सुपरमून

Submitted by kaushiknagarkar on 8 August, 2013 - 11:56

सुपरमून
ए काय पाहतोयस एवढं?
सुपरमून
अय्या सुपरमॅन? कुठेय ? पाहू ..
सुपरमॅन नाही सुपरमून
तू सर पाहू ... कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाही.
सुपरमॅन इथे शेजारी उभा आहे आणि सुपरमून तिकडे वर आकाशात. खिडकीतून खाली पाहून काही दिसणार नाही.
आईग कित्ती गोड दिसतोय.
कोण?
चंद्र. छानच दिसतोय आणि केवढा मोठा! म्हणून त्याला सुपरमून म्हणायचं का?
हो आणि नाही.
झालं का तुझं सुरू?
काय?
मग? हो आणि नाही म्हणजे काय? नक्की सांग ना.
पण आता ते तसं आहे त्याला मी काय करू?
काही सबबी देउ नको बरं का. नेहेमीचचं आहे हे तुझं. संध्याकाळी जेवणार का म्हणून विचारलं तेंव्हा देखील हेच उत्तर दिलस. हो आणि नाही.
ट्रिंग.. ट्रिंग..
पण त्याचा अर्थ अगदी स्पष्ट नव्हता का? जेवायचं आहे. पण तू केलेलं नाही.
ट्रिंग.. ट्रिंग..
अस्सं काय ? जेवायला घालते का बघ आता तुला.
रिंग.. रिंग..
अग तसं नाही ... अरे बापरे, हा फोन बाजतोय बघ तुझा.
ट्रिंग.. ट्रिंग..
माझा नाही. तुझाच वाजतोय.
हो का? हॅलो. हॅलो ...
काय सुप्परमून पाहिला की नाही?
अरे तू? वाटलच होतं मला. हो आत्ता या क्षणी पाहातो आहे.
केवढा प्रचंड आहे ना?
अरे तुम्हा लोकांना वेडं लागलीत की काय? चंद्र कधी न पाहिल्या सारखं बोलताय अगदी.
हट लेका, चंद्र कित्येकदा पाहिलाय. कोजागिरीला आपणच तर एकत्र असतो दरवर्षी.
कोजागिरी नाही रे म्हणायचं. को जा ग री.
काय सांगतोस? का बरं?
तो काय कोजा नावचा पर्वत आहे का? द्रोणागिरी त..
अं.. मला वाटत मी आपलं जावं. तुम्हा मित्रांचा चालू दे प्रेमसंवाद...
नाही नाही. सॉरी सॉरी.. हे बघ मित्रा तुझ्या प्रश्नांना बरीच पिल्लं असणार. तेंव्हा तू असं का करीत नाहीस? अजून संध्याकाळ जस्ट होतेय. मी शीतपेयांची व्यवस्था करतो. तु एक तासाभरात इकडे ये. सध्या आम्ही चंद्र पाहातो आहोत.
ठरलं?
ठरलं. चल. बाय.
काय ग चालेल ना? आता बोलावून तर बसलो. तुझाच भाऊ आहे म्हणा.
नाही म्हणून उपयोग आहे का काही? आधी ठरवायचं आणि नंतर तोंडदेखलं विचारायचं. लेकिन इसबार माफ किया. कारण मला ही तेच प्रश्न आहेत. पेयाबरोबर काहीतरी चमचमीत खायला हवच असेल?
हवच असं नाही. पण चालेल नक्कीच. थँक्स हं.
यू आर नॉट वेलकम हं.
हा हा हा...
...
:
:
डिंग.. डॉंग..
हं.. ये ये. वाटच पाहत होतो.
तू ते द्रोणागिरीच काय म्हणत होतास?
अरे आत घरात तर येशील की नाही पूर्ण? तो द्रोणागिरी काही कुठे पळून जात नाही.
हा पहा. आलो. बसलो. हा ग्लास उचलला. भज्यांची थाळी हातात घेऊन उभ्या असलेल्या माझ्या बहिणीला हॅलो असं म्हणालो. आभाळातल्या त्या चांदोबाला सुध्दा 'हाय' केलं. चांदोबा थोडा रोडावल्या सारखा वाटतोय. आता तरी सांग.
काय सांगू?
द्रोणागिरी..
हो हो. अरे ते मी गमतीने म्हटलं.
हा असाच आचरटासारखं बोलतो नेहेमी. तू मनावर नको घेऊ.
ताई, अगं मनावर घेतलं असतं तर इथे आलो असतो का पळत पळत? मी शाळेत उनाडक्या केल्या, त्यामुळे हे असले बारकावे मला माहीत नसतात. या गाढवामुळे निदान कळतात तरी या गोष्टी.
बरं मित्रा, आता तरी सांगशील का की कोजागिरी म्हणण्यात काय चुकलं?
कोजागिरी या शब्दाचा अर्थ 'कोजा नवाचा पर्वत' असा होईल. जसा द्रोणागिरी किंवा गोवर्धनगिरी.
किंवा वराहगिरी वेंकटगिरी गिरी..
अय्या हे काय़?
एक रबरस्टँप राष्ट्रपती होते. जाउदे. तर खरा शब्द आहे कोजागरी. 'को जागर्ती?' असं विचारीत लक्ष्मीदेवी त्या रात्री फिरत असते म्हणून तिला म्हणायचं कोजागरी पौर्णिमा. जे झोपलेले असतील त्यांच्या घरी ती रहात नाही.
अच्छा म्हणून त्या रात्री सगळे जागे रहातात होय? पैसा चाहिये इस लिये.
मग काय तर. 'बाबानो अश्विनातली हवा फार सुरेख असते. पौर्णिमेच्या चांदण्यात मित्रमंडळीसमवेत हास्यविनोद करणे आरोग्यास हितकर' असं सांगितलं तर किती लोक ऐकतील?
शून्य
हो ना? पटलं ? शेवटी लक्ष्मी म्हणजे काही फक्त पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे धनसंपदा. आणि आरोग्य हे पैशापेक्षाही मूल्यवान अशी संपत्ती नाही का?
पटलं पण त्याचा सुपरमूनशी काय संबंध?
मी कधी म्हटलं तसं? आपण तर कोजागिरी या शब्दाची चिरफाड करत होतो. मला एक सांग, की सुपरमून म्हणजे काय?
सुपरमून म्हणजे .. म्हणजे .. मोठ्ठा मून. सुपरसाईज. थांब थांब, लेका सुपरमून म्हणजे काय हे तर मी तुला विचरतोय ना?
हो पण तुझी काय कल्पना आहे ते समजून घ्यायचं होतं मला. सुपर म्हणजे मोठ्ठा पण किती मोठा? का मोठ्ठा?
ये तो हमने सोचा न था. काही कल्पना नाही बुवा.
तुला ग? तुझं काय मत आहे?
मला वाटतय की जवळ आल्यामुळे मोठा दिसत असावा. पण किती ते नाही बाई ठाऊक. आणि जवळ का येतो? आत्ताच का आला? देव जाणे.
व्हेरी गुड. व्हेरी गुड. जवळ आला म्हणून मोठा दिसतो हे बरोवर आहे अगदी. जवळ येतो कारण चंद्र पृथ्वीभोवती वर्तुळाकर मार्गाने फिरत नसून लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. खरं म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरत नाही. चंद्र आणि पृथ्वी हे दोघेही एकमेकांभोवती फुगडी घालत असतात पण ते इथे महत्वाचं नाही.
मग जवळ जर येतो तर लांबही जात असला पाहीजे.
बरोब्बर. हुशार आहेस हं तू. पण जवळही फार येत नाही आणि दूरही फार जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला जाणवेल इतका काही मोठा दिसत नाही.
