तगमग

Submitted by बेफ़िकीर on 14 August, 2013 - 08:53

एका टेकडीवरच्या रानात जायचं आहे. तिथे एक बाई असते, तिला भेटायचं आहे. ती साठ भूमिका जगते. तिला स्वतःला धरून एकसष्ट! मी बासष्टावा! त्या साठ भूमिका लिहायच्या आहेत. टेकडीला पायर्‍या नाहीच आहेत. पण टेकडी चढायला वाटही नाही आहे.

भूमिकांचं काही एवढं नाही. लिहिण्याचंही काही एवढं नाही. टेकडीच्या वर पोहोचण्याचंही काही एवढं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग निघू शकतोच.

पण अवघड वाटते ते हे, की हे मी करू शकणार आहे.

हे मी का करू शकणार आहे? बँक ऑफ महाराष्ट्रचा कारकून आणि विणकाम भरतकाम यापलीकडे न गेलेल्या आणि आता सर्वापलीकडे गेलेल्या एका व्यक्तीच्या सहजीवनाचे चिन्ह इतक्यावरच माझे वर्णन आटोपण्याचे दातृत्व नशिबाकडे का नाही? अस्वस्थतेच्या किड्याला मानवी देहाचे स्वरूप देण्याची हीन वृत्ती कोणाची?

जे शोधतो आहे तेच वाटत फिरतो आहे आणि वाटल्यावर वाटते की हेच तर साले आपण आपल्यात शोधत होतो. यापेक्षा रस्त्याच्या बाजूला पडलेले कंस्ट्रक्शनचे पाईप्स बरे ज्यातून रस्त्यावरील सांडपाणी, कुत्र्याचे पिल्लू आणि भिकार्‍याचा पोरगा असे सगळे जण एकाचवेळी जाऊ शकतात. माझ्यातून जे आरपार जाते तो मीही नसतो आणि त्यावर माझा प्रभावही नसतो. तरीही तोच मी असतो आणि माझा त्याच्यावर प्रभाव असतो? हे कसे काय?

सोंग!

लक्षावधी सोंगे मिळून एक मोठे सोंग किंवा एका सोंगातून कोट्यावधी सोंगे! खरे काय तर काहीच नाही.

एखाद्या क्षणाला चिकटलेली त्या त्या क्षणाची एक्स्क्ल्युझिव्ह मानसिकता व तिची तीव्रता इतकेच खरे! मग ती ओढून ताणून पुढच्या लाखो क्षणांपर्यंत नेत राहायची आणि शब्दांमधून जगासमोर उभी करायची तोंडाला रंग लावून! सुटका हवी आहे. कायिक सुटका ही खरी नसल्याने कायिक सुटका नको आहे. कश्यापासून सुटका हवी आहे हेही कळू देत नाही. 'तो भोसडीचा'!

तगमगीचीच तगमग व्हावी असे काहीतरी करावे का?

टेकडीवरच्या बाईने एकसष्ट तगमगी उदरात लपवल्या आहेत. त्या सगळ्या तगमगींची म्हणूनच तर तगमग होत असेल ना? मला काय? नुसते ते खरडायचे आपले तिचे उदर शब्दांमधून!

प्रत्येक स्वरुपाला एक भूमिका मिळालेली असते. किंवा असे म्हणता येईल की डोळे या इंद्रियाला बाहेरच्या जगातील जे जे दिसते ते ते एका विशिष्ट प्रकारे वागेल असे डोळ्यांमागच्या मेंदूने ठरवून ठेवलेले असते. खरी चूक येथेच होते. काहीच ठरवले जायला नको होते. मग क्षणांना काही चिकटले नसते. का चिकटले नसते याचे कारण मनोरंजक आहे. जे एका क्षणाला चिकटले ते त्याच, तश्याच परिस्थितीत येणार्‍या दुसर्‍या क्षणालाही चिकटेल हा आडाखाच मुळी चुकीचा निघाला असता आणि मग माणसे घुबडासारखी माना आणि डोळे फिरवत नुसती येणार्‍या जाणार्‍या क्षणांना काय काय चिकटतंय ते बघत राहिली असती. तरडक तरडक ढिंग टाक ढिंग! बेकार धमाल आली असती.

टेकडीवरच्या बाईला एकसष्ट भूमिका आहेत.

आपल्याला अनंत!

म्हणून भूमिकांचं काही एवढं नाही. टेकडी चढायचं काही एवढं नाही. लिहायचंही काही एवढं नाही.

