विषय क्रमांक १ - लोकसंख्यावाढ

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2013 - 03:52

रोहन प्रकाशन व मायबोली डॉट कॉम यांनी आयोजिलेल्या लेखनस्पर्धेसाठी एक मायबोली सदस्य म्हणून आभार! या लेखनस्पर्धेत समाविष्ट केलेल्या विषयांमुळे विचारांना चालना मिळाली व स्पर्धा किती आव्हानात्मक आहे याची जाणीव होत राहिली.

भारताच्या वर्तमानावर नकारात्मक परिणाम कोणकोणत्या बाबींमुळे झाले याची यादी एखादा माणूस अगदी सहज देऊ शकेल. मात्र सकारात्मक परिणाम कोणकोणत्या गोष्टींमुळे झाले हे ठरवणे कठिण होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे लेख वाचून असे वाटू लागले की खरोखरच कितीतरी गोष्टी, व्यक्ती, कलाकृती अश्या असतील ज्यांच्यामुळे वर्तमान भारत सुसह्य देश वाटत आहे. सर्व स्पर्धकांचेही अतिशय माहितीपूर्ण लेखांसाठी आभार व अभिनंदन!

एका नाजूक विषयावर यापूर्वी मी अनेकदा विचार केलेला होता आणि तो विषय या स्पर्धेच्या निमित्ताने मला अभिप्रेत असलेल्या पद्धतीने मांडता येईल याची खात्री पटली व मी यात सहभागी होण्याचे ठरवले. माझ्या या लेखातील विचार हे दृष्टिकोन बदलण्याचा एक दुबळा अथवा अपुरा प्रयत्न वाटू शकेल याची जाणीव आहे, मात्र कृपया मला हा प्रयत्न करून पाहूदेत अशी विनंती!

१९४७ साली असलेल्या सुमारे ३६ कोटी लोकसंख्येला कुटुंब नियोजन, लोकसंख्यावाढीमुळे उद्भवू शकणारे प्रश्न यांचे फारसे वारे लागलेले नव्हते. विशिष्ट राजकीय व भौगोलिक सीमांमध्ये असलेली मर्यादीत नैसर्गीक सुबत्ता व साधनसंपत्ती उपभोगणारी लोकसंख्या जास्तीतजास्त किती असू द्यावी हा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा तो काळच नव्हता असे म्हणावे लागेल. परिणामतः स्वतंत्र भारताबाबत निर्माण झालेला ताजाताजा आपलेपणा, कुटुंबव्यवस्था हे सामर्थ्य असल्याची सार्वत्रिक ठाम भूमिका, एकत्र कुटुंबपद्धती, मुलगाच व्हावा म्हणून प्रयत्नरत राहण्याची प्रवृत्ती, तांत्रिक विकासाचा अभाव, नोकरी-व्यवसाय व कमी गरजा हे त्याकाळच्या समाजमनावर दूरगामी परिणाम करणारे घटक ठरले.

लोकसंख्यावाढीला आळा घातला नाही तर ही लोकसंख्यावाढ एक दिवस सर्व सुबत्ता गिळंकृत करेल याचे भान माणसांना वैयक्तीक पातळीवर आलेले नव्हते. शासनाच्या धोरणात लोकसंख्यावाढ सीमीत करणे याचा समावेश कालांतराने होऊ लागला, पण समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत तो विचार प्रभावीपणे पोहोचून तो सर्वमान्य होणे हे नेमके घडत नव्हते. 'माझ्या एकट्याच्या कुटुंबाने असे काय बिघडणार आहे' ही वृत्ती जोपासली जात राहिली.

या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि तिचा विस्फोट होऊन आजघडीला ती सव्वा अब्जच्या आसपास पोचलेली आहे. सहासष्ट वर्षात साडेतीनपटीने वाढलेल्या या लोकसंख्येला सामावून घेणार्‍या भौगोलिक सीमा त्याच राहिलेल्या आहेत. नैसर्गीक साधनसंपत्ती मर्यादीत असल्याने तीही झपाट्याने व्यतीत होत आहे.

खरे तर, लोकसंख्या हा आजमितीला भारतासमोरचा एक अतिशय भयप्रद प्रश्न आहे. या लोकसंख्येने सुबत्ता गिळंकृत करायचा सपाटा लावलेला आहे. खनिज संपत्ती संपुष्टात आलेल्या काही खाणी आज विषण्णपणे स्वतःचे गतवैभव आठवत कामगार कुटुंबांना उपासमारीचे भविष्य बहाल करत आहेत. रोजगाराच्या अभावाने राक्षसी स्वरूप प्राप्त केलेले आहे. पाणीसाठे, वीज उत्पादन, शेतकी उत्पादन, रस्ते, प्रवासी वाहतूक, निवास व्यवस्था, शिक्षण, दरडोई उत्पन्न अश्या अत्यंत महत्वाच्या निकषांवर भरमसाठ लोकसंख्या भारताला एक देश म्हणून कमनशीबी ठरवत आहे. विशेष म्हणजे आजही समाजातील कित्येक थरांपर्यंत कुटुंबनियोजन हा विचार नीटसा पोचलेला नसून लोकसंख्यावाढ नियंत्रणात येण्याची चिन्हे अजुनतरी दृष्टिपथात आलेली नाही आहेत. ही चक्रावून टाकणारी वाढ माणसामाणसातील जगण्याची स्पर्धा इतकी भीषण बनवत आहे की काही वर्षांनी कदाचित भारतात सर्वात स्वस्त काय असेल तर माणसाचे आयुष्य, असे वाटू लागले आहे.