पण मला दिसलाकी आज.
अय्या मलाही.
तेचतर सांगतोय ना. तुम्हाला तो फार मोठा वाटला कारण तो तुम्ही उगवताना पाहिलात, क्षितीजाजवळ.
हट. कहीतरीच काय.
बरं. मग आता पुन्हाएकदा पाहा बरं.
अरे बापरे! चंद्र लहान झाला की.
ई….. खरच की. अस कसं झालं?
चंद्र आकाशात कोठे आहे? क्षितिजावर?
नाही जवळजवळ डोक्यावर आहे आता.
मावळतीकडे जाईल तेंव्हा पुन्हा मोठा झालेला दिसेल.
आज सुपरमून आहे म्हणून?
नाहिरे बेटा. असं रोजच असतं. चंद्र आणि सूर्य उगवताना आणि मावळताना नेहेमीच खूप मोठे भासतात. तो निव्वळ दृष्टीभ्रम असतो. आपल्याला बर्‍याच गोष्टींच म्हणजे आकार, अंतर, वजन, वेग यासारख्या गोष्टींच आकलन हे दुसर्‍या कशाच्यातरी संदर्भानेच होतं. उगवताना चंद्राच्या जवळ झाडं, घरं अशा वस्तू असतात. त्यांच्या बरोबर पाहिल्या मुळे तो मोठा वाटतो. डोक्यावर असताना जवळपास, म्हणजे, चंद्रासह दिसणार्‍या ओळखीच्या गोष्टी नसतात त्यामुळे नुस्तं चंद्रबिंब पाहून ते किती मोठं आहे असं आपल्याला वाटत नाही.
खरं सांगतोयस की फेकतोयस?
खरं सांगतोय रे. मला नाहिती आहे, हे पटायला कठीण आहे. म्हणून तुला एक दृष्टांत सांगतो. फर्निचरच्या दुकानात लहान वाटणारं टेबल घरी आणल्याबरोबर मोठ धूड बनतं हा अनुभव घेतला असशीलच?
होय होय.
एका साध्या प्रयोगाने याची शहानिशा करणं शक्यं आहे. एक नळी घ्यायची, जिच्यात पौर्णिमेचा उगवता चंद्र फिट्ट बसेल अशी. नन्तर चंद्र डोक्यावर आला की पुन्हा पाहायचं. झालं. करणार?
अं अम. हो हो नक्की. पण मग सुपरमून वगैरे नुस्त्या थापा? अस धडधडीत खोट सांगतात टीव्हीवर?
तसंही नाही रे, थोडं खरं. बरचसं वाढवून सांगितलेलं. चंद्र पृथ्वीच्या जवळ ठराविक कालाने येत असतो, पण पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा जो काल आहे- २४ तासाचा - त्यामुळे जेंव्हा तो अगदी जवळ येईल तेंव्हा आपल्या कडे दिवस असू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पौर्णिमेला रात्री जर चंद्र जवळ आला तर तो सुपरमून. असा योग काही अगदीच दुर्मिळ नाही. दर चौदा महिन्यात एकदा तरी येतोच असा योग. त्याला सुपरमून अस कोणीतरी नाव दिलं अलिकडेच.
पण असं कसं असेल? तुमच्या खगोलशास्त्रात तर सगळं शिस्तशीर व्हायला लागतं ना? घड्याळाच्या काट्यानुसार? मग हा असा रँडमनेस कसा? दर पौर्णिमेला का होत नाही सुपरमून?
आमचं खगोलशास्त्र काय? पण खरोखरीच खगोलशास्त्राच्या, भौतिकशास्त्राच्या नियमानुसारच हे घडत आहे. म्हणजे त्याचं काय आहे की चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो साडे सत्तावीस दिवसात (२७.३ दिवसात). म्हणजे समज आज पौर्णिमा आहे.
आहेच की.
हो खरच. मी विसरलोच होतो. तर आज पौर्णिमा आहे, मग आजपासून साडेसत्तावीस दिवसांनंतर कोणती तिथी असेल?
पौर्णिमा? पण ज्या अर्थी तु असा सोपा वाटणारा प्रश्न विचारतोयस त्या अर्थी ते उत्तर बरोबर नसणार.
बरोब्बर.
काय बरोबर?
उत्तर चूक. अंदाज बरोबर.
पौर्णिमा हे उत्तर प्रथमदर्शनी बरोबर असयला हवं. कारण चंद्राने एक फेरी पूर्ण केली आहे. पण चांदोबा प्रदक्षिणा घालत असताना पृथ्वीही सूर्याभोवतीच्या कक्षेत पुढे गेलेली असते. म्हणून पौर्णिमा होण्यासाठी चंद्राला अजून थोडा प्रवास करावा लागतो. म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते ..
साडेसत्तावीस दिवसात.
पण पौर्णिमा ते पौर्णिमा यातलं अंतर असतं साडे एकोणतीस दिवसांचं.
अस्सं. म्हणजे आजच्याप्रमाणे जर चंद्र पौर्णिमेला पृथ्वीच्या जवळ असेल तर साडेसत्तावीस दिवसांनी तो जेंव्हा पुन्हा जवळ येईल तेंव्हा पौर्णिमा नसेल.
अंगाश्शी. समजलं गड्या तुला. तेंव्हा साधारणपणे एक कला अलिकडची असेल. अणि क्रमाक्रमाने फिरून परत पौर्णिमेला सुपरमून येईल.
समजलो. सुपरमून म्हणजे पौर्णिमेल जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळातजवळ आलेला असतो त्याला म्हणतात. हे असं दर पौर्णिमेला होतं नाही पण बर्‍यापैकी फ्रिक्वेन्टली होतं असतं.
झकास. ही भजी तशीच राहून जातील हं, तुम्ही नुसतेच बोलत बसलात तर.
ओके. डोळ्याने पाहून सुपरमून फारसा मोठा दिसत नाही पण त्याचा काहीतरी परिणाम होत असेलच की. गुरूत्वाकर्षण वगैरे?
हो. एरवीदेखील पौर्णिमा अमावास्येला भरती मोठी येते. सुपरमूनमुळे ती आणखी मोठी असते. पृथ्वीच्या परिवलनाची गती थोडी अधिक मंदावत असणार त्यामुळे.
अग बाबो. हे काय काढलस आणखीन मधेच? पृथ्वीचं परिवलन काय, गती मंदावेल काय... स्लो डाऊन. स्लो डाऊन.
अरे यात नवीन काही नाही. परिवलन म्हणजे पृथ्वीचं स्वत:भोवती फिरणं. रोटेशन. त्यामुळे रोज दिवस-रात्र होत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला म्हणायचं, परिभ्रमण. हे करीत असताना पृथ्वीसुध्दा सूर्यापासून जवळ आणि दूर जात असते. परिभ्रमण आणि पृथ्वीची कललेली कक्षा यांचा परीणाम म्हणून पृथ्वीवर ऋतू होतात.
स्वत:भोवती गरगर फिरणं. म्हणजे परिवलन. दुसर्‍याभोवती फिरणं म्हणजे परिभ्रमण. समझ गये.
पृथ्वीप्रमाणेच चंद्रही स्वत:भोवती परिवलन करण्यात दंग असतो. आणि त्याचबरोबर पृथ्वीभोवती आणि पृथ्वीसह सुर्याभोवती परिभ्रमण करत असतो.
च्यायला. हे डबल काम आहे कि चंद्राला.
सूर्यही स्वत:भोवती परिवलन करत करत, परिवलन आणि परिभ्रमण करणार्‍या सर्व ग्रहांना आणि त्यांच्या पिल्लांना घेऊन आकाशगंगेच्या मध्याभोवती परिभ्रमण करीत असतो. आणि आकाशगंगाही स्थिर नाही. ती ही ...
