विषय क्रमांक १ - लोकसंख्यावाढ

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2013 - 03:52

रोहन प्रकाशन व मायबोली डॉट कॉम यांनी आयोजिलेल्या लेखनस्पर्धेसाठी एक मायबोली सदस्य म्हणून आभार! या लेखनस्पर्धेत समाविष्ट केलेल्या विषयांमुळे विचारांना चालना मिळाली व स्पर्धा किती आव्हानात्मक आहे याची जाणीव होत राहिली.

भारताच्या वर्तमानावर नकारात्मक परिणाम कोणकोणत्या बाबींमुळे झाले याची यादी एखादा माणूस अगदी सहज देऊ शकेल. मात्र सकारात्मक परिणाम कोणकोणत्या गोष्टींमुळे झाले हे ठरवणे कठिण होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे लेख वाचून असे वाटू लागले की खरोखरच कितीतरी गोष्टी, व्यक्ती, कलाकृती अश्या असतील ज्यांच्यामुळे वर्तमान भारत सुसह्य देश वाटत आहे. सर्व स्पर्धकांचेही अतिशय माहितीपूर्ण लेखांसाठी आभार व अभिनंदन!

एका नाजूक विषयावर यापूर्वी मी अनेकदा विचार केलेला होता आणि तो विषय या स्पर्धेच्या निमित्ताने मला अभिप्रेत असलेल्या पद्धतीने मांडता येईल याची खात्री पटली व मी यात सहभागी होण्याचे ठरवले. माझ्या या लेखातील विचार हे दृष्टिकोन बदलण्याचा एक दुबळा अथवा अपुरा प्रयत्न वाटू शकेल याची जाणीव आहे, मात्र कृपया मला हा प्रयत्न करून पाहूदेत अशी विनंती!

१९४७ साली असलेल्या सुमारे ३६ कोटी लोकसंख्येला कुटुंब नियोजन, लोकसंख्यावाढीमुळे उद्भवू शकणारे प्रश्न यांचे फारसे वारे लागलेले नव्हते. विशिष्ट राजकीय व भौगोलिक सीमांमध्ये असलेली मर्यादीत नैसर्गीक सुबत्ता व साधनसंपत्ती उपभोगणारी लोकसंख्या जास्तीतजास्त किती असू द्यावी हा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा तो काळच नव्हता असे म्हणावे लागेल. परिणामतः स्वतंत्र भारताबाबत निर्माण झालेला ताजाताजा आपलेपणा, कुटुंबव्यवस्था हे सामर्थ्य असल्याची सार्वत्रिक ठाम भूमिका, एकत्र कुटुंबपद्धती, मुलगाच व्हावा म्हणून प्रयत्नरत राहण्याची प्रवृत्ती, तांत्रिक विकासाचा अभाव, नोकरी-व्यवसाय व कमी गरजा हे त्याकाळच्या समाजमनावर दूरगामी परिणाम करणारे घटक ठरले.

लोकसंख्यावाढीला आळा घातला नाही तर ही लोकसंख्यावाढ एक दिवस सर्व सुबत्ता गिळंकृत करेल याचे भान माणसांना वैयक्तीक पातळीवर आलेले नव्हते. शासनाच्या धोरणात लोकसंख्यावाढ सीमीत करणे याचा समावेश कालांतराने होऊ लागला, पण समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत तो विचार प्रभावीपणे पोहोचून तो सर्वमान्य होणे हे नेमके घडत नव्हते. 'माझ्या एकट्याच्या कुटुंबाने असे काय बिघडणार आहे' ही वृत्ती जोपासली जात राहिली.

या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि तिचा विस्फोट होऊन आजघडीला ती सव्वा अब्जच्या आसपास पोचलेली आहे. सहासष्ट वर्षात साडेतीनपटीने वाढलेल्या या लोकसंख्येला सामावून घेणार्‍या भौगोलिक सीमा त्याच राहिलेल्या आहेत. नैसर्गीक साधनसंपत्ती मर्यादीत असल्याने तीही झपाट्याने व्यतीत होत आहे.

