विठ्ठलाचा शेर माझा भाबडा नसतो....

Submitted by वैवकु on 31 July, 2013 - 04:48

कुंपणापर्यंत खोट्याची मजल असते
ब्रम्हही व्यापून सत्याचे प्रतल असते

पॉश स्वप्नांच्या "फरारी"तून* मन फिरते
देह ..मागे धावणारी सायकल असते

वाद होती आमचे संवादण्या जाता
मी विनोदी दाद ती हळवी गझल असते

मी ठरवतो रोज ..दादा कोंडके व्हावे
पण नशीबी व्हायचे अलका कुबल असते

मी नकाशे कुंडल्यांचे वागवत नाही
शेवटी , आयुष्य चुकलेली सहल असते

एक जीवन एक मृत्यू ..वेगळे गुंते
श्वास घेणे हीच दोघांची उकल असते

विठ्ठलाचा शेर माझा भाबडा नसतो...
मीपणाने त्यात खाल्लेली उचल असते
.. Sad

________________________
* फरारी = Ferrari

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंपणापर्यंत खोट्याची मजल असते
ब्रम्हही व्यापून सत्याचे प्रतल असते

एक जीवन एक मृत्यू ..वेगळे गुंते
श्वास घेणे हीच दोघांची उकल असते

व्वा. हे दोन शेर आवडले.

सहल आणि उकल शेर आवडले. सायकलही फार मस्त आहे!!

मतला - भाव समजला पण शेर तितकासा आवडला नाही. अर्थात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विषयाबद्दलच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.

मी नकाशे कुंडल्यांचे वागवत नाही
शेवटी , आयुष्य चुकलेली सहल असते>>>
पहिल्या मिसर्यातली "नकाशे कुंडल्यांचे " ही प्रतिमा अप्रतिम आहे.. दुसरा मिसराही बेफिजींनी म्हटल्याप्रमाणे
उत्कृष्ट !

वाद होती आमचे संवादण्या जाता
मी विनोदी दाद ती हळवी गझल असते >> क्या बात है!!

मी ठरवतो रोज ..दादा कोंडके व्हावे
पण नशीबी व्हायचे अलका कुबल असते >>:हाहा:

सर्वांचे शतशः आभार
माझंमलाच बरं वाटल ही गझल करून
अलका कुबल हा शेर हझलेचा वाटतो असे अनेकांनी आवर्जून कळवले
मला त्यांचा नजरिया समजतो आहे पण मला तो हझलेचा नाही वाटला कधीच तो एक दिल्खुलास शेर आहे असं मी म्हणीन !!!

परवा बेफीजीना भेटलो तिथे दैवयोगाने म भा देखील पोचले (आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले त्यांना ) मस्त मैफिल जमली मी ही गझल सादर केली होती सगळ्याना आवडली ही ...दादा-अलकाकुबल च्या शेरावर मनमुराद दाद मिळाली ..आजूबाजूचे लोकही अधून मधून आमच्याकडे लक्ष पुरवून होते व मीही त्यांच्यावर ..या शेरावर त्यांचेही चेहरे खुललेले पाहून खूप आनंद झाला ...लोकाना आनंद देवू शकेल खासकरून बेफीजी व मभांना असे काही लिहून झाल्याच्या जाणिवेने भरून पावलो आहे

बाकी ; सर्वच शेर मतल्यातील आशयाला विषयाला न्याय देणारे असेच झाले आहेत ..प्रत्येक शेरानंतर .."होय खरे आहे अगदी " असे वाटत राहते

विठ्ठलाचा शेर तर त्या मानाने माझ्यासाठी साक्षात्काराचा !!! मी शेर करायला जातो विठ्ठलाचा पण माझा मीपणाच भाव खावून जातो हे मला तसे बरेच उशिरा का होईना पण आता समजून चुकले आहे त्यामुळे विठ्ठलाचा शेर भाबडा होत नाही हे माझे मलाच हल्ली आवडेनासे झाले आहे

पण काय करू कसे करू काहीच माहीत नाही तुम्हाला कुणाला माहीत असेल तर मला सांगाल ना ? Sad

बाकी ह्या गझल बद्दल मी फार काही सांगावे असे काहीच वाटत नाही तरी जितूच्या डीटेल प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

__________________________
अजून एक शेर होता या गझलेत पण मला काही कारणे दिसली व ती योग्य वाटली म्हणून नव्हता दिला
तो असा होता.........

जॅझ रॉक नि पॉपच्यापाठी दिवाणे जग
आणि माझे गीत के एल् सेहगल असते

धन्स
आणि क्षमस्वही .. गार्‍हाणी गायला नकोत हे कळत असूनही गायली ....क्षमस्व

~वैभव वसंतराव कुलकर्णी