चुक : भाग ३

Submitted by यःकश्चित on 26 July, 2013 - 06:54

चूक : भाग ३

==================================================

भाग १
भाग २

कोण असेल ही डेअरिंगबाज बाई ? इतक्या हुशारीने खुन करते. बहुतेक ही तरुणी असावी. पण तो नेकलेस तरुणी घालणार नाही. तो एखादी पस्तीशी वा चाळीसच्या आसपासच्या वयाची बाई घालेल. शिवाय पैंजणांचाही आवाज येत होता. अरेरे.. खात्रीलायक असं काहीच हाती लागत नाहीये.

सावळे अचानक काही आठवल्यासारखे करून उठले. ते बाहेर येऊन म्हणाले,

" ढेरे चला. बीचवर कुणी आल होतं का ते पाहू. मिसाळ पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला तर ठेवून घे. येतोच थोड्या वेळात. "

असे म्हणून ते निघाले.

------------------------------------------------------------------------

" काय रे ? दिवसभरात कुणी इथे आलं होत का ? "

" नाही साहेब. तुम्ही गेल्या गेल्या एक जोडपे आले होती. ते त्यातिकडे थोडावेळ बसले. आणि नंतर निघून गेले. "

" यांच्याशिवाय कुणी बाई वा तरुणी आली होती काय ? "

" नाही साहेब. कुणीच नाही. "

" नीट आठवून बघ. एखादी स्त्री येऊन त्या दगडांकडे फिरकली का ? "

" नाही..न..ह..हा साहेब एक पोरगा इकडे येऊन गेला. त्या दगडांकडे थोडा वेळ फिरला. आणि मग गेला. "

" तो कसा होता दिसायला ? आणि किती वाजता आला ? "

" पोरेला होता. तब्येतीने बऱ्यापैकी होता. दुपारी तीनच्या आसपास आला होता. "

" तू त्याचं चेहरा पाहिलास का ? "

" होय. साहेब "

" त्याचे वर्णन सांगू शकशील ? "

" हो बहुतेक सांगू शकेन. "

" ढेरे याला घेऊन चला आणि त्या पोराचे स्केच बनवा. "

*****

" मिसाळ रिपोर्ट आला काय ? "

" हा साहेब, हा घ्या. ", असे म्हणून मिसाळने सावळेंच्या हातात पोस्टमार्टम रिपोर्ट दिला. सावळे तो काढून वाचत आत गेले.

आपल्या खुर्चीवर बसून त्यांनी तो वाचायला सुरुवात केली.

आणि एक एक करून धक्कादायक गोष्टी त्यांच्या वाचण्यात आल्या.

*****

"मिसाळ, गाडी काढा."

" कुणीकडे साहेब ?"

" संतोषच्या घराकडे घे गाडी. "

तपासाला अजून योग्य दिशा मिळत नव्हती. कुणावर संशयही नीटसा घेता येत नव्हता. ते दोन मित्र त्यांच्या मेथडनुसार निर्दोष होते. त्या पाकिटांवर आणि बाटल्यांवर त्या तिघांव्यतिरिक्त कुणाचेही ठसे नव्हते. एका हारावरून खुन्याला शोधणे जरा अवघडच होते. आणि हो, ते स्केच बनवायला सांगितले होते की.

" ढेरे, स्केच बनवून झाल का ?"

" होय साहेब, हे घ्या."

चित्रातला माणूस गुंडासारखा दिसत होता. दाढी वाढलेली होती आणि मिशी उडवलेली होती. त्यावरून तो मुस्लीम इसम असावा असे वाटत होते. डोळे वटारलेले होते. डाव्या कानात बाली घातलेली होती.

" ढेरे, ह्या स्केचच्या कॉपीज सर्व पोलीस स्टेशनना पाठवा आणि लवकरात लवकर शोध याला. चला मिसाळ, संतोषच्या घराकडे."

*****

एका दुमजली इमारतीच्या गच्चीवर दोनजण बोलत होते. त्यांच्यातला एक इसम आडदांड होता तर दुसरा बर्यापैकी सडपातळ.