खरे तर, लोकसंख्या हा आजमितीला भारतासमोरचा एक अतिशय भयप्रद प्रश्न आहे. या लोकसंख्येने सुबत्ता गिळंकृत करायचा सपाटा लावलेला आहे. खनिज संपत्ती संपुष्टात आलेल्या काही खाणी आज विषण्णपणे स्वतःचे गतवैभव आठवत कामगार कुटुंबांना उपासमारीचे भविष्य बहाल करत आहेत. रोजगाराच्या अभावाने राक्षसी स्वरूप प्राप्त केलेले आहे. पाणीसाठे, वीज उत्पादन, शेतकी उत्पादन, रस्ते, प्रवासी वाहतूक, निवास व्यवस्था, शिक्षण, दरडोई उत्पन्न अश्या अत्यंत महत्वाच्या निकषांवर भरमसाठ लोकसंख्या भारताला एक देश म्हणून कमनशीबी ठरवत आहे. विशेष म्हणजे आजही समाजातील कित्येक थरांपर्यंत कुटुंबनियोजन हा विचार नीटसा पोचलेला नसून लोकसंख्यावाढ नियंत्रणात येण्याची चिन्हे अजुनतरी दृष्टिपथात आलेली नाही आहेत. ही चक्रावून टाकणारी वाढ माणसामाणसातील जगण्याची स्पर्धा इतकी भीषण बनवत आहे की काही वर्षांनी कदाचित भारतात सर्वात स्वस्त काय असेल तर माणसाचे आयुष्य, असे वाटू लागले आहे.

संकटाला संधी माना असा एक सुविचार आपण वाचलेला असतो. पण अक्राळविक्राळ लोकसंख्येला संधी मानणे हा विचार आपल्या मनाच्या पहिल्याच थराला पटणे अवघड आहे. तो मनात आतवर सामावून, त्यावर चिंतन करून काही निष्कर्ष काढणे इतका संयम आज भारतीय सामान्य माणसाकडे कसा असू शकेल?

मात्र या निमित्ताने आपण सारे काही मिनिटे या विचाराला देऊन पाहूयात का?

लोकसंख्यावाढीला आळा घालण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम कायद्याच्या अतिशय कडक व काटेकोर अंमलबजावणीमार्फत व्हायलाच हवा आहे. मात्र, आज असलेली लोकसंख्या, जी आपलीच सुबत्ता गिळत आहे, ती आपली एक शक्तीही आहे का?

माझे मन म्हणते की 'होय, ती एक शक्तीही आहे'.

या लोकसंख्येमुळे आज आर्थिक उत्पन्नाचे कोट्यावधी थर आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. प्रत्येक गरिबाहून अधिक गरीब असलेला एक थर मिळतच आहे आणि प्रत्येक श्रीमंताहून अधिक श्रीमंत असलेला एक थर दिसतच आहे. उत्पन्नामधील या अवाढव्य वैविध्यामुळे देशात निर्माण होणार्‍या प्रत्येक कामासाठी पात्र असा माणूस आज आपल्या देशात उपलब्ध आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडे मदतीचे हात कित्येक पटीने अधिक असून तुलनेने कमी मोबदल्यात ते उपलब्ध आहेत. हे फार मोठे सामर्थ्य आहे.

आपली अफाट लोकसंख्या ही आंतरराष्ट्रीय उत्पादकांसाठी एक भली मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच संशोधन व विकास यावर तुलनेने कमी कष्ट घेऊनही आपल्याकडे प्रगत उत्पादने, तंत्रज्ञाने रोजमितीला अवतरत आहेत. माणसेच कमी असती तर ही तंत्रज्ञाने आपल्याला देण्यात या उत्पादकांना तितक्याच प्रमाणात कमी स्वारस्य असते हे मान्य व्हावे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर प्रभाव पडू शकेल इतकी आपली लोकसंख्या, एक ग्राहक म्हणून महत्वाची आहे. आजची युद्धेही भौगोलिक सीमेपेक्षा अर्थकारणाच्या मैदानावर लढली जातात. आपण एक भले मोठे ग्राहक असल्यामुळे आपल्याला कमी लेखण्याची भल्याभल्या विकसित राष्ट्रांची हिम्मत नाही.

