अनोखे - श्री. कर्णेश्वर मंदिर

Submitted by ferfatka on 21 August, 2013 - 07:38

DSCN4257.jpg
श्री. कर्णेश्वर मंदिर

सकाळी ९.३० ला चिपळूणच्या करंजेश्वरीचे दर्शन घेऊन पुढे संगमेश्वरला श्री कर्णेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी निघालो. ‘आधि पोटोबा मग विठोबा’ म्हणून चिपळूणच्या काणे बंधूंच्या हॉटेलमधील मिसळ खाऊन संगमेश्वर पाहण्यास निघालो.
चिपळूणपासून संगमेश्वर अंदाजे ४५ किलोमीटर अंतरावर म्हणजे साधारणपणे गाडी असल्यास १ तास लागतो. मुंबई-गोवा महामार्ग असल्याने रस्ता एकदमच छान होता. वाटेत काही भाग सोडला तर रस्ता एकदम छान होता. वळणदार रस्ते, पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र दिसणारी हिरवाई यामुळे हवेत एक छानसे आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. ११ वाजता कसबा गावात आम्ही रस्ता विचारत विचारत पोहोचलो.
कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे कसबा नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. आम्ही चालत चालत निघालो. कारण जेमतेम एक गाडीच जाऊ शकेल एवढा बारीक रस्ता आहे. त्या रस्त्यावर बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेला एक ट्रक उभा असल्याने गाडी पुतळ्याशेजारी लावून मंदिर पाहण्यास निघालो. पाच मिनिटातच मंदिरात पोहचलो. समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचे मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास झाला. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले. सूर्यनारायणाच्या मागील बाजूस बारा राशी कोरलेल्या आहेत.

DSCN4256.JPGDSCN4254.JPG

मुख्य मंदिर पुढे असल्याने परत येताना दर्शन घेऊ असे ठरले. मंदिरात पोहचल्यावर ‘ओम नमो:शिवाय’ म्हणत एक पुजारी दिसले. त्यांना मंदिराबाबत विचारले असता त्यांनी मंदिरात कोरण्यात आलेल्या मूर्तींची विस्तारपूर्वक माहिती दिली.

मंदिर एक आख्यायिका अनेक

कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.

पालथे ताट :

कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.

मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली.
DSCN4206.jpgपालथे ताट

DSCN4212.jpg

दरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप, मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे पाहण्यासारखे आहे.

DSCN4213.jpg

मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली. आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर बहरेला आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.

ऐतिहासिक वारसा असलेले कसबा गाव

कसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.

आणखीन काय पहाल :

 • मुंबई-गोवा महामार्गालागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याची कुंडे.
 • प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर आहे.
 • संभाजीमहाराजांची सासूरवाडी व मुख्य ठाणे असलेले श्रृंगारपूर हे देखील संगमेश्वरच्या जवळ आहे.

  कर्णेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता :

  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) वर चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर कसबा गाव लागते. तिथे छत्रपती संभाजीमहाराजांचा अर्ध पुतळा आहे. त्या पुतळ्यामागे काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. कर्णेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गास निघालो. परतीचा मार्ग चिपळूण, कुंभार्ली घाट मार्गे उंब्रज व तेथून सातारा व पुणे असा होता.

  कुंभार्ली घाट

  कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे. जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.

  प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.

  कुंभार्ली घाटातून पुण्याकडे येण्यासाठी उंब्रजमार्गे रस्ता आहे. कराडकडे एक फाटा गेलेला आहे. हा संपूर्ण रस्ता मी आलो तेव्हा व यापूर्वीही अनेकवेळा खराबच होता. सकाळी १० ला चिपळूण सोडले होते. तेथून संगमेश्वरमधील कसाब्यातील कर्णेश्वर मंदिरात दुपारी १२ वाजता पोहोचलो. तासभर थांबून तेथून निघालो. परत चिपळूणमार्गे- कुंभार्ली घाट (दुपारी २.००) उंब्रजमार्गे - सातारा - पुणे (६.३०) असा २७० किलोमीटरचा प्रवास करून घरी परतलो.

  आणखीन फोटोसाठी कृपया येथे टिचकी मारा.
  http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_15.html

  ताम्हिणीघाटातून दुर्गदुर्गेश्वर रायगड
  http://www.maayboli.com/node/44682
  http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_13.html

  परशुराम मंदिर, विसावा पॉइंट
  http://www.maayboli.com/node/44715
  http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_14.html

  या कर्णेश्वर मंदिराच्या लेखात काही त्रुटी आढळल्यास जरूर कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर सफर घडविली फेफ. उपयुक्त माहिती आणि देखणी प्र.चि. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्प कुंभार्ली घाटातुन दिसतो का?

किशोर मुंढेजी
<कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्प कुंभार्ली घाटातुन दिसतो का?>
नुकताच कोयना जलविद्युत केंद्राचा टप्पा ४ पूर्ण झाल्याच्या बातम्या टिव्ही व पेपरमध्ये वाचण्यास मिळाल्या होत्या. पोपळीतील जलविद्युत केंद्र मी पाहिलेले नाही. मात्र येथे जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. घटातून खाली एमएसईबीचे गेस्ट हाऊस दिसते. जलविद्युत केंद्र प्रकल्प घाट उतरल्यावर पोपळीगावातून रस्ता आहे.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

<मी बघितलेय हे. खुप आडवाटेला असल्याने फार कमी लोकांना माहीत आहे .>
दिनेशजी
श्री. कर्णेश्वराचे मंदिर तसे आडवाटेला आहे. हे नक्की. मात्र, मुंबई-गोवा हायवेवर मुंबईहून येताना शास्त्रीपूल ओलांडल्यावर लगेचच कसबागावाकडे जाणारा रस्ता आहे. फक्त पाच मिनिटांतच तेथे जाता येते. वेळ काढल्यास मंदिर बघण्यास तासभर पुरेसा होतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

फेरफटका,

आपले लेख फारच छान असतात.

आपल्या भंडारा डोंगराबद्दलचा लेख पाहुन ते पहायला गेलो. फार सुंदर आहे प्रत्यक्षात सुद्धा.
घोरावडेश्वर इज नेक्स्ट.

धन्यवाद.