सुर्योदय

Submitted by मुग्धमानसी on 23 July, 2013 - 03:33

"ए चला आता. पुरे झालं. अंधार पडूनही फार वेळ झालाय. परतूया आता. हला." - आकाश आता अगदी निर्वाणीच्या सूरात म्हणाला.

शुभ्र कोर्‍या कॅनव्हासवर एखाद्या सुंदर चित्राची कल्पना करत असतानाच कुणीतरी त्यावर भस्सकन् वेडीवाकडी शाई ओतून द्यावी तसं झालं राजसला. मनातल्या मनात वैतागून त्यानं क्षितीजाकडे लागलेली त्याची नजर पुन्हा पायाखालच्या रेतीत घुसळली.

आकाशच्या चेहर्‍यावर त्या अंधारातही स्वराला काकूळती, वैताग, कंटाळा, काळजी आणि अजून काहितरी अगम्य... जे तिला अजूनही शब्दात पकडता आलेलं नव्हतं.... असं सगळं मिसळलेला एक ’टिपिकल’ भाव अगदी स्पष्ट दिसत होता. तिच्या कपाळावर गहिरी आठी उमटली. पण ती काहीच बोलली नाही. आकाश आता उठून उभाच राहीला होता.

"बस यार जरा. काय जाऊया जाऊया? पिकनिकला आलोय ना आपण इथं? मग एन्जॉय कर रे.... बस इथं. समुद्र ऐक जरा. तिथं पुण्यात नळाचं पाणी ऐकत असशील रोजच. इथं समुद्र ऐक जरा... मोठा आहे तो... मोठी माणसं बोलत असताना लहानांनी फक्त ऐकायचं असतं! शिकवलं नाही का कुणी तुला?" - राजस म्हणाला आणि अचानक कारंज्यातून तुषार फस्सकन् हवेत उंच उडावेत तशी मृणाल हसली. पाठोपाठ स्वरासुद्धा हसली. आकाश पुन्हा मुकाट्याने रेतीवर अर्धामुर्धा बसला.
"तसं नाही रे राजस. अनोळखी ठिकाण, अंधारून आलेलं, अशी निर्जन जागा... सोबत दोन बायका....."
"ए... बायका काय बायका?" - स्वरा फ़ुत्कारली आणि मृणालचं कारंजं पुन्हा हवेत उसळ्या मारून आलं.
"कूल यार आकाश... रात्रीच्या अशा शांततेतच समुद्र ऐकायला मजा येते. जिथे गोंगाट हवा तिथं गोंगाट... पण जिथं शांतता हवी तिथं शांतताच हवी यार. तुझ्या टेन्शनचं गाठोडं डोक्यावरून उतरून ठेव त्या गार रेतीत जरा वेळ. इथं मुक्काम नाही करायचा आपल्याला. थोड्या वेळानं जाऊयात रे. ज....रा वेळ बस फक्त." राजस अधिकाधिक समजूतदारपणा आवाजात आणायचा प्रयत्न करत म्हणाला. इथं आकाशच्या जागी दुसरं कुणी असतं तर त्यानं त्याचं मुस्काट घट्ट दाबून त्याला गप्प केलं असतं. पण आकाशची आणि त्याची काही फार मैत्री नव्हती. तशी पुरेशी ओळखही नव्हती. गेली चार-पाच वर्षं ते माहीत होते एकमेकांना ते केवळ स्वरामुळे. आपल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा नवरा असं अवघड नातं असल्यामुळे नक्की कितपत मोकळेपणा ठेवावा या विचारात राजसची भंबेरीच जास्त उडाली होती. स्वराला मजा येत होती. आताही ती राजसकडे पाहून फक्त त्यालाच कळेल असं हसली.
नेमकं त्याचवेळेस आकाशनं ’मदत’ अशा आशयाने स्वराकडे पाहिलं. पण ती राजसकडे पाहून हसत होती म्हणजे तिलाही इथं जरा वेळ थांबायचं आहे हे जाणवून आकाश मुकाट झाला. हिरमुसल्या चेहर्‍याने बसून राहिला. पण त्याची अस्वस्थ नजर... आजूबाजूच्या अंधाराचा कानोसा घेणारी अस्वस्थ हालचाल... बेचैन चुळबूळ... राजसच्या मनाला कायम भुरळ पाडणारी ती शांतता आता नष्ट झालीच होती.

"मृणालला भूक लागली असेल..." - आकाश पुन्हा काही क्षणांनी म्हणाला आणि स्वरा अंगात आल्यासारखं ताडकन् उभी राहिली.
"राजस, चल निघूया. समजतंय का तुला? अरे आठ वाजलेत आठ! गणपतीपुळ्याला असलो म्हणून काय झालं? पिकनिक असली म्हणून काय झालं? आठ वाजले तरी आपण घराबाहेर हे वाईट असतं अरे! आठ वाजले तरी जेवण नाही? शक्य आहे का? चला चला निघा..." म्हणून स्वरा ताड-ताड चालायला लागली. तिच्या मागून धडपडत आकाश "अगं अंधार आहे... एकटी जाऊ नकोस..." म्हणत धावला.
त्या पाठमोर्‍या दोघांकडे हताशपणे बघत राजस काही क्षण हललाही नाही. शेवटी मृणालले त्याच्या दंडाला धरून हलवलं आणि म्हणाली - "चल आता... गेले ते दोघं. आपण थांबायचंय का अजून?"
"हं...." एक लांब निःश्वास टाकत राजस उठला आणि म्हणाला... "चला..."
लहान मुलीच्या उत्साहाने मृणाल उठली आणि राजसच्या दंडाला जवळ जवळ लोंबलळत चालू लागली.
"राजस.... मला ना... खरोखरच भूक लागलीये...." मृणाल म्हणाली आणि राजस तिच्याकडे पाहून वेगळंच हसला. दोघेही समुद्राकडे पाठ फिरवून अंधारात स्वरा आणि आकाश गेले त्या दिशेने चालू लागले.
_______________

गणपतीपुळ्याच्या खारट हवेत रात्रीच्या गार वार्‍यात MTDCच्या त्या शांत, निवांत परिसरात स्वरा आणि राजस त्यांच्या रूम्सच्या बाहेर हिरवळीवर पाय पसरून बसले होते. दिवसाने कधीच निरोप घेतलेला. रात्र चढत चाललेली... समुद्र उधाणत चाललेला... आणि त्याच्या रुद्र, धीर-गंभीर आवाजाने भारलेला तो सगळाच परिसर त्या दोघांसकट स्वतःत नकळत विरघळत चाललेला. सगळी वेळच अशी भारलेली... धुंद. अशा वातावरणात रात्र ’चढणं’... राजससाठी नेहमीचंच.

"राजस...." यावेळी राजसची तंद्री भंग करणारा आवाज स्वराचा होता. तोच कोवळा, विलक्षण आर्त आवाज! स्वराचा हा खास ठेवणीतला आवाज राजसला भयंकर आवडायचा. तो म्हणायचाही तिला अनेकदा.... ’तु कधीकधी अशी बोलतेस ना.. की वाटतं जणू खोल खोल दरीतून कुणीतरी माझ्याशी आग्रहानं बोलतं आहे!’ हा आवाज.... इतक्या दिवसांनीही... अगदी तस्साच आहे! राजसच्या चेहर्यावर हसू पसरलं...

नाम गुम जाएगा... चेहरा ये बदल जाएगा.... मेरी आवाज ही पेहेचान है... अगर याद रहे....

