विषय क्रमांक १ - टाटा नॅनो ' प्रॉमिस इज प्रॉमिस '

Submitted by अंकुरादित्य on 24 August, 2013 - 02:36

कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?

''आज छोटी म्हणाली , बाबा उद्यापासून तुम्ही मला शाळेत सोडायला येऊ नका . तीला कमीपणा वाटतो . माझा अन आपल्या स्कूटरचा . . तिच्या मैत्रिणी गाडीतून येतात . चिडवतात तीला . एक 'साधी ' गाडी नाही म्हणून . साध्या माणसाकडे कशी असणार ग गाडी ?? दूरच्या शाळेत जाताना माझी पोरगी माझ्यापासून दूर जात आहे . . . '' भावनांनी ओलावलेल्या रात्रीला आश्रुनी चिंब करणारे शब्द प्रत्येकाने ऐकले , अनुभवले असतील . कधी स्वतःच्या घरात तर कधी शेजाऱ्याच्या . . कधी ट्रेन मध्ये शेजाऱ्या कडून तर कधी ऑफिस मधल्या सहकाऱ्या कडून . शब्दांची पेरण वेगळी असली तरी वास्तवाची दाहकता सारखीच असते . आपण 'गाडी ' घेऊ शकत नाही याचे दुक्खच वेगळे असते . अनेक प्रौढ सायकलच्या दांडीवर किंवा पेट्रोलच्या टाकीवर बसलेल्या पोरासोबत लहान होतात . समोरून चाललेल्या चकचकीत गाडीकडे हरखून बघतात . पोराची आणि पोरसवदा मनाची समजूत घालत रस्ता संपवू बघतात . अशी अनेक कुटुंबे , अनेक कुटुंब प्रमुख आहेत ज्यांना पद्मिनीच्या जमान्यापासून गाडी घ्यायची असते पण जमाना गेला तरी त्यांचे स्वप्न 'अबाधित ' असते . कधी बस मध्ये लोंबकळत , ट्रेन मध्ये लटकत , टमटम मध्ये कोंबत , टेक्सी मध्ये गुदमरत रोजचा प्रवास करत करत असतात . जीवासाठी . . जीव धोक्यात घालून . अशा अनेक लोंबकाळलेल्या , लटकलेल्या , कोंबलेल्या , गुदमरलेल्या आणि घुसमटलेल्या जीवांकडे लक्ष कोण देणार ? आताच्या 'संस्कृतीत ' काच बंद केली किंवा दरवाजा जोरात आपटला की सगळे प्रश्न 'आपल्यापुरते ' संपतात . . या संकुचित जगात असा एकतरी जीव असतो जो इतरांची घुसमट समजू शकतो . त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारा असतो . निराशेला आशेत आणि नाही रे ला आहे रे मध्ये बदलण्याची क्षमता राखून असतो . . गरज असते योग्य 'वेळ ' येण्याची .

