हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी..

Submitted by रसप on 8 August, 2013 - 01:58

ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे

भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे

दाढ्यांना कुरवाळुन जो तो 'हांजी-हांजी' करतो
मलाच केवळ खरे बोलण्याचा हा विकार आहे

हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे

------------------------------------------------------

कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे Wink

....रसप....
७ ऑगस्ट २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/blog-post_8.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे>>> मस्त मतला.

भिंतीवरचे घड्याळ माझी वेळ दाखवत नाही
हृदयी टिकटिकणारा काटा बहुधा चुकार आहे>>> छान.

--------------------------
कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे

हे काही पटले नाही बुवा!

धन्यवाद रणजित माझा प्रतिसाद गांभीर्याने घेतल्याबद्दल... आजकाल तुमच्यासारखे अपवाद वगळता हे दिसत नाही.

असो, शुभेच्छा आपल्याला.

एकापेक्षा एक उंच चालले आहेत षट्कार
आवडले शेर

पोळ्या भारी जमल्या की !!!

घड्याळवाला शेर सर्वाधिक आवडला !!!

____________________________

अवांतर : पोळ्या करणं बरचं सोप्प असतं <<<< मी असे वाचले >>>चारोळ्या करणं बरचं सोप्प असतं < Uhoh
मुक्तछंदाचा माझ्यावरचा वाढत चाललेला परिणाम असावा Wink

एक से बढकर एक शेर ! मस्त मस्त गझल !

पोळ्या मात्र पचल्या नाहीत बुवा Sad

----------------------------------------------------
अवांतर

तुझ्या मतल्यावरुन एक शेर आठवला

यायचे सर्रास तर स्वप्नामधे ये
चांदण्या रात्रीस बोलावू नको तू

-सुप्रिया.

___/\___

--------------------------------

'पोळ्या' विनोदाने लिहिले आहे. गांभिर्याने घेऊ नये. कुणी दुखावल्यास क्षमस्व........!

हरेक जन्मी तूच भक्त मी गाभाऱ्याचा बंदी
एकदा तरी 'तू' बनण्याचा माझा विचार आहे<<< सुंदर शेर

मतल्यावरून माझ्या कवितेतील दोन ओळी आठवल्या.

सत्यात प्राप्त व्हावी कशि हा सवाल आहे
स्वप्नात यायला तर तीही तयार आहे

(आलास तू उशिरा - या कवितासंग्रहातून)

हो, मी करतो तिची चाकरी इमान-इतबाराने
बस प्रेमाचा कटाक्ष एकच माझा पगार आहे <<< व्वाह....

कविता लिहिणे, पोळ्या करणे एकसारखे असते
गोलाईला जपले इतकेसुद्धा चिकार आहे <<<:हाहा:

रसप , छान आहे.
ती नसल्याच्या दु:खाला आनंदी किनार आहे
स्वप्नामध्ये भेटण्यास ती रोजच तयार आहे >> हे जास्त आवडले.

__/\__

------------------------

>>गझलेत अश्लीलता नसावी.<<

अश्लीलता कशातच नसावी ना बेफीजी ? Happy