत अंतर्मुख होताना त्या वाक्यातील संदेश कोणी दिला यावरून आपले मत ठरवतो.अर्थात असे का घडत असावे कारण, काय बोलले यापेक्षा कोण बोलले, हे अधिक महत्वाचे ठरते कारण त्या बोलण्याला बोलणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे अधिष्ठान असते.

" मी शेंगा खाल्या नाहीत,म्हणून मी टरफले उचलणार नाही " हे तुम्ही आम्ही शाळेत म्हणलो असतो तर, त्या काळात मास्तरांनी असे काही फोकळून काढले असते कि,आयुष्यभर शेंगा खाताना त्याची आठवण राहिली असती. पण हे वाक्य बाळ गंगाधर टिळक यांच्या तोंडी आले आणि ते बाणेदारपणाचे प्रतिक ठरले, कारण त्यांनी तो बाणेदारपणा विद्यार्थी दशे पासून ते लोकमान्य होईपर्यंत उभ्या आयुष्यात सातत्याने जपला.आता नमनाला घडाभर तेल कशा साठी होते ते मुख्य विषयास हात घालताच आपण लक्षात घ्यालच.

स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणून कोणा एकाच्या उल्लेखाने या विषयास न्याय मिळणार नसला तरी मी ज्या व्यक्ती बद्दल बोलणार आहे ते म्हणजे, कधीही नामशेष न होणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे म्हणजे,दहावे निवडणूक आयोग प्रमुख अर्थात टी. एन. शेषन.
स्वतंत्र भारतात प्रथम सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे एक्कावन्न साली पार पडली आणि एकोणीसशे बावन्न साली प्रथम लोकसभा अस्तित्वात आली,आणि तेंव्हा पासून लोकशाहीचा प्रवास लोकसेवा,समाजसेवा इथपासून … निवडणुकीतील घोडेबाजार इथपर्यंत येवून कधी पोहचला ते कळलेच नाही.

पक्ष कोणताही असो प्रत्येक उमेदवाराचा प्रवास लोकनेता ते पुढारी असा अगदी पक्ष, पक्षीय मुल्ये नितीमत्ता या सर्व बाबी नजरेआड करत घडत गेला.राजकारणात निवडणुकीचे महत्व जन सामान्यांनी आपला प्रतिनिधी निवडून देणे यासाठी न राहता उमेदवारांनी सत्ता काबीज करण्याचा कावेबाज मार्ग असे झाले.

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे, यात लोकांच्या मताची किंमत राखणे हा दृष्टीकोन मागे पडून मताची किंमत ठरवणे हा दृष्टीकोन उमेदवारांसाठी सोयीस्कर ठरू लागला.

‘पेराल ते उगवेल’ या म्हणी नुसार अपुरे शिक्षण, भौगोलिक आणि वैचारिक मागासलेपण यातून ग्रामीण भागात किंवा शहरी भागातील वस्त्यांमधून उमेदवाराकडून साड्या,धोतर जोड्या, दारू पैसा अश्या व्यक्तिगत लाभाची अपेक्षा प्रथम केली जावू लागली. या मुळेच मताला किंमत न राहता मताची किंमत ठरत गेली.
देश, राज्य याचा समतोल विकास याचा साकल्याने विचार होण्या ऐवजी जात धर्म यावर आधारित 'गठ्ठा मते' हा विकास योजना राबवण्यासाठीचा निकष मानला जावू लागला.

जर मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर खरे तर मतदारांनी जागरूक राहून मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्याऐवजी मला काय त्याचे ? किंवा माझ्या एका मताने काय फरक पडणार ? हा स्वतःच्या निष्क्रियतेवर घातलेले पांघरूणच अल्पमतातील सरकार बहुमताने निवडून येण्याची कार्यपद्धती रूढ होण्यास कारणीभूत झाली आहे.

त्याच बरोबर साकल्याने साधक बाधक विचार करून , पक्षाच्या जाहीरनाम्याचा आभ्यास करून ,मतदान करण्या ऐवजी अनेकदा विशिष्ठ प्रकारची लाट अधिक प्रभावी होत गेली. कधी दुष्काळ,कधी महागाई ,कधी युद्धोत्तर परिस्थिती,तर कधी आणीबाणी ,कधी विशिष्ट पक्षाच्या नाकर्तेपणाचा समोरील पक्षाने उठवलेला फायदा असे घटक निकालावर परिणाम करणारे ठरले.

