उदास श्रावण ??

Submitted by पुरंदरे शशांक on 6 August, 2013 - 23:29

उदास श्रावण ??

खळखळणारा खुशाल श्रावण
रानी फिरतो अन् वस्तीवर
नाचून थकतो, बसतो आणिक
आठी होउन कधी भाळावर

धाव धावतो वस्तीमधुनी
सांडपाणीही तसेच निश्चल
उदासवाणा कसा थिरकतो
अरुंद गल्ली शोधत दुर्बल

रंग उधळतो कसे कधीही
सप्तरंगही ये जमिनीवर
भाकरीतही कधी झळकतो
चंद्र होऊनी असाच सुंदर

झोपडीतल्या छतामधुनिया
हसतो निळसर भावूक सुंदर
भकास विद्रूप कळकटलेला
डबक्यामधली ओंगळ थरथर

असेच येती जाती श्रावण
जगणे करती अतिच अवघड
दाट काजळी क्षितीजावरती
पापणीत ना आता गहिवर...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<<<<<<रंग उधळतो कसे कधीही
सप्तरंगही ये जमिनीवर
भाकरीतही कधी झळकतो
चंद्र होऊनी असाच सुंदर

>>>>> आवडले.

व्वा ! शशांक,
आता वेगवेगळी वृत्तेही चांगली हाताळायला लागलात.... छानच.

(काही ठिकाणी मात्रादोष आहेत, जे सहज दूर होऊ शकतात.)