जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

Submitted by अभय आर्वीकर on 23 August, 2013 - 01:35

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

                           अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

                           जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. 

                    "प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्‍या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे. 

                           अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे. 

                           जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.

                           जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.

                           या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्‍यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्‍यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.

                           साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.

१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.

यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.

३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.

परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही

.......(अपूर्ण).........

                                                                                                                             - गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न सुविधा पोहचविण्याचा नाही तो लोकांना सुशिक्षित ( केवळ शैक्षणिक नव्हे) करण्याचा आहे त्यासाठी प्रबोधनात्मक आणि कायमस्वरुपी कार्यक्रम आवश्यक
>> +१००

एक शंका:
आमच्या इथे गणेशोत्सव, नवरात्र इ. मिरवणूकीत काही टारगट मुले अक्राळ-विक्राळ चेहरे करत "अंगात आल्यासारखे" नाचतात.
त्यांच्यावर या कायद्याखाली काही कारवाई होईल काय? Happy

तेव्हा देखील अनेकांनी मंत्राने कावीळ उतरवायला सांगितली होती. >>>>>

जबरदस्ती तर केली नव्हती ना. तुम्ही हा महत्वाचा मुद्दा का विसरताय? माणसाला कोणाकडुन उपचार करुन घ्यावे हे ठरवण्याचा हक्क नाही का? आणि त्याला हवे तसे उपचार कोणी करुन देत असेल तर काय हरकत आहे?

जर आयुर्वेद आणि होमिओपाथी ने रोग बरे होउ शकतात Happy तर मंत्राने काविळ उतरायला काहीच हरकत नाही.

आमच्या इथे गणेशोत्सव, नवरात्र इ. मिरवणूकीत काही टारगट मुले अक्राळ-विक्राळ चेहरे करत "अंगात आल्यासारखे" नाचतात. >>>>>

ह्याचे कारण म्हणजे लोकमान्य टिळकांची अंधश्रद्धा. जरा आगरकरांचे म्हणणे समजुन घेतले असते तर Sad

जबरदस्ती तर केली नव्हती ना>>
मुळीच नाही. पण समाजात अनेक लोक आहेत जे अश्या ठिकाणी जावून आपल्या पायावर धोंडा मारुन घेतायत.

माणसाला कोणाकडुन उपचार करुन घ्यावे हे ठरवण्याचा हक्क नाही का? >>
म्हणून का उगाच काही अघोरी/अपायकारक उपाय करवून घ्यायचे आणि जीव धोक्यात घालायचा?

म्हणून का उगाच काही अघोरी/अपायकारक उपाय करवून घ्यायचे आणि जीव धोक्यात घालायचा? >>>>

ते ज्याचे त्यानी ठरवावे. सरकार कोण ठरवणारे. जर सरकारनी मोफत वैद्यकीय सेवा दिल्या असत्या आणि कोणी व्यक्तीने अघोरी उपचार करुन घेतल्या मुळे सरकार चा खर्च होत असेल तर सरकार ने बोलावे.

लोक ट्रेकींग ला जातात, हिमालयात शिखरे सर करायला जातात. लहान मुलांना सायकल वरून गर्दीच्या रस्त्यावरुन शाळेत जाऊ देतात - त्यांचे काय करायचे?

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे.>>>>

अरे तो माणुस बेशुध्द असेल ....... मग तो कसा ठरवणार आहे.....

तुमच्या थेअरी च्या मते......उद्या मी कुणाचा खुन केला.......आणि वर म्हणालो की मी त्याच्यावर जबरदस्ती नाही केली ...त्याच्या मर्जीने त्याने करुन घेतला माझ्याकडुन तर तुम्ही मान्य करणार का ??????? कैच्याकै डोके लावतत राव

लोक ट्रेकींग ला जातात, हिमालयात शिखरे सर करायला जातात>> हे साहस आहे. यात धोका आहे, हे करणार्‍याला माहिती असते.
लहान मुलांना सायकल वरून गर्दीच्या रस्त्यावरुन शाळेत जाऊ देतात>> पर्यायच नाही. इथे रस्तांवरून माणसांनाच चालायला जागा नाही, सायकलिंगसाठी वेगळा ट्रॅक कुठे तयार करणार. Sad

अनेक स्कीम येतात सहा महिन्यात (कमी मुदतीत) पैसे दामदुप्पट करुन देऊ म्हणून. यात काही लोक आपली सर्व कमाई घालतात, नंतर कळते की स्कीम बंद आणि एजंट गुल. अश्या आर्थिक फसवणूकीवर कारवाई करता येते कारण कायदा आहे.