निवडणुका आणि भ्रष्ट मार्गांचा अवलंब यांचा सहसंबंध जोडण्यात उमेदवारास लाजही वाटेना झाली. आणि हे शब्दशः गल्ली पासून दिल्ली पर्यंत घडू लागले.आणि हे सर्व अगदी अतिरेकी पातळी पर्यंत वाढले, तोपर्यंत स्वतंत्र भारतातील एक पिढी संपून दुसरी पिढी तारुण्यात प्रवेश करती झाली होती. नवव्या लोकसभेने आपला कार्यकाल पुरा करीत आणला होता. दहाव्या लोकसभेचे पडघम वाजू लागले होते.

आणि याच वेळेस दहाव्या निवडणूक आयोगाच्या मुख्य पदावर ,तिरुनेल्लै नारायण अय्यर शेषन उर्फ टी.एन.शेषन यांची नेमणूक झाली. नवव्या मुख्य निवडणूक आयोग पदावरील व्ही. एस. रमादेवी यांचा कार्यकाल संपला म्हणून दहावे निवडणूक आयोग प्रमुख शेषन यांची निवड ,इतकेच महत्व त्यावेळी या घटनेस होते. तो दिवस होता बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद(१२/१२/१९९०).

दृष्टी क्षेपात असलेल्या दहाव्या लोकसभेची तयारी करण्याकरता, आलेला दहावा निवडणूक आयोग प्रमुख हा पलक्कड, केरळ या देव भूमीत जन्मलेला जणू द्शावतारीच होता. कारण जेंव्हा त्यांची त्या पदावर नेमणूक झाली तेंव्हा त्यांना निवडणूक आणि त्याची नियमावली यांचा गंध देखील नव्हता. त्यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक कार्य प्रणाली प्रत्यक्षात हाताळली नव्हती . मात्र त्यांना सरकारी उच्च पदावर काम करण्याचा उदंड अनुभव होता.

नवीन जबाबदारी ,नवी आव्हाने याकडे दबून जावुन न पाहता ,त्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन विषद करताना ते म्हणतात, "मी एखाद्या चेंडू प्रमाणे आहे,जितक्या जोरात तुम्ही मला ढकलाल तितकीच उसळी घेत मी परत तिथे येईन."आणि त्यांच्या इतिहास घडवणाऱ्या कार्यकालाची सुरवात करताना, त्यांचा प्रथमचा निर्णय, स्वतःच्या कार्यकक्षेतील कार्यालापासून सुरु करताना, त्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातील सेवकांचे लांबलचक जेवणाचे तास कमी केले आणि कार्यालयीन कामाच्या वेळेत ग्रंथालय व खेळ यासाठी वेळ खर्च करण्यावर पूर्णतः निर्बंध घातले .

निवडणूक आयोग प्रमुख पदावर ते जरी नव्याने विराजमान झाले असले तरी, त्यापूर्वी त्यांनी सुमारे अडतीस वर्षे विविध जबाबदारीची पदे, जबाबदारी समजावून घेवून भूषवली होती. संचालक वाहतूक विभाग - मद्रास या पदावर कार्यरत असताना ते तीन हजार बसेस आणि चाळीस हजार कर्मचारी यांच्या समस्यांना सामोरे जात असत. त्यावेळी एक बस चालक त्यांना म्हणाला,"ना तुम्हाला बस चालवता येते,ना तुम्हाला बसच्या इंजिनची माहिती आहे ,तर तुम्ही काय आमचे प्रश्न हाताळणार ? " तेंव्हा त्यांनी या प्रश्नास अपमान न मानता आव्हान म्हणून पाहिले. ते बस चालवण्यास शिकून थांबले नाहीत तर बसचे इंजिन पूर्णतः वेगळे करून त्याची पुनः जोडणी करण्या पर्यंत ते निष्णात झाले.