"राजस.... तुझ्याशी बोलतेय मी."
"माहितीये मला. अजून कुणी आहे का इथे?"
"पहिल्या हाकेला ओ देण्याची सवय अजूनही नाही लागली तुला. मला वाटलं लग्नानंतर बदलला असशील."
"मी? बदलणार? शक्य आहे का गं? रोज अंगावरचे कपडे बदलावेत तितक्या सहजतेनं माझ्यातल्या मला मीच हजारदा बदलतो... मला इतर कुणी, अगदी परिस्थितीही... बदलणार म्हणजे नक्की काय करणार? माझं बदलणं थांबवणार?" राजस खट्याळपणे म्हणाला. स्वरा हसली.
"तुझं बोलणंही अगदी तसंच आहे. बोलण्यात कोण मागे टाकणार तुला?"
"हं...."
"किती छान वाटतंय ना इथे! किती वर्षांनी असे निवांत सुंदर क्षण अनुभवतीये मी माहितीये?"
"स्वरा.... किती वर्षांनी आपण दोघं असं रात्रीचं गप्पा मारत बसलोय माहितीये?"
"अं... एक वर्ष, तीन महिने आणि अं.... सहा दिवसांनी."
"आयला स्वरा... पोरिंना खरंच तारखा वगैरे लक्षात रहातात राव."
"अरे असं काय? तुझ्या लग्नाच्या आदल्याच्या आदल्या दिवशी आपण सगळे जुने मित्र तुझ्या घरी रात्रभर दंगा करायला जमलेलो नैका..."
"अगं हो... आणि नेहमीसारखं रात्री दोन-अडिच वाजेपर्यंत एक-एक करत सगळ्यांच्या विकेट्स पडल्या आणि आपण दोघंच पहाटेपर्यंत गप्पा मारत जागे होतो. पहाटे पाच-साडेपाचला झोपलो आणि दुसर्या दिवशी मी माझ्याच लग्नघरात विरक्त संन्याशासारखा तांबरट डोळ्यांनी फिरत होतो."
स्वरा हसली. "हो... तुझ्या आईला तर रात्री आपण ओली पार्टी वगैरे तर नाही ना केली असा संशय पण येत होता. पण मुलीपण होत्या ना सोबत... त्यामुळे काकूंनी उघड काही विचारलं नाही. पण लग्नाच्या आदल्या रात्री मात्र आपापल्या घरी रवानगी झाली सगळ्यांचीच."
राजस मनापासून हसला. "हं... ते शेवटचं नै स्वरा? त्यानंतर गप्पांची तशी मैफल परत जमलीच नाही!"
"हं... त्यानंतर आताच. फार खास वाटतंय राव! अगदी लहान लहान झाल्यासारखं वाटतंय." स्वरा स्वतःवरच फार खूश झाली होती. काही क्षण दोघेही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघत राहिले. स्वतःशीच हसत राहिले.

"राजस...."
"अं...."
"ऐक ना...."
"अगं बोल ना... क्षणभर काय मला आकाश समजलीस की काय? ऐक ना वगैरे..."
"गप रे. आणि आता जे बोलणारे ना मी... त्यानंतर तुला खात्रीच पटेल की मी तुला तू सोडून काहीच समजलेले नाही. आकाश तर नैच नै."
"ए बाई... पटकन बोलतेस का काय ते.... किती फूटेज खातेस?"
"सांगते रे. ऐक नं... दारू आहे आत्ता तुझ्याकडे? निदान बिअर?"
"क्काय?" राजस टण्णकन हिरवळीवर उठून बसला.
तेवढ्यात समोरच्या रूमचं दार उघडून मृणाल आली आणि दोघांच्याही नजरा तिच्या दिशेनं वळल्या.
"अरे काय हे... राजस... माहितीये का तुला रात्रीचे बारा वाजून गेलेत. कधी संपणारेत तुमच्या गप्पा?" राजसला खेटून हिरवळीवर बसत मृणाल म्हणाली. स्वरा जराशी अवघडली.
"अगं तू का उठलीस?"
"जाग आली म्हणून..."
"हो? आमच्यात तर जाग न येताच उठतात बुवा..." राजस तोंडाचा चंबू करत मृणालकडे पहात म्हणाला. मृणालने एक जोरदार चापट त्याच्या दंडावर दिली आणि लाडिकपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डुलत राहिली.
स्वराने उगाचच इकडे तिकडे पहात आपल्या रूमकडे नजर टाकली. दरवाजा बंद होता आणि लाईट्स बंद होते. आकाश आता सकाळशिवाय उठणार नाही. आजवर... गेल्या पाच वर्षांत... त्याला कधी अशी अधेमधे रात्री अवेळी जाग आलेली पाहिलं नाही.
"तुम्ही अजून त्या नाटकाविषयी बोलताय?" मृणालने स्वराकडे पहात प्रश्न टाकला.
"कुठल्या गं?" राजसच म्हणाला.
"ते... काईतरी... व्हाईट नाईटी...."
"अगं येडे असं काईतरी बोलून लाज काढू नको माझी चार-चौघांत. ’व्हाईट लिली अॅण्ड नाईट राईडर्स’ असं नाव आहे त्या नाटकाचं. आपणच गेलो होतो ना बघायला?" राजस मृणालच्या केसांत हात घुसळत म्हणाला. मृणाल हिरमुसली. स्वरासमोर राजसने तिला असं म्हटलेलं तिला आवडलं नाही. त्यातून स्वरासुद्धा समोर हसत होती राजसच्या बोलण्यावर. मृणालच्या डोळ्यांत क्षणभर पाणी तरळलं. स्वराला लक्षात आलं तसं तिनं हसणं बंद केलं आणि विषय बदलत म्हणाली,
"अगं मृणाल त्यानंतर कितीतरी विषय बोलून झालेत आमचे. तुला माहितीये? रात्र-रात्रभर अशाच खूप सार्‍या विषयांवर बोलत रहायचो आम्ही पूर्वी. खूप दिवसांनी हा योग जुळून आलाय बघ परत. आत्ता तेच बोलत होतो आम्ही. बरं झालं तूही आलीस. आता गप्पा आणखीन रंगतील."
"म्हणजे तुम्ही रात्रभर अशाच गप्पा मारत जागणार आहात?" मृणालने डोळे मोठ्ठे करत राजसला विचारलं. तिच्या डोळ्यांतले निरागस भाव पाहून राजसला हसू आलं. तिचं नाक धरून हलवत तो तिला म्हणाला, "चालेल ना तुला?" आणि मग तिच्या कानाशी ओठ नेऊन हळूच कुजबुजला "की येऊ तुला झोपायला कंपनी द्यायला?"
मृणालचे गाल तांबूस झालेले स्वराला त्या अंधारातही दिसले. "चल..." म्हणत तिनं राजसला उगाचच दूर लोटलं आणि राजस हसू लागला. मृणाल विलक्षणच बावरून गेली. स्वरा अवघडून गेली आणि ’मी काहिच ऐकलं नाही’ असं भासवायचा उगाचच प्रयत्न करत राहिली. राजस मात्र हसत होता. कधी मृणालकडे तर कधी स्वराकडे बघत होता. जणू त्या दोघींचेही विचार त्याला ऐकू येत होते.
"तुमच्या गप्पा चालुदेत. मी जाते झोपायला." मृणाल पुटपुटत म्हणाली. वाक्याच्या शेवटी तिनं राजसकडे रागिट कटाक्ष टाकला.
"अगं थांब ना मॄणाल. राजसकडे काय लक्ष देतेस? नवर्‍या लोकांचं बोलणं अजिबात सिरियसली घ्यायचं नसतं अगं..." स्वरा म्हणाली.
"वा! छान शिकवताय हो माझ्या बायकोला! तरिच मी म्हणतोय तो बिचारा आकाश असा वैफल्यग्रस्तासारखा का दिसतो नेहमी." राजस थट्टेच्या सूरात म्हणाला आणि उत्तरादाखल स्वराने एक गवताची काडी त्याच्या दिशेले भिरकावली.
"तुला फार काळजी आहे रे त्याची? मगाशी चार-पाच तासांतच त्यानं तुलाच वैफल्यग्रस्त केलं होतं. समुद्राकाठी... विसरलास काय? आणि मी गेली पाच वर्षं सोबत राहतेय त्याच्या.... आणि तरिही तोच बिचारा होय रे?"
"अगं हो गं स्वरा... आकाश रागावला का गं मगाशी? तुमच्यात काही भांडण नाही ना झालं आमच्या... आय मीन या दुष्ट राजसमुळे?" मॄणाल राजसला दंडावर चापट मारत म्हणाली.
"वेडी आहेस का मृणाल? नाही म्हणजे राजस दुष्ट आहे हे मान्य आहे मला..." या वाक्यानंतर राजसने गवताची काडी नाचवत एक हात छातीवर ठेऊन किंचित वाकून अभिवादन स्विकारल्याचे हावभाव केले आणि मृणालकडून अजून एक फटका खाल्ला.
"आणि माझ्यात आणि आकाशमध्ये भांडण लावता आले तर त्याला परमानंद होईल याचीही कल्पना आहे मला..." पुन्हा राजसने हा सन्मान स्विकारला...
"पण... पण हे सगळं तो त्याच्या बोलाच्या कढीत आणि भातात कालवायला वापरतो. प्रत्यक्षात का...ही...ही हिंमत नाही याच्यात." स्वरा हासली आणि पाठोपाठ मृणालचं कारंजंही पार आकाशाला भिडून आलं. राजसचं विमान धाडकन् जमिनीवर अवतरलं.
"जाडे... प्रत्यक्ष कृतीवर उतरलो ना तर काय होईल माहितीये का? असला इतिहास-भुगोल बदलून ठेवेन ना सगळा की तुझा नवरा माझेच आभार मानेल... तुझ्या रुपात त्याच्या आयुष्यात उगवलेल्या या भयंकर संकटातून त्याला सोडवल्याबद्दल."
"अरे जा रे..." - स्वरा.
"राजस... काहीही काय बोलतोस?" - मृणाल.
"मॄणाल... तू खरोखर मनावर घेतेयस की काय आमच्यातलं हे संभाषण? तू जास्त विचार करू नकोस हं.... वेडी होशील. आम्ही एकमेकांशी हे असंच बोलतो." स्वरा मृणालला हसत म्हणाली.
"हं. माहितीये तसं हे मला. राजस सांगतो मला बरेचदा तुमच्यातले संवाद. पण अजून सवय नाही ना... असो. चालू दे तुमचं. मी खरंच झोपते आता. मला झोप येतेय. आणि तुमचे विषय मला फारसे कळतही नाहित. सो... गूड नाईट."
मृणाल उठली. राजसने तिच्याकडे बघून गूड-नाईट केलं. रूमच्या दरवाजातून आत गडप होईपर्य़ंत स्वरा आणि राजस तिला पहात होते. ती जाऊन रूमचा दरवाजा पाठोपाठ बंद होताच राजस स्वराकडे वळला आणि म्हणाला... "काय म्हणत होतीस तू मगाशी?"

स्वरा मिष्किल हसत म्हणाली.... "दारु...."
_________________________

"च्यायला तुला माहित होतं की काय माझ्याकडे बाटली आहे ते? मृणाललाही बोललो नव्हतो मी."
"छे रे... मला माहित कसं असेल? पण उगाच आपलं वाटलं... तुला पण असंच काहितरी वाटलं असणार म्हणून ही बाटली ठेवलीस ना सोबत? नाहितर बायको, मैत्रिण आणि तिचा सोवळ्यातला सोज्वळ नवरा असली कंपनी असताना तुला ही स्फोटक वस्तू सोबत ठेवायची बुद्धी का बरं झाली तुला?"
"अगदी हाच विचार करत होतो बघ मी ही बाटली बॅगेत लपवताना. तीनदा बॅगेतून काढून ठेवली आणि परत भरली. आपल्याला सुगावाही नसलेलं बरंच काय काय आपल्या आतल्या कुणालातरी ठावूक असतं बहुतेक."
"त्याला ना... सब-कॉन्शस माईंड म्हणतात. किंवा असंच काहितरी. पण मला अनुभव येतो याचा खुपदा. नाहितर आकाशपासून अवघ्या काही हातांच्या अंतरावर मी रात्री दोन वाजता दारू पित बसलेय.... you cant imagine the thrill I am experiencing right now..."
"खरंच गं. आता आकाश उठला आणि त्याने तुला असं पाहिलं तर?"
"फेफरं येईल त्याला. दारू तर जाऊचदेत... अंड्याचं सुद्धा नुसतं टरफल अंगावर पडलं तरी आंघोळ करतो तो. आणि अशा सात्विक माणसाची बायको.... दारू पीत बसलीये... तेही मित्रासोबत... तेही अनोळखी ठिकाणी रात्रीच्या दोन वाजता! बाप्परे!"
"कठिणे. जास्त घेऊ नकोस बाई. तुझा नवरा नाहितर यापुढे माझ्या सावलीलाही तुझ्यापर्यंत पोचू देणार नाही."
"तसं काही होत नसतं रे. तो ना अशा वेळी स्वतःलाच त्रास करून घेणं पसंत करतो. माझ्यावर रागवतो पण भांडत नाही. त्याचा पांगळा राग कुठल्या ना कुठल्या तर्हेने माझ्यापर्यंत पोचावा म्हणून केविलवाणे प्रयत्न करत रहातो. तो चांगला वागत राहिला तर एक दिवशी मी बदलेन अशा भाबड्या आशेवर रहायला त्याला आवडतं. मग मीही त्याला तसंच आशेवर राहू देते. दुसरं काय करणार मी? तो तोंडावर भांडला तर किमान भांडता भांडता माझे मुद्दे तरी त्याला सांगू शकले असते... पण तो निमुटपणे सहन करत राहिल्याच्या आवेशात माझ्याकडून त्याला अपेक्षित असलेल्या वर्तणूकीची अक्षरशः भीक मागतो आणि त्या वेळेस तो मला अत्यंत केविलवाणा दिसतो. तेंव्हा माझ्या मनातून तो अजून काही सेंटिमीटर खाली उतरतो. मग पुन्हा त्याला न पटणारं तेच करण्याची इच्छा नकळत अजून प्रबळ होते. हे असं सगळं दुष्टचक्र आहे. काय करायचं सांग."
"बापरे... भयंकर वाटलं ऐकताना तू हे जे काही बोललीस ते." राजस प्लॅस्टिकच्या चहाच्या ग्लासमधून दारू पोटात ढकलत म्हणाला.
"अनुभवणं त्याहून जास्त भयंकर आहे. माणूस वाईट असला तर ठिक असतं रे... म्हणजे त्याचा वाईटपणामुळे होणारा त्रास उघड असतो. त्याला शिक्षा देता येते, काही नाही तर गेला बाजार थोडिशी सहानुभूती तरी मिळवता येते. पण अशा प्रमाणाबाहेर चांगल्या असणार्या माणसांचं काय करायचं? त्यांच्यामुळे होणारा त्रास हा विषयच नसतो कुणाच्या सिलॅबस मध्ये. उलट जगासाठी आपण फार फार लकी असतो रे... हे जामच त्रासदायक आहे. विशेषतः तेंव्हा जेंव्हा आपण तितके चांगले नसतो. किंबहूना आपण खरेतर वाईटच असतो."
"ह्म्म्म. यू आर राईट."
"माझं जाउ देत रे. तुझी मृणाल मात्र गोड आहे अगदी. तुमचं ट्युनिंगही छान जमलेलं दिसतंय..."
"ह्म्म्म."
"ह्म्म्म काय? बोल ना तिच्याविषयी काहितरी. की अजून थोडं चढण्याची वाट बघायचीये?" स्वरा हसली. मग राजससुद्धा.
"मृणाल.. छान आहे. लहान आहे अजून."
"लहान? अरे वयाने माझ्याहूनही मोठी आहे ना ती?"
"वयाबद्धल कोण म्हणतंय? मी म्हटलं की ती लहान आहे अजून. बस्स."
"म्हणजे...?"
"अं.... म्हणजे आता जर मॄणाल इथे आली आणि तिनं आपल्याला असं पिताना पाहिलं, तर तीला काय वाटेल माहितीये?"
"तिला राग येईल, ती भांडेल तुझ्याशी."
"अंहं. तिला माझा अजिबात राग येणार नाही. ’बास आता’ वगैरे म्हणेल ती मला, पण वरवर. मुळात मी जे काही करतो ते योग्यच असतं अशी श्रद्धा असते तिची. उलट ’तेच’ कसं योग्य आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवून घेते ती."
"अरे वा! म्हणजे फॅन आहे ती तुझी असं म्हणायला लागेल. किंवा भक्त म्हणता येईल." स्वरा हसत म्हणाली.
"ह्म्म्म. पण त्यामुळे काय होतं ना... माझी जाम गोची होते गं. म्हणजे आम्ही एकत्र असताना कधी मी एकदम मोठ्ठा होतो. तिला जवळ घेऊन समजवतो वगैरे... वडिलांसारखं. आणि कधी कधी मी अगदी लहान होतो. तेंव्हा ती माझी आई होते आणि मला समजून घेते, समजावते वगैरे. दोन्ही रोल्स मध्ये ती एकदम खूश असते. तिच्यातलं लहान मूलही सुखावतं आणि स्त्री म्हणून तिच्यात अंगभूत असलेलं आईपणही सुखावतं. आणि तिचं हे ’सुखावलेपण’ मला आवडतं म्हणून मी माझी भूमिका बदलत रहातो. पण एक जाणवत रहातं की हे माझ्याच्याने काही सहज घडत नाहीय्ये. तिच्यासारखं माझ्यात असं अंगभूत काहिही नाही. म्हणजे माझं सगळं असणं, वागणं-बोलणं वगैरे... फक्त तिला दिलेली प्रतिक्रीया आहे कि काय असं वाटत रहातं. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते?"
"हम्म्म... कळतंय."
"काय?"
"हेच की तुला हळू हळू चढायला लागलीये."
चमकून राजसनं स्वराकडे पाहिलं आणि स्वरा एकदम फस्स्स्कन हसायला लागली. राजस तिच्याकडे फक्त पहात राहिला. तिला डोळे मिटून खळाळून हसताना पाहून त्याच्याही ओठांवर नकळत अलवार हसू फुटलं. पण ते काहिसं बिच्चारं वाटलं त्याचं त्यालाच. आणि त्यानं चटकन् ते पुसून ’राग’ आणला.
"तुडवलं पाहिजे गं स्वरा तुला. एवढं गहन काहितरी बोलतोय मी तुझ्याशी. तू पार उतरवली यार."
स्वरा अजून हसत होती. हसता हसताच म्हणाली, "पण काही म्हण राजस... रात्री अडिच वाजता, गणपतीपुळ्याच्या गार खारट मस्त हवेत, बर्यापैकी चांदण्यात, गार गार दंवानं ओलेत्या गवतात बसून चहा प्यायच्या प्लॅस्टिकच्या कपातून बिसलेरीचं पाणी मिसळून दारू पित बसले आहे मी... माझ्या ’मित्रा’सोबत. लाईफटाईम अॅचिव्हमेंट आहे ही माझ्यासाठी. ही अनुभूती फक्त तुझ्यामुळेच मिळायची होती यार मला. दोस्त नसला असतास तर शतशः आभार मानले असते तुझे."
राजस हसला. नकळत स्वराच्या जवळ जाऊन त्यानं तिच्या खांद्याभोवती हात टाकून तिला हलवलं आणि मग तिच्या पाठीत दोन मस्त गुद्दे हाणले. स्वराला खरंतर अशी लगट अजिबात आवडत नाही हे राजसला कॉलेजपासून माहित होतं. पण का कोण जाणे... आज, आत्ता तिला हे आवडेल असं उगाच त्याला वाटलं. आणि स्वराचं त्याच्याकडे पाहणं आणि हसणं बघितल्यावर त्याला त्याचं वाटणं योग्यच होतं याची खात्री पटली. स्वरा त्याला पुन्हा एकदा... खूप जवळची कुणीतरी वाटली. स्वरालाही बहुतेक असंच काहिसं वाटत असावं.

"स्वरा...."
"हं...."
"समुद्राचा आवाज ऐकू येतोय बघ...."
"हो... येतोय. एकदम गंभीर काहितरी अध्यात्मिक उपदेश देत असल्यासारखा."
"तुला काय आठवतंय या क्षणी?"
"अं... तू सांग आधी."
"मी सांगू? कॉलेजमध्ये असताना एकदा त्या मिलिंदनं तुला काही पुस्तकं वाचायचा आग्रह चालवला होता. कुठली पुस्तकं होती ती ते आठवतंय?"
"हो तर... विवेकानंद, रविशंकर, ओशो वगैरे भारदस्त मंडळींची पुस्तकं होती ती. मिलिंदला त्या पुस्तकांतल्या तत्त्वांबाद्दल माझ्याशी वाद घालायचा होता. पण मी ती पुस्तकं शेवटपर्यंत वाचली नाहीत."
"हो. तू त्याला जे उत्तर दिलेलंस ना... ते आठवतंय मला या क्षणी. तू म्हणाली होतीस, ’मला माझी स्वतःची मतं अजून बनवायची आहेत. ती एकदा बनली असं वाटलं की मग या थोर मंडळींना विचारून पडताळून घेईन त्यांना. त्याआधीच त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं ईंन्टंट तत्त्वन्यान मी माझं कसं म्हणू? आणि का म्हणू?’ आणि नंतर तू एक शेर सांगितलेलास... आठवतंय?"
"हो. ले दे के अपनेपास एक नजरही तो है! फिर क्यों देखे दुनियाको किसी और के नजरियेसे?"
"वाह!"
स्वरा किंचित संकोचून निर्मळ हसली.
"राजस... आता ती पुस्तकं मिळवून वाचावित म्हणते. माझी तत्त्व पडताळून पहाण्याची वेळ बहूदा आलीये."
आता राजस हसला.
"का हसलास?"
"नाही... ती पुस्तकं वाचण्यासाठी मी तयार कधी होणार तेच समजत नाही. अजूनही सैरभैर... स्वतःला शोधतोच आहे. माझं असं अजून एकही भक्कम तत्त्व नाही. प्रवाहानुसार वाहात गेलो. हवेच्या प्रत्येक झोतात स्वतःला भिरकावत गेलो. त्यात माझं काही नुकसान झालं नाहिच म्हणा... पण अजूनही माझं माझ्याविषयीचं मत मला बनवताच आलेलं नाही. साली एक सही मला नेमानं तिच ठेवता येत नाही. प्रत्येकवेळी माझीच सही मला वेगळी वाटते. आधीची सही आठवावी लागते. माझे कपडे, माझे बूट... मला नक्की काय आवडतं समजतच नाही. भिरभिरायला होतं गं."
"अरे पण तुला आवडतं ना असं चांदण्यात बसून समुद्र ऐकत स्वतःशीच धीरगंभीर गप्पा मारणं... मग तेच तुझं तत्त्व! ’तत्त्वहीन जगणं!’"
राजसने थेट स्वराच्या डोळ्यांत पाहिलं. डोळ्यांत थेट... खोल... आरपार... काहितरी सापडल्यासारखं! स्वरानं नजर वळवली.

"स्वरा..."
"हं..."
"फार टिपिकल आहे माझा हा प्रश्न. मला कल्पना आहे. पण तरी विचारतो. आयुष्यात... खूष आहेस ना?"
स्वराने मान वर करून एकवार राजसकडे पाहिलं आणि मग खळाळून हसली.
"तू आहेस? खूष?" हसतच स्वराने विचारलं.
"हो आहे! नाराज नाही एवढं नक्की. पण तरिही काहितरी मिस करतो रोज... प्रत्येक क्षणी. तुझ्यासारखंच. शेकडो फुलांच्या गंधांनी भारलेल्या बागेत बसून नेमकं रातराणीला मिस करावं तसं. आपल्या आजूबाजूलाच असते ती... पण अल्वार अनावर गंधाने नुसती झुलवत रहाते. सापडत नाही... गवसत नाही... तसं काहिसं. बरोबर ना?"
"हं..." स्वरा शांत नजरेने समुद्राच्या दिशेने पहात होती.

"पहाट होईल आता काही वेळात. सुर्योदय बघायला समुद्रावर जाऊयात? पूर्ण उजाडायच्या आत परत येऊ." - राजस अचानक उद्गारला
स्वरानं एकवार रूमकडे पाहिलं. आकाश शांत झोपला असेल.
"चल." स्वरा म्हणाली आणि धडपडत गवतावरून उठली. रात्रभरचं जागरण, सवय नसताना घेतलेली घोटभर दारू... सगळ्याचा अंमल जाणवू लागला होता. पण राजसच्या हाताला घट्ट धरून स्वरा समुद्राच्या दिशेनं चालू लागली आणि कुठल्यातरी वेगळ्याच जाणिवेने अचानक तिच्यातला सगळा अशक्तपणा संपवून टाकला. जणू समुद्र हाकारत होता... तोच तिला हाताला धरून चालवत होता...
___________________________

मृणालला जाग आली तेंव्हा चांगलंच उजाडलं होतं. तिनं शेजारी पाहिलं. राजस शांत झोपला होता. चेहर्‍यावर मात्र आताच आंघोळ करून आल्यासारखे ताजेतवाने भाव. त्याचा हात तिच्या अंगावर पडला होता. तो हळूच बाजूला करून तिनं एकवार राजसकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या केसांतून हात फिरवताना हाताला रेती लागली तिच्या. ’इथे जिथं पहावं तिथे रेतीच रेती नुसती. स्वच्छ अंघोळ करायला हवी.’ - मृणाल मनातच पुटपुटली आणि पलंगावरून उठली. घड्याळात सात वाजून गेले होते. कपडे जरा ठाकठीक करून तिनं रूमचा दरवाजा उघडला. भस्सकन पांढराशुभ्र प्रकाश दाराशीच ओठंगून रात्रभर उभा असल्यासारखा आत शिरला. आणि त्या सोबतच निरनिराळे आवाज... समुद्राची किंचित अस्पष्ट गाज...

मॄणाल बाहेर आली. शेजारच्या रूमबाहेर व्हरांड्यात कठड्याला ओठंगून कुठेतरी दूर पाहणार्‍या आकाशकडे पाहून तिला उगाच हसू आलं. कालचा समुद्राकाठचा प्रसंग आठवला.
"हाय आकाश. गूड मॉर्निंग."
चमकून आकाशने मॄणालच्या दिशेनं पाहिलं आणि मग त्यानंही हसून ’गूड मॉर्निंग’ केलं. त्याच्या हातात सिगारेट होती. मृणाल त्याच्या जवळ आली.
"आकाश... तू... सिगारेट पितोस?"
"हो. कधी कधी. का गं?"
"नाही... तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तूला कसलंही व्यसन असेल. फारच चांगला मुलगा वाटतोस."
"म्हणजे? सिगारेट ओढणारे, दारू पिणारे... सगळे वाईट असतात?"
"नाही... तसं नाही..." मॄणाल गोंधळली. आकाश हसला.
"राजस आणि स्वरा... रात्री खूप वेळ गप्पा मारत होते. मीही होते थोडा वेळ... पण मग मला आली झोप. आणि त्यांचे गप्पांचे विषय माझ्या आवाक्यापलिकडचे. मग मी आले झोपायला. राजस कधी झोपायला आला ते कळलंच नाही मला. किती छान गार वाटतंय ना इथे... मला तर मस्त झोप लागली. खरंतर पहाटे उठून समुद्रावर सुर्योदय पहायला जायचं होतं... पण जागच आली नाही. आणि राजस एवढ्या उशीरा झोपलाय म्हटल्यावर इतक्यात नाहीच उठणार आता. तूला लागली झोप चांगली?"
मॄणालने आकाशकडे पाहिलं. काहिच उत्तर आलं नाही.
"अं... मी उगाचच सकाळी-सकाळी पकवत नाहिये ना तूला बडबड करून?" मॄणालेने विचारलं तसं आकाशने अखेर तिच्याकडे पाहिलंच.
"छे... अगं नाही गं. बोल ना. मी एकूणच जरा कमी बोलतो. तू मनावर नको घेऊस."
मॄणाल हसली.
"तू चहा घेतलास?"
"नाही अजून."
"चल मग जाऊयात चहा प्यायला? हे दोघं उठेपर्यंत तसंही काय करायचंय?"
आकाशने एकवार उगाचच समोर समुद्राच्या दिशेनं पाहिलं. मग क्षणभर विचार करून त्याने सिगरेट पायाखाली चुरडली अन् म्हणाला... "चला."

"स्वरा कधी आली झोपायला? समजलं का तुला?"
मॄणालचा प्रश्न. आकाशने फक्त नकारार्थी मान हलवली. त्यानंतर मृणाल बराच वेळ एकटीच खूप काही बोलत होती. गरम चहाच्या कपातून आकाशात झेपावणार्‍या वाफा आकाशला घेऊन पुन्हा पोचल्या समुद्रावर...

पहाटेच्या कुडकुडत्या गारव्यात स्वराला शोधत आकाश समुद्रावर पोचला होता. नुकतंच तांबडं फुटत होतं. सोनेरी सोनेरी काहितरी सगळ्या समुद्राने पांघरलं होतं. स्वरा असती तर नक्की काहितरी कविता केली असती तिनं. विचार करता करताच त्याला ती दिसली. समुद्राकडे नजर लावून... सुर्याच्या पहिल्या पहिल्या सोनेरी किरणांनी लालबुंद झालेली स्वरा... विस्कटलेले तिचे केस वार्‍यावर झोके घेत होते. आणि शांत-क्लांत तिची मान किती सहज, विश्वासाने विसावली होती... राजसच्या खांद्यावर!

काही न बोलता आल्यापावली आकाश पुन्हा परतला आणि पलंगावर निजला. तासाभराने स्वरा आली. त्याच्याशेजारी निजली. निजताना तिनं आकाशच्या केसांतून हात फिरवला होता. तिच्या नखांतली रेती... थोडी पसरली होती त्याच्याही कपाळावर. तशातही त्याला जाणवलं स्वराच्या श्वासांतलं ते अनोखं चैतन्य. तिचा आनंद. ती खूष होती. गेल्या पाच वर्षांत... पहिल्यांदा... माझ्यासोबत असतानाही ती खूष होती. कदाचित... माझ्यापेक्षाही जास्त... ती स्वतःसोबत होती!
थॅंक्स राजस!

"आकाश... आकाश...."
"अं.... काय?"
"अरे कसल्या विचारात बुडालायस? मी काय बोलतेय ते ऐकतोयस तरी का?"
"मृणाल, एक विचारायचं होतं तुला. खरं उत्तर देशील?"
"अरे विचार ना..."
"मी काल जरा जास्तच विचित्र वागलो का गं? म्हणजे समुद्रावर छान बसलो होतो आपण... मी उठायची, जायची घाई केली..."
"विचित्र नाही रे. तुला काळजी वाटत होती स्वराची म्हणून तू असं वागलास. स्वरा बोलली का तुला काही?"
"नाही.... मी आपलं उगाचच."
"मग सोड ते आता."
"मॄणाल..."
"हं...."
"समुद्रावर जाऊयात?"
"आत्ता? इतक्या उशीरा? सुर्योदय होऊन काळ लोटला आता. रेती तापायला लागली असेल आता."
"असूदेत ना. आपल्यासाठी सुर्योदय अजून झालाच नाही असं समजू..."
"क्काय? म्हणजे?"
"काही नाही. चल समुद्रावर जाउयात."
काही न बोलता चेहर्‍यावर एक प्रश्नचिन्ह घेऊन मृणाल आकाशच्या पाठोपाठ चालू लागली. आता एवढ्या उशीरा... हा आकाश कुठला सुर्योदय शोधणार होता कुणास ठावूक!
______________________________________________

-मुग्धमानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास.......
निवडक दहात. स्वरा अगदी मनापासुन भावली आणि राजस, आकाश ही..................
पु.ले.शु.
मुग्धमानसी. अगदी वास्तविकता जगतेय अस वाटतेय. मनोगत वाचल्यासारखं.

कथा खुप आवडली पण थोड्या वेगळ्या प्रकारे.
स्वरा आणि आकाश यांच्यात जो काही विसंवाद आहे तो काहिसा खोल आणि न दुर होणारा वाटला आणि हलवुन गेला.
राजस आणि मृणाल सुखी आहेत थोडाश्या कुरबुरी सह, पण आकाश स्वराची तड्फड खुपच गहिरी वाटली.
स्वराचा राजस सोबत जो उद्रेक झाला तो खरोखर एक बिग रिसेन्ट्मेन्ट असावी असा वाटला. तिने जी कारणे सांगितलीत ती वरवरची असावित. यापेक्षाही मोठा अपेक्षा भंग दोघांमध्ये आहे ज्या विषयाला हात लावायची दोघांचीही इच्छा नाही असे काहिसे वाटले. राजस स्वराला तु सुखी आहेस का विचारतो त्याला ती उत्तर टाळते, वास्तविक हा असा प्रश्ण आही की थोडिशी सुखाची भविष्यात शक्यता असेल तर उत्तर टाळले जात नाही.

कथा प्रचंड आवडुन पण एक प्रश्ण पडला ज्याचे उत्तर मिळाले तर खुपच बरे वाटेल.

सुर्योदय हे कथेचे नाव का ठेवले असावे हा तो प्रश्ण. नवरा बायको सर्व बाबतीत एकमेकांना पुरेसे पडत नाहित हे नक्की पण जर पाच वर्षात पहिल्यांदा स्वरा आनंदी असेल आणि याचेही कारण ती स्वतःबरोबर होती म्हणुन आनंदी होती असे वाटत आकाशला वाटत असेल तर हा प्रश्ण छोट्याशा मोकळिकीचा नाही.
यावरुन आपल्याला बदलायचे असे आकाशने ठरविले म्हणुन हा नविन आयुष्याचा सुर्योदय?
का विसंवादी संसारात समुद्रावर काही आनंदाचे क्षण चमकुन जावेत तसा हा सुर्योदय?
का एकमेकांपासुन दुर राहिल्याने आपण आनंदी होतो व एकत्र तसे होण्याची शक्यता नाही या जाणिवेचा सुर्योदय?

निलीमा>>> या कथेनं तुला एवढ्या सखोल विचारांसाठी प्रवृत्त केलं हे मी या कथेचं खरोखर मोठं यश मानते. कथा मीच लिहिलेली असली तरी एकदा वाचकांकडे सोपवल्यावर ती आता माझी राहिलेली नाही. ती तुमची झालेली आहे. ज्याने त्याने आपापले प्रश्न तयार करावेत आणि उत्तरेही आपापल्या परिनेच शोधावित. ती उत्तरं सापडतील किंवा नाही.... पण अनेक प्रश्न मनात रेंगाळत राहिले तरी आपापल्या वैयक्तिक आयुष्यात काही विशिष्ट प्रसंगांना सामोरं जाताना स्वतःला, इतरांना, देवाला, परिस्थितीला जे जाब विचारावे लागतात... विचारले जातात... त्याची तयारी होत असते - असं मला वाटतं.

या कथेकडे तू पाहिलंस तेवढ्याच त्रयस्थपणे बघून मला काय वाटलं ते मी सांगते. आकाश आणि स्वराच्या नात्याबद्दल तुला जे वाटलं तेच मलाही वाटतं. त्या दोघांच्यात एक अस्वस्थ करणारा दुरावा आहे. आणि जे कधीच भरून निघणार नाही असं त्या दोघांनीही स्विकारलेलं आहे जणू. या स्विकारण्याचं एकमेव कारण 'प्रेम' असावं. त्या दोघांचे विरुद्द स्वभाव त्यांच्यातल्या अपेक्षाभंगाला कारणीभूत आहेत. पण तरिही आकाश स्वराला पहाटेच्या अंधारात तिच्या मित्रासोबत असलेलं पाहून चिडत नाही. उलट आज एवढ्या दिवसांनी स्वरा आनंदात आहे हे जाणवून शांत होतो. आत्ममग्न होतो. स्वराच्याही मनात आकाशबद्दल खूप सार्‍या तक्रारी आहेत. पण ती त्याच्याकडे परत येते... त्याच्या कपाळावरून मायेने हात फिरवते. यावरून काहितरी त्या दोघांच्याही आत आत असावं... जे तुटायचं म्हटलं तरी तुटत नाहिये.

या कथेचं नाव 'सुर्योदय'या साठी असावं की या एका रात्रीनंतर कथेतल्या प्रत्येकालाच काहितरी नवं गवसलं आहे, स्वतःतही आणि आपल्या जोडिदारातही. स्वराला ती मिस करत असलेलं काहितरी त्या रात्री मि़ळालं. आणि तिला समजलं असावं की आकाशकडून तिला काय हवंय... एक निखळ मैत्री. आकाशला समजलं असावं की स्वरा स्वतःसोबत असते तेंव्हा जास्त खूश असते. म्हणजे आपण कमी पडतोय या नात्यात. राजसला समजलं असावं की त्याच्या आयुष्याला कुठलीही दिशा नाही हा त्याचा समज म्हणजे एक 'मिथ' आहे. दिशाहीन फिरण्यात सुद्धा 'प्रवासाचा आनंद घेणं' हे ध्येयच असतं की! आणि राहता राहिली मृणाल... या कथेत या पात्राचा विचार फारसा सखोल झालेलाच नाही. पण या पात्रावरून वाचणार्‍यालाच जाणवू शकतं की या चौघांत मृणाल एकटीच अशी आहे जिला त्या रात्रीनं ढवळून काढलेलं नाही. कारण बहूदा तिची राजसविषयीची निष्ठा आणि श्रद्धा असावी. आणि तिच्या विचारांतला काहिसा उथळ निरागसपणाही.

इतरांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.

मुग्ध्मानसी मला आपल्या कथा आवडतात विशेषतः शॉर्ट वन मुक्तछंदातल्या. आपला प्रतिसाद एकदम आवडला आणि बराचसा पटलाही. बराचसा कारण या दोघांच्यात सुर्योदय व्हायचा असेल तर आधी थोडेसे निखळ भांडण होणे आवश्यक आहे म्हणजे वादळ येणे आवश्यक आहे. पण वादळात नाते तोडले जाण्याचीही शक्यता असते म्हणुनच बरीचशी नाती अशी अपरिहार्यतेकडे झुकणारीच असतात.
बाकी दीर्घ प्रतिक्रियेबद्दल थॅन्क्यु. आकाशचा दुपारी सुर्योदय शोधण्याचा प्रसंग हा नाते जुळवण्याची धडपड हे आता या आपल्या प्रतिक्रियेनंतर जाणवले पण ही धड्पड तो स्वरासमोर दाखवेल तर उपयोग. एकवेळ तो जेलस होउन चिडला असता तरी बरे वाटले असते. स्वरा कंटाळलीय ती त्याच्या समंजसपणालाच नाही का?
इतरांच्यापण प्रतिक्रियांची वाट पहाते.

आपण छान लिहिता. कथा पटली नाही, मुळांत आधी समजलीच नव्ह्ती, पण आपल्या स्पष्टीकरणानंतर कळली Sad

माझी हरकत का असेल? Happy
मलाही आवडेल हे जाणून घ्यायला. मला माझ्या त्रुटी कळतील कदाचित. गो अहेड... Happy

कथा वाचली. आधी लिहिलं होतं तशी तुमची शैली छान आहे लिहायची. वातावरण निर्मीती आणि संवाद छान. पण बरेच संवाद खूप पुस्तकी झाले आहेत असे माझे मत.

प्रतिसादामधे कथेचे स्पष्टीकरण वाचून असं जाणवलं की कथेमधे त्यातल्या बर्‍याचशा बाबी येत नाहीत. मुळात आकाश स्वरा आणि राजस ही तिन्ही पात्रं सक्षमपणे उभी रहात नाहीयेत असे माझे मत. मृणाल हे पात्र तर अजिबातच नाही. चारही पात्रांमधलं आपापसांतलं डायनॅमिक्स लक्षातच येत नाही.

त्यातही सर्वात तकलादू पात्र स्वराचं आहे. तिला नक्की आकाशकडून काय प्रॉब्लेम आहे? तो चांगला वागतो हा प्रॉब्लेम असेल तर ते कशामुळे? त्याला न पटेल असे तिला वागायचे आहे म्हणजे नक्की कसं. तो कधी त्याला अपेक्षित आहे असं वागणं तिच्यावर लादताना दिसत नाही. त्यांचं नातं नक्की कसं आहे तेदेखील समजत नाही. ते भांडतात, त्यांची काही मतं एकमेकांना पटत नाहीत. आकाशला स्वराचं वागणं खटकतं तरीदेखील दोघांचं एकमेकांवर प्रेम आहेच की. स्वभाव सारखे असेल तर प्रेम असतं असं थोडीच आहे? रीअल लाईफ मधे असेच तर जोडीदार असतात. उलट आकाशकडे आपली बायको रात्री दोन वाजेपर्यंत मित्रासोबत गप्पा मारत बसली होती (त्याला बहुतेक दारूबद्दल माहित नाही असं आपण समजू) हे स्विकारण्याची मॅच्युरिटी आहे. तीच मॅच्युरीटी मृणालकडे देखील आहे. पण कुठेतरी ती "आपला नवरा चुकीचा वागूच शकत नाही" या भाबड्या समजुतीमधे देखील आहे.

राजस दिशाहीन फिरतोय म्हणजे नक्की कसा? कथेमधे तो हॅपीली मॅरीड आहे. नोकरीधंदादेखील करत असावा, मग दिशाहीन कसा? उलट मध्यमावर्गाच्या चौकटीतून पाहिलं तर चांगला स्थिरावलेला दिसत आहे.उलट माझ्या मते हे स्थिरावलेलं अस्णं बहुतेक त्याला मानवत नसावं. स्वत्ळ्कडूअन्च त्याच्या काही वेगळ्या अपेक्षा असाव्यात असा अंदाज.

खूप विस्कळीत वाटली कथा. दोन्ही जोडप्यात एक व्यक्ती आपल्या जोडीदाराबाबत खुष नाही एवढेच कळले. बाकी नात्यातले कंगोरे कळलेच नाहीत. पात्रांच्या चाकांचे दाते एकमेकात आडकून कथेचे यंत्र फिरतय असे कुठेच जाणवले नाही.

प्रतिसादात सर्वांना काहीतरी नविन सापडलय असे म्हटलय. पण मला तरी आकाश सोडून बाकीच्यांना काही गवसलय असे जाणवले नाही. आकाशला जे गवसलय ते पण नीट उलगडलं नाहीये.

पण तरिही आकाश स्वराला पहाटेच्या अंधारात तिच्या मित्रासोबत असलेलं पाहून चिडत नाही. उलट आज एवढ्या दिवसांनी स्वरा आनंदात आहे हे जाणवून शांत होतो. >> हे खूप अनैसर्गिक आहे (चूक आहे असे नाही). जोडीदाराला दुसर्‍या व्यक्तीच्या इतक्या जवळ बघून ' सुप्त का होईना पण राग / संशय येणे' ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. आकाश शांत होतो हे पटवून घ्यायचे असेल तर तशी पार्श्वभूमी कथेत यायला हवी होती.ती तशी नाही जाणवली म्हणून शेवट नाहीच कळला.

राजस आणि स्वरा यांच्यामधे 'आपण एकमेकांना साथीदार म्हणून का नाही निवडले' अशी भावना जाणवली मधेमधे - खास करून 'तू खूश आहेस ना' असे विचारल्यावर. मग त्यांनी एकमेकांना साथीदार म्हणून का नाही निवडले ते नाट्य कथेत यायला हवे होते.

स्वरा आणि राजस ज्या गप्पा मारत बसले होते आपापल्या जोडीदाराबद्द्ल ती मला त्यांनी केलेली प्रतारणा वाटली, भावनिक / मानसिक जे काय म्हणायचे आहे. अश्या गप्पा होत नाही असं मी म्हणणार नाही फक्त कोणाशी ह्या गप्पा केल्या ह्याला पण महत्त्व आहे. कोणीच १००% पर्फेक्ट नसतं एवढी साधी मॅच्युरिटी नाहीये Sad ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही आयुष्य काढणार आहात त्याच्याशी तुमची loyalty नाही. Sad सगळंच खोट वाटल मला ह्या पात्रांच, प्लास्टिकची आयुष्य आणि प्लास्टिकची दु:ख.

आपल्यासाठी सुर्योदय अजून झालाच नाही असं समजू..." याचा अर्थ अजून लागलेला नाहीये ?

अर्थात, ही एक कथा आहे आणि अशी लोकं आजूबाजूला असतात आणि लेखिकेला नक्कीच भेटली असणार याची मला खात्री आहे.

अवांतर : मला ' बकुळाबाईंची' कथा खूप आवड्ली आणि पटली पण होती.

ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही आयुष्य काढणार आहात त्याच्याशी तुमची loyalty नाही. सगळंच खोट वाटल मला ह्या पात्रांच, प्लास्टिकची आयुष्य आणि प्लास्टिकची दु:ख.

>>

राजसी loyalty नाही असे नाही, फक्त स्वराचा त्यावेळी स्फोट झाला. आणि तिने आकाशची प्रतारणा केलीच नाही. तिचे खरे काहीतरी आकाशबरोबर बिनसलेले आहे ते तिने राजसला सांगितलेलेच नाही.
कदाचित ते असे काही असेल की त्या परिस्थितीवर तिचा ताबा नाहीए.
बर्याच्श्या नात्यांमध्ये एखादा (नवरा किंवा बायको) जास्त पावरफुल बनतो अशा वेळी जो नात्यात कमी पावरफुल असेल त्याची खुपच गोची होते असे काहिसे इथे झाले आहे. आकाशला पण याची कल्पना आहे.
कदाचित त्याचा स्वभाव असेल पण आपल्याला नावडणार्या गोष्टींना सरळ सामोरे न जाता तो (नात्यात पावरफुल असल्याने) स्वतःला दुर नेउन स्वराला शिक्षा करतो आणि स्वतः पण सफर होतो. हा त्याचा दुरावा असह्य झाल्याने स्वरा दोघांचा आनंद एकटीच भोगुन त्याला काहिसा देण्याचा प्रयत्न करते आहे.

माधव.
जोडीदाराला दुसर्‍या व्यक्तीच्या इतक्या जवळ बघून ' सुप्त का होईना पण राग / संशय येणे' ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे.
>> हाच भाग मला काहिसा कळला नाही. त्याला राग आला नाही याचेच वाईट वाटले. माधव तुम्हाला काय वाटते स्वराला पण याचे वाईट वाटत नसेल की आकाशला तिच्याबद्दल काहीच का वाटत नाही?
मृणालला नवर्याने दुसर्या स्त्रीसमोर थोडेसे गमतीत बोलल्यावर तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तसेच काहिसे आकाशला वाटायला हवे होते.

राजस आणि स्वरा यांच्यामधे 'आपण एकमेकांना साथीदार म्हणून का नाही निवडले' अशी भावना जाणवली मधेमधे - खास करून 'तू खूश आहेस ना' असे विचारल्यावर. मग त्यांनी एकमेकांना साथीदार म्हणून का नाही निवडले ते नाट्य कथेत यायला हवे होते.
>> याची २ कारणे तर स्पष्ट आहेत. ते कॉलेजमध्ये असताना मित्र होते पण प्रेमी नव्हते कारण १५ /१६ वर्षापुर्वी पर्यंत मुलींची लग्ने फार लवकर (शिक्षण संपल्यावर) होत, (म्हणुनच राजसचे लग्न स्वराच्या लग्नानंतर ४ वर्षांनी तो settle झाल्यावर झाले आहे.) ह्याची जाणिव असल्यानेच शक्यतो बरीचशी मुले मुली स्वतःच स्वतःला प्रेमात पडु देत नसत. आणि वर दिलेली भावना फारशी तीव्र नाही. राजसही काही स्वराच्या प्रेमात नाही पण दुसर्याला हवे तसे प्रतिसाद द्यायची कला त्याच्यात आहे.
अजुनही स्वराचे आकाशवर प्रेम आहेच, फक्त त्यांच्या नात्यात अंतर निर्माण झाले आहे.

एकुण कथा इतकी सुरेख आहे की जरी पटली नसेल तरी अस्वस्थ मात्र नक्की करेल.

आवडली कथा Happy
आपल्या जवळच्या मित्राबरोबरचं sharing छान रेखाटलय. स्वरा आणि राजस यांचे संवाद खुप मस्त वाटले. <शांत-क्लांत तिची मान किती सहज, विश्वासाने विसावली होती... राजसच्या खांद्यावर!> इथे आकाशला वाईट वाटायला हवं होत असं वाटल..

कथेची थीम फारशी पोहोचली नाही, पण तरीही आवडली. काही काही संवाद, त्यांच्या हालचालींची वर्णने आवडली (त्या राजस च्या एका पोज बद्दल वाचताना उगाचच राजेन्द्र कुमार डोळ्यासमोर येतो, छातीशी गवताची काडी नेऊन सलाम स्वीकारणारा Happy ). तर इतर काही संवाद (ते रातराणीचे वर्णन ई.) नॅचरल वाटले नाहीत.

कॉलेजच्या दिवसांचे उल्लेख करताना क्लिशेज वापरलेले नाहीत, तसेच ती स्वरा व राजस हे केवळ मित्रच दाखवलेत, यामुळे अशा मी वाचलेल्या इतर कथांपेक्षा वेगळी वाटली.

मात्र नंतर एक दोन ठिकाणी विचारांचे वर्णन खूप लांबल्यासारखे वाटले. ते स्किप करून वाचली मी.

(एक दोन अवांतर गोष्टी: सूर्योदय, सूर्यास्त असे जास्त बरोबर आहे बहुधा. दुसरे म्हणजे पुळ्याला आहेत ना हे? किनार्‍यावर सूर्योदय? हे लोक बीचवर जाउन मग समुद्राकडे पाठ करून डोंगरांच्या बाजूला सूर्योदय बघत आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले Happy )

आता तुमच्या बाकी कथा वाचायची उत्सुकता आहे. बघतो.

एक दोन अवांतर गोष्टी: सूर्योदय, सूर्यास्त असे जास्त बरोबर आहे बहुधा. दुसरे म्हणजे पुळ्याला आहेत ना हे? किनार्‍यावर सूर्योदय? हे लोक बीचवर जाउन मग समुद्राकडे पाठ करून डोंगरांच्या बाजूला सूर्योदय बघत आहेत असे चित्र डोळ्यासमोर आले << फा, तुझी ही पोस्ट वाचल्यावर मग लक्षात आले. Happy

पुळ्याच्या बीचवरून एमटीडीसी जवळ कुठेही सूर्योदय दिसत नाही. डोंगररांग आहे भली मोठी. तिथे सूर्य चांगला हातभर वर आल्यावरच दिसतो. अर्थात कथेला यामुळे काही फरक पडत नाही. वाटलंच तर लोकेशन चेंज कर. पुरी किंवा कन्याकुमारी कर. तिथे समुद्रातून येणारा अतिशय सुंदर असा सूर्योदय दिसतो. .

ही पात्र ज्याने जगुन पाहीली आहेत ना त्यांना ही पात्र कधीच प्लास्टिकची वाटणार नाहीत. मेनली स्वराच पात्र, नवरा पुर वेज, बायको कट्टर नॉनवेज. नवर्‍याने कधी सुपारी पण नाही खालेली आणि बायको अस्सल बेवडी. हा कोंबो हल्ली हजारात एक पाहायला मिळतो. पण जो तो कोंबो जगतो ना त्याला ही कथा खुप निवडक वाटेल. कितीही सतवल तरी हांजी हांजी करणारा नवरा असला ना तर एका स्टेजला येवुन बायको वैतागतेचं. तिच अवस्था झाली आहे स्वराची.
कधी कधी अशी मानसिक स्थिती होते ना की एकवेळ नवरा रागवला, भांडला, ओरडला तरी चालतो पण हा जो अबोला असतो ना तो ईतका टोचतो ना की बस्स्स्स्स्स्स्स्स्स..............

प्रतिसाद वाचून आनंद झाला. प्रत्येकाने आपापल्या परिने या कथेचा आणि कथेतील पात्रांचा अर्थ लावला आहे. त्या प्रत्येक विचारांमागे अर्थातच त्या त्या प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव, अनुभूती वगैरे असणार. त्या सर्वांचा मी आदर करते.

पण स्वराला राजससोबत पाहून आकाश अजिबात अस्वस्थ झालेला नाही असे वाचकांना का वाटले असावे हा प्रश्न मला पडला आहे. तो शांत राहिला म्हणजे त्याला काहीच फरक पडलेला नाही असा अर्थ अजिबात होत नाही. रुढार्थाने अत्यंत गुणी आणि चांगला मुलगा असलेला आकाश कधी नव्हे ते सिगारेट ओढत होता हा त्याच्या मनीच्या अस्वस्थतेचा परिणाम असावा का?

आणि कुणीही 'परफेक्ट' नसतं हे जगन्मान्य सत्यच आहे की! स्वरा आणि राजसलाही मान्य असणारच. एवढी मॅच्युरिटी नसती तर त्या दोघांमध्ये एवढा मोकळेपणा असतानाही त्यांच्यातलं नातं निखळ मैत्रीच्या पातळीवरच मर्यादित राहिलं असतं का? ते दोघं... विषेशत। स्वरा... आपल्या मित्राशी फक्त मनातली बोच किंचित (तेही पूर्णत। नाहिच) मोकळेपणाने बोलून दाखवते तर त्यावरून ते दोघे त्यांच्या त्यांच्या जोडिदारांशी एकनिष्ठ नाहित या निष्क्रर्शापर्यंत कसं बरं पोचता येतं हा मला पडलेला अजून एक प्रश्न.

शेवटी फक्त एकच माझं वैयक्तिक मत. एकमेकांवर प्रेम असले तरी त्या जोरावर सहजीवन दोघांसाठीही 'सुखासमाधानाचे' होईलच असे नाही. त्यासाथी स्वभावही काही प्रमाणात जुळावे लागतात. किमान एकमेकांच्या स्वभावाविषयी मनात प्रामाणिक आदर असावा लागतो. तो स्वभाव मनापासून पटलेला असावा लागतो. अनेक वर्षांच्या संसारानंतरही नवरा-बायको एकमेकांसोबत बरेचदा आनंदी नसतात म्हणजे त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते का? तर तसे नाही. पण कुठेतरी तारा जुळलेल्याच नसतात.... तेच हे नाही का?

तृष्णा म्हणते त्याप्रमाणे.... ही पात्र ज्याने जगुन पाहीली आहेत त्यांना ही पात्र कदाचित प्लास्टिकची वाटणार नाहीत. इतरांना वाटतील... ते सर्व नशिबवान आहेत.

फारएण्ड आणि नंदिनी>>> तांत्रिक चूक झालिये खरी. मोठ्या मनाने पदरात घ्या म्हणजे झालं. Happy

अत्यंत गुणी आणि चांगला मुलगा असलेला आकाश कधी नव्हे ते सिगारेट पित होता हा त्याच्या मनीच्या अस्वस्थतेचा परिणाम असावा का?
<< मुग्धा, बाकीचं राहू दे, इथे माझा आक्षेप. तांत्रिक चूक: सिगरेट ओढतात, पित नाहीत. Happy (आमचे मित्रवर्य म्हणले होते: प्यायला सिगरेट म्हणजे काय गुडगुडी आहे का?) गुणी आणि चांगली मुलं सिगरेट ओढत नाहीत का? आमी काय अगुणी आणि वाईट मुलं हाव काय???

ऑन द सीरीयस नोट:

तुझे स्पष्टीकरण् पटते आहे, पण माझे म्हणणे हे आहे की, हे सर्व कथेमधून दिसत नाहीये.

शेवटी फक्त एकच माझं वैयक्तिक मत. एकमेकांवर प्रेम असले तरी त्या जोरावर सहजीवन दोघांसाठीही 'सुखासमाधानाचे' होईलच असे नाही. त्यासाथी स्वभावही काही प्रमाणात जुळावे लागतात. किमान एकमेकांच्या स्वभावाविषयी मनात प्रामाणिक आदर असावा लागतो. तो स्वभाव मनापासून पटलेला असावा लागतो. अनेक वर्षांच्या संसारानंतरही नवरा-बायको एकमेकांसोबत बरेचदा आनंदी नसतात म्हणजे त्यांचे एकमेकांवर प्रेम नसते का? तर तसे नाही. पण कुठेतरी तारा जुळलेल्याच नसतात.... तेच हे नाही का?

वैयक्तिक मत काहीही असलं तरी कथेम्धल्या मताबद्दल मी बोलत आहे. तुझ्या या विधानाला कथेमधे कुठेही पुष्टीच मिळत नाहीये, कारण ती पात्रं तेवढ्या सक्षमपणे ही नाती अथवा त्यामधली गुंतागुंत दाखवत नाहीयेत. त्यामुळे सर्व अगदी "वरवरचं" वाटत आहे. आकाश जर आपल्या बायकोला मित्राबरोबर बघून अस्वस्थ होतो आणि सिगरेट ओढतो तर मग लगेच त्याच मित्राच्या बायकोला "चल आपण सूर्योदय बघायला जाऊ" असं का म्हणतो? फारच बालिश वाटतं ते आणि आकाश (कथेमधे तरी) नक्कीच बालिश नाही. मग त्याच्या या वागण्याबद्दल काय म्हणणार?

मोकळेपणाने बोलून दाखवते तर त्यावरून ते दोघे त्यांच्या त्यांच्या जोडिदारांशी एकनिष्ठ नाहित या निष्क्रर्शापर्यंत कसं बरं पोचता येतं हा मला पडलेला अजून एक प्रश्न.
>>> माझा हा निष्कर्ष नाही. मोकळेपणाने बोलून दाखवले तर त्यात चूक काही नाही. (इन फॅक्ट, दोघे बोलण्यापुढे गेले असते तरी मला चूक वाटले नसते, जर त्याच्या अशा वागण्याचे समर्थन कथेमधे आले असते तर!!!) जोडीदारापेक्षाही त्या दोघांना नक्की हवंय काय तेच समजत नाहीये मला.

खुप छान..... खुप आवडला.

माझ्यावरती खूप impact झाला बहुतेक........मी घरी जाऊन नवर्‍याला पण ही गोष्ट सांगितली..... आनि
विचारत बसले , की ते दोघे खुष का नव्हते? तू तरी खुष आहेस ना माझ्याबरोबर?

त्याने खूप सुंदर उत्तर दिल, share करावस वाटल......मी खूप खुष आहे ग..,मी नेहमी तू बनून विचार करतो,तुझ्याबद्द्ल विचार करताना ,कोणी दुसरा बनून मी विचारच नाही करू शकत........लोक नाती , प्रेम आपल्या परीने judge करत रहातात आणि खर्‍या आनंदाला मूकतात.

लतांकूर>>> खूप छान विचार आहेत तुमच्या नवर्‍याचे. भाग्यवान आहात. तुम्ही आणि ते ही. माझ्या शुभेच्छा!!!

धन्यवाद बस्के.

हे काय लिहिलंय? डोक्याला शॉट आहे राव. नाही म्हणजे, कथानक खूप आवडले. त्यातल्या त्यात... वैवाहिक जोडीदार झोपलेले असताना मित्र-मैत्रीण ड्रिंक्स सोबत गप्पा मारत बीचवर रात्रभर मस्त एन्जोय करत आहेत. ओह हो! क्या बात है. कथानक फार फार आवडले ब्वा आपल्याला. एकदम थ्रील आहे. आणि शेवटी जोडीदाराला सुखी पाहणे ह्यासारखे सुख नाही असा संदेश. वा! छानच.

पण मांडणी आवडली नाही. पात्रांची नावे आणि त्यांच्यातले नाते डोक्यात पक्के होण्याआधीच त्यांच्यातील संवाद वाचावे लागतात. कोण कुणाची बायको आणि कोण कुणाचा मित्र हे वाचकाला establish झाले नसताना "मृणाल आकाशला म्हणाली" असले वाक्य वाचावे लागते. शेवटी कागदावर लिहून काढले,

राजस <--> मृणाल.
आकाश <--> स्वरा.

आणि तो कागद डोळ्यासमोर धरून कथा वाचली. कळली असे वाटले तोच पुढे अजून एक संकट. "पहाटेच्या कुडकुडत्या" पासून "थॅंक्स राजस!" पर्यंतचा भाग! हा नक्की काय प्रकार आहे? हा त्याला झालेला भास आहे का पहाटे खरे घडलेले आठवतेय? का वाचकाला विचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी लेखिकेने मुद्दामहून योजेलेला तो भाग आहे? देवा रे देवा. इतक्या क्लिष्ट मांडणीची काय गरज होती कळत नाही.

दोन जोडपी. त्यातल्या एकातील नवरा आणि दुसऱ्यातील बायको आधीपासूनचे जवळचे मित्र-मैत्रीण. असा साधासुधा पण मस्त मसालेदार विषय असताना पार वाट लावली आहे इथे. थांबा आता मीच लिहितो एखादी फक्कड कथा.

Pages