पण असे भोंदू उपचार करुन मग जीव गमावला/नुकसान झाले तर? त्या व्यक्तीवर कशी कारवाई होणार?

जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे.>>>>

याच युक्तीवादाने शिक्षा होत नव्हती. आता भोळ्या लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन मंत्रशक्तीने बरं करतो असं आश्वासन देणं हे कायद्याच्या कक्षात आलं आहे. दिवसाढवळ्या फसवणूक करण्याचं दुकान थाटणं हा गुन्हा नाही का ?

देवाच्या नावाखाली बोकड, कोंबडा यांचा बळी देणे हा गुन्हा होणार काय?

तसे झाले तर जत्रांमध्ये बोकड बळी देवून नैवेद्य करतात तसेच मुस्लिम बांधव बकरी ईदला बोकड, उंट इ. चारपायी प्राणी बळी देतात. त्यांचे काय?

देवाच्या नावाखाली बोकड, कोंबडा यांचा बळी देणे हा गुन्हा होणार काय? >>>
यालाच नरबळी म्हणतात का ? कलमं दिलीयेत कि वर..

माझा प्रसाद १९७१ यांन पूर्ण पाठिंबा आहे. जशी मुक्त अर्थव्यवस्था असते तशी मुक्त राज्यव्यवस्था हवी. कशाला हवेत कायदे? उगाचच नवी नवी कुरणे बनवण्यासाठी? ते शक्य नसेल तर माझी सर्व आशा नक्षलवाद्यांवरच एकवटली आहे. तेच भारताला योग्य अशी राज्यव्यवस्था देऊ शकतील.

भरत
लोकांना उपहास कळत नाही याचा नुकताच अनुभव घेतलेला आहे. आता काय गदारोळ होईल सांगता येत नाही. शाब्दीक कीस काढून सुळावर चढवण्याची शक्यता वाटते.

मयेकरांना तरी उपहास कुठे कळतो? मुटेंनी शेवटी अपूर्ण असे लिहिले आहे की? पुढच्या भागात ते लिहिणार आहेत की 'मी मागच्या भागात कशी सगळ्यांची मजा केली'!

>>>विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.<<<

साप चावल्या नंतर तूम्ही सांगितल्याप्रमाणे पहीला एक तास महत्वाचा आहे तर व्यक्तीवर मंत्र तंत्र करून वेळ घालवावा की डॉक्टर कडे नेऊन त्याचे/तीचे प्राण वाचवावे. तूम्हाला काय वाटते मूटेजी?

मी पाचवीत असताना, माझ्या शाळेतील एक अतीशय हूशार मूलगा ( जो शेजारच्य खेड्यात रहायचा) सर्प दंशाने मरण पावला. त्याला सरकारी दवाखान्यात आणले नाही कारण गावातल्या भगताचं म्हणण होतं की साप चावल्यावर नदी ओलांडायची नाही. कदाचीत तो वाचला असता कारण गावातल्या दवाखान्यात लस उपल्ब्ध असते.

<यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले>.

Happy

समाजाची वाईट मानसिकता जाणे महत्वाचे आहे .दिल्लितले पाचशे पंचाऐंशी पंच परमेश्वर चांगला निर्णय करतील ही अपेक्षा ठेवतो .

<यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले>.........................ह्यातून तुमचे दाभोलकर यांच्याविषयीचे प्रेम दिसून येतेय. अहो गर्दी उगाच जमलेली नव्हती उद्या तुमच्यावर किव्वा माझ्यावर हि पाळी आली तर नातेवाईक सोडून कुत्रही येणार नाही

प्रसाद,
कालच्याच बातम्यांमधे पाहिलं, एका माणसाच्या दोन मुली व बायको काही वर्षांच्या अंतराने आजारपणात दगावल्या. त्या माणसाने कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला होता. शेजार्यांनी केलेल्या विनंतींचाही परिणाम झाला नाही. केवळ गंडेदोरेछाप उपाय करत होता. तिसर्या मृत्यूनंतर पत्नीच्या घरच्यांनी गोंधळ घातला तेव्हा तो पसार झाला. बहूदा काविळ झाली होती तिघांनाही. आता सांगा त्या माणसाची चूक आहे की नाही? त्याला कोणीही कसलीही जबरदस्ती केली नव्हती, त्याला जे पटले ते त्याने केले. परंतु शेवटी पळून का बरं गेला असेल?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. Happy

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)
http://www.maayboli.com/node/44806

या कायद्याचे रामायण आणि लोकांच्या प्रतिक्रीया बघता असे वाट्तेय ़ की आपले नशिब थोर की ़ईंग्रज आपल्यावर राज्य ़़़़ करत होते आणी त्यांनी सतीचा कायदा आणला .