हाच दृष्टी कोन दृढ करीत त्यांनी त्यांच्या निवडणूक आयोग पदावरील कामास सुरवात केली. निवडणूक कार्यपद्धती समजावून घेताना त्यांनी,भ्रष्ट मार्गांचा वापर थांबवण्यासाठी ,चुकीच्या मतदार याद्या, मतदान केंद्र उभारणीतील चुका,निवडणूक खर्च मर्यादा , बलप्रयोगाने केले जाणारे मतदान, यासारख्या शंभरहून अधिक गैर मार्गांचा अभ्यास करून ते प्रकार पूर्णतः थांबवण्याचा निर्धार केला .

या त्यांच्या कामकाज पद्धतीत त्यांना जे अपूर्व यश मिळाले आणि स्वातंत्र्या नंतर ,चाळीस वर्षांनतर , जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीस खुल्या आणि निपक्षपाती निवडणुकांचा जो आनंद घेत आला,त्यामागे दोन प्रमुख गोष्टींचा कार्यकारण भाव आहे. एक म्हणजे त्यांनी केलेला कायद्याचा सखोल अभ्यास आणि रास्त नियमांची काटेकोर अंमलबजावणी. अर्थात या त्यांच्या यशात काहीतरी चांगले आणि सर्वसामान्यांच्या हिताचे करण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती हा घटक निर्विवाद श्रेष्ठ ठरतो हे कधीच दुर्लक्षून चालणार नाही .

एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत निवडणुका म्हणजे प्रचार सभा,कर्कश्श आवाजातील कर्णे ,आणि सर्व गावभर जागा दिसेल तिथे घोषणा किंवा उमेदवारांची नावे आणि चिन्हे यांनी गलिच्छ केलेल्या भिंती, असे समीकरण झाले होते. पण शेषन यांनी आचार साहिंता या वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दाचा मतितार्थ यंत्रणेस आणि उमेदवार यांना समजावून दिला. त्याचा परिणाम म्हणून निवडणूक काळात यातील अनेक त्रासां पासून आपली सुटका झाली .

या स्वतःच्याच महत्वपूर्ण कार्याकडे पाहण्याचा त्याचा व्यक्तिगत दृष्टीकोन किती स्वच्छ होता हे पाहणे देखील नक्की गरजेचे ठरते.निवडणुका खुल्या आणि निपक्षपाती वातावरणात झाल्या पाहिजेत असे जर घटना सांगते ,तर ते वातावरण निर्माण करणे हि निवडणूक आयोगाची आद्य कर्तव्याची बाब ठरते. आणि म्हणूनच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेताना मतदार केंद्र स्थानी ठेवून त्यांनी त्यांचे कामकाज केले. प्रत्येक पात्र मतदार राजकीय दडपणाने किंवा भविष्यात कधीही मतदाना पासून वंचित राहू नये म्हणून,' मतदार ओळखपत्र ' वितरण हा त्यांचा निर्णय, दूरगामी परिणाम करणारा ठरला.

मतदार ओळखपत्र म्हणजे कसलीही राजकीय खेळी नसून ती प्राथमिक गरज आहे असे सांगत त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी अठरा महिने वाट पाहून मग त्यावर सरकारी यंत्रणा सुस्त आहे असे लक्षात येताच , त्यांनी निकराचा संदेश देत जर ओळखपत्र तयार करून दिली गेली नाहीत तर, एक जानेवारी १९९५ नंतर निवडणुका होणार नाहीत असेच सांगितले. परिणाम स्वरूप देशभरात अनेक निवडणुका पुढे ढकलणे क्रमप्रात झाले .

त्यावेळी राजकीय पुढारी हि बाब खर्चिक व अनावश्यक आहे, असे म्हणत त्यास विरोध करू लागले.
न्यायालयीन हस्तक्षेपानंतर, जरी निवडणुकीतील मतदान हा प्रथम अधिकार आहे, या कारणास्तव त्यावेळी निवडणूका थांबवता येणार नाहीत, हे जरी स्पष्ट झाले तरी शेषन यांनी ओळखपत्र वितरणाचा आग्रह कायम ठेवून, त्यावेळी ते काम सरकारी पातळीवर सुरु करून त्यांच्या कार्यकाळा अखेर वीस लाख मतदारांना प्रत्यक्ष ओळख पत्रे वितरीत केली .