थांब थांब. स्टॉप. आधी हे सूर्यमालेचं चित्र डोळ्यापुढे आणू दे. ... हं. चालूदे
आपली आकाशगंगा इतर आकाशगंगांसमवेत फिरत असते.
आईग. आगदी पिंडी ते ब्रम्हांडी का काय म्हणातात तसला प्रकार झाला.
तर काय. गल्लीतला दादा नगरसेवकाभोवती, नगरसेवक आमदाराभोवती, आमदार मंत्र्याभोवती, मंत्री मुख्यमंत्र्याभोवती, मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याभोवती अँड सो ओन अँड सो फोर्थ...
पुरे हं आता. गाडी भलतीकडेच घसरली तुमची. हे सगळं निघालं कुठून?
परिवलन आणि परिभ्रमण…
आठवलं. मात्र आता जे बोलतोय त्याचा सुपरमूनशी अर्थाअर्थी काही संबंध नाही बरका. पृथ्वी आणि चंद्र दोघेही एकमेकाला खेचत असतात. त्यामुळे पृथ्वीवर भरती ओहोटीचं चक्र चालू असतं हे तर सगळ्यांना ठाऊक असतचं. या भरती ओहोटीमुळे घर्षण होतं त्यातून जी ऊर्जा, म्हणजे एनर्जी, खर्च होते त्यामुळे परिवलनाची गती मंदावते. दर शंभर वर्षाला दोन मिलिसेकंद एवढा फरक पडतो. सुपरमूनमुले आणखी तिळभर जास्त.
अरे पण ज्योतिषी तर म्हणतात सुपरमूनचा फार मोठा प्रभाव पडणार आहे म्हणून. आपलं शरीर सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे. समुद्राला जर एवढी भरती येते तर आपल्यावर परीणाम झाल्या शिवाय कसा राहील?
हे बघ, ज्योतिष ही विश्वास ठेवण्याची गोष्ट आहे त्यामुळे मी शक्यतो त्याविषयी बोलायचे टाळतो. पण एक शंका नमूद कराविशी वाटते, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम शरीरातल्या पाण्यावर होत असेल तर तो सर्वांवर सारखा नको का व्हायला? आणि ग्रहांचा आपल्या भविष्यावर होणारा परीणाम हा गुरुत्वाकर्षणामुळे उद्भवलेला आहे असे जर मानायचे ठरविले तर मग हे ही मान्य करावे लागेल की शुक्र, मंगळ, गुरू, आणि शनी यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नगण्य आणि त्यामुळे निरूपयोगी आहे.
अरे पण ग्रहांची किती काळजीपूर्वक नोंद ठेवलेली असते पत्रिकेत.
अगदी मान्य आहे. किंबहूना ज्योतिषातूनच ज्योतिर्विद्येचा जन्म झाला म्हणेनास. शतकानुशतके स्थिर भासणार्‍या तार्‍यांच्या पार्श्वभूमीवार आकाशात फिरणारे हे हे खगोल ( चंद्र,सूर्य आणि ग्रह) अद्भुत होतेच. कालांतराने त्यांच्या फिरण्यात एक नियमितता आहे हे जाणवलं आणि मग त्यांचे काळजीपूर्वक वेध घेतले गेले. ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोहोंची सुरूवात अशा रितीने झाली. पण ज्योतिषाचा रोख हा या ग्रहांची पृथ्वीसापेक्ष स्थिती आणि त्यांचा तुमच्या आमच्या जीवनावर होणारा परिणाम यावर असतो. ग्रह, यात सूर्यचंद्रही आले, कसे निर्माण झाले, कधी निर्माण झाले, ते केवढे आहेत आकाराने, कशाचे बनले आहीत अशा प्रश्नांची उत्तर शोधायचा ज्योतिषाने कधी प्रयत्न केला असे दिसत नाही. असले प्रश्न ज्योतिषाला कधी पडले नसावेत.
हं.
प्रत्येक ग्रहाचं एक रूप ठरवलं गेलं. त्यांचे विशिष्ट गुण ठरवले गेले. त्यांच्या उपकारक गुणांचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि त्रासदायक गुणांचा शम करण्यासाठी मंत्र, खडे, व्रत वैकल्य असे उपाय योजले गेले. गुरुत्वाकर्षाणाचा यात कधी उल्लेख नव्हता. आता हा प्रभाव गुरुत्वाकर्षणामुळे असं 'सायंटिफीक' प्रतिपादन करायचं असलं तर ते 'सिलेक्टिव्हली' घेऊन चालायचं नाही. गुरुत्वाकर्षण मानायचं तर सर्व ग्रहांचं गुरुत्वाकर्षण सारखचं, फक्त शक्तिचाच काय तो फरक हे ही मानावं लागेल. गुरुत्वाकर्षणाचा सर्वांवर एकसारखाच परिणाम होणार हेही मान्य करावं लागेल. त्यापेक्षा अजून खगोलशास्त्राला न समजलेलं अगम्य असा 'फोर्स', एक अतर्क्य शक्ती आहे असं मानणं सोपं होईल. 'सुडो सायन्सचा' प्रॉब्लेम दूर होईल.
कडकडून टाळ्या.
समजलो. उपदेश पुरे, असच ना? पण विषय तुम्ही काढलात.
कबूल. आपण आपलं चंद्राबद्दल बोलुया.
काय बोलुया?
फार काही नाही रे. फकत चंद्र कसा झाला, कधी झाला, कसा आहे, केवढा आहे एव्हढचं।
परिक्षा घेतोयस. पण या प्रश्र्नांची बर्‍यापैकी समाधानकारक उत्तरे आहेत आता.
अय्या. म्हणजे इतकं करून 'बऱ्यापैकीच' का समाधानकारक!
अगं ताई, खगोलशास्त्रात ना, सगळ्या 'थियर्‍या' असतात. एखाद्या थियरीच्या आधाराने जोपर्यंत समाधानकारक उत्तरे देता येतात तोपर्यंत ती थियरी मान्य असते. जर थियरीचा आणि निरीक्षणाचा, पुराव्याचा मेळ बसला नाही तर थियरीचा खेळ खल्लास. काय राजे बरोबर ना?
कस लाख बोललास.
तुझ्याकडून ऐकून ऐकून तोंडपाठ झालय आता. चला जाउद्या गाडी.
सार्‍या ग्रहांच्या उपग्रहात आपला चांदोबा निराळा आणि वैशिष्ठ्यपूर्ण आहे हं. बुध आणि शुक्राला उपग्रह नहीत. पृथ्वीला एक, मंगळाला दोन, गुरुला सहासष्ट, शनीला बासष्ट, युरेनसचे सत्तावीस आणि नेपच्यूनला तेरा उपग्रह आहेत. हा अर्थातच आजचा आकडा आहे. यापैकी मोठे उपग्रह म्हणजे; गुरूचे गॅनिमिड, आयो, युरोपा हे तीन गॅलिलियन उपग्रह. शनिचा टायटन, युरेनसचा टायटेनिया आणि नेपच्यूनचा ट्रायटन. हे चारही बाह्यग्रह, ज्यांना 'गॅस जायंटस्' आणि 'आइस जायंटस्' म्हटलं जातं, ते पृथ्वीपेक्षा आकाराने आणि वस्तुमानाने फार मोठे आहेत. त्यांचे उपग्रहही तसेच मोठे असले तर नवल नाही. पण त्यांच्या पंक्तीत चंद्र बसतो यावरून लक्षात येईल की चंद्र हा चांगला सणसणीत आहे अंगापिंडाने. जर ग्रहांचा आकार विचारात घेतला तर चंद्राचा मोठेपणा आणखीनच नजरेत भरतो. गुरुचा मोठा उपग्रह गॅनिमिड हा बुधापेक्षाही मोठा आहे पण त्याचं वस्तुमान गुरुच्या वस्तुमानाच्या एक दशसहस्रांश पेक्षाही कमी आहे.