गंगाधर मुटे,

मी आपल्याशी सहमत आहे. या कायद्याचा काडीइतकाही उपयोग नाही. ढोंगीपणा करणार्‍या भोदूंवर कारवाई करायला प्रचलित कायदे समर्थ आहेत. नव्या कायद्याने काय मोठा उजेड पडणार आहे!

सर्प वा विंचूदंशाच्या बाबतीत प्रबोधन आवश्यक आहे. कायदा नव्हे. कायदा करून काय मिळणार कोण जाणे! या बाबतीत कायद्याची शब्दयोजना उलटी आहे. 'सर्पदंशावर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे' अशी सकारात्मक नसून 'कोणी यास प्रतिबंध केला तर गुन्हा मानला जाईल' अशी नकारात्मक आहे. हा काय बकवास आहे! कायदा म्हणजे निर्बंध आहे ना, मग तो प्रबोधनाची जागा कशी घेऊ शकेल?

देवी आणि पोलियो नाहीसे झाले ते प्रबोधनाने. त्याकरिता कोणी कायदे केले नाहीत! हा कायदा म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. याद्वारे अनिसच्या जादूटोणा गेस्टापोंना मात्र रान मोकळे मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

चिनूक्स,

>> अठरा वर्षांत 'विधेयकाचा मसुदा काय?', 'त्यात काय बदल झाले / केले गेले?' ही माहिती मिळवता येऊ नये?

सरकारने कायद्याचा मसुदा दाबून ठेवला आहे. तो सरकारच्या अधिकृत संकेतस्थळी उपलब्ध नाही. हीच गोष्ट संशयास्पद नाही का? शेवटी हिंजसच्या स्थळावरून उचलावा लागला.

राजश्री कांबळे या सरकारी कर्मचार्‍याच्या संगणकाच्या डेस्कटॉप वरून जर कायद्याचा नवा मसुदा छापला जात असेल तर निश्चितच काहीतरी लपवाछपवी चाललीये ना?

आ.न.,
-गा.पै.

महेश,

ईसकाळमधील वार्तेवरून हा कायदा दात व नखे काढलेल्या सिंहासारखा वाटतो. नरबळी देणार्‍याला फक्त ७ वर्षे तुरुंगवास? हा काय निर्बुद्ध प्रकार आहे? खुनी गुन्हेगाराला शिक्षा देण्यास प्रचलित कायदा समर्थ आहे. नरबळीची घटना उघडकीस आल्यास जाटोवि कायदा म्हणजे खुन्याला एक नवी पळवाटच मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

दोन दिवसांपासून मी जग्गी वासुदेवाची टीव्हीवर जाहिरात पाहत आहे. त्यात आज शिवरात्रीला अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष खालील लिंक वरून घेण्यास सांगत आहेत. अजून अजबगजब वस्तुही विक्रीला आहेत. हे रुद्राक्ष अभिमंत्रित आहेत का नाही हे पाहायला काही मशीन असते का ? ह्या सगळ्या भोंदूगिरीला मोठमोठाले स्पॉन्सर्स आहेत. पटकन जाहिरात संपत असल्याने ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक फक्त दिसले पण अजूनही आहेत. कॉर्पोरेट हाऊसची याबाबत काही पॉलिसी नसते का? जादुटोणा कायदा याला लागू नाही होत का? मीडियावाले पैशासाठी कशाचाही प्रचार करू शकतात तर मग अंनिस ने अमुकतमुक प्रकरणे उघडकीला आणली अशा गमज्या कशासाठी मारतात बातम्यांमध्ये ? इथे त्यांचे कोणी व्हाईट कॉलर भक्त असतील तर त्यांना या रुद्राक्षाचा काय अनुभव आला ते सांगा. ह्या जाहिरातीबरोबरच डिअर लॉटरीची बम्पर सोडत आहे, तीबी जाहिरात पाहीली. अभिमंत्रित रुद्राक्ष वापरून लॉटरी जिंकता येईल का याचा विचार करतोय .
https://mahashivarathri.org/en/rudraksha-diksha
https://www.ishalife.com/in/rudraksha

Pages