विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ"

Submitted by बकुल on 21 August, 2013 - 02:14

"सहकार - एक चळवळ"

माणुसकिचे शत्रू हे जगाच्या प्रारंभापासून ते अतांपर्यन्त येतच राहणार. आपल्या देशावर दिडशे वर्ष इग्रजांनी राज्य केले. मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करुन अनेकांनी प्राण वेचले. भगतसिंग, राजगुरु, मंगल पांडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक वीरांनी मायभूमीला स्वतंत्र केले. देश स्वतंत्र तर झाला परंतू देशाची आर्थिक व्यवस्था मात्र खिळखिळी झाली. जेथे एके काळी सोन्याचा धुर निघत होता तेथे गरिबी मुक्कामास आली. एकिकडे लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, गरिबी हटवणे हि काळाची गरज होती. देशाची आर्थिक प्रगती साधायची तर एकट्या दुकट्याचे काम नव्ह्ते. रामायण, महाभारत व गीतेची पार्श्वभूमी असलेल्या भारतभुमीच्या पुत्रांना माहित होते कि प्रभु रामचंद्रानी सेतूचे निर्माण कार्य कसे केले. त्या काळी प्रभु रामचंद्रांच्या नेतृत्वाखाली सर्व वानर, मानव, हजरो हात कामाला लागले होते. एवढेच काय छोटुशी खारुताई पण सहभागी झाली होती. पाहता पाहता सागरावर सेतू निर्माणाचे कार्य पार पडले. सर्वांच्या मदतीने सेतू पार झाला. सर्वांची मदत व सहकार्य करुन कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. यातुनच "एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" या म्हणी प्रमाणे काळाची पाऊले ओळखून सहकाराचे हाथ एकत्र आले आणि प्रचंड शक्ती जमा झाली. फार पुर्वीपासुन आपली संस्कृती सहाकाराचे असे तत्व जाणते. "एकिचे बळ मिळते फळ" हे आपणास ठाऊक आहे. मी लहान असतांना आजी नेहमी म्हणायची "गांव करील ते रांव काय करील" या छोट्याशा म्हणीत सहकाराची किती मोठी शक्ती आहे हे मोठे झाल्यावर कळु लागले. आपली संस्कृती फार पुर्वीपासुन सहाकाराचे ( एकमेकांना मदतीचे ) महत्व जाणते म्हणुन तर आजसुद्धा कोणतेही काम एकत्रितपणे आल्याशिवाय होत नाही. सहाकाराने मोठमोठी कामे सहज होतात. म्हणुन तर आजसुद्धा एकत्र रहावे, एकत्र जेवावे, एकत्र बसावे, एकत्र येऊन रक्षण करावे, व पराक्रम गाजवावे यातच सुरक्षीतता आहे. "ईर्जिका" पद्धत आपल्याला हेच सांगते.

शेतकर्‍याला सावकाराच्या जाचातून सोडवण्यासाठी एकशे दहा वर्षापूर्वी सहकार चळवळीची मुहुर्तमेढ रोवली गेली. गेल्या शतकात या चळवळीने अनेक चढ-उतार पाहिले, कडु-गोड अनुभव आले, परंतु सहकार चळवळ शेतकर्‍याचा मुख्य आधार ठरली. खेडोपाडी या सहकारी सोसायट्या गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत आहेत. त्यांचा कारभार स्थानिक पातळीवर चालतो. लोकशाही पद्धतीचा तो एक भाग आहे. १९०४ मध्ये देशात सहकार चळवळ आली, यात पुढे वैकुंठभाई मेहता आणि महात्मा गांधी यांनी मोठे योगदान दिले आणि त्यातुन १९२० सालचा सहकारी कायदा तयार झाला. हा कायदा १९६० पर्यंत सरसकट लागू राहिला. गोरावाला समितीच्या मदतीने सहकार चळवळ वाढली, फोफावली. १९८० साली पन्नास टक्के वित्तपुरवठा या माध्यमातून झाला. हे या सहकारी चळवळीचे मोठे योगदान होते. पंचायतराजच्या माध्यमातून राजकीय लोकशाहीचा पाया घातला गेला. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण यांनी सहकार कायद्यात वृद्धी करुन खेड्यातील गरीब शेतकर्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्याद्वारे आर्थिक लोकशाहीची जोड दिली. त्यामुळे स्थापनेनंतर महाराष्ट्रात सहकार चळवळ जोमाने रुजली. या मागे समाजाचे राजकिय व आर्थिक उथ्थान व्हावे हे धोरण होते.