सुदैवाने आपल्याकडे शिक्षणसंस्कृती बर्‍यापैकी प्रमाणात फोफावलेली असल्याने इतक्या प्रचंड लोकसंख्येला स्पर्धा-सिद्ध होण्यासाठी हजारो विषयांचे शिक्षण घ्यावे लागते. हे विषय, त्यावरील संशोधन, त्यातून मिळणारे उत्पन्न, रोजगार हे सर्व १९४७ च्या तुलनेत आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे. याचा अर्थ असा, की निव्वळ काळ बदलला म्हणून अधिक विकास झाला व अधिक ज्ञानसमृद्धी आली इतकेच न होता लोकसंख्यावाढीमुळे त्या विकासाचा व समृद्धीचा वेग अस्मानाला भिडला. भिडवावाच लागला. उच्चशिक्षण घेऊन परदेशात स्थायिक होणार्‍यांतही भारतीय बरेच अग्रेसर असावेत. नगण्य का असेनात, पण याचा एक अर्थ असाही होतो की अनेक परदेशातील उद्योग आपल्याकडील मनुष्यबळाचा वापर करतातच, त्यावर थोड्या प्रमाणात तरी ते अवलंबून असतातच. त्यांचे स्वतःचे नागरीक असतानाही भारतीय नागरिकांना नोकरी देण्याचा त्यांचा निर्णय हा निव्वळ रुपया स्वस्त असल्यामुळेच घेतला जातो असे नसून आपल्या नागरिकांचे अष्टपैलुत्व, तुलनेने अल्पसंतुष्ट असणे यावरही ते अवलंबून असते. आपले नागरीक असे घडण्यामागे अर्थातच आपल्याकडे अफाट लोकसंख्या असणे हे कारण असते. माणसाच्या सुबत्तेबाबतच्या, स्थैर्य व सुरक्षेबाबतच्या सर्व गरजा जागच्याजागी भागून तो समाधानी झाला तर स्थलांतराचा निर्णय तो घेणारही नाही.

अधिक चांगल्या राहणीमानाच्या ओढीमुळे निर्माण होणारी अंतर्गत स्पर्धा या प्रचंड लोकसंख्येमुळे इतके रौद्र स्वरूप धारण करत आहे की त्यामुळे समाजातील एक मोठा थर दैववादापासून प्रयत्नवादाकडे वळताना दिसत आहे. याचा लक्षणीय परिणाम अंतर्गत उत्पादने, सेवासुविधा, साधनसंपत्तीची निर्मीती यावर होत आहे. एक नवीन लोहमार्ग निर्माण करणे या कामासाठी शेकडो प्रकारचे कारखाने, रोजगार, आर्थिक उलाढाल अश्या कित्येक बाबी चैतन्यमय होतात, मग आपल्याकडे तर रोजच रस्ते, धरणे, पूल, इमारती बांधल्या जात आहेत.

एक आकाराने व लोकसंख्येनेही अफाट विस्तार असलेला देश म्हणून थेट परकीय आक्रमणाची भीती पूर्वीपेक्षा घटलेली आहे. अर्थात याची इतरही अनेक महत्वाची कारणे आहेतच, पण इतका विस्तृत प्रदेश व संस्कृती नामशेष करणे हे तितकेच अशक्यप्राय आव्हान आहे.

अतीपूर्वेकडील राज्ये, केरळ, गुजरात, काश्मीर आणि या सर्वांच्या आतील प्रदेश असा अखंड भारत एकाच तिरंग्याखाली सहासष्ट वर्षे नांदताना त्यात पुन्हा लोकसंख्येने विस्तारीत होतो हे पाहून परदेशांचे डोळे चक्रावत असतील. अत्यंत दुर्दैवी व मान खाली घालावयास लावणारे निर्भया प्रकरण व त्याशिवाय अण्णा हजारेंचे आंदोलन अश्या घटनांनी जनशक्तीची झलक जनशक्तीलाच दाखवून दिली. देशाच्या स्वास्थ्यासाठी जनशक्तीने प्रयत्न केल्यास उलथापालथी घडून येण्याची उदाहरणे इतर देशात होत असताना भारताची स्तिमित करणारी लोकसंख्या स्वतःसाठी किती उत्तमोत्तम बाबी घडवून आणू शकते याची जाणीव हळूहळू पसरत आहे. ही बाब थेंबभर आकाराच्या युरोपियन देशांना नक्कीच व्यवस्थित समजलेली असेल.

लोकसंख्येला असलेल्या नितांग गरजेमुळे वैद्यकीय ज्ञानाची व्याप्ती आणि प्रगती रोज अशी उंची गाठत आहे की एकुण रुपयाचे मूल्य आणि सेवाभाव असलेली माणसे हे पाहून 'मेडिकल टूरिझम' हा व्यवसाय उदयास आल्याप्रमाणे वाटत आहे. ज्या भारतात पूर्वी रोगराई आणि सुविधांचा अभाव असल्याने विकसित देश नाक मुरडायचे त्या भारतात आता त्यांचे नागरीक वैद्यकीय सेवेसाठी येऊन परकीय चलनात भर घालत आहेत.

