मुक्तछंदाच्या दिसात, ऐकू येता अष्टाक्षरी,
मन गेले पार मागे, छोटे वय मन भरी
माझ्या मनाच्या कुपीत, काही स्मृतींची अत्तरे
उठे सुगंधाची कळ, दिस होती वो साजिरे
तन झोपले तरीही, मन राही की हो जागे
एका क्षणी होते इथे, दुज्या क्षणी जाई मागे
माझ्या मनाचा जो वेग, काय त्याचा जी झपाटा
मन जाई पार मागे, दिसे मज मीच छोटा
माझ्या छोट्याशा डोळ्यात, स्वप्ने भली मोठी सारी
ऐलतीर भासे खुजा, मग घेतली भरारी
झालो नव्हत्याचा होता, पालथली गावे, देश
बारा गावांच्या पाण्याने, बाल्य संपे भसाभस
दु:ख संपले म्हणून, हसू येई कानोकानी
जुनी सुखे आठवून, डोळा येई खारे पाणी
गोड चवीच्या पाण्याची, मज आठवता बाव
पैलतीर भासे दुजा, बरा आपलाच गाव
जागे पणी नको झाली, मोठेपणाची ही झूल
बरी आपलीच गड्या, गाव, धूर आणि चूल
होत्या कल्पना ज्या माझ्या, किती किती रोम्यांटिक
काय सांगू तुम्हा आता, झाल्या जळून वो खाक
नाही राहिला पिंपळ, झाला पारही सपाट
गावातल्या घरोघरी, आता बॉक्स इडियट
गेले जाते आणि ओव्या, गेला गोड गाता गळा
विहिरीवरी असे पंप, राही रहाट मोकळा
मम्मी म्हणती आईला, पोरे इंग्रजी स्कूलात
कोणा नाही चूक वाटे, याला प्रोग्रेस म्हण्तात
येता परतोनि माझा, झाला भ्रमाचा निरास
कुठे कुठे मुळी नाही, माझा गाव माझा देश
कळे मना माझ्या आता, आजवरी जे ऐकले
कृष्णेकाठी वो कुंडल, नाही उरले पहिले.
अरे व्वा हर्पेन, किती सुंदर
अरे व्वा हर्पेन, किती सुंदर मनोज्ञ लिहिली आहे कविता ! ही अनुभूती प्रत्येकाला त्याच्यात्याच्या तर्हेने येतेच. पु.ले.शु.
इतक्या लगेच प्रतिसाद, बासच
इतक्या लगेच प्रतिसाद, बासच एकदम, धन्यवाद भारती..
तू कविता पण करतोस???????
तू कविता पण करतोस??????? माहित नव्हते.
लै भारी आहे ::):
आवडली.
आवडली.
कृष्णेकाठी वो कुंडल, नाही
कृष्णेकाठी वो कुंडल, नाही उरले पहिले >>>>> आहे खरेच! कविता आवडली.
छान आहे!
छान आहे!
मस्त!
मस्त!
मुक्तछंदाच्या दिसात, ऐकू येता
मुक्तछंदाच्या दिसात, ऐकू
येता अष्टाक्षरी,
मन गेले पार मागे, छोटे वय मन भरी
व्वा व्वा ! आवडली कविता
कविता छान झालीय. गेले जाते
कविता छान झालीय.
गेले जाते आणि ओव्या, गेला गोड गाता गळा
विहिरीवरी असे पंप, राही रहाट मोकळा
इ. उपरोध पटला नाही.
वा, सुंदर कविता ....
वा, सुंदर कविता ....
चांगली आहे पण एकाच कवितेत
चांगली आहे
पण एकाच कवितेत इतक्या भरार्या ....राग मानू नका पण पाल्हाळ वाटते
एखाद्या अस्सल व्यावसायिक चित्रपटात कसा सर्व प्रकारचा मसाला घातलेला असतो तशी कविता वाटली
पण छान लिहिले आहे आवडलेलेही आहे
सहेली - मी कविता, 'करतो' असे
सहेली - मी कविता, 'करतो' असे म्हणण्या इतपत काही करत नाही पण (हात वर शपथपुर्वक वगैरे) सांगतो ही मीच लिहिली आहे. (ढापली नाहीये, प्रताधिकार मुक्त डकवलेली पण नाहीये)
गजानन - उपरोधाबाबत अधिक खुलासा करावा ही विनंती
वैवकु - पाल्हाळ आहेच, इथे गरज पण आहे. असे, 'गेले ते दिन गेले' किंवा 'How green was my valley' वाल्या फेजमधले गाणे, खूप रिकामा वेळ असेल अशा वेळीच सुचते, स्मरते आणि अशा सविस्तर विलंबित ख्यालातच ऐकवले जाते.