संकटाला संधी माना असा एक सुविचार आपण वाचलेला असतो. पण अक्राळविक्राळ लोकसंख्येला संधी मानणे हा विचार आपल्या मनाच्या पहिल्याच थराला पटणे अवघड आहे. तो मनात आतवर सामावून, त्यावर चिंतन करून काही निष्कर्ष काढणे इतका संयम आज भारतीय सामान्य माणसाकडे कसा असू शकेल?

मात्र या निमित्ताने आपण सारे काही मिनिटे या विचाराला देऊन पाहूयात का?

लोकसंख्यावाढीला आळा घालण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम कायद्याच्या अतिशय कडक व काटेकोर अंमलबजावणीमार्फत व्हायलाच हवा आहे. मात्र, आज असलेली लोकसंख्या, जी आपलीच सुबत्ता गिळत आहे, ती आपली एक शक्तीही आहे का?

माझे मन म्हणते की 'होय, ती एक शक्तीही आहे'.

या लोकसंख्येमुळे आज आर्थिक उत्पन्नाचे कोट्यावधी थर आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. प्रत्येक गरिबाहून अधिक गरीब असलेला एक थर मिळतच आहे आणि प्रत्येक श्रीमंताहून अधिक श्रीमंत असलेला एक थर दिसतच आहे. उत्पन्नामधील या अवाढव्य वैविध्यामुळे देशात निर्माण होणार्‍या प्रत्येक कामासाठी पात्र असा माणूस आज आपल्या देशात उपलब्ध आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडे मदतीचे हात कित्येक पटीने अधिक असून तुलनेने कमी मोबदल्यात ते उपलब्ध आहेत. हे फार मोठे सामर्थ्य आहे.

आपली अफाट लोकसंख्या ही आंतरराष्ट्रीय उत्पादकांसाठी एक भली मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच संशोधन व विकास यावर तुलनेने कमी कष्ट घेऊनही आपल्याकडे प्रगत उत्पादने, तंत्रज्ञाने रोजमितीला अवतरत आहेत. माणसेच कमी असती तर ही तंत्रज्ञाने आपल्याला देण्यात या उत्पादकांना तितक्याच प्रमाणात कमी स्वारस्य असते हे मान्य व्हावे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर प्रभाव पडू शकेल इतकी आपली लोकसंख्या, एक ग्राहक म्हणून महत्वाची आहे. आजची युद्धेही भौगोलिक सीमेपेक्षा अर्थकारणाच्या मैदानावर लढली जातात. आपण एक भले मोठे ग्राहक असल्यामुळे आपल्याला कमी लेखण्याची भल्याभल्या विकसित राष्ट्रांची हिम्मत नाही.

सुदैवाने आपल्याकडे शिक्षणसंस्कृती बर्‍यापैकी प्रमाणात फोफावलेली असल्याने इतक्या प्रचंड लोकसंख्येला स्पर्धा-सिद्ध होण्यासाठी हजारो विषयांचे शिक्षण घ्यावे लागते. हे विषय, त्यावरील संशोधन, त्यातून मिळणारे उत्पन्न, रोजगार हे सर्व १९४७ च्या तुलनेत आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे. याचा अर्थ असा, की निव्वळ काळ बदलला म्हणून अधिक विकास झाला व अधिक ज्ञानसमृद्धी आली इतकेच न होता लोकसंख्यावाढीमुळे त्या विकासाचा व समृद्धीचा वेग अस्मानाला भिडला. भिडवावाच लागला. उच्चशिक्षण घेऊन परदेशात स्थायिक होणार्‍यांतही भारतीय बरेच अग्रेसर असावेत. नगण्य का असेनात, पण याचा एक अर्थ असाही होतो की अनेक परदेशातील उद्योग आपल्याकडील मनुष्यबळाचा वापर करतातच, त्यावर थोड्या प्रमाणात तरी ते अवलंबून असतातच. त्यांचे स्वतःचे नागरीक असतानाही भारतीय नागरिकांना नोकरी देण्याचा त्यांचा निर्णय हा निव्वळ रुपया स्वस्त असल्यामुळेच घेतला जातो असे नसून आपल्या नागरिकांचे अष्टपैलुत्व, तुलनेने अल्पसंतुष्ट असणे यावरही ते अवलंबून असते. आपले नागरीक असे घडण्यामागे अर्थातच आपल्याकडे अफाट लोकसंख्या असणे हे कारण असते. माणसाच्या सुबत्तेबाबतच्या, स्थैर्य व सुरक्षेबाबतच्या सर्व गरजा जागच्याजागी भागून तो समाधानी झाला तर स्थलांतराचा निर्णय तो घेणारही नाही.

अधिक चांगल्या राहणीमानाच्या ओढीमुळे निर्माण होणारी अंतर्गत स्पर्धा या प्रचंड लोकसंख्येमुळे इतके रौद्र स्वरूप धारण करत आहे की त्यामुळे समाजातील एक मोठा थर दैववादापासून प्रयत्नवादाकडे वळताना दिसत आहे. याचा लक्षणीय परिणाम अंतर्गत उत्पादने, सेवासुविधा, साधनसंपत्तीची निर्मीती यावर होत आहे. एक नवीन लोहमार्ग निर्माण करणे या कामासाठी शेकडो प्रकारचे कारखाने, रोजगार, आर्थिक उलाढाल अश्या कित्येक बाबी चैतन्यमय होतात, मग आपल्याकडे तर रोजच रस्ते, धरणे, पूल, इमारती बांधल्या जात आहेत.