लोकसंख्येचे दुष्परिणाम जितके, तितकेच चांगले परिणामही आहेत. लिहावे तितके कमीच ठरेल असा हा विषय आहे. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे, की लोकसंख्यावढीचा वर्तमान भारतावर चांगला, सकारात्मक परिणाम झाला हे एकवेळ मान्य झाले तरीही लोकसंख्यावाढ हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणता येईल का? प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळात घडलेली ही घटना किंवा प्रक्रिया असली तरीही ती चांगल्या उद्देशाने ठरवून करण्यात आली आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असे द्यावे लागेल. पण या कालावधीत घडलेली अशी घटना, जी सकृतदर्शनी दुष्परिणाम करणारी असली तरीही तिचे अनेक सकारात्मक परिणामही झाले, असे या लोकसंख्यावाढीला नक्कीच म्हणता यावे. भविष्यातही, नियंत्रीत वाढ भारतावर सकारात्मक परिणाम घडवून आणू शकेल असे म्हणता येईल.

माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार मी हा धाडसी लेख लिहिला खरा, पण तो विचारी प्रतिसाददात्यांनी प्रतिसादांमधून अधिक समृद्ध करण्याचे काम अवश्य करावे ही विनंती!

पुनःश्च आभारी आहे.

-'बेफिकीर'!

(संदर्भ - लोकसंख्येचे आकडे आंतरजालावरून प्राप्त केले.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम वेगळा विषय. निबंध छान झाला आहे पण प्रस्तावना जरा लांबल्यासारखी वाटली.

अतिप्रचंड लोकसंख्येची फायदे तुम्ही लिहिले आहेत ते नाकबूल करून चालणारच नाही. ते मान्य करुनही फायदे तोट्यांच्या तराजूत तोट्यांचं वजन अधिक भरतय असं वाटतं.
कल्पू +१
चीनच्या जुलमापेक्षा भारतात याबाबत लोकशिक्षण आणि जनजागृती हे अवलंबिलेले मार्ग निश्चितच जास्ती दूरगामी आणि प्रश्नांच्या मुळाशी जाणारे आहेत हे नक्की.

स्पर्धेसाठी शुभेच्छा!

बेफिकीर
प्रथम या "नाविन्यपुर्ण जुन्या" विषयाच्या निवडीबद्दल अभिनंदन.
हा विषय खरे तर आपण एका पत्रकाराप्रमाणे हाताळला म्हणजे लोकसंख्यावाढीची चांगली आणि वाईट दोन्ही बाजु हाताळली गेली.
लोकसंख्यावाढ ही खरे तर जागतिक समस्या आहे (काही युरोपियन राष्ट्रे सोडली तर), फरक इतकाच की प्रगत राष्ट्रांना या लोकसंख्यावाढीबरोबर अधिकाधीक जमीन, व नैसर्गिक संपत्ती पण उपलब्ध झाली याउलट असे न झाल्याने दक्षिणपुर्व एशियात आपण म्हटले त्याप्रमाणे ह्या समस्येने रौद्र रुप धारण केले आहे.
या विषयावरुन आजुन एका शास्त्रज्ञाची आठवण झाली त्याचे नाव "केमिकल वारफेअर" चा जनक हेबर.
आता म्हणाल याचा काय संबंध? तर ह्याच कुप्रसिद्ध ज्युइश शास्त्रज्ञाने "हेबर प्रोसेस" म्हणुन रासायनिक खते बनविण्याची पद्धत, जर्मनीची अन्नसमस्या सोडवायला शोधुन काढली आणि असे करताना जगाची अन्न उत्पादनाची शक्ती कैक पटीने वाढवली. ही उत्क्रांत झालेली शेती पद्धत आणि हरित/दुग्ध क्रांती, वाढते आयुष्यमान यामुळेच बराच काळ नियंत्रणात राहिलेली जागतीक लोकसंख्या फुगली गेली आणि युद्धे कमी झाली.
"haber-bosch process and world population" याच्यावर गुगल गुरुंना बोलवल्यावर बरीच माहिती मिळेल.

बरेचदा मी ईंग्रजी शब्द ऐकल्यावर त्यांचा नेमका अर्थ काय असेल हा विचार करत असतो. हा लेख वाचल्यावर मला "नाईव्हली ऑप्टिमिस्टिक" चा बरोब्बर अर्थ कळला.

Pages