व्यावसायिक हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे? बाजारू, गल्लाभरू या अर्थाने की सफाईदार, नैपुण्याने युक्त या अर्थाने हे जरा विस्कटून सांगाल तर मंडळ आभारी राहील
चैत्राली, नरेंद्र गोळे, के अंजली, फारएण्ड, सुशांत खुरसाले, पुरंदरे शशांक - अनेकानेक धन्यवाद.
इथे गरज पण आहे. असे, 'गेले ते
इथे गरज पण आहे. असे, 'गेले ते दिन गेले' किंवा 'How green was my valley' वाल्या फेजमधले गाणे, खूप रिकामा वेळ असेल अशा वेळीच सुचते, स्मरते आणि अशा सविस्तर विलंबित ख्यालातच ऐकवले जात <<<<
<<<<<<<<<<<<<<<<बर अस्सय होय !!!
धन्यवाद !!!
(पण मला उगाचच वाटायचे की अश्या ओळी/ कविता... वेळ रिकामा असल्यावर नाही तर मन भरभरून आल्यावर होतात वगैरे ...असो !!! )
खूप खूप शुभेच्छा
वैवकु - मनालाच रिकामा वेळ
वैवकु - मनालाच रिकामा वेळ पाहिजे की, बाकीच्या काळज्या, विवंचना यांनीच ते व्यग्र असेल तर भर-भरून कसे यावे त्याने आणि ते असो तर असोच, पण पुढचा प्रश्न का डावललात? तळ्यात का मळ्यात ते सांगा की, कुंपणावर किती भार टाकावा आपला

गावाचा भौतिक विकास झाला, पण
गावाचा भौतिक विकास झाला, पण आत्मा हरवला ही खंत व्यक्त करण्याचा प्रयत्न असावा असे वाटते.
प्रयत्न काही अंशी सफल झालाय.
परंतु,
विकासामुळे पूर्वीच्या खाणाखुणा पुसल्या गेल्याची खंत अधिक हायलाईट झाली आहे.
त्यामुळे मूळ उद्देश काहीसा मागे पडला असावा असे वैम. कृगैन.
विकासामुळे पूर्वीच्या
विकासामुळे पूर्वीच्या खाणाखुणा पुसल्या गेल्याची खंत अधिक हायलाईट झाली आहे. <<< अनुमोदन. मलाही असे वाटले हर्पेन. रहाटाऐवजी विहिरीवर पंप आला तर खंत का वाटावी?
उल्हास भिडे - अचूक निरिक्षण -
उल्हास भिडे - अचूक निरिक्षण - विकासामुळे पूर्वीच्या खाणाखुणा पुसल्या गेल्याची खंत अधिक हायलाईट झाली आहे. हे खरेच आहे कारण हे एका अंतर्विरोधी विचार असणार्या माणसाचे हे स्वसापेक्ष प्रकटीकरण आहे.
एका प्रगतीशील पण आत्मकेंद्रित, गत जीवनाशी नाळ तुटलेल्या, मधल्या एका मोठ्या कालावधीमधे आपल्या जुन्या जीवनप्रणालीशी संपर्क देखिल नसलेल्या / न ठेवलेल्या माणसाचे, त्याने ठेवलेल्या भाबड्या अपेक्षांचा भंग झाल्यावर (थोडेसे लाऊड, अटेंशन सिकिंगसाठी) गायलेले रडगाणे आहे. त्याने स्वतःचा विकास साधलाय, तो स्वतः बदलला, त्याची जीवनशैली बदलली, पण त्याला असे वाटते आहे तो मागे जे काही ठेवून गेला होता ते सर्व चौथ्या मितीचा काहीही परिणाम न होता तसेच्या तसेच राहिले असेल / पाहिजे.
ह्या इथे त्याच्या विचारांमधे अंतर्विरोध पुरेपूर ठासून भरलेला आहे, त्यामुळे त्याच्या विचारांचे प्रकटीकरण पण तसेच आहे.
रच्याकने - माझ्यामते प्रत्यक्ष जीवनात 'गावाचा भौतिक विकास झाला पण आत्मा हरवला' यासारखे, असे सरधोपट, एकमार्गी बायनरी काहीच नसते. हे एक खूपच सरसकट विधान झाले. वै.म.
कविता फार आवडली.
कविता फार आवडली.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
छान !
छान !
जे तिथून कधी बाहेर निघालेच नाहींत, त्याची खंत तर वेगळीच व अधिकच बोचरी !!