एक आकाराने व लोकसंख्येनेही अफाट विस्तार असलेला देश म्हणून थेट परकीय आक्रमणाची भीती पूर्वीपेक्षा घटलेली आहे. अर्थात याची इतरही अनेक महत्वाची कारणे आहेतच, पण इतका विस्तृत प्रदेश व संस्कृती नामशेष करणे हे तितकेच अशक्यप्राय आव्हान आहे.

अतीपूर्वेकडील राज्ये, केरळ, गुजरात, काश्मीर आणि या सर्वांच्या आतील प्रदेश असा अखंड भारत एकाच तिरंग्याखाली सहासष्ट वर्षे नांदताना त्यात पुन्हा लोकसंख्येने विस्तारीत होतो हे पाहून परदेशांचे डोळे चक्रावत असतील. अत्यंत दुर्दैवी व मान खाली घालावयास लावणारे निर्भया प्रकरण व त्याशिवाय अण्णा हजारेंचे आंदोलन अश्या घटनांनी जनशक्तीची झलक जनशक्तीलाच दाखवून दिली. देशाच्या स्वास्थ्यासाठी जनशक्तीने प्रयत्न केल्यास उलथापालथी घडून येण्याची उदाहरणे इतर देशात होत असताना भारताची स्तिमित करणारी लोकसंख्या स्वतःसाठी किती उत्तमोत्तम बाबी घडवून आणू शकते याची जाणीव हळूहळू पसरत आहे. ही बाब थेंबभर आकाराच्या युरोपियन देशांना नक्कीच व्यवस्थित समजलेली असेल.

लोकसंख्येला असलेल्या नितांग गरजेमुळे वैद्यकीय ज्ञानाची व्याप्ती आणि प्रगती रोज अशी उंची गाठत आहे की एकुण रुपयाचे मूल्य आणि सेवाभाव असलेली माणसे हे पाहून 'मेडिकल टूरिझम' हा व्यवसाय उदयास आल्याप्रमाणे वाटत आहे. ज्या भारतात पूर्वी रोगराई आणि सुविधांचा अभाव असल्याने विकसित देश नाक मुरडायचे त्या भारतात आता त्यांचे नागरीक वैद्यकीय सेवेसाठी येऊन परकीय चलनात भर घालत आहेत.

लोकसंख्येचे दुष्परिणाम जितके, तितकेच चांगले परिणामही आहेत. लिहावे तितके कमीच ठरेल असा हा विषय आहे. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे, की लोकसंख्यावढीचा वर्तमान भारतावर चांगला, सकारात्मक परिणाम झाला हे एकवेळ मान्य झाले तरीही लोकसंख्यावाढ हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणता येईल का? प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळात घडलेली ही घटना किंवा प्रक्रिया असली तरीही ती चांगल्या उद्देशाने ठरवून करण्यात आली आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने 'नाही' असे द्यावे लागेल. पण या कालावधीत घडलेली अशी घटना, जी सकृतदर्शनी दुष्परिणाम करणारी असली तरीही तिचे अनेक सकारात्मक परिणामही झाले, असे या लोकसंख्यावाढीला नक्कीच म्हणता यावे. भविष्यातही, नियंत्रीत वाढ भारतावर सकारात्मक परिणाम घडवून आणू शकेल असे म्हणता येईल.

माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार मी हा धाडसी लेख लिहिला खरा, पण तो विचारी प्रतिसाददात्यांनी प्रतिसादांमधून अधिक समृद्ध करण्याचे काम अवश्य करावे ही विनंती!

पुनःश्च आभारी आहे.

-'बेफिकीर'!

(संदर्भ - लोकसंख्येचे आकडे आंतरजालावरून प्राप्त केले.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर, खूपशी आकडेवारी अन तक्ते न देताही तुम्ही जो मुद्दा स्पर्शिला आहे तो सर्वात कळीचा आहे इतकेच प्रकर्षाने जाणवले. भारताच्या भविष्याबद्दल चिंता असणार्‍या प्रत्येकाला या वाढीच्या मिती भेडसावत असतात.
>>या सर्वाचा व्हायचा तोच परिणाम होऊन लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि तिचा विस्फोट होऊन आजघडीला ती सव्वा अब्जच्या आसपास पोचलेली आहे. सहासष्ट वर्षात साडेतीनपटीने वाढलेल्या या लोकसंख्येला सामावून घेणार्‍या भौगोलिक सीमा त्याच राहिलेल्या आहेत>>>>

अमेरिकेशी तुलना करता ढोबळमानाने भारताच्या चारपट भूविस्तार असलेल्या अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या एकचतुर्थांश आहे.

या एका मुद्द्यावर सारे विकासप्रयत्न, साधनसामग्री, मूलभूत सुविधा अन शेवटी नागरिकांचा आत्मसन्मान यांच्या धज्ज्या उडत आहेत.शिवाय ही वाढ नाहीरे वर्गात जास्त झाल्याने विषमता वाढणे क्रमप्राप्त आहे. वाढलेली गुन्हेगारी, बालके-वृद्ध-स्त्रियांची असुरक्षितता, अपंगांची दुर्दशा सार्‍याचे कारण हेच.