. .
सन २००३ . कलकत्ता मधील हात रिक्षा ओढणारे रिक्षावान . दोन चाकांवरून वरून जाणारे चौकोनी कुटुंब . . एक अपत्य पुढे उभारलेले , चालक वडील , एखादे बाळ हातात घेऊन मागे बसलेली स्त्री . . यांच्या सुरक्षेचे काय ? रात्रीची वेळ किंवा निसरड्या रस्त्यावरून जाणाऱ्या या कुटुंबाच्या भविष्याचे काय ? दोन चाकांना आणखी दोन चाके जोडली तर स्थिरता येईल ? डोक्यावर छत दिले तर हे वाचतील ? याच प्रश्नांनी एका उत्तराला जन्म दिला . . भविष्यातील यशोगाथेची बीजे पेरली . . रतन टाटा नामक अवलियाला अमरत्व मिळवून दिले . गाडीच्या काचेतून सगळेच बाहेर पाहतात . बाहेर बघितलेले चित्र त्याच्या अलिप्त बाजूसह मनावर उमटले तरच 'बदल ' होतो . टाटांनी भारत बदलवला . जगाचा भारताकडे पहायचा दृष्टीकोन बदलवला . जग्वार आणि लेंड रोवर आपल्या ताब्यात घेऊन जगाला संदेश दिला की भारतीय केवळ विक्रीत माहीर नाहीत तर खरेदीत सुद्धा बाजीगर आहेत . अशा टाटांनी स्वप्न बघणे काही कौतुकाची गोष्ट नाही . कारण बघितलेले स्वप्न पूर्ण करायची त्यांच्यात वैचारिक , आर्थिक ताकद आहे . पण . . . कर्तुत्वाच्या आकाशात भरारी मारत असताना , आपल्या स्वप्नांना कवेत घेत असताना आपल्याच देशातील अनेक वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारे , कितेक कुटुंबांच्या सुरक्षेचे स्वप्न पाहणारे स्वप्न पाहणे हे कौतुकास्पद आहे . सन २००३ प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवले पाहिजे कारण याच वर्षी एका स्वप्नाचा जन्म झाला . . याच वर्षी नव्या आव्हानांचा आणि आव्हान पूर्ततेसाठी संघर्षाचा जन्म झाला
. .
भारत आणि इंडिया यात फरक असतो (म्हणे ) . एकदम हे विधान ऐकले की देशाची पुन्हा एकदा फाळणी झाली का ? असा प्रश्न पडून हात गुगल कडे वळतात . काही सेकंदाने आपली चूक आणि भारत इंडियातला फरक समजू लागतो . इंडिया नेहमीच शायनिंग असतो . देशाचे आणि राज्याचे 'बजेट ' बघून झाले की 'बजेट ' या शब्दाशी त्यांचा संबंध संपतो . पण भारत ? बजेट मध्ये बसेल इतकेच आयुष्य जगत असतो . त्यामुळे भारतासाठी गाडी तयार करताना 'किंमत ' हा महत्वाचा मुद्दा होता . एक लाख रुपये अशी लाख मोलाची किंमत ठरवून टाटांनी भारताला गाडीचे स्वप्न दाखवले . टाटा ' आशियातील लोकांची गाडी ' करण्यास उत्सुक होते . ज्यात भारत , मलेशिया आणि इंडोनेशिया यांनी संयुक्तपणे गाडीची निर्मिती करायची .गाडीचे भाग आपापल्या देशात तयार करायचे आणि ते जोडायचे . पण असे झाले असते तर 'न्यूयॉर्क टाइम्स ' ला ' गांधीयन इंजीनीअरिंग ' असे बिरुद नॅनो ला देता आले नसते . ही गाडी मध्यमवर्गीयांसाठी (गरीब )असली तरी केवळ मध्यम वर्गापुरती मर्यादित नवती . रतन टाटा म्हणतात ,'' अमेरिकेत एका गेरेज मध्ये १ -२ बेंटली किंवा महागडी मर्सिडीज असते त्याच गेरेज मध्ये एक लहान गाडी असते . कारण त्या श्रीमंत माणसाला आणखी एक गाडी घेण्यात मजा वाटते '' नॅनो ही ठराविक वर्गासाठी न बनवता टाटा यांनी ती देशासाठी बनवण्याचा निर्णय घेतला . नॅनो तयार करताना गाडी कशी असेल त्याचे चित्र नंतर तयार झाले . गाडी कशी असली पाहिजे याबद्दल टाटा ठाम होते . ३२ वर्षीय इंजिनियर गिरीश वाघ यांच्यावर कमी किमतीची ,जास्त मायलेज देणारी ,सुरक्षेच्या आणि अत्यावश्यक गरजेच्या निकषावर उतरणारी गाडी बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली . सुरक्षेला प्राधान्य देऊन किंमत कमी करायची असेल तर भव्यतेवर फुली मारायला हवी . नॅनोची किंमत कमी असण्याचे एक कारण म्हणजे त्याचा आकार . ३ . १ मीटर लांब , १. ५ मीटर रुंद आणि १. ६ मीटर उंच इतक्या 'नॅनो' आकारात गाडी आल्याने त्याचा बांधणीचा खर्च कमी झाला . बेसिक मॉडेल मध्ये ,वातानुकुलीत यंत्रणा , बम्पर ला रंग , पॉवर विंडो टाळण्यात आले . अत्याधुनिक अशा आर आर डीझाइन ( रिअर इंजिन रिअर व्हील ड्राइव ले आउट ) च्या वापराने अधिक यांत्रिक खर्च वाचला . या तंत्रज्ञानात गाडीचे मशीन मागच्या चाकांवर बसवण्यात येते . कमीतकमी स्टील वापरून फायबर आणि प्लास्टिकचा वापर करून किंमत नियंत्रित केली . .दोन ऐवजी एक वायपर ,डावीकडे आरसा नाही यासारख्या चातुर्याचा वापर करत किमतीवर विजय मिळवण्यात आला . कोणत्याही उद्योगातून 'फायदा ' काढण्याचा स्वाभाविक प्रयत्न उदयोजकाचा असतो . टाटांनी हा फायदा बेसिक /स्टेनडर्ड मॉडेल पुरता टाळला . तीन चाकी रिक्षा किंवा दोन दुचाकी जोडून केलेली टप असलेली रचना असे प्रकार टाळून चार दरवाजे असलेली , चार ते पाच माणसे सहज बसू शकणारी नॅनो निर्मितीच्या उंबरठ्यावर उभी राहिली . .