दश.. दश काय म्हणालास?
दशसहस्रांश, म्हणजे दहाहजार पटीने कमी आहे.
हो नं, अगदी परफेक्ट समजलं नाही.
म्हणजे समजा एक योग्य आकाराचा तराजु घेतला आणि त्याच्या एका पारड्यात गुरू ठेवला तर तो तराजु समतोल करण्यासाठी दुसऱ्या पारड्यात दहाहजार गॅनिमिड ठेवावे लागतील.
म्हणजे गुरूच्या पुढे गॅनिमिड अगदी किरकोळ आहे. हाथीके सामने चींटी.
बरोबर. हाथीके सामने चींटी.
तो फिर? ऐसी 'साइँटिफीक' भासामें एस्पलेन कर ना यार.
गॅनिमिडचा व्यास गुरूच्या व्यासाच्या सव्वीस पटीने कमी आहे. समजा आपण बाजारात गेलो गुरूच्या आकाराची पिशवी बरोबर घेऊन आणि त्यांना मागितले 'जरा एक पिशवीभर गॅनिमिड द्याहो', तर त्यांना जवळजवळ एकोणीस हजार गॅनिमिड ठेवावे लागतील ती पिशवी भरण्यासाठी.
त्यांना म्हणजे कोणाला मागायचे?
दुकानदाराला. 'युनिव्हर्स जनरल स्टोसर्स, आमचे येथे सर्वप्रकारचे ग्रह, तारे आणि उपग्रह निर्भेळ, खात्रीशीर आणि स्वस्त दरात मिळतील', त्यांना.
असतील का त्यांच्याकडे एवढे आयत्यावेळी.
नसले तर आणतील की जवळपासच्या दुकानातून. नाहीतर आधी फोन करून जायचं. तू काळजी नको करू.
झाला का तुमचा दोघांचा फाजीलपणा सुरू?
अोके. आता पृथ्वीपुढे चंद्र म्हणजे 'हाथी के सामने गधा'.
ते कसं काय?
चंद्र हा पृथ्वीच्या एक चतुर्थांश आहे ..
आकाराने का वजनाने?
फार छान प्रश्र्न विचारलास. दोन खगोलांची तुलना करताना आकार आणि वस्तुमान अशी दोन्ही प्रकारे करणे योग्य ठरते. वस्तुमान म्हणजे मास, म्हणजे त्या खगोलात असलेल्या सर्व पदार्थांची गोळाबेरीज. वजनाला यासंदर्भात काही अर्थ नाही. आता हे वस्तुमान कसं मोजलं ते विचारू नको. तो वेगळाच विषय आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे. आणि वस्तुमान मात्र एक्याऐंशी पटीने कमी आहे. म्हणजे पृथ्वी आणि चंद्राचा समतोल होण्यासाठी फक्त एक्याऐंशी चंद्र पुरे होतील.
म्हणजे चंद्र पृथ्वीपुढे किरकोळ नाही.
किरकोळ नाही, आणि भरीत भर म्हणून तो खूप जवळून फिरत असतो पृथ्वीच्या.
म्हणजे, इतर ग्रहांचे उपग्रह ज्या अंतरावरून फिरतात त्या तुलनेने.
एक्झॅक्टली. पण आता दुसरी गंमत पहा. आकाराने चंद्र बराच मोठा असला तरी वजनाने जरा कमीच आहे. म्हणजे त्याची घनता अर्थात डेन्सिटी ही पृथ्वीपेक्षा कमीच आहे.
वा. वा. चंद्राची घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे हे ऐकून आनंद झाला. कळलं मात्र काही नाही. अजिबात. घनता कमी असो किंवा जास्त असो त्याचा आम्हाला काय उपयोग? आमच्या घशाला पडलेली कोरड कमी होणार आहे का त्यामुळे? शरीरातले द्रवपदार्थ कमी झाल्यामुळे आमची घनता मात्र इथे क्षणाक्षणाने वाढते आहे.
आहे, आहे. उपयोग आहे. थोडा धीर धर. तिकडेच चाललो आहोत आपण. तुझा पहिला प्रश्न होता चंद्र कसा झाला? या विषयी तीन निरनिराळ्या थियर्‍या मांडल्या गेल्या.
आ .. हा! आ हा! मी म्हटलं होत की नाही.
दोनदा आ..हा का?
पहिली आ..हा शीतपेय पोटात गेलं त्याला दाद म्हणून होती. दुसरी थियऱ्यांबाबतची माझी थियरी बरोबर निघाली म्हणून स्वत:ला दिलेली दाद होती.
गुड. तुझी घनता पूर्ववत झाली हे ऐकून आनंद झाला. तर या थियऱ्या अशा; सहोदर उत्पत्ती, विभाजन आणि कबजा.
सहोदर काय?
उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे निर्माण होणे. उत्पन्न होणे.
ते माहिती आहे रे. सहोदर म्हणजे काय?
उदर म्हणजे पोट. एकाच आईच्या पोटात जन्मतात ते सह उदर, सहोदर. म्हणजे भावंडे.
हुं
तर कांट आणि लाप्लास यांनी अठराव्या शतकात सूर्यमालेची निर्मीती कशी झाली यासंबंधी जी थियरी मांडली तिला नेब्यूलर हायपॉथिसीस म्हणतात. सूर्य जन्म घेत होता तेंव्हा त्या गरगर फिरणार्‍या प्रचंड ढगाच्या सेन्ट्रीफ्यूगल फोर्समुळे, विषुववृत्ताच्या पातळीत वायू आणि धूलीकणांनी युक्त अशी एक तबकडी निर्माण होऊन ती ही गरगर फिरत राहीली. पुढे गुरुत्वाकर्षणामुळे वस्तुमान दाटत जाऊन सूर्य आक्रसत गेला आणि हळूहळू तापू लागला. त्याचवेळी तबकडी दूर दूर जात थंड होत गेली आणि त्यातून ग्रह बनले. चंद्रचा जन्मही पृथ्वीबरोबरच अशातह्रेने झाला. सहोदर उत्पत्ती.
कधी झालं हे ? आणि मला कसं कळलं नाही?
सधारणपणे चार बिलियन, चार अब्ज वर्षांपूर्वी घडलं हे. आम्ही तर तेंव्हा नव्हतो पण तुला तरी कळवायला हवं होतं.
हा हा हा.. चांगली आहे की थियरी. आम्हाला पसंत आहे. मग आता प्रॉब्लेम कुठे आला?
कोण म्हणालं प्रॉब्लेम आहे म्हणून?
प्रॉब्लेम नाही तर उरलेल्या दोन थियर्‍या काय गंमत म्हणून केल्या?
गुड थिंकींग. कांट आणि लाप्लासची ही थियरी अनेक गोष्टींचा समाधानकारक उलगडा करते. उदाहरणार्थ सर्व ग्रह सूर्याभोवती एकाच दिशेने फिरतात. सर्व ग्रह सूर्याच्या विषुववृत्ताशी समपातळीत फिरतात. अंतर्ग्रह, म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे लहान आणि खडकाळ आहेत. बाह्यग्रह; गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे भलेमोठे आणि वायूंचे बनलेले आहेत. इत्यादी इत्यादी.
अजूनही अडचण समजलीच नाही.
हे सगळं छान आहे. आणि एकंदरीत कोणत्याही तार्‍याची आणि त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहमंडळाची निर्मिती याबद्दल हीच थियरी अजूनहि बर्‍याच अंशी प्रमाण मानली जाते.