तुम्ही या वाढीकडे सकारात्मक दृष्टीने पाहाण्याचा प्रयत्न केला आहे. पण वाढत्या लोकसंख्येला कठोर संततीनियमनाची जोड देऊन तिचा गुणात्मक दर्जा सुधारणे व तिचे एका ऊर्जास्त्रोतात रुपांतर करण्याचा यशस्वी प्रयत्न चीनने केला तसा आपल्याला आपल्या शतखंडित भाषा, संस्कृती, अस्मिता, जाती ,धर्म यांच्या गदारोळात व राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे करता आलेला नाही .

हा विषय एका वेगळ्या अंदाजाने पटलावर घेतल्याबद्दल आभार व शुभेच्छा.

वेगळा विचार केल्याबद्दल अभिनंदन.
भारताच्या लोकसंख्येची वयोगटवार सध्याची जी स्थिती आहे, ती भारताला अत्यंत फायदेकारक आहे. भारतात तरुणांचे प्रमाण जास्त आहे. वाढते आहे. त्यामुळे येणारा कारण तसा आव्हानात्मकही आहे. (तरुण हातांना उद्योग देणे गरजेचे आहे.) बर्‍याच प्रगत देशांत निवृत्तांचे प्रमाण जास्त आहे. काही देशांमध्ये लोकसंख्यावाढीचा दर उणे (म्हणजे लोकसंख्या वाढीऐवजी घट) झालेले असल्याने तिथे मुले जन्माला घालण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन द्यावे लागते आहे.

लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहण्याचा वेगळा विचार तुम्ही दिला आहे. पण दुर्देवाने, राज्यकर्त्यांनी जनतेच्या साहाय्याने जे हातात आहे त्या गोष्टींना ’दिशा’ देण्याची जी गरज असते त्याची आपल्याकडे कमतरता आहे. वरवर पाहता चित्र वेगळं असल्याने तुम्ही लिहलं आहे ते वाचून पुन्हा एकदा त्या दृष्टीकोनातून या सगळ्या बाबींकडे पाहायला हवं असं वाटलं.

बेफि, वेगळ्या नजरेने बघताय खरे पण हे सगळे अनायासे झालेले आहे, असे नाही वाटत ? कुटुंब नियोजनाबद्दल आता सरकारकडून काही ऐकायलाच मिळत नाही. जणू हा प्रश्नच आता निकालात निघाला आहे.

हे सकारात्मक परिणाम आहेत हे मान्य पण या वाढत्या लोक्संख्येमूळेच बरेचसे प्रश्न ( बेकारी, गरीबी, गुन्हेगारी, शिक्षणाचा अभाव.. ) निर्माण झालेत असे नाही का वाटत ? नव्याने निर्माण होणार्‍या सुविधा, मोबाईलसारखा
एखादा अपवाद सोडल्यास, कितीजणांच्या आवाक्यात आहेत ?

बेफिकीरः
प्रथम इतक्या नाजुक विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन! पण मला तुमचा लेख खूपच भाबडा वाटला. फुगलेल्या लोकसंख्येचे दुष्परीणाम एवढे आहेत की भारत हा जगातली मोट्ठी पण अतिशय आजारी आणि पोखरलेली बाजारपेठ झाला आहे. भारती यांनी त्यांच्या प्रतिसादात हा मुद्दा अतिशय समर्पक रीत्या मांडला आहे. Huge pouplation has contributed more towards weakness than strength for India.

<कुटुंब नियोजनाबद्दल आता सरकारकडून काही ऐकायलाच मिळत नाही. जणू हा प्रश्नच आता निकालात निघाला आहे.> कुटुंब नियोजन कार्यक्रम कुटुंब कल्याण (फॅमिली वेल्फेअर) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चालवले जातात.
बालमृत्यूचे, बाळंतपणातील स्त्री-मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर जोर आहे.
२००१-११ या दशकात लोकसंख्यावाढीच्या दराने स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी घट नोंदवली. गेल्या तीन दशकांतले लोकसंख्यावाढीचे (दशकासाठीचे ) दर : १९८१-९१ : २३.८७%. १९९१-२००१ : २१.५४ (२.३३% घट)
२००१-११ : १७.६१% (३.९०% घट)
लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर असाच २.१६%, १.९७% पासून १.६४% पर्यंत खाली आला आहे.
जन्मदर १९९१ मधील २९.५ प्रतिहजार वरून २००९ पर्यंत २२.५ इतका कमी झाला आहे. तरीही तो आणखी कमी व्हायला हवाच आहे. चीनचा लोकसंख्यावाढीचा दर जगातला सर्वाधिक कमी दरांमधला असला तरी चीनने योजलेले उपाय आपल्याकडे योजणे शक्य नाही.

प्रतिसाददात्यांनी प्रतिसादांमधून अधिक समृद्ध करण्याचे काम अवश्य करावे
<<
ही तर मायबोलीची खासियत आहे, की इथली मेंब्रं, कोणताही लेख प्रतिसाद देऊन देऊन अगदी समृद्ध करून सोडतात. Wink

तसा मी तुमच्याशी सहमत आहे.
तरुणांचा देश असण्याचे, व लोकसंख्येचा उलटा पिरॅमिड नसण्याचे फायदे आहेतच.

पण लेख पूर्ण वाचला नाहिये अजून, जस्ट स्कॅन केला. डिट्टेलवार वाचून पर्तिसाद देणेत येईल अशी खात्री देतो.

स्पर्धेसाठी शुभेच्छा.