इग्रजांनी "तोडा व फोडा" या पद्धतीचा वापर करुन आपल्यावर राज्य केले त्यावरुन वरील ओळीचे महत्व लक्षात येइल. "संघोसंघ रक्षती" हे ब्रिद्वाक्य अंगिकारुन सहकाराचे अनेक हात एकत्र आले आणि प्रचंड शक्ति जमा झाली. सहकारी बॅंका, सहकारी ग्राहक पेठा, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या उभ्या राहिल्या आणि मोठ्या प्रमाणात सहकारी चळवळ उभी राहिली. अनेक खेडोपाडी सहकारी चळवळ उभी राहिली. गरिब शेतकर्‍याला मुलीच्या लग्नासाठी कर्ज मिळू लागले, अडिअडचणी भागु लागल्या. सहकारी चळवळीतून धन व बळाची प्रचंड शक्ति निर्माण झाली. सहकारी तत्वावर शेती मध्ये सुधारणा झाली, यंत्र सामुग्रीमध्ये वाढ झाली. बी, बीयाणे एवढेच काय शेतीचा माल साठवणे, बाजारपेठा, अनेक समित्या शेतकर्‍याला मिळू लागल्या. शेतातील मालाला बाजारपेठा उपलब्ध झाल्या. सहकारी तत्वाची पाळेमुळे खोलवर रुजली गेली होती. नाहीतरी पूर्वीपासुन गांव म्हणजे एक घरंच होते, कुटुंब होते. कुणाकडे काही आपत्ती आली तर सारा गांव धावुन येई. त्याचे अश्रु पूसत, त्याला सर्वतोपरि मदत करत.

सहकारी सोसायट्याचे कार्य कसे चालते? तर जिल्हा सहकारी बॅंकांमार्फत शेतकर्‍यांना कर्ज मिळते ते सोसायटीच्या मार्फत. म्हणजे सहकारी सोसायट्या ह्या जिल्हा बॅंक व शेतकरी या मधिल दुवा आहे. आणि जिल्हा बॅंकेकडुन सोसायट्यांना दोन टक्के नफा मिळतो व त्या पैशात सोसायट्या आपला कारभार चालवितात आणि दुवा म्हणुन काम करतात. सहकारी सोसायट्या ह्या बॅकेची पन्नास टक्के कामे पार पाडतात. असे हे व्यवहार चालतात. राज्यात शंभर वर्षात सोसायट्यांनी आदर्श निर्माण केले. स्वताचे भांडवल उभे केले, स्वस्त धान्य दुकाने सुरु केले, सहकारी तत्वावर शेतकर्‍यांना कर्ज मिळू लागले. शेतीला जोडधंदा म्हणुन गाय, म्हैस, शेळ्या पाळणे, कुक्कुट पालन या सारखे उद्योग सुरु झाले. ठिकठिकाणी दुग्धालये सुरु झाली, मोठ्या प्रमाणात दुध गावाबाहेर, शहरात वितरीत होऊ लागले. दुधापासुन तयार होणर्या पदार्थांना बाजारपेठ मिळाली. खुप मोठी धवलक्रांती होती ती. त्याचबरोबर शेतकर्‍याचा सहकारी तत्वावर पैशांची नड भागल्याने शेतीमध्ये उत्पादन येऊ लागले. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जागतिकिकरणामुळे अनेक बॅंका उघडल्या, बॅंका तोट्यात होत्या. परंतु सहकारी सोसायट्या यांनी मात्र आपले आर्थिक धोरण इमाने-इतबारे राबऊन देशाच्या अर्थ व्यवस्थेला फार मोठा हातभार लावला.