" तेरको, क्या जरुरत था , उसे कायको मारा ? "

तो आडदांड दुसर्याला झापत होता आणि दुसरा मान खाली घालून शांतपणे उभा होता.

" अबे साले बोल तो. जबान चली गयी क्या ? "

" गलती हो गयी बॉस."

" अबे तुने क्या किया ये तुझे अभी तक पता नाही है. एक तो गलती की उपरसे ऐसी जगा की के अपने बचनेके चान्सेस भी बाहीत कम है. "

" बॉस, इतना क्या गलत किया मैने ? सिर्फ टपकाही तो दिया साले को, ऐसा क्या बडा गुनाह किया ? हफ्तेमे चारपाच को तो हम ऐसेही टपकाते है. "

" अरे तुने सावलेके एरिया मी खून किया है. वो सावले क्या चीज है तुझे पता नही. एक तो वो रिश्वत भी नही लेता और खुनी को पकडे बिना चूप नही बैठता. "

" तो फिर अब क्या करे ?"

" तू कूछ मत कर. जो करना है, वो मै करुंगा. सिर्फ मुझे ये बता, तू अपना कुछ हत्यार वगैरा वहा छोडके तो नही आया ना ? "

" नही बॉस."

" ठीक है. अब जा तू."

तो इसम जाऊ लागला आणि अचानक मागे वळला.

" बॉस, माफी चाहता हु पर..."

" पर क्या ? ", बॉस जोरात ओरडला.

" वो....वो... अपना एक हार कल रात गुम हो गया था. "

" हे अल्लाह, ऐसे लोगोंको क्यू भेजता रे मेरे पास. अबतक सावलेने वो हार ले लिया होगा पर अगर अल्ला मेहेरबान होगा तो.. "

" बॉस मै वहा जाके देखता हु. "

" हा देख. हार मिला तो मुझे दे. और नही मिला तो यहा वापीस मत आ. तू भी कही गुम हो जा. वो सावले तुझे जरूर ढूंडेगा. तू छिप जा कही और मेरे बताने तक बाहर मत आ."

"जी बॉस, खुदाहाफीस."

" खुदाहाफीस"

****

सिंगारांचा बंगला फारच प्रशस्त होता. आता ज्वेलर्स म्हणल्यावर श्रीमंत असणारच. मिसाळ नुसता बंगल्याकडे पाहतच राहिला.

" मिसाळ, आत जायचंय आपल्याला. "

" होय होय", म्हणत मिसाळ सावळेंच्या मागून निघाला. दोघेही बंगल्याच्या आत गेले. आत नातेवाईक जमले होते. पोलीस आलेले पाहून ते चमकले. तेवढ्यात मिस्टर आणि मिसेस सिंगार त्यांना दुसऱ्या एका खोलीत घेऊन गेले.

" इ.साहेब बसा. "

एका सोफ्यावर श्री व सौ सिंगार बसले आणि समोरच्या सोफ्यावर ते दोघे.

" सिंगारशेठ, जे झालं ते खूप वाईट झालं. संतोषचा मृतदेह एक-दोन तासात येईलच. पण तत्पूर्वी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची परवानगी असेल तर.. "

" जरूर साहेब, त्या खुन्याला पकडून चांगली शिक्षा करा. "

" त्यासाठीच काही आवश्यक माहिती हवी होती. तर सर्वात आधी मला हे सांगा की, संतोष पार्ट्या करतो, हे तुम्हाला माहिती आहे ? "

" कसल्या पार्ट्या ? ", शेठनी काही माहित नसल्याच दाखवलं खरं पण सावळेनी त्यांच्या चेहऱ्यातला बदल लगेच ओळखला. परंतु न कळल्याच दाखवून ते पुढे बोलत राहिले.

" पार्ट्या म्हणजे तो त्याच्या २ मित्रांसोबत प्यायला जायचा. "

" काय ? " , सौ जोरात ओरडल्या. मग शेठनी त्यांना शांत व्हायला सांगितले.