बेफिकीर, फक्त विकीचा संदर्भ घेण्यापेक्षा अनेक प्रकारची अधिकृत आकडेवारी जालावरच उपलब्ध आहे. तिचा आधार घेऊन, लेख अधिक परिपूर्ण करता येईल. संयोजकांची परवानगी मात्र लागेल.

भारताच्या सर्वात गंभीर सम्यस्येवर प्रकाश टाकला आहे. चांगला लेख. आवडला, आणि बेफीजी शुभेच्छा!

विषय निवड - एकदम चांगली. मुद्दे - काही मुद्दे एकदमच चांगले आहेत आणि अजून लिहिता आले असते.

तरूणांचा देश आहे हे खरे आहे त्यामुळेच जागतिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आपण होतो( होतो लिहिले ह्याची नोंद घ्यावी) पण ही शक्ती आपण एक देश म्हणून वाया घालवत आहोत हे ही सत्य आहे.

केवळ इंटरनेट / सोशल मिडीया मुळे निर्माण होणारी प्रतिक्रिया ही काहीवेळच टिकत आहे हे त्या दोन्ही घटनेतून सिद्ध होते आहे. लोकं (तरूणाई) केवळ निषेध आणि नेटवरील भांडणे इतक्या पुरतीच उरली आहे. त्यांना मार्ग दाखवणारे सक्षम नेतृत्व आज देशात उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. (नेतृत्व हे राजकीय पार्टीतच असायला हवे असे नाही.)

लेख धाडसी निश्चित आहे; त्यातही लोकसंख्या हा विषय डोक्यावरील केस कमी करण्याचा विषय असूनही श्री.बेफिकीर यानी अत्यंत संयमाने त्यावर होकारात्मक लिखाण केल्याचे जाणवते. स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही दशकात....आणि कोणत्याही पक्षाचे सरकार असतानाही....लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम यावर सरकारला नेहमी संघर्ष करावा लागला आहे असा इतिहास आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय गांधीने राबविलेल्या योजनेपोटी आय कॉन्ग्रेसला सत्तवरून पायउतार व्हावे लागले होते. तो विषय इतका हळवा झाला होता की आलेल्या जनता सरकारने 'कुटुंब नियोजन' हे खातेच रद्दबातल करून त्याला 'कुटुंब कल्याण' असे फसगतीचे नाव दिले.... आणि मग या खात्याचे काय काम ? काहीही नाही. सत्तेच्या पहिल्या महिन्यातच सरकारी दवाख्यान्यातून कुटुंब नियोजनाचा गाशा गुंडाळला गेला होता.

अशा विचित्र परिस्थितीत शासन यंत्रणा तरी वाढीवर कसा ताबा ठेवेल ? जे जे होईल ते ते पाहात जावे असा एकच धोशा सरकारला करावा लागला आणि त्याचे जे काही परिणाम भोगावे लागत असतील ते आज या तब्बल सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशाला भोगावे लागणार आहेत.

वर एका प्रतिसादात भारती म्हणतात, "... वाढत्या लोकसंख्येला कठोर संततीनियमनाची जोड देऊन तिचा गुणात्मक दर्जा सुधारणे..."; पण मला वाटते या वाक्यातील 'कठोर' शब्द असा काही अघोर आहे की ज्याचा वापर कोणतेही शासन करायला धजणार नाही.

फार क्लिष्ट आणि तितकाच मेंदूचा भुगा करणारा हा विषय आहे, तरीही तो छानपैकी श्री.बेफिकीर यानी शब्दमर्यादेत तोलला आहे.

अशोक पाटील

बेफिकीर, छान लिहीलंय.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय गांधीने राबविलेल्या योजनेपोटी आय कॉन्ग्रेसला सत्तवरून पायउतार व्हावे लागले होते. तो विषय इतका हळवा झाला होता >>> अशोकजी, अगदी अगदी. मी हेच लिहायला आले होते. तेव्हा संतती नियमनाच्या जिल्हावार स्पर्धा लावत असत. गडचिरोलि जिल्हा पहिला आला होता. कारण तिथल्या निरक्षर आदिवासींना प़कडून, फसवून त्यांच्यावर नसबंदी केली जात होती. ज्या आदिवासींमधे अर्भक मृत्यू व बाल मृत्यूचं प्रमाण प्रचंड होतं त्यांच्यावर हे लादणं हा केवढा निर्दयपणा होता.

इतर देशांच्या तुलनेत भारत तरुणांचा देश आहे हे बर्याचदा वाचनात येतं. या तरुणाईची आकडेवारी कुठे उपलब्ध आहे? यात मध्यमवर्गीय, कायदा पाळणार्या / कायदा मानणार्या घरांतली मंडळी किती आहेत? या आकडेवारीवरून देश तरुण आहे म्हणून हुरळून जायचं कि काळजी करायची, उपाय योजना करायची त्याची कल्पना येईल.

राज इथे http://www.prb.org/pdf13/youth-data-sheet-2013.pdf १०-२४ ची पाप्युलेशन बघायला मिळेल.

अशीच एक डेटा शिट २०१२ ची होती तिथे २५ टू ३५ असा डेटा मिळेल.

यात मध्यमवर्गीय, कायदा पाळणार्या / कायदा मानणार्या घरांतली मंडळी किती आहेत >. Lol मध्यमवर्गीय मिळेल पण कायदा पाळणारी कुठल्याच देशाची मिळेल असे वाटत नाही.