सहकाराने काय साध्य होते ? ह्याचा, विचार करण्यापेक्षा सहकाराने काय साधत नाही ! हा विचार महत्वाचा आहे. सहकारला अशक्य असे काहीही नाही. "एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" हे सहकाराचे ब्रिदवाक्य आहे. अनेक अपंगांनी सहकार साधला व सुदृढांनाही लाजवेल असा पराक्रम बाबा आमटे यांच्या आनंदवनात करुन दाखवला. प्रतीत यश वकिल व एका शहराच्या नगराध्यक्ष असलेले बाबा आमटे यांनी स्वता:च्या जीवनातील सुखाचा त्याग केला. रस्त्याने जात आसतांना एक महारोगी बाबांना दिसला, तेव्हा बाबांनी त्याच्या अंगावर पोते टाकले, त्याला स्पर्श केला नाही. पण बाबांच्या मनात खंत राहिली, कि "त्याला मी स्पर्श केला नाही, त्याच्या जागी जर मी असतो तर" ...? अशी मनाला टोचणी लागली. त्या क्षणापासुन त्यांनी सुखाचा त्याग करुन ओसाड माळरानावर नवे जग बसवले. ज्यांना समाजाने दुर लोटले होते त्यांना जवळ घेतले, अनेक अपंग एकत्र आले. अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी "आनंदवन" आश्रम स्थापन केला. तो केवळ आश्रम नाही तर वरोद्याच्या जगांत अपंगांना तिथे जीवन मिळाले, त्यांचे व्यक्तिमत्व फुलले, त्यांचा आत्मविश्वास वाढला. आनंदवनात अपंग स्वावलंबी बनले. त्यांच्या जीवनातील लाचारी सपंली. बाबा अपंगांचे दोस्त बनले. चटया विणण्यासारखे अनेक छोटिमोठी कामे होऊ लागली व अर्थार्जन झाले. सहकार तत्व हेच सांगत नाही का? सहकार तत्वाने अनेक दलितांचा उद्धार केला. समाजातील अनेक अपंग व अंध लोकांना एकत्र आणले त्यांना स्वावलंबी बनवले. आपल्या अंधत्वाचा त्या लोकांना विसर पडला. तर असे हे सहकारी तत्व बाबा आमटे यांनी पटवून दिले. सहकार हे तत्व समाजसेवी लोकांनी अंगीकारीले याचे उत्तम उदारण देता येइल ते सिंधुताई सपकाळ यांचे. स्वताचा उद्धार करुन त्याबरोबर इतरांचाही उत्कर्ष करावा, असे त्या सांगतात. अनेक बिकट परिस्थीतींवर मात करुन अनेक अनाथांच्या माता सिंधुताई सपकाळ झाल्या. त्यांचे कार्य अनेक ठीकणी चालते. सहकार तत्वाने "गांव करील ते राव काय करील" हे पटवून दिले आहे.

गरीब कुटुंबामध्ये नवरा व्यसनी व आजारी, घरात कमवणारे कोणी नाही, अशा कुटुंबामध्ये घरातील स्त्रिया घरकाम करतात. काही छोटेमोठे कुटीर उद्योग करतात. त्यातून त्यांना जो पैसा मिळतो तो दारुसाठी पती हिसकाऊन घेतो, म्हणुन त्या पैशाच्या बचतीसाठी बचत गटाची स्थापना झाली. आणि हळुहळु थोडी थोडी करुन प्रचंड रक्कम यातुन जमा होऊ लागली. त्यातुन अडिअडचणीला किंवा छोटा मोठा व्यवसाय करायला गरीब कुटुंबातील स्त्रियांना अगदी कमी व्याजात कर्ज मिळु लागले. पाहता पाहता बचत गटाचे कार्य एक चळवळच नाहि का बनले? खेडोपाडी, शहरांमध्ये बचत गट स्थापन झाले. त्याची गरज व महत्व सगळ्यांना पटु लागले. त्यातुन छोटेमोठे उद्योग सुरु झाले. लोणची, पापड, तिखट, मसाला एवढेच काय पण गोधडीला सुद्धा परदेशात मोठी मागणी आहे. तर असे हे सहकार तत्व ! अनेक ठिकाणी गृहिणींचे मंडळ असते, तेथे भजन, पोथीवाचन, पाक कौशल्य इत्यादि कलागुण या बरोबर ठरावीक रक्कम भिशीच्या रुपाने दर महिन्याला भरतात. त्यातुन एक रकमी पैसा मिळतो तो अडचणीच्यावेळी उपयोगी पडतो. तर अशी ही सहकार चळवळ. हिची पाळेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातही होती. शेतकरी एकमेकांचे पिकवलेल्या धान्याची अदान प्रदान करित असे. स्वातंत्र्योत्तर काळात ती फुलली, बहरली व आजही कार्य चालु आहे व चालुच राहिल. "विना सहकार नाही उद्धार" हे खरेच आहे.