अशक्य आहे ते इतकेच.... की एकाच भूमिकेत कुलुपबंद व्हायला कोणी सांगितले तर... आपल्याला ते जमू शकेल का?

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणूस हजार मुखवटे घेवून जगत असतो..... घरच्यान्साठी वेगळा, साहेबासाठी वेगळा, शाळेत पालक म्हणून वेगळा मुखवटा....... तर एखाद्या मुलीला इम्प्रेस करताना वेगळा मुखवटा.

मागे वाशी पोलिस स्टेशनला एक स्ल्गन वाचले होते...

प्रत्येक पोलिस हा वर्दी असलेला नागरीक आहे,तर प्रत्येक नागरीक हा वर्दी नसलेला पोलिस आहे

याचह उक्तीस अनुसरून म्हणावेसे वाटते....

प्रत्येक अभिनेता हा अभिनय हा व्यवसाय असलेला माणूस आहे,तर प्रत्येक माणूस हा अभिनय हा व्यवसाय नसलेला अभिनेता आहे.

आपल्या ख-या रुपात नेहमीच उपलब्ध न राहता येणे...या मुळे "तगमग" होतेच .

लेख आवडला.

टेकडीवरच्या बाईला एकसष्ट भूमिका आहेत.<<<<उत्सुकता !!!!!
कश्यापासून सुटका हवी आहे हेही कळू देत नाही. 'तो भोसडीचा'!<<< खरय अगदी ...
तगमगीचीच तगमग व्हावी असे काहीतरी करावे का? <<<< नको

अशक्य आहे ते इतकेच.... की एकाच भूमिकेत
कुलुपबंद व्हायला कोणी सांगितले तर...
आपल्याला ते जमू शकेल का? >>> तेव्हा मग पूर्णपणे आपण 'आपणच' असू...आपल्या व्यक्तित्वाचा कोणताही खोटा पैलू नसेल..

लेखन आवडले हे वे सां न ल.:)

मस्त लेख आहे.
आपल्या हजारो सोंगांपैकी आपण कोण? की यापैकी कोणीच नसलेला आपण वेगळाच कोणीतरी एखाद्या पायपासारखा? आपण फसवणारा की फसविला जाणारा? संपुर्ण सत्य असे काही नसतेच असतात ते वेगवेगळे आभास.
ही तगमग पण तशी खरी नाहीच कारण ती टेकडी चढण्याचे कारणच नाही.
______________________________________

अविकुमार | 15 August, 2013 - 12:34 नवीन
स्वारी, नै झेप्या. मल्तकैकळ्ळच्नै

Happy Happy

किंवा असे म्हणता येईल की डोळे या इंद्रियाला बाहेरच्या जगातील जे जे दिसते ते ते एका विशिष्ट प्रकारे वागेल असे डोळ्यांमागच्या मेंदूने ठरवून ठेवलेले असते. खरी चूक येथेच होते. काहीच ठरवले जायला नको होते. मग क्षणांना काही चिकटले नसते. का चिकटले नसते याचे कारण मनोरंजक आहे. जे एका क्षणाला चिकटले ते त्याच, तश्याच परिस्थितीत येणार्‍या दुसर्‍या क्षणालाही चिकटेल हा आडाखाच मुळी चुकीचा निघाला असता आणि मग माणसे घुबडासारखी माना आणि डोळे फिरवत नुसती येणार्‍या जाणार्‍या क्षणांना काय काय चिकटतंय ते बघत राहिली असती. तरडक तरडक ढिंग टाक ढिंग! बेकार धमाल आली असती. >> ओह्हो, interesting. अध्यात्म हेच तर सांगतय वेगळ्या शब्दात, किंवा तुम्ही सांगताय अध्यात्म वेगळ्या शब्दात.
लेख आवडला, बेकार धमाल आहे!

सर्व दिलखुलास व दिलदार प्रतिसाददात्यांचा आभारी आहे. कैलासराव व निलिमाजी, आपले विशेष आभार! निलिमाजी, आपला संदेश समजला व पटलाही Happy

नेहमीच मनातील गुंतागुंत किंवा असे काही मनोव्यापारांबाबत लिहिले की तुम्ही अतिशय मैत्रीपूर्णपणे त्यातील गोम किंवा खोच दाखवून देता आणि डोळे उघडता, हे आपले वैशिष्ट्य अनेकदा आपल्या प्रतिसादाची वाट पाहण्यास भाग पाडते.

आपला अनुग्रहीत!

-'बेफिकीर'!