स्वप्नांच्या पुर्ततेला संकटांची साथ असते
ध्येयप्राप्तीची वाट नेहमीच खडतर असते
टीकेशी अन विरोधाशी संघर्ष करत चालायचे असते
कर्तुत्वाच्या पोवाड्यांनी आसमंत भारून टाकायचे असते

'' इतक्या कमी किमतीची गाडी सुरक्षित असणार नाही कदाचित स्पर्धेतून ती बाद होईल . अधिक निराशेने बोलायचे तर टाटा इतक्या कमी किमतीत गाडी बनवू शकतील यावर मारुतीचा विश्वास नाही '' -ओसामा सुझुकी . नॅनोची कमी किंमत हा जगासाठी चिंतेचा अन चेष्टेचा विषय होता . नॅनो रस्त्यावर आल्यावर काय होऊ शकते ? यावर जागतिक स्तरापासून ते गल्लीतील जग्ग्या पर्यंत सर्वच आपली कुत्सित मते मांडत होते . इतक्या कमी किमतीची गाडी रस्त्यावर आली आणि ती चालली तर वाहतुकीची कोंडी , पर्यावरण यांच्या समस्या निर्माण होतील असा अंदाज होता . पर्यावरणास आवश्यक असलेले युरो चार आणि भारत तीन हे निकष नॅनोने पूर्ण केले होते . दुचाकी भारत दोन या निकषावर चालतात , त्यामुळे त्यांच्यापेक्षा नॅनोने होणारे प्रदूषण कमीच असेल हा टाटांचा युक्तिवाद बिनतोड होता . रस्त्यांवर गाड्या अधिक वाढल्या तर सरकार मोठे रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करेल अधिक गुंतवणूक रस्त्यात होईल असा आशावाद सुद्धा होता . पण जग्ग्या चे काय करायचे ? अलीकडच्या 'भारी ' गाडीत बसलेल्या शेठ कडे पलीकडच्या नॅनोमधून भिकारी भिक मागत आहे . कामवाली उशीर झाल्याचे कारण नॅनो पंक्चर झाली आहे सांगते किंवा दुधवाला आता गाडीतून दुध घालत आहे . अशी व्यंगचित्रे आणि कुत्सित विनोद धुमाकूळ घालत होती . टाटाना खरा धक्का बसला तो 'सिंगूर ' प्रकल्पामुळे . मे २००६ मध्ये नॅनो पश्चिम बंगाल मधील सिंगूर येथे बनणार असे जाहीर झाले . एक हजार एकर जागा आणि पंधराशे कोटी (१५०० ) रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प सुरु झाला . राजकारणाला सबळ कारण लागतेच असे नाही . टाटा विरुद्ध तृणमूल संघर्षाची ठिणगी ऑक्टोबर २००६ मध्ये पडली . टाटा गरजेपेक्षा जास्ती जागा बळकावत आहे या आरोपातून शेतकरी आणि राजकारणी खांद्याला खांदा लाऊन टाटाविरोधी आघाडी लढू लागले . त्यांना मेधा पाटकर , अनुराधा तलवार , अरुंधती रॉय यांची साथ मिळाल्याने वातावरण गंभीर बनले . ऑक्टो ०६ पासून ऑक्टो ०८ पर्यंत सिंगूर धुमसत राहिला . निदर्शने , प्रोजेक्ट वर होणारे हल्ले , हिंसक कारवाया , शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे परिस्थिती चिघळत होती . टाटा आणि सरकार यादरम्यान बोलणी फिस्कटली . भारतीयांची नॅनो कशी असेल याचे प्रथम दर्शन जगाला जानेवारी ० ८ मध्ये झाले . सिंगूर मधील वाढता हिंसाचार आणि विरोध लक्षात घेता नॅनो प्रोजेक्ट सिंगूरमधून ३००० ट्रक मधून २१०० किलोमीटर लांब अशा सानंद (गुजरात ) येथे हलवण्यात आला . प्रोजेक्ट पूर्ण कार्यान्वयित होण्यास अवधी लागणार असल्याने मागणी अधिक पुरवठा कमी या अवस्थेत नॅनो अडकली . लॉटरी पद्धतिचा वापर करून एक लक्ष 'भाग्यवान ' ग्राहक ठरवण्यात आले . वाढती महागाई , कच्च्या मालाचे वाढते दर यामुळे नॅनो एक लाख रुपयांना देणे शक्य नवते पण टाटा शब्दाला जागले . . प्रथम एक लाख ग्राहकांना नॅनो एक लाख रुपयात देऊन वाचनाशी टाटा किती प्रामाणिक असतात याचा पुनश्च्य प्रत्यय दिला . .

स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरले
डोळ्यातून दोन अश्रू टपकन गळाले
न्युनत्वाचे भाव पळाले
हे सारे एका नॅनो ने घडवले

२३ मार्च २००९ . . छोटेखानी पण देखणी नॅनो रस्त्यावर उतरली . . आपले बाळ पहिल्यांदा चालताना जो आनंद पालकांना मिळतो तोच आनंद रतन टाटासह भारताने अनुभवला . . बाळच ते . . २००३ पासून २००९ पर्यंत वाट पाहायला लावणारे . . अनेक कुटुंबे पूर्ण करणारे ! नॅनोला पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले . . दोन सिलेंडर , ३८ मेट्रिक हॉर्स पॉवर , ६२४ सी .सी चे इंजिन . फोर स्पीड , ० -६० किमी /तास ८ सेकंदात जाणारी , १०५ किमी चा कमाल वेग असणारी ,२ ५ किमी /लिटर चे मायलेज देणारी नॅनो टाटांनी बाजारात आणली . मारुती ८०० ची ' मध्यमवर्गीयांची गाडी ' ही ओळख पुसून टाकली . गाडीची डिकी पुढे आणि मशीन मागे ही संकल्पना भारतासाठी नवी होती पण भारताने ती स्वीकारली . कमी बूट स्पेस , अपुरी इंधन टाकी , कमी स्थिरता (स्टेबीलीटी ) या त्रुटींसह ती प्रत्येकाला आपली वाटली . कारण छोट्या नॅनो वर टाटांच्या समृद्ध वारसा सांगणारा शिक्का होता . टाटा म्हणजे विश्वास हे समीकरण दृढ असल्याने नॅनो बाजारात सुपरहीट ठरली . आगमनाची उत्सुकता असलेली नॅनो प्रसिद्धी माध्यमांच्या कमी वापराने थोडी दुर्लक्षिली गेली . रतन टाटा अपयशी ठरले असे वातावरण निर्माण करण्यात आले . जाहिरात क्षेत्राचा प्रभावी वापर आणि सानंद प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यावर मागणी बरोबर पुरवठा झाल्याने नॅनो सुसाट सुटली . मार्च २००९ ला जागतिक बाजारपेठेत दाखल झालेली नॅनो भारतीय बुद्धिमत्तेचा , स्वयंपूर्णतेचा , उत्कृष्ट निर्मिती क्षमतेचा डंका जगभर वाजवत आहे . या एका नॅनो ने वर्तमानासोबत भविष्यावर सुद्धा परिणाम केले आहेत .कमी खर्चात छोटी गाडी बनवणे शक्य असेल आणि त्यातून बाजारपेठ काबीज करता येत असेल तर अनेक कंपनी या स्पर्धेत उतरतील . स्पर्धा तीव्र झाल्याने अत्युच्च तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध राहील. गाडी ही ठराविक वर्गाची मक्तेदारी न राहता त्याला सर्वसमवेशकत्व येईल . . अर्थात हे व्हायला मोठ्या अवधीची गरज आहे पण हे होणार नक्की !