<यात मध्यमवर्गीय, कायदा पाळणार्या / कायदा मानणार्या घरांतली मंडळी किती आहेत?>

या दोन्हींची वेगवेगळी संख्या अपेक्षित आहे ना? Wink

धन्यवाद केदार! क्रिमिनल रेकॉर्डस, पोलिस ब्लॉटर्स याचा डेटा (डेमोग्राफि) मिळवणं अशक्य नसावं. तुम्ही दिलेल्या लिंकमधील माहिती विचार करण्याजोगी आहे. एस्पेशियली, एज्युकेशन-एम्प्लॉयमेंट आणि हेल्थ रिस्क्-बिहेवियर बाबतीतली.

"... वाढत्या लोकसंख्येला कठोर संततीनियमनाची जोड देऊन तिचा गुणात्मक दर्जा सुधारणे...";

अशोकजी , मान्य,माझ्या 'कठोर' चा अर्थ दुर्दैवाने 'अघोर' असा लावला जाऊ शकतो, तसे भूतकालीन संदर्भ आहेत.मला नि:पक्षपातीपणा , देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी वचनबद्धता असे काहीसे अभिप्रेत होते.. लिहितालिहिताच माझा मलाच याही शब्दांचा आपल्या वास्तवातला फोलपणा विविध कारणांनी जाणवत आहे.

अगदी चीनमध्येही इन्सेंटिव्ह स्वरूपाचेच उपाय जास्त योजले गेले व आशियाई 'मुलगा हवाच'' या मानसिकतेमुळे ते निष्प्रभ ठरत गेले तरीही कम्युनिस्ट राजवटीमुळे काही अंशी तरी परिणाम साधण्यात चीनला यश आले आहे.

शुगोल....

तुम्ही दिलेले गडचिरोली जिल्ह्याचे उदाहरण अचूक आहे आणि त्या साली "सक्ती" म्हणजे काय असते याचे प्रत्यंतर तेथीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यानांनी उमजून चुकले होते. त्या वर्षी उत्तर भारतातील हरियाणा आणि उ.प्र. मध्ये तर संजय गांधी आणि त्याच्या चौकडीने "कुटुंब नियोजना" ची मोहिम अशी काही धडाकेबाज चालविली होती की त्यातून पुढे आलेले आकडे थक्क करणारे ठरले. रितसर प्रोग्राममुळे आणीबाणीच्या आदल्या वर्षी जिथे वीस लाख शस्त्रक्रिया केल्या गेल्या तिथे आणीबाणीच्या वर्षात तब्बल ८३ लाख नसबंदीचा आकडा मिळविता आला.

हे कसे शक्य झाले आणि कुणी केले याबद्दल या घडीला चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण ज्यानी ते केले [वा त्यांच्या कृतीना ज्यानी आशीर्वाद दिले] ती सारीच मंडळी आता पडद्याआड झाली आहेत.

लोकशाहीच्या जडणघडणीला कुणी कितीही नावे ठेवो पण याच लोकशाहीच्या आधारे आपण एकत्र येऊन अशा हुकूमशाही कृत्यांचा यशस्वीरित्या बिमोड करू शकतो. इंदिरा गांधी २१ महिन्याचा तो कालावधी मनी कायमच्या ठेवून बसल्या आणि ज्यावेळी त्याना कळले की हीच लोकशाहीप्रेमी जनता वेळ आली की हृदयात घर केलेल्या व्यक्तीलाही पायऊतार करायला लावते, तेव्हाच त्यानी पुनःश्च लोकशाहीचा रस्ता धरला होता.

अशोक पाटील

भारती....

मराठीमधील विशेषण तसेच क्रियाविशेषणांची हीच खासीयत आहे की तिचा वापर आपण कुठे आणि कसा करीत आहोत त्यावर त्या पूर्ण वाक्याची परिणामकारता अवलंबून असते. तुमचे वाक्य भावना व्यक्त करते... "... वाढत्या लोकसंख्येला कठोर संततीनियमनाची जोड देऊन तिचा गुणात्मक दर्जा सुधारणे...". इथल्या 'कठोर" विशेषणाचा अर्थ इंग्रजीमध्ये केल्यास 'हार्श, स्टर्न, सेव्हिअर, हार्ड, रीगरस....' आदी भाव प्रकट होतात ज्यांची अंमलबजावणी करायची झाल्यास शासनकर्त्याला नेहमीच्या योजनांना बाजूला ठेवून अन्य प्रभावी मार्ग अवलंबणे क्रमप्राप्त आहे.

नेमका हाच प्रकार संजय गांधी, बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला आदी आणीबाणी काळातील सरदारांनी इंदिरा गांधींना अंधारात ठेवून केल्याचा दाखला आहे. सुप्रसिद्ध पत्रकार मार्क टुली नी हा प्रकार प्रत्यक्षदर्शी पाहिला होता. त्याला अनुसरून त्यानी लिहिले होते ~ "संजय गांधीने त्या काळात काय केले असेल तर त्यानी बेगुमानपणे आपल्या आईकडे असलेली 'ड्रॅकोनीअन पॉवर' स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आणि त्याचा सर्वात फटका बसला तो प्रशासनला. अत्यंत कठोरपणे संजयने त्या ठिकाणी पोलिस राज आणले...."

इथे 'कठोर' चा व्याख्या पूर्णतया परिणामकारक वाटते. आता या दशकात तितक्या कठोरपणे कुणी शहाणा राजकारणी तितकी आततायी पाऊले [कोणत्याही विषयाच्या निमित्ताने] उचलू शकत नाही. कुटुंब नियोजनाच्याबाबतीत तर नाहीच नाही. ही वस्तुस्थिती कदाचित शोचनीय वाटेल, पण तशी ती आहे हे मात्र खरे.

अशोक पाटील

यात मध्यमवर्गीय, कायदा पाळणार्या / कायदा मानणार्या घरांतली मंडळी किती आहेत? या आकडेवारीवरून देश तरुण आहे म्हणून हुरळून जायचं कि काळजी करायची, उपाय योजना करायची त्याची कल्पना येईल.
<<
राज यांच्या मनातली काळजी थोऽडी समजू शकतो.
पण मग प्रश्न मनात येतो, की
मध्यमवर्गीय पापभीरू घरांत जन्मलेली तरुण मुले वाममार्गाला लागतच नाहीत काय?
भारतभर पसरलेल्या शिपाई कारकूनापासून आयएएस साहेबापर्यंतचे लक्षावधी लाचखोर सरकारी नोकरांपैकी किती लोक मध्यमवर्गीय व कायदा मानणार्‍या घरांत जन्मले असावेत? काही ढोबळ अंदाज?

काळजी वाटते, त्यावर इलाज म्हणून या तरुणाईला योग्य शिक्षण व प्रशिक्षण देऊन एम्प्लॉयेबल बनवायचे, कायदे पाळायला शिकवयचे, अशा उपाय योजना करणे अधिक उत्तम, की सरसकट नसबंद्या करून जननप्रमाण कमी करून टाकायचे, हे उत्तम?

चीन लोकसंख्येला आळा घालतोय हे नुसते दुरून दिसते. दुरुनच इतर आकडेवार्‍या व बातम्याही ऐकायला मिळतात.

*

स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या वेगाने वाढली असे वाटते, ती नुसत्या जन्मदरामुळे नव्हे.
दुष्काळ व साथींचे रोग आटोक्यात आल्यने मृत्यूदर कमी झाला. बाल-माता मृत्यू दर देखिल लक्षणीय रित्या घटला. अ‍ॅवरेज लाईफस्पॅन वाढला.

वर लोकसंख्यावाढीच्या दराची आकडेवारी मयेकरांनी दिली आहे, त्यात तो घटतो आहे हे दिसतेच आहे.

*

राहिला प्रश्न 'ही प्रचण्ड लोकसंख्या अ‍ॅसेट आहे की लायेबिलिटी?'

आज जगातील अनेक प्रगत देशांत विशेषतः युरोपिय देश : जे चित्र दिसते आहे, ते असे, की रिटायर झालेल्या, व अ‍ॅक्चुअली प्रॉडक्टिव्ह नसलेल्या लोकांची संख्या ही कमावत्या तरुणांपेक्षा खूप मोठी होऊ लागली आहे. याच सोबत आजची तरुण जोडपी मुले होउ द्यायला नाखुश आहेत, म्हणून येत्या ६०-७० वर्षांत हे प्रमाण अजूनच व्यस्त होईल. हाच तो लोकसंख्येचा उलटा पिरॅमिड. याचा सरळ परिणाम देशाच्या प्रगतीवर व उत्पादनक्षमतेवर पडतो, म्हणून तिथे शासकीय पातळीव मुले होऊ देण्यासाठी इन्सेन्टिव्ह दिला जातो आहे.

आपल्याकडे हे चित्र असे नसेल. आपल्या देशात पुढचे शतकभर तरी कमावत्या लोकांची संख्या निवृत्त वृद्धांच्या संख्येपेक्षा अधिक रहाणार आहे. याने देशाचे एकूण उत्पन्न, व देशाला करावा लागणारा खर्च यांचा ताळेबंद फायद्याचा ठरणार आहे.

आपल्या लोकसंख्येत साक्षरता वाढीस लागलेली स्पष्ट दिसते आहे. तसेच मुलांचे एकंदर आरोग्य भरपूर सुधारलेले दिसते आहे. आमच्या कॉलेज दिवसातील ग्रूपफोटोत किरकोळ शरीर यष्टीच्या मुलामुलींचे प्रमाण जास्त होते, हे आजकालच्या मुलांकडे पाहून पटकन लक्षात येते.

यापाठीमागे गर्भार स्त्रीला मिळणार्‍या पोषण आहारापासून गावोगावी बाळंतपणे घरी करण्याऐवजी दवाखान्यात करा, हे प्रयत्न, एकंदरितच शिक्षणात वाढ झाल्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता हे देखिल आहे.

नवी पिढी अधीक सक्षम, शारिरिक व शैक्षणिक दृष्ट्या देखिल होत आहे. चुकीच्या, अनिष्ट बाबींचा निषेध करायला हीच पिढी रस्त्यावर उतरते आहे, हे वर लिहिलए गेलेच आहे.

देशाच्या प्रगतीचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेतच. त्यात अजून वाढ व्हायला हवी.

ओव्हरनाईट फरक दिसणार नाही. ६० वर्षांत बराच पडला आहे, पुढच्या २०-३० वर्षांत थोडा जास्त पट फरक दिसेल असे वाटते... पण राष्ट्रांच्या लाईफस्पॅनमधे २०-३० वर्षे किती मिनिटांची असतात?

*

लांबलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व. मोठ्या लोकसंख्येच्या फायद्यांचे आणिक कंगोरे आहेत, पण ते नंतर.

<अगदी चीनमध्येही इन्सेंटिव्ह स्वरूपाचेच उपाय जास्त योजले गेले > याबद्दल जास्त वाचायला आवडेल.
माझ्या वाचनात आलेले काही
Thus began the most forceful population-control program since Nazi Germany. Qian Xinzhong, a Soviet-trained former major general in the People’s Liberation Army, was placed in charge of the campaign. He ordered all women with one child to have a stainless steel IUD inserted and to be inspected regularly to make sure they had not tampered with it. To remove the device was deemed a criminal act. All parents with two or more children were to be sterilized. No pregnancies were legal for anyone under 23, whether married or not, and all unauthorized pregnancies were to be aborted.Women who defied these injunctions were taken and sterilized by force. Babies would be aborted right through the ninth month of pregnancy, with many crying as they were being stabbed to death at the moment of birth. Those women who fled to try to save their children were hunted, and if they could not be caught, their houses were torn down, and their parents thrown in prison, there to linger until a ransom of 20,000 yuan - about three years’ income for a peasant - was paid for their release.

Babies born to such fugitives were declared to be “black children,” illegal non-persons in the eyes of the state, without any right to employment, public schooling, health care or reproduction. Millions have been confiscated from their mothers and placed in “orphanages” where, if not adopted in short order, they are left to expire without food in “dying rooms.”

चिनमध्ये मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे, ते "मुलगाच " हवा ह्या हव्यासाने. आज कित्येक चिनी पुरुषांना मुली मिळणे अवघड झालेय.
इब्लिस अगदी बरोबर. पिरॅमिड सांभाळला नाहीतर चीनपेक्षाही वाईट परिस्थिती होवू शकते. त्यामानाने भारत चांगल्या पद्धतीने (शिक्षण आणि जनजागॄती करुन) लोकसंखेवर आळा घालत आहे.

विषयाची निवड उत्तम.
सकारात्मक सूरही आवडला.

(कृपया गैरसमज नसावा, पण लिहिताना 'या लेखावर मायबोलीवर काय-काय वादविवाद होतील' असा विचार सतत मनात ठेवून 'प्लेइंग सेफ' स्टाईलनं लेखन झालंय, की काय, असं वाटलं.)

चीनच्या लोकसंख्येबद्दल, तिथल्या कुटुंबनियोजनाच्या कठोर उपायांबद्दल आताचे तिथले तरूण राज्यकर्ते काय विचार करत आहेत याबद्दल आजच्या लोकसत्तामधे आलेला लेख - 'दुसर्‍या संधीसाठी चीन राजी?'
http://epaper.loksatta.com/152077/indian-express/26-08-2013#page/7/2

(कृपया गैरसमज नसावा, पण लिहिताना 'या लेखावर मायबोलीवर काय-काय वादविवाद होतील' असा विचार सतत मनात ठेवून 'प्लेइंग सेफ' स्टाईलनं लेखन झालंय, की काय, असं वाटलं.)<<<

एक गुणी निरिक्षण म्हणता येईल हे! मात्र प्रामाणिकपणे सांगायचे तर या धाग्यावर वादविवाद होणार नाहीत असेच वाटत होते वा आहे, याचे कारण हा धागा स्पर्धेसाठी लिहिला गेलेला आहे. सहसा स्पर्धेत समाविष्ट झालेल्या धाग्यावर प्रतिसाददाते विशेष तीव्रपणे भावना व्यक्त करत नाहीत. 'प्लेईंग सेफ' या शैलीतील लेखनाचे एकमेव कारण हे आहे की विषय संवेदनशील आहे, त्या विषयाबाबतचा मी मांडलेला सूर नेमका उलट दिशेचा आहे आणि विषयाचा आवाका इतका आहे की शब्दमर्यादेत तो बसवताना माझ्याकडून लेखाला पुरेसा न्याय मिळाला असेल की नाही ही चिंता मनाला सतावत आहे. Happy

मात्र, सर्व विचारपूर्वक दिलेल्या संयत प्रतिसादांसाठी प्रतिसाददात्यांचे आभार मानतो. अनेकांची मते पटत आहेत, काही पटत नाही आहेत, पण लोकसंख्यावाढ हे एक सामर्थ्य आहे हा मुद्दा सर्वांना काही प्रमाणात मान्य होत आहे असेही दिसत आहे.

खरे तर आता असे वाटत आहे की आता या लेखाखाली थोडे वादविवाद झाले तरीही ते कंट्रिब्यूटरीच ठरू शकतील.

पुनःश्च आभार!

-'बेफिकीर'!

लोकसंख्या वाढीमुळे झालेलं एक निरीक्षण मी इथे नोदंवितो..... आज आपल्या देशात काही अघटीत घडलं... म्हणजे... महापुर आला, दरड कोसळली, नविन/जुनी इमारत कोसळली, रोडवर अपघात झाला, यात्रेत धावपळ झाली की.... सगळ्यात आधी बातमी येते की त्यात किती लोक मेले हि....तसचं यामुळे गावात जमीन विकत घेणे... शहरात घर विकत घेणे... ह्या गोष्टी ज्या घरात एकच माणुस कमावता आहे किंवा ज्यांचे हातावर पोट आहे.... अशा माणसाला ह्या जन्मात तरी शक्य नाही.....तसेच रोडची रुंदी वाढवणे... एखादं धरण बांधणे... कारखाण्यासाठी जमिन संपादन करणे.. ह्या किती कठीण गोष्टी झाल्या आहेत....तेव्हा हे काही विकासाचे लक्षण नाही...... तेव्हा कधीतरी आपला देश आर्थिक महासत्ता होईल.... असे दिवास्वप्न पाहु नका.

Pages