तो फिर प्रॉब्लेम क्या है बोल ना यार! शरमाओ नही..
हे सगळ ठीक असलं तरी चंद्राच्या उत्पत्तीचा खुलासा ही थियरी नीटपणे करू शकत नाही. जर चंद्र या थियरीप्रमाणे बनला असता तर त्याची आणि पृथ्वीची जडणघडण एकसरखी असायला हवी. पण आपण पाहिलं त्याप्रमाणे चंद्राची घनता पृथ्वीपेक्षा खूपच कमी आहे.
हे तू म्हणालास. आम्ही नाही. काय गं? याचं म्हणणं आपण याच्यावर विश्वास ठेवावा, पण ज्योतिषावरमात्र नाही.
ज्योतिषावर विश्वास ठेवायचा का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. माझ्यावर मात्र बिलकुल विश्वास ठेवू नका, असच मी म्हणेन. मी सांगतो ते कदाचित चुकीचही असू शकेल, तेव्हा ते तपासून खात्री करून मगच स्वीकारा.
अरे, अरे. मैँ तो यूँ हि मजाक कर रहा था यार. तेरे उपर अपना पूरा भरोसा है बॉस. तू आगे चल.
तेंव्हा हे अर्थातच माहीती नव्हतं पण चंद्रावरून अपोलो अंतराळवीरांनी आणलेल्या दगडांमध्ये लोखंडाचं प्रमाण अगदी नगण्य आहे हे सिध्द झालेलं आहे.
म्हणजे आता जी नवी थियरी असेल तिने आधीच्या थियरीने दिलेली बरोबर उत्तरं तशीच देऊन या नव्या कोड्यांचा सुध्दा उलगडा केला पाहीजे तर.
बिलकूल सही. दुसरी थियरी कांट आणि लाप्लासच्या थियरीत एक तडजोड सुचविते चंद्र सूर्यमालेत इतरत्र जन्माला आला पृथ्वीच्या कबजात तो नंतर सापडला म्हणून त्याची जडणघडण पृथ्वीपेक्षा निराळी. सूर्यमालेतले बहुसंख्य उपग्रह हे अशाच पध्दतीने आपापल्या यजमान ग्रहाच्या सेवेत रुजु झालेले आहेत.
आता ह्या थियरीत काय खोड निघाली?
बाकी सगळं छान होतं पण एक बारीक अडचण होती. चंद्र हळुहळू पण निश्चितपणे पृथ्वीपासून दूर जात आहे. शिवाय असा एवढा मोठा गोल गुरु, शनी, युरेनस यासारख्या महाकाय ग्रहांच्या तावडीत न सापडता पृथ्वीपर्यंत कसा पोहोचला? आणि लोखंड नाही हे सोडलं तर इतर बाबतीत त्याची जडणघडण पृथ्वीसारखीच आहे त्याचं काय?
या दुसर्‍या थियरीत काही दम नाही राव.
ती गणिताची भानगड नसती तर मी सुध्दा यापेक्षा छान थियरी सांगितली असती.
असं? ऐकव तरी तुझी थियरी.
सोपं आहे. चंद्र पृथ्वीपासून दूर जातो आहे आणि त्याची जडणघडण बरिचशी पृथ्वीसारखी आहे. फक्त चंद्रामधे लोखंड नाही. बरोबर?
बरोबर..
पृथ्वी बनत असताना तिचे दोन भाग झाले. एक छोटा. एक मोठा. छोटा भाग हळूहळू दूर जाऊ लागला. जाताजाता त्यातलं लोखंड कोणीतरी काढून घेतलं.
बरोब्बर.
बरोब्बर?
अगदी पन्नास टक्के बरोबर.
पण पन्नास टक्के तरी कसं बरोबर असेल? मी तर आपलं असच बरळत होतो.
तुझी बेसिक कन्सेप्ट बरोबर आहे. ही विभाजन थियरी झाली. जॉर्ज डार्विन याने अशी कल्पना मांडली की पृथ्वी अगदी गरमागरम द्रवस्वरूपात असताना सेंट्रीफ्यूगल फोर्समुळे विभाजन होऊन चंद्र निर्माण झाला आणि तू दूर दूर जात आहे. पण या थियरीला लोखंडाचा प्रश्न सोडवता आल नाही. अगदी अलिकडे मांडली गेलेली, चौथी थियरी अशी आहे की पृथ्वी घडल्यानंतर काहीकाळाने मंगळाच्या आकाराच्या एक गोलाची पृथ्वीशी टक्कर झाली. यावेळपर्यंत पृथ्वीचा अंतर्भाग म्हणजे कोअर हे लोखंड आणि कथिल यांचे बनून गेलेले होते आणि बाह्य आवरणामध्ये लोखंडाचे प्रमाण अत्यल्प होते. या टकरीचा परीणाम म्हणून चंद्राच्या वस्तुमानाएवढा पृथ्वीच्या बाहेरील भागातील ऐवज मुक्त होऊन अवकाशात फेकला गेला आणि पृथ्वीभोवती फिरू लागला. कालांतराने हे बारीकबारीक भाग एकत्र येऊन त्यापासून चंद्र बनला.
आणि त्या गोलाचं काय झालं?
तो या टकरीमुळे पूर्णत: नष्ट होऊन गेला. काही भाग चंद्रामधे तर आतला लोखंड-कथिलाचा गोळा पृथ्वीच्या अंतर्भागात सामावून गेला.
मस्तं! म्हणजे मी म्हटलो तसच घडलं की. मग हे ठरलं तर.
चंद्राच्या उत्पत्तिविषयीचे बरेचसे प्रश्न या थियरीने सुटले म्हणून सध्या हीच त्यातल्यात्यात सर्वमान्य आहे. तरी यातही काही त्रुटी होत्याच. उदाहरण द्यायचं झालं तर चंद्राची काळी बाजू, म्हणजे दुसरी बाजू अशी का आहे?
वाटलच मला. ह्याचं काही सरळ असायचं नाही. मारुतीच्या शेपटासारखी लांबच होत जाते प्रत्येक गोष्ट.
मारुतीच्या शेपटीसारखी म्हणजे? मी नाही समजलो
हे बघ ती गोष्ट तुला नंतर कधीतरी सांगीन. नाहीतर ...
नको, नको. माझ्यामुळे तुमच्या गप्पात व्यत्यय नको.
बरं थोडक्यात सांगतो. तसं मी नेहेमी थोडक्यातच सांगत असतो म्हणा.
पण ते असो. रामाने मारुतीला लंकेत पाठवले सीतेचा शोध घ्यायला. त्याला सीता अशोकवनात सापडली, तिच्याशी बोलून रामाचा निरोप दिल्यानंतर मारुतीने लंकेत दंगा करायला सुरूवात केली. मोठ्या कष्टाने त्याला पकडून आणले आणि रावणाच्या दरबारात नेऊन हजर केले. तिथे त्याच्या रुपाची आणि शेपटीची सगळ्यांनी थट्टा केली तेंव्हा त्याने आपली शेपटी लांबचलांब केली अशी कथा आहे.
बरं. आता चंद्राच्या दुसर्‍याबाजूची काय गोष्ट आहे ती सांग.
चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. सोवीयेत रशियाच्या क्ष्क्ष्क्ष्क्ष यानाने प्रथम त्याबाजूची छायाचित्रे काढली. त्यात असं दिसून आलं की ही बाजू आपल्याला दृश्य असलेया बाजूपेक्षा फार निराळी आहे.
निराळी म्हणजे?
म्हणजे त्याबाजूला खूप जास्त विवरं आहेत. आणि या, आपल्या बाजूला जे समुद्र दिसतात तसे प्रदेश त्याबाजूला जवळजवळ नाहीतच.
