जय वीरु

Submitted by बाबूराव on 22 July, 2013 - 04:59

जय वीरू
=======

"जय तू लईच इसरभोळा गड्या "
"का रं इ-या ?"
"आरं तू मेला व्हतास कि मागं ? अन आत्ता जित्ताच फिरतुयास गावभर"
"मर्दा, गोळी लागली म्हनुन लगिच जाळाय निघत्यात व्हय ? लास्ट मोमेन्टला लाकडं बाजुला झालि म्हनुन वाचलु. नायतर जाळला व्हता मला"
"पन तुच म्हनला व्हता ना, येकदा गानं म्हन, अन मान टाकली का, आमाला वाटलं उडलाच "
"आहा रं मर्दा ! गोळी लागल्यावर सुध नाय जात व्हय ? आता तुलाच बसंतीला घेवुन जायची हित्की घाइ झाल्ती कि मी जा म्हनलं का पळाला"
"न्हाय जय न्ह्याय ! आसं काळजाला घरं पाडनारं बोलु नगंस. तुच म्हनला व्हतास, जा नाय तर शपथ हाय"
" म्या काय बी म्हनन, पन तुला डोस्कं नाय व्हय ? आन येवडं करून ती बसंती नाय ते नायच नांदली तुझ्याबरं "
" ये ये ये गल्त है. तुला म्हाईत न्हाय ती का गेली? तुझ्या नादानंच म्या वाटमारी चालु केली. इसरलास का ? "
" माज्या नादानं? परत माज्यावरच का ? तुजा काय गळा धरला व्हता ? "
" बरं बरं आपन दोघांनि ! पन काय करनार म्या तरी ? लैच खायाला लागायचं तिला. गावात बरं व्हतं, पाडाला लागल्यालं आंबं तोडुन आनता येत व्हतं. पन हिला हितं रोज रोज आमरस पुरी लागायची. कुटनं आनायचं आंबं ? येक तर आपल्याला काय इन्कम न्हाइ, अन लग्नानन्तर बसंतीबी टान्गा, रिक्षा चालवायचं नाव घेईना, ठाकुरनं दिल्यालं अन गब्बरला पकडल्याचं पैकं काय जन्माला पुरत्यात व्हय ? "
" आता डान्स बार मधी नाचती म्हनं ?"
" हे बिनकामाच्या ! असं काय बी बोलायचं न्हाय माज्या बसन्तीला. "
" बरं बाबा -हायलं. आता परत मागल्या चुका न्हाय करायच्या रं मर्दा ! अन बिनहाताच्या मानसाबरं परत काम न्हाय करायचं. "
" त्ये का म्हनुन?"
" इसरलास व्हय ? नाक धरायला लागायचं का न्ह्याय ठाकुर आल्याबरं ? "
" व्हय रं जय व्हय. मला तर वाटलं व्हतं गब्बर यायच्या आधीच मरतु का काय वासानं"
" रामलाल चं लै वंगाळ वाटतं बग"
" व्हय ! लैच येकनिष्ठ गडी. कॉन्ग्रेसमधि असता तर पार पीयेम सीयेम झाला असता "
" आंग अशी ! "
" जय भावड्या, गब्बर ला पकडल्यावर आपलं लै नाव झाल्तं. पन परत काय तस्लं काम नाय भेटलं लका "
" आरं, आता ