|| विरळा वारकरी ||

Submitted by पुरंदरे शशांक on 26 July, 2013 - 05:32

|| विरळा वारकरी ||

तुका ज्ञानियाचा |
शब्द अमृताचा |
तोचि एक साचा |
मानूनिया ||

अभ्यासितो नित्य |
कळावया सत्य |
येर सारे मिथ्य |
सांडूनिया ||

राहतो जागृत |
आत दिनरात |
बळ ते राखीत |
भक्तिचेच ||

ध्यातसे निर्गुण |
पूजीतो सगुण |
मानूनी वचन |
संतांचेच ||

न जाता तीर्थासी |
न सोडी गृहासी |
तद्रूप विठूसी |
होत भला ||

जीवभाव सारी ।
हीच मानी वारी ।
ऐसा वारकरी ।
विरळाच ।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तयाही देह एक कीर आथी
लौकिकी सुखदु:खी तयाते म्हणती
परी आम्हा ऐसी प्रतीती
परब्रह्म हा ||
देह तरी वरचिलीकडे
आपुल्यापरी हिंडे
परी बैसिका न मोडे
मानसीची ||
__/\__

आवडला हा विरळा वारकरी !

'अंतरी दिनरात'
या चरणात एक अक्षर अधिक आहे.
'आत दिनरात'
असा बदल केला तर अर्थही तोच राहील, सोबतच दोष दूर होऊन अनुप्रास आणि यमक दोन्ही मस्तपैकी साधता येतील.

वाह शशांकजी खूप छान

सांगणे महत्त्वाचे नाहीच म्हणा पण काही वैयक्तिक मते शेअर करावीशी वाटत आहेत

` दुसरी ओवी पहिली करता येईल
`तीही इतर प्रस्तुत ओव्यां सारखी स्वतंत्र कवितेसारखी अर्थाकरिता स्वयंपूर्ण हवी असे वाटले ...मानूनिया ऐवजी मानीतसे असा शेवट करता येईल का
` मग आता पहिली ओवी शेवटची करता येईल का

` असे करून एक उत्तम सुरूवात व एक उत्तम शेवट असे साधता येईल असे वाटले
- मला वाटत आले आहे की अभंग म्हणजे एक मुसल्ल्सल गझलेगत कविता जिच्यात प्रत्येक ओवी सेपरेट केली तरी एक शेर जसा एका कविते इतकी मजा देतो तशी ती ओवी देते व यथोचित क्रमाने अश्या एकेका ओवीला गुंफून एक अ-भंग रचना आकारास येते तीला अभंग म्हणतात... मला असे वाटते म्हणून वरील मते कळवावीत असा मोह झला
विनंती आग्रह सूचना वगैरे काहीच नाही कृ गै न
असाही ....अभंग फारच उत्ताम झाला आहे

चूक भूल द्यावी घ्यावी

धन्यवाद शशांकजी
आपला नम्र
वैवकु

राजीव मासरुळकर >>> सुयोग्य बदल सुचविल्याबद्दल मनापासून धन्स ... (तसा बदल केला आहे)

सर्व रसिक, मान्यवर, जाणकारांचे मनापासून आभार ..

वैभव - फारच सूक्ष्म व जाणकार निरीक्षण - खूपच आवडले हे .... विशेष धन्यवाद ... (अशी मते वा वेगळा विचार जरुर देत रहाणे)

वारीचे सुख अतुलनीय आहेच.. तो प्रवास नाही.. सोहळाच आहे... हरीदर्शनाइतकाच मनोहारी...
मात्र त्या सुखापासुन वंचित राहिलेल्या मनांवर हळूवार फुंकर घालणारा हा अतिशय सुंदर अभंग खूप आवडला...
जय हरी विठ्ठल...

सुंदर!
विठ्ठल विठ्ठल , जय हरी विठ्ठल! _____/\_____

वाह!