पण चंद्रावर तर पाणी नाही. मग समुद्र कोठून आले? आणि दोन बाजू वेगवेगळ्या असल्या तर काय झालं, पृथ्वीवर पण असा असमतोल आहेच की. पृथ्वीवरची बरिचशी जमीन उत्तर गोलार्धात आहे आणि दक्षिण गोलार्ध बहुतांशी पाण्याने व्यापलेला आहे.
वा. हा खरोखरच उत्तम मुद्दा काढलास तू. तुझं म्हणणं बरोबर आहे. चंद्रावर पाणी नाही. जरी सुरुवातीला असलं तरी ते केंव्हाच नाहीसं झालं. समुद्र चंद्रावर कधीच नव्हते आणि नाहीत. पण जेंव्हा चंद्राकडे प्रथम दूरदर्शकातून पाहील गेलं सतराव्या शतकात, तेंव्हा हे काळ्या रंगाचे सपाट प्रदेश समुद्राप्रमाणे भासले म्हणून त्यांना सी अॉफ ट्रँक्वीलीटी, प्रशांत समुद्र अशी नावही दिली गेली. पुढे चंद्राचे खरे स्वरूप समजले तरीही ही नावे तशीच प्रचलीत राहिली. हे समुद्र म्हणजे खरोखर लाव्हा फ्लोज पासून बनलेले आहेत हे आता आपल्याला ठाउक झालेलं आहे. त्यामुळे 'लाव्हाचा उद्रेक एकाच बाजूला जास्त का आणि अशनीपातापासून निर्माण झालेली विवरं दुसर्‍या बाजूला जास्त का ' अस प्रश्न उभा राहातो.
पण पृथ्वीवर ..?
सुध्दा असमतोल आहेच की असच ना? पृथ्वी हा एक सजीव ग्रह 'लिव्हींग प्लॅनेट' आहे. पृथ्वीवर वातावरण आहे त्यामुळे पाऊस, वादळे, वीज कोसळणे असे प्रकार होत राहातात. पृथ्वीच्या पोटात आग आहे त्यामुळे ज्वालामुखी, धरणीकंप असे उद्रेक सतत घडत राहून पृथ्वीचा चेहेरामोहोरा सतत बदलत राहातो. आज जमीन आणि पाणी यांची जी मांडणी आहे ती पुढील काही दशलक्ष वर्षात पूर्णपणे बदलून जाणार आहे. थोडक्यात पृथ्वीवर सुध्दा अशनीपात झाले असणार, फक्त त्याच्या खुणा पुसून गेल्या आहेत. पृथ्वीवर जी मोठी विवरं आहेत ती बरिचशी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेली आहेत. अशनीपातानी बनलेली जी मोठी विवरं माहीत आहेत ती गेल्या पन्नास हजार वर्षातली आहेत. त्यातलं एक, आपल्या महाराष्ट्रात लोणार येथे आहे. दुसरं अमेरिकेत अॅरिझोना राज्यात आहे.
बघितली पाहिजेत एकदा.
जरूर पहा. चंद्र हा निर्जीव गोल आहे. ग़ेल्या तीन बिलियन वर्षात तिथे काही बदल घडलेले नाहित. त्यामुळे जे अशनीपात होतात त्यांचे ठसे तसेच राहातात. मग हे असं का घडलं हा प्रश्न उद्भवतो. या दोन बाजू इतक्या निराळ्या आहेत की जणू ..
.. ते दोन वेगवेगळे ग्रह असावेत.
अरेच्चा! अगदी बरोबर. मगाशी सांगितलेल्या थियरीला जोड देणारी नवी उपथियरी अशी आहे की, त्या अज्ञात ग्रहाशी झालेल्या टकरीतून ज्या ठिकर्‍या उडाल्या त्या हळुहळु एकत्र जमत गेल्या आणि पृथ्वीला दोन चंद्र निर्माण झाले. हे दोन आवळे-जावळे गोल रेसट्रॅकवर शेजारी शेजारी एकाच गतीने फिरणार्‍या गाड्यांप्रमाणे एकमेकांच्या जवळजवळ राहून पृथ्वीभोवती फिरत राहिले. कालांतराने गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने ते एकजीव होऊन आता आपल्याला दिसतो तो चंद्र अस्तित्वात आला. ही प्रक्रिया लाखो वर्षांच्या अवधीत घडली, प्रचंड स्फोट वगैरे न होता. हे चालू असताना लाव्हाचे उद्रेक होऊन जाऊन दोन्ही चंद्रार्ध निर्जीव झालेले होते त्यामुळे एकत्र येताना ते जसे होते तसेच राहिले.
फारच कन्व्हीनीयंट स्पष्टीकरण आहे. पण एक प्रश्न तरी उरतोच. त्या दुसर्‍या बाजूला जास्त विवरं का? ती तर काही ज्वालामुखीच्या स्फोटाने बनलेली नाहीत, अवकाशातून येणार्‍या अस्टेरोईडसमुळे झालेली आहेत. मग दोन्हीकडे सारख्याच प्रमाणात व्हायला नकोत का?
बिनतोड मुद्दा आहे. त्याचं उत्तर असं दिलं जातं की सूर्यमालेची निर्मिती झाल्यावर सुमारे एक बिलियन वर्षांनी आपल्या सूर्यमालेत अशनींचा भडीमार झाला, त्याला लेट हेव्ही बंबार्डमेंट असं म्हणतात. चंद्ावरची बहुतेक मोठी विवरं ही त्या काळातली आहेत. आपल्याला दिसणाऱ्या बाजूला ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यामुळे त्यातली बरिचशी विवरे भरून गेली. हे सगळं दोन्ही चंद्रार्ध एकत्र येण्यापूर्वीच घडलं.
अं.. हे जरा ओढून ताणून केलेलं स्पष्टीकरण वाटतं. असं नसेल का, की चंद्राची जी बाजू सतत पृथ्वीकडे वळलेली असते तिचे पृथ्वी अशनीपातापासून रक्षण करते.
दे टाळी. मला ही असंच वाटतं, पण या कल्पनेला फारसा सपोर्ट दिसत नाही. चंद्रावर जाणारे अशनी पृथ्वी अडवू शकणार नाही असचं एकंदरीत मत दिसतं. पण मलाही वाटतं की या कल्पनेत जरूर तथ्य आहे.
मी तर पुढे जाऊन म्हणेन की खरतर चंद्र हाच पृथ्वीची ढाल होऊन इथल्या जीवसृष्टीचे संरक्षण करीत असतो.
अगदी भावाने बहिणीचे रक्षण करावं तसा.
ते असुदे, ताई. आज बहिणीनेच भावाचं रक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
म्हणजे?
घड्याळाकडे बघ. किती उशीर झाला. आता माझं काही खरं नाही. ... रिंग रिंग ... तो पहा वाजलाच फोन. केंव्हाच गेला. वाटेत आहे म्हणून सांग. बाय..
बाय ..
चला आपणही झोपूया आता.
कशाला? हात तु्झ्या हातात अन् धुंद ही हवा, रोजचाचं चंद्र आज वाटतो नवा …
थँक यू, सुपरमून.
-------------
काही संदर्भ:
सुपरमून - http://www.space.com/22025-supermoon-2013-full-moon-myths.html
चंद्र कसा बनला? - http://csep10.phys.utk.edu/astr161/lect/moon/moon_formation.html
चंद्र कसा बनला? - http://en.wikipedia.org/wiki/Giant_impact_hypothesis
नवी थियरी - http://www.nasa.gov/topics/solarsystem/features/moon_formation.html
हिचा उल्लेख वरील लेखात नाही.
चंद्र-पृथ्वी तुलना - http://solarsystem.nasa.gov/planets/compchart.cfm?Object1=Moon