सहकार तत्वामुळे मधल्यामध्ये फायदा उठवणारा दलाल व भांडवलदार नष्ट झाले आहेत हा सगळ्यात महत्वाचा फायदा झाला आहे. प्रत्यक्ष सहकारामुळे शेतकरी ग्राहकांपर्यन्त जाऊन पोहचला. सहकारामुळे सर्वांना संरक्षण मिळाले, संकटकाळी कोणी एकटे पडले नाही. सहकारात संघशक्ती आहे म्हणुन तर म्हणतात "संहिता कार्य साधिका". सहकारात माणुस अनेक गोष्टी शिकतो, माणुस येथे दुसर्याला समजुन घेतो, एकमेकांना सांभा़ळुन प्रगती साधतो. सहकाराने हे वेळोवेळी करुन दाखविले आहे.

सहकारला अशक्य असे काहीही नाही. परंतु सहकार या तत्वाला सत्तांतरांचे गालबोट लागले. "नाबार्ड" च्या नव्या धोरणामुळे सोसायट्या बंद होऊ पाहात आहे व शेतकर्‍यांना जिल्हा बॅंकेमार्फत कर्ज दिले जात आहे. म्हणजे शेतकरी पुन्हा भांडवलशाही व सावकार यांच्या पाशात अडकत आहे. यात शेतकरी पुर्ण अडकला जाईल हि शोकांतिका आहे. सहकारातिल भ्रष्टाचार दुर करण्यासाठी सोसायट्याच बंद करणे म्हणजे रोग्याचा इलाज न करता त्याला मृत्युच्या दारात ढकलण्यासारखे नाही का? आणि आता तर सहकार हा शब्द लोप पावत आहे. सहकार कुटुंबातूनही हद्दपार होतांना दिसत आहे हि खेदाची गोष्ट आहे. शेजारी शेजार्‍याला ओळखत नाही, भाऊ भावाला विचारित नाही. ज्या तत्वाने पुर्ण भारत मातेची शान राखली, ते तत्व झाकोळू लागले आहे. जो तो आपल्या पानावर तुपाची धार कशी पडेल याचाच विचार करीत आहे. अर्थात याला काही अपवादही आहेत. परंतू आजची पिढी आदर्शहिन झाली आहे, समाज मृतप्राय झाला आहे. दुसर्याचा विचार करणारे फारच थोडे आहेत. "जगा व जगु द्या" हे कुठेतरी हरवत चालले आहे. आज खरी सहकाराची गरज आहे. विखुरलेल्या परिस्थीतीवर तरुणांना एकत्र आणणे गरजेचे आहे. शिबीरे भरऊन विचार विनिमय करणे आवश्यक आहे. भरकटलेल्या युवा वर्गाला एकत्र आणुन सहकारी तत्वाने कार्य करुन घेणे हि काळाची गरज आहे. इंटरनेटमुळे सारे जग जवळ आले आहे पण मने दुर गेली आहे. नदिचे प्रवाह बदलवायला निघालेले राजकारणी पाण्याच्या हक्कासाठी भांडत असतात पण शेतकरी जो भारताचा आर्थिक कणा आहे तो आत्महत्या करित आहे. त्यासाठी आपल्या मायबाप सरकारला काही ठोस पाऊले उचलायला वेळ मिळेल का ? खरे तर वेळ मिळत नाही ही शोकांतिका आहे. जेथे निर्सगावर, पाण्यावर मालकी हक्क दाखवला जात आहे, सर्वांना स्वतंत्र व्हायचे आहे, तेथे निदान माणुसकीसाठी तरी सहकार तत्वाचा विचार होणे गरजेचे आहे.