आज रस्त्यावर लक्ष लक्ष नॅनो धावताना पाहतो तेव्हा टाटा ग्रुप सोडताना रतन टाटा मागे काय ठेऊन गेले याची जाणीव होते . गुजरातीत नॅनो ला 'छोटी ' असे म्हणतात . छोट्या गोष्टीच आयुष्यात मोठे आनंद देतात . महागड्या फुलांच्या ताटव्यात एखादे मोगऱ्याचे फुल जसा सुगंध देऊन जाते , परदेशातील रस्त्यावरच्या गर्दीत भेटलेला एखादा भारतीय /मराठी माणूस आनंद देऊन जातो , पाश्चात्य संगीताचे अनुकरण करणाऱ्या जमान्यात एखादा शास्त्रीय राग मंत्रमुग्ध करून जातो , संपूर्ण भरलेल्या ताटाला एक तुपाची धार पूर्णत्व देऊन जाते तसेच नॅनो भारतीय वाहन उद्योगाला अभिमान देऊन जाते .कारण या गोष्टीत 'आपलेपण ' आहे . . आपल्या मातीशी जोडलेले नाते आहे आणि या नात्याला भावनांची किनार आहे . या गोष्टी लहानच . . दखल घेतली तरच लक्षात येणाऱ्या पण जेव्हा नसतात तेव्हा आयुष्यात पोकळी निर्माण करणाऱ्या . . अनेक कुटुंबे आज नॅनो मधून आयुष्याचा मोठा आनंद लुटत आहेत . आपली नवी कोरी गाडी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगत आहेत . . नॅनो ही काही परिपूर्ण गाडी नाही पण अनेक कुटुंबाना पूर्णत्व देणारी नक्कीच आहे .मारुती ८०० चा जमाना पाहायला माझी पिढी नवती . तीच्या वर्तमानाचे निरीक्षक जरी असलो तरी तिच्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही नवतो . कदाचित तिने लोकांच्या आयुष्यावर नॅनो पेक्षा अधिक प्रभाव पाडला असेल . पण 'श्रुत ' गोष्टींपेक्षा 'दृश्य आणि अनुभूत ' गोष्टीना काकणभर अधिक महत्व असते . मध्यमवर्गीय , शिक्षक , नोकरदार , पेन्शनर , वकील , डॉक्टर , इंजिनिअर , तुम्ही आम्ही कधी न कधी आपल्या बायकोला , मुलांना , कुटुंबाला गाडी घेण्याचे 'प्रॉमिस ' दिलेच असेल . . ते पूर्ण करू शकत नाही याची खंतही मनी बाळगली असेल . म्हणूनच नॅनोच्या किल्ल्या आपल्या सहृदांच्या हाती ठेवताना ते सगळे , रतन टाटाप्रमाणे अभिमानाने म्हणत असतील ' प्रॉमिस इज प्रॉमिस ' . . .

संदर्भ - १. http://articles.economictimes.indiatimes.com/2008-01-11/news/27732684_1_...
२. http://en.wikipedia.org/wiki/Tata_Nano

लेखात वापरलेले पद्य लेखन स्वरचित आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॅनो - टाटा उद्योग समुहाची धुरा, जमशेदजी, जेआरडींनंतर तितक्याच सहृदयतेने चालवणार्‍या रतन टाटांची वचनपूर्ती.... चांगला विषय!

नॅनोच्या संशोधन आणि निर्मीती प्रक्रियेतला, महत्वाचा हिस्सा असणार्‍या मराठ्मोळ्या गिरीश वाघांचा अनुल्लेख मात्र जरा खटकला. असो.