" माफ करा. पण आम्हाला स्पष्टपणे काही गोष्टी कळाव्या लागतात. त्याशिवाय खुन्याचा पत्ता कसा लागणार ? "

" अचानक धक्का बसल्याने तिची मानसिक स्थिती जरा खालावली आहे. आपण बाहेर जाऊन बोलूयात ? "

" चालेल. काहीच हरकत नाही."

मिसेसना नातेवाईकांकडे सोडून शेठ बाहेर आले.

" हा साहेब बोला."

" तर तुम्हाला हे माहित नाही की तुमचा मुलगा पार्ट्या करतो- "

"साहेब - ", शेठ सावळेंच्या जवळ येत हळूच म्हणाले, " हळू बोला साहेब. जरा तिकडे चला तुम्हाला सगळ सांगतो. "

सावळेंनी मिसाळकडे पाहून भुवया उंचावल्या.

" साहेब , कुठे पार्टी करत होता संतोष ? "

" कोळीवाड्याजवळच्या बीचवर"

सिंगार यांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. पण सावळेंनी ते बरोबर टिपले.

" शेठ, जे खरं आहे ते सांगा. आमच्यापासून काही लपवू नका. अन्यथा तुमच्याच मुलाच्या खुन्याचा शोध लागणार नाही. "

" सांगतो. पण साहेब आधी मला वचन द्या. तुम्ही मला काही करणार नाहीत. "

" जरा स्पष्ट बोललात तर बर होईल."

" साहेब माझ्या ज्वेलर्स मध्ये जे दागिने असतात ते मी दुबईमधून आयात करतो. पण एक्साईज ड्युटी भरावी लागू नये म्हणून मी ते समुद्रमार्गे गुप्तरीत्या घेतो. "

" ओह आय सी. म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणे व्यवसाय करता. म्हणजे मी तुमच्यावर कारवाई करायलाच हवी."

" पण साहेब, प्लीज. आता घरात अशी परिस्थिती आहे. त्यात पुन्हा..."

" म्हणूनच मी गप बसतोय. "

" धन्यवाद साहेब. "

" आता सोडतोय पण यापुढे हा प्रकार बंद करा. पुन्हा एकदा जरी तुम्ही - "

" यापुढे शक्यच नाहीये साहेब ", त्यांचा आवाज एकदम उतरला.

" म्हणजे ? " - सावळे.

" म्हणजे साहेब, आत्तापर्यंत हा माल जहाजातून उतरवून आणायला मी संतोषला पाठवायचो. माझ्या खास माणसांसोबत जाऊन तो हा माल उतरवून घ्यायचा. हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून मी दरवेळी नवीन जागी हे काम करतो. "

" अच्छा, म्हणून संतोष दरवेळी नवीन जागी पार्ट्या करायचा. "

" पण साहेब, तो पार्ट्या करायचा हे मला माहित नव्हतं. हे मला आत्ता तुमच्याकडून कळतंय."

" तो घरी आल्यावर तुम्हाला कधी तो नशेत दिसला नाही का ? त्याच्या तोंडाला दारूचा वासही कधी आला नाही का ?"

" साहेब तो हे काम करायला जायचा तेंव्हा याच्या आईला हे आवडलं नसत म्हणून तिच्यापासून आम्ही हे लपवून ठेवलं होतं. म्हणून मी हिला घेऊन झोपायला जायचो आणि मग मीही तिच्यासोबत झोपून जायचो. त्यामुळे आमच बोलणं सकाळीच व्हायचं. "

" अच्छा "

सावळे इक्लेयरचं कव्हर काढू लागले.

" धन्यवाद सिंगार शेठ. आपण बरीच माहिती दिलीत. आता फक्त एक काम करा. तुमच्या त्या खास माणसांचे नाव पत्ते मिसाळला द्या. "

पत्ते घेऊन मिसाळने गाडी चालू केली. गाडी पोलीस स्टेशनकडे निघाली आणि सावळेंनी हातातली इक्लेयर तोंडात टाकली.

क्रमशः

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांनाच पुन्हा वाचव लागणार आहे कारण भाग २ पोस्ट करून बरेच दिवस झालेत...
तसदी बद्दल माफी असावी....
पण यापुढचे भाग लवकर टाकेन....