आज भारताला एक सामर्थ्यशाली देश म्हणुन ओळख जरी मिळाली असली, भारताचे तंत्रज्ञान आकाशात झेपावत जरी असले तरी त्याच बरोबर आपण आपली पाळेमुळे विसरत चाललो आहे. कुटुंबापासुन गावापर्यंत, गावापासुन शहरापर्यंत, शहरापासुन राज्यापर्यंत आणि राज्यापासुन देशापर्यंत सगळ्यानांच व सगळ्यासाठींच सहकाराची अत्यंत गरज आजच्या काळात आहे. शामला सहकाराचा मंत्र शिकवणारी शामची आई कुठेतरी हरवली आणि आजची आई आता "तुझ्या मित्राला तुझ्या बाटलीतले पाणी देवू नको, तूच पी. तुझा खाऊ तूच खा" असे संस्कार करीत आहे. हे कधी कुणाच्या लक्षात येइल.......?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सहकारा"चे महत्व विशद करणारा हा लेख जितका अभ्यासपूर्ण आहे हे जसे मान्य तितकेच वैकुंठभाई मेहता आणि महात्मा गांधी यांचे या चळवळीतील योगदान उल्लेख करतेसमयी इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याच्या नावाचा उल्लेख टाळणे मान्य करण्यासारखे नाही. लॉर्ड कर्झनचे नाव प्रामुख्याने बंगालच्या फाळणीशी जोडले जाते पण या देशात 'सहकार चळवळी' चे महत्व किती आणि त्यामुळे रात्रंदिन शेतात राबणार्‍या शेतकर्‍याची पैशाकडून होणारी कुचंबणा टाळण्यासाठी त्या को-ऑपरेटिव्ह इरा ची स्थापना करणे किती आवश्यक आहे हे इंग्लिश संसदेला पटवून देण्यात लॉर्ड कर्झन यशस्वी ठरले होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने "को-ऑपरेटिव्ह सोसायटी अ‍ॅक्ट, १९०४" ची स्थापना झाली. त्या वर्षापासून 'सहकार चळवळी' ने हिंदुस्थानात बाळसे धरले हा इतिहास आहे.

१९०५-०६ मध्ये सहकार सोसायट्यांची देशात संख्या होती ८४३ आणि वार्षिक उलाढाल झाली होती रुपये २३,८१,६७३ ची; तर पुढील पाच वर्षातच सहकाराने जोर धरला आणि अधिकृत सोसायट्यांची संख्या झाली ८,१७७ तर उलाढाल झाली ती तब्बल ३,३५,७४,१६२ रुपयांची. अर्थात याला स्थानिक सहकाराने जितकी साथ दिली तितकीच त्या काळातील लॉर्ड कर्झनच्या मार्गदर्शनानेही.

सहकाराला सत्तांतराचे गालबोट लागले आहे असा लेखिकेचा दावा आहे; पण मला वाटते कोणत्याही पक्षाचे शासन सत्तेवर असले तर "सहकार" कधी संपेल अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. इतके महत्व या चळवळीला तर आहेच शिवाय त्यातून निर्माण झालेल्या मतशक्तीलाही ते नजरेआड करू शकणार नाहीत.

असो.....एक चांगला लेख {जरी स्पर्धेच्या निमित्ताने लिहिला असला तरे....} वाचायला मिळाला हे सांगणे आवश्यक आहे.

अशोक पाटील

@ बकुल

इतका सुंदर विषय निवडल्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन ! आज पाहीलेले दोन्ही विषय दाद द्यावेत असेच वाटले. लेख चाळला आहे. वेळ मिळताच काळजीपूर्वक वाचणार आहे.

सहकार क्षेत्राचा हाय लेव्हल आढावा छान घेतलाय.
यशवंतरावांच्या योगदानाबद्ल आणखीत तपशीलवार वाचायला आवडले असते.
सहकारी साखर कारखाने अन त्यांचे परिणाम यावरही विश्लेषण हवे होते .

बाबा आमटे यांचे कार्य वादातीत आहेच पण सहकार चळवळीशी त्याचा संबंध जोडलेला पटले नाही