मायबोलीवर आपले स्वागत आणि मायबोलीवरच्या पहिल्या वहिल्या लेखाबद्द्ल अभिनंदन! Happy

हर्पेन उल्लेख केला आहे . . "" ३२ वर्षीय इंजिनियर गिरीश वाघ यांच्यावर कमी किमतीची ,जास्त मायलेज देणारी ,सुरक्षेच्या आणि अत्यावश्यक गरजेच्या निकषावर उतरणारी गाडी बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली "" . . प्रतिक्रिये साठी धन्यवाद Happy

अंकुरादित्य ,
तुम्ही लेख प्रकाशित केल्यानंतर काही बदल केलेले दिसत आहेत. हे बदल कुठले ते कृपया स्पर्धासंयोजकांना कळवाल का?
धन्यवाद Happy

बदल लेखनात नाही केला . केवळ 'शुद्धलेखनाच्या ' १ -२ चुका होत्या तितक्याच सुधारल्या आहेत आणि येथे प्रथमच लिहित असल्याने 'परिच्छेद ' कसा पडायचा या याशी लढण्यात बराच वेळ गेला . . अंती 'स्पेस ' चा वापर करून जमा केला . . इतकेच !!

परीक्षकांना कोठे कळवायचे ते सांगा . . निश्चित कळवेन !! Happy

वा ! लेख आवडला. लिखाण थेट भावनेला हात घालते. पहिला प्यारा तर मस्तच.

टीम ने चार दरवाजे नको असे सांगीतल्यावरही रतन टाटा ठामच राहिले कारण बहुंताश भारतीय स्त्रिया साड्या घालतात. त्यामुळे गाडी जरी किमतीत कमी असली तरी स्वतंत्र दरवाजे हवेतच ह्या मतावर रतन टाटा ठाम राहिले.

न्यानो हा एक टाटांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आतिशय कमी मार्जीन मध्ये पार्ट्स अ‍ॅसेंबल करून त्याचं मार्केटींग करून विकणं म्हणजे साधी गोष्ट नाही. पण उगाच त्या चार चाकी खोक्यावर उभं राहून भारत म्हणजे उद्याची महासत्ता वगैरे म्हणणं हास्यास्पद आहे.

जरा न्यानोचे सप्लायर्स बघा. इण्तेरिअर्स, इंजिन, वायरींग्झ, इलेक्ट्रॉनिक्स सगळं आयात होतं. फक्त ब्रेक प्लेट वगैरे प्रकार भारतात बनतात.

तुर्रमखान , ' उगाचच त्या चार चाकी खोक्यावर उभं राहून भारत म्हणजे उद्याची महासत्ता वगैरे म्हणणं हास्यास्पद आहे.' हे आपले विधान अंशतः मला मान्य आहे . परंतु 'नॅनो' ची निर्मिती म्हणजे भारताचा महासत्ता होण्याचा राजमार्ग असे मी कोठे लिहिल्याचे माझ्या स्मरणात नाही तसेच नजीकच्या भूतकाळात कोणी म्हणल्याचे माझ्या ऐकिवात नाही . तरीही , तुमचे खरे आहे . महासत्ता होणे हे खूपच 'पुढचं पाऊल ' असले तरी वाहन उद्योगात आपण 'स्वयंपूर्ण ' होत आहोत यालाही तुमचा आक्षेप आहे का ? तुम्ही म्हणत असाल तसे त्याचे पार्ट बाहेरून येत असतील ( बॉश इत्यादी कंपनी त्या बनवतात ) परंतु अंतिम प्रोडक्ट चा विचार करता त्यास महत्व येत नाही . हे सर्वत्र सुरु असते . अगदी 'apple ' मोबाइल पण दोन -चार देशात तयार होऊन तो जोडला जातो . . म्हणून तो काय गुणवत्तेच्या कसोटीवर बाद झाला का ? जॉब्सच्या कल्पकतेची आपण आजही आणि येणाऱ्या अनेक पिढ्या स्तुती करतील नॅनो हि काही परिपूर्ण गाडी नाही . . हे त्रिवार सत्य आहे . परंतु नॅनो तयार करण्यामागे जवळपास ८ वर्षे झटत असलेल्या ५०० लोकांचे श्रेय आणि बुद्धी कशी नाकारणार ?? म्हणजे अगदी सोपे सांगायचे झाले तर भारतात विकली जाणारी बहुतांशी औषधे विदेशी कंपनीने 'पेटंट ' केलेली असतात . . आपण केवळ ती 'बनवतो ' . . रुग्णाला अनेक औषधा मधून योग्य एक निवडून देणाऱ्या 'डॉक्टर 'ला जे श्रेय जाते तेच इकडे 'टाटा आणि त्यांच्या टीम ' ला जाते . . . कारण आपण ' अरे सिप्ला , रेड्डी , केडीला यांच्यामुळे बरे झालो बुवा ' असे म्हणतो की ' अमुक अमुक डॉक्टरच्या हातगुणाने बरे झालो म्हणतो ' ? तसेच आहे . . . . विजय संकल्पनेचा , स्वयंपूर्णतेचा आणि गुणवत्तेचा आहे . हे 'नॅनो ' पाऊल महासत्तेच्या वाटचालीतील एखादे पाऊल ठरेल किंवा नाही पण ती एक 'प्रेरणा ' मात्र निश्चितच ठरेल . . . बघा बाबा पटतंय का Happy