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटलं वाचायला. खुपच मेहनत घेतलीय. या सगळ्याबद्दल मला स्वतःला खुप कमी माहिती आहे. पण अगदी शाळेत असल्यापासुन एक प्रश्न पडलाय, चंद्राला स्वतःमोवती फिरण्यास आणि पॄथ्वीभोवती फिरण्यास सारखाच वेळ लागतो तो कसा काय?

निवांत,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रश्न खूप छान अाहे. मी देखील या प्रश्नामागे धावलो अाहे. थोडक्या शब्दात सांगायचं तर, टायडल इफेक्टचा हा परिणाम अाहे. चंद्र पूर्वी यापेक्षा जास्त वेगाने फिरत होता. पृथ्वीच्या अाकर्षणाच्या प्रभावाने चंद्राचा पृष्ठभाग खेचला जाऊन पृथ्वीच्या बाजूस चंद्राला फुगवटा येतो (अाणि जातो) या सततच्या प्रक्रियेमुळे ऊर्जा खर्च होते त्यामुळे त्याचा वेग मंदावत गेला. जेंव्हा परिवलनाचा अाणि परिभ्रमणाचा वेग एकच झाला तेंव्हा एक्विलिब्रियम साध्य होऊन अाजची स्थिती प्राप्त झाली.