त्यांच्या या स्व निर्णयावर ठाम राहण्याच्या वृत्तीवर अनेकदा कडवट टीका होत असे. एकदा त्यांना त्याबाबत छेडले असता त्यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात द्यावयाची झाल्यास ते म्हणतात -

"It was not that I introduced a new reform in the system. In fact, I didn't even add one comma, semicolon or a full stop to the Act. Whatever was said in the Act, I implemented."

म्हणजेच ते म्हणतात -" असे काहीही नाविन्यपूर्ण बदल मी यंत्रणेत केलेले नाहीत. वस्तुतः मी अगदी स्वल्प विराम ,अर्ध विराम किंवा पूर्ण विराम यांची देखील भर अस्तित्वातील कायद्यात घातलेली नाही,मात्र जे कायद्यात नमूद केले आहे त्याची तंतोतंत अमंलबजावणी मी केली.

या ठिकाणी ' जर इच्छा असेल तर मार्ग दिसेल 'या म्हणीचा अर्थ त्यांनी कृतीने उलगडून दाखवला आहे. याठिकाणी शेषन हे स्वतंत्र भारतातील महत्वाचे व्यक्तिमत्व ठरतात असे मला ठाम पणे वाटते. त्यांच्या कठोर भुमिके मुळे मी मी म्हणणारे राजकीय नेते किमान निवडणूक काळात तरी वठणीवर राहतात. स्वतःचे निवडणूक खर्चाचे हिशेब वेळेवर सदर करतात.

भ्रष्ट मार्गांचा वापर टाळतात . इतकेच काय पण प्रत्येक मतदारास ओळखपत्र हा त्यांनी दिलेला एक कागद नसून मतदारास त्याची ओळख सांगणारा खराखुरा सन्मान आहे.

यामुळेच दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद(१२/१२/१९९०) रोजी सुरु झालेला झंजावात दिनांक अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव या त्यांच्या निवृतीच्या दिवसापर्यंत तितक्याच ताकदीने घोंगावत राहिला.त्यांची दहाव्या प्रमुख निवडणूक आयुक्त या पदावरून झालेली निवृत्ती हि अनेक राजकीय मंडळींना दशम ग्रह पासून झालेली सुटकाच वाटली.

ते पदावर कार्यरत असताना एकदा त्यांनी रिलायन्स कंपनीच्या विमानाचा वापर करून एका धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावली.तेंव्हा त्यांच्या स्वच्छ प्रतिमेस तडा गेला ,त्यासाठी त्यांना विचारले असता त्यांनी लगेचच रक्कम रुपये ९५०००/- चा चेक देत त्या विषयास पूर्णविराम दिला . या त्यांच्या कृतीने त्याच्यातील निर्भीड माणूस अधिकच उजळून निघाला. एकुणात काय तर सरकारी सेवेत देखील स्वच्छ व पारदर्शी कारभार कसा करावा याचे दुसरे नाव म्हणजे टी.एन.शेषन होय.

निवृत्ती नंतर त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली,पुढे राजकीय निवडणुकीत सहभाग घेतला पण त्यात त्यांना अपयशाची चव चाखावी लागली .

त्यांच्या या कार्याचा देश पातळीवर जरी पुरेसा सन्मान झाला नाही तरी आशियाई पातळीवरील नोबेल दर्जाचा सन्मान असलेला मॅगसेसे पुरस्कार त्यांच्या कामाची महती सांगणारा सन्मान ठरतो यात नक्कीच शंका नाही.

माहितीचा स्त्रोत - विविध संकेत स्थळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते पुर्वी कधी जेलर (कि तत्सम) होते त्यावेळी एका राजकिय नेत्याची चांगलिच खोड मोदली होती. आता फारसे आठवत नाही, पण तो बहुदा चेन्नईचा किस्सा होता.

चांगला लेख, पण थोडं अधिक लिहिलं असतं तर मजा आली असती.

विजय देशमुख - तिहार मध्ये महासंचालक पदावर किरण बेदी यांनी काम करताना खूप वेगळ्या पद्धतीने काम काज हाताळले होते. तसेच दिल्ली येथे वाहतूक विभागात असताना त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांची गाडी नो पार्किंग मधुन उचलली होती. आपणास बहुदा सदर घटना आठवत असावी. प्रतिसादासाठी धन्यवाद !

लेख आवडला.
"It was not that I introduced a new reform in the system. In fact, I didn't even add one comma, semicolon or a full stop to the Act. Whatever was said in the Act, I implemented."

हे आपल्या देशात अर्ध्या कायद्यांच्या बाबतीत झाले तरी देश सुरक्षित ,सुजलाम,सुफलाम होईल.

माझ्या एका चुलत भावाचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे.
व्यवसाय सुरू केला त्यावर्षीच जिल्ह्यातल्या मतदारयाद्यांसाठी मतदारांचे व्हिडिओशूटिंग /फोटोचे काँट्रॅक्ट मिळाले.
त्यात त्याचा इतका जम बसला की तो शेषनसाहेबांचा फोटो दुकानात देवासारखा ठेऊ लागला.
Wink

श्री -स्पर्धा,शब्द मर्यादा यामुळे विस्तारभय सतत डोळ्यासमोर राहिले .पण अजून लिहता आले असते हे खरेच.
शुगोल ,शोभनाताई-धन्यवाद
साती - अंमलबजावणी हेच सर्वात मोठे आव्हान असते.
प्रज्ञा , चनस- प्रतिक्रियेसाठी आभार.

चांगला लेख किंकर!

शेषन व्यक्तिगत आयुष्यात स्वतः अतिशय साधे आहेत. कोणताही बडेजाव नाही. त्याची छोटीशी झलक मला एकदा एका कार्यक्रमात बघायला मिळाली. ते तिथे खास पाहुणे म्हणून आले होते. नंतरच्या आयोजित स्नेहभोजनात खास अतिथींची व्यवस्था बघायला कार्यकर्ते पळापळ करत होते. त्यांच्यासाठी वेगळी टेबल्स होती व तिथे त्यांना जागेवरच कार्यकर्ते भरलेल्या प्लेट्स आणून देत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाकीचे लोक स्वयंसेवा (बुफे) धर्तीने ठेवलेल्या भोजनासाठी शिस्तीत रांगेत उभे होते. शेषन साहेब व त्यांच्या पत्नी दोघेही भोजनाच्या रांगेत जाऊन उभे राहिले. आपल्या हाताने प्लेट्स भरून घेतल्या. कार्यकर्त्यांना त्यांनी विनम्र नकार दिला. भोजनोत्तर बाकीच्या लोकांप्रमाणे स्वयंसेवा धर्तीवर आपापल्या प्लेट्स दोघांनी कोणताही संकोच न करता घासून पुसून ठेवून दिल्या. छोटीशी कृती. पण त्यातून त्यांचा साधेपणा जाणवला.

अरुंधती कुलकर्णी - खरे आहे अनेक शब्द जे सांगणार नाहीत ती सहज कृती शिकवून जाते. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !

छान लेख. Happy
त्या काळात शेषन यांच्या नावाचा खरंच दबदबा होता हे अगदी चांगले आठवते.
एका व्यंगचित्र स्पर्धेत 'राजकारण' हा विषय असताना शेषन यांचे ते राजकारण्यांच्या डोक्यावर नाचत आहेत अशा प्रकारचे व्यंगचित्र काढल्याचे आठवते. Lol

"It was not that I introduced a new reform in the system. In fact, I didn't even add one comma, semicolon or a full stop to the Act. Whatever was said in the Act, I implemented."

हे आपल्या देशात अर्ध्या कायद्यांच्या बाबतीत झाले तरी देश सुरक्षित ,सुजलाम,सुफलाम होईल. >>> ++

छान विषय. शेषन यांच्याविषयी काही नवीन माहिती मिळाली.

(मांडणी मला जरा विस्कळीत वाटली. एक छोटा ३-४ वाक्यांचा परिच्छेद दोनवेळा जसाच्या तसा आला आहे.)