अंकुरादित्य,

"महासत्ता होणे हे खूपच 'पुढचं पाऊल ' असले तरी वाहन उद्योगात आपण 'स्वयंपूर्ण ' होत आहोत यालाही तुमचा आक्षेप आहे का ? तुम्ही म्हणत असाल तसे त्याचे पार्ट बाहेरून येत असतील ( बॉश इत्यादी कंपनी त्या बनवतात ) परंतु अंतिम प्रोडक्ट चा विचार करता त्यास महत्व येत नाही . हे सर्वत्र सुरु असते . अगदी 'apple ' मोबाइल पण दोन -चार देशात तयार होऊन तो जोडला जातो . . म्हणून तो काय गुणवत्तेच्या कसोटीवर बाद झाला का ?"

मला या क्षेत्रात एका दशकाचा अनुभव आहे.

हे वर दिलेलं उदाहरण निखालस चुकीचं आहे. अ‍ॅपल किंवा इतर कंपन्या भाग आयात करण्यामागचं कारण अर्थशास्त्र असतं. उदाहरणार्थ 'अ‍ॅपल' संपुर्ण प्रॉडक्ट युयस मध्ये तयार करू शकते पण त्यांना त्या मार्जीन मध्ये बल्क प्रॉडक्शन करून विकता येणार नाही. पण त्या प्रॉडक्टचं 'इंटेलेक्चुअल ब्लु प्रिंट' त्या कंपनीकडे असतं. टाटा किंवा कोणताही लोकल सप्लायर न्यानोमधलं काहिही करू शकत नाही. फक्त त्यांचाकडे सर्व पार्ट असेंबल करण्याचे ड्रॉईंग्ज आहेत.

"जॉब्सच्या कल्पकतेची आपण आजही आणि येणाऱ्या अनेक पिढ्या स्तुती करतील नॅनो हि काही परिपूर्ण गाडी नाही . . हे त्रिवार सत्य आहे . परंतु नॅनो तयार करण्यामागे जवळपास ८ वर्षे झटत असलेल्या ५०० लोकांचे श्रेय आणि बुद्धी कशी नाकारणार ??"

आठ वर्षात जर काही केलं असेल तर सप्लायर्स निगोशिएशन्स, असेंब्ली ड्रॉईंग्ज आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोड्युस करण्याची तयारी. पण त्या मागे आपलं असं अनोव्हेटीव काहीच नाही.

"हे 'नॅनो ' पाऊल महासत्तेच्या वाटचालीतील एखादे पाऊल ठरेल किंवा नाही पण ती एक 'प्रेरणा ' मात्र निश्चितच ठरेल . . . बघा बाबा पटतंय का स्मित"

कुठल्याश्या शो मध्ये ल्यारी किंगने न्यानोची स्तुती करताना, "इट दझ नॉट हॅव एबीएस, पॉवर स्टीअरींग, एअर बॅग बट बिंगो, इट दझ हॅव फोर व्हील्स" असं म्हणाला होता.

टाटानी न्यानो बनवली म्हणून किंवा जॅग्वार लॅड रोव्हर घेतली म्हणून हुरळून जाणार असाल तर जा बापडे.

अनोवेटीव काहीच नसेल तर मग बोलणंच खुंटल . . टाटा ने 'दखल ' घेण्यासारखे काहीच केले नाही असे तुमचे मत दिसते . . ( मार्केटिंग , असेम्ब्लिंग , ड्रोइंग ,सप्लायर्स निगोशिएशन्स सोडून ) . . . तुमच्या दहा वर्षाच्या अनुभवापुढे माझा अनुभव खुजा आहे . अधिक बोलणे कापत नाही . पण मला तुमचे म्हणणे पटलेले नाही .. . शेवटी टाटा न्यानो बनवूदेत किंवा जॅग्वार लॅड रोव्हर घेउदेत . त्याही पुढे जाऊन फेरारी ,बेंटली घेउदेत . . मी तेव्हाच हुरळून जाईन जेव्हा माझ्या खिशाला परवडेल अशी एकतरी गाडी टाटा च्या ताफ्यात असेल किंवा आणखी कोणत्या कंपनीच्या शोरूम मध्ये असेल . . प्रतिक्रिये साठी धन्यवाद !!

मी तेव्हाच हुरळून जाईन जेव्हा माझ्या खिशाला परवडेल अशी एकतरी गाडी टाटा च्या ताफ्यात असेल किंवा आणखी कोणत्या कंपनीच्या शोरूम मध्ये असेल>>> +१

छान विषय आणि छान लेख.

मात्र पहीला छोट्या मुलीचा प्रसंग खटकला. कारण त्यात मुलांनी भौतिक वस्तुवरुन केलेली स्टेटसची तुलना आली आहे. त्याऐवजी 'गाडी हवी' असे ठसवणारा दुसरा एखादा प्रसंग हवा होता.

तुर्रमखान : <<<<<"मला या क्षेत्रात एका दशकाचा अनुभव आहे"" >>>>>

एका दशकाच्या अनुभवांती तुम्हाला एवढेही कळू नये की अमेरिकेतले आणि भारतातले व्यावसायिक स्वरूप आणि वातावरण फारच वेगळे आहे?? एक देश "टेक्नोलॉजी तसेच प्रोसेस ड्रीवन" तर दुसरा देश "पीपल ड्रीवन" आहे? एका देशात ऑटोमेशन म्हणजे रोजचा खेळ आहे तर दुसऱ्या देशात ऑटोमेशन करणे म्हणजे अर्ध्या जनतेला आणखीन भुकेले करणे ठरू शकते?

अशा परिस्थितीत एखाद्या उद्योग समूहाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून एखादे स्वप्न पूर्ण करणे याची तुम्हाला काहीच किंमत नसावी? फुकट आहे तुमचा एका दशकाचा अनुभव !!!

भिडे साहेब, तुमच्या प्रतिसादावरून माझ्या एका 'ढ' मित्राची आठवण आली. हा बहाद्दर परिक्षेत कोणताही प्रश्न आला तरी तो त्याच्या खाली त्याने तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरेच लिहुन यायचा. तुम्हाला शुभेच्छा. Happy

सावली . . धन्यवाद ! हो लिहिताना मलाही कसंनुसं झालं होतं पण माझ्या परिचयातील एका कुटुंबात घडलेला प्रसंग आहे हा . . अनेकदा मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पोटाला चिमटा लाऊन मोठ्या शाळेत घातले जाते पण तिकडची बाकीची व्यवधानं खिशाला परवडत नाहीत . . त्यातून अनेक समस्या निर्माण होतात . . म्हणजे पूर्वी 'दप्तर - डबा -पाण्याची बाटली ' यावरून कोणाचे आई बाबा प्रेमळ आणि लई भारी आहेत ते ठरायचे आता या ठरवा ठरवीला बरेच व्यापकत्व आले आहे . हे चिंतेचे आहेच पण . . . तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे पण घटना मी ऐकली असल्याने लिहिली !

Pages