हे असं होणं हे पृथ्वी-चंद्रा पुरतचं मर्यादित नाही. मंगळ, गुरू, शनि अादी ग्रहांचे जवळून फिरणारे (या लेखात उल्लेख असलेले) उपग्रह, इतकच नव्हे तर बुध हा ग्रह देखिल अशाच तऱ्हेचे वर्तन करतो. कोणत्याही दोन खगोलांमधे काही विशिष्ट अटी (तुलनात्मक अाकार, एकमेकांपासूनचे अंतर वगैरे) पाळल्या गेल्यास हीच परिस्थिती उद्भवते. यासंबंधी अधिक वैज्ञानिक माहिती कोणीतरी (बहुधा अश्र्चिग किंवा गामा पैलवान यांनी) यापूर्वी इतरत्र दिलेली अाहे.

पृथ्वी-चंद्र जोडीचा विशेष म्हणजे, कालांतराने पृथ्वीचा वेग मंदावत जाऊन ती ही चंद्राला एकच बाजू दाखवू लागेल.

अरे बापरे म्हणजे एका साईडच्या लोकांना चंद्र दिसणारच नाही कधी?

एक्विलिब्रियम साध्य होऊन >>> साधारण किती काल लागला याचा काही तर्क आहे का?

निवांत पाटील,

>> चंद्राला स्वतःमोवती फिरण्यास आणि पॄथ्वीभोवती फिरण्यास सारखाच वेळ लागतो तो कसा काय?

यास गुरुत्वीय बंध (tidal locking) म्हणतात. विकिवर पाहिल्यास दिसतं (इंग्रजी दुवा) : http://en.wikipedia.org/wiki/Tidal_locking

आ.न.,
-गा.पै.

हा लेख लिहिण्यास उद्युक्त केल्याबद्दल हर्पेन यांचे विशेष अाभार.

२२ जुलै रोजी सुपरमून दिसणार अशा बातम्या होत्या. त्याने निश्चितच उत्सुकता वाढून अनेकांनी अपेक्षेने चंद्रदर्शन घेतले. पण खरोखर सुपरमून म्हणजे काय? इतकी वर्षे तो कोठे दडला होता? हे व इतरही अनेक प्रश्न लोकांना पडले.

वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांनी वेळोवेळी केलेल्या प्रश्नांची एकत्रित उत्तरे सुपरमूनच्या निमित्ताने, मनोरंजक स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलेला अाहे. अावडेल अशी अाशा अाहे.

काही चुका किंवा त्रुटी अाढळल्यास जरूर कळवा.

काय जबरी मस्तं लिहिलंय!
अशा इतरही विष्यांवर अभ्यासपूर्ण आणि तरीहि आमच्यासारख्यांना कळतील असे लेख येऊ द्या!

kaushiknagarkar,

या लेखासाठी तुम्ही बरीच मेहनत केलेली आहे हे दिसतंच आहे. बरंच संदर्भग्रहणही (रेफरन्सिंग) केलेलं दिसतंय. त्याबद्दल अभिनंदन! Happy वैज्ञानिक माहीती रंजक प्रकारे देणे हे वेगळेच कौशल्य आहे.

तुमच्या लेखात प्रथमदर्शी काही चूक वा त्रुटी आढळली नाही. यासारखे लेख आणि तुमच्यासारखे लोक यांच्यामुळेच मराठीला परत ज्ञानभाषा म्हणून ऊर्जितावस्था येणार आहे. यादृष्टीने प्रयत्न म्हणून एक गोष्ट सुचवू इच्छितो. ती म्हणजे लेखाच्या शेवटी सारांश द्यावा. त्यात जमल्यास संदर्भाचे दुवेही द्यावेत.

पुनश्च अभिनंदन आणि पुढील लेखनास जोरदार शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

आधीच्या लेखांसारखाच हा ही लेख चांगलाच आहे, ज...रा मोठा वाटला, तरीपण चुरचुरीत संवादांमुळे आवडलाच.

गापैंच्या वरच्या प्रतिसादातल्या " वैज्ञानिक माहीती रंजक प्रकारे देणे हे वेगळेच कौशल्य आहे. आणि यासारखे लेख आणि तुमच्यासारखे लोक यांच्यामुळेच मराठीला परत ज्ञानभाषा म्हणून ऊर्जितावस्था येणार आहे. यादृष्टीने प्रयत्न म्हणून एक गोष्ट सुचवू इच्छितो. ती म्हणजे लेखाच्या शेवटी सारांश द्यावा. त्यात जमल्यास संदर्भाचे दुवेही द्यावेत." ह्या वाक्यांना अनुमोदन

लिहित रहा...:)

निवांत, केदार, विजय, चैत्रगंधा,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

गामा_पैलवान,

मन:पूर्वक अाभार. तुम्ही सुचविल्याप्रमाणे संदर्भ जोडीन. खरंतर इंटरनेट हा एकच संदर्भ पुरेसा अाहे. नाही का? चित्र अाणि अाकृत्यांच्या अाधार घेण्याचा मोह अनावर होतो, परंतु त्याने संभाषणाचा अोघ खंडीत होइल म्हणून तसे केले नाही. शिवाय केवळ शब्दांवरून मनामध्ये चित्र उभे करताना वाचकांच्या कल्पनाशक्तीला देखील तेवढाच व्यायाम! जेंव्हा मी प्रेझेंटेशन करतो तेंव्हा मात्र संदर्भ, अाकृत्या अाणि चलतचित्रांचा जरूर वापर करतो.

हर्पेन,

तुमची सूचना एकदम मान्य. लवकरच मजकूर बदलून अपलोड करेन.

भानुप्रिया,

धन्यवाद. यापूर्वी तीन, चार लेख मायबोली वर सादर केले होते. त्यांचे दुवे हे पहा:

कुणा एकाची भ्रमणगाथा http://www.maayboli.com/node/42061

|| प्लुटोपुराण || http://www.maayboli.com/node/41662

उल्का, अशनी, डायनोसॉर्स आणि 'प्रिय अमुचा …' http://www.maayboli.com/node/41626

अाणि काही सटरफटर:

आकाशगंगा http://www.maayboli.com/node/41809

चंद्र हरवला आहे http://www.maayboli.com/node/41693

kaushiknagarkar,

>> खरंतर इंटरनेट हा एकच संदर्भ पुरेसा अाहे. नाही का?

हो, मलाही तेच म्हणायचं होतं! Happy जर पुस्तक वापरलं असेल तर मोघम उल्लेख चालेल. इथे लेख लिहितांना आकृत्या टाळलेल्या बर्‍या! तुमचं कारण पटलं.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान,

धन्यवाद. काही काही ठिकाणी आ या अक्षराचा अा असा घोटाळा होत होता. तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला अाहे. बहुधा यशस्वी झाला असावा.

kaushiknagarkar | 9 August, 2013 - 05:18
हा लेख लिहिण्यास उद्युक्त केल्याबद्दल हर्पेन यांचे विशेष अाभार.>>>> ओहो, हे मी आज वाचले, कौशिक, आभार कसले मानताय, माझा स्वार्थ आहे ह्यात, असा शाळेत नीट शिकायला न मिळालेला विषय, इतक्या सोप्या भाषेत, रंजकतेने मांडू शकताय का नाही आग्रह करणार मी? मला खात्री आहे, इतर अनेक जणांच्या मनात देखिल तुम्ही असेच अजून लिहित रहावे असे असणार.

तर मग आता पुढचा लेख कधी? आपल्या विषयाशी निगडीत एखादा लेख, लेखन स्पर्धेसाठी म्हणून का लिहित नाही? आहेत अजूनही दहा-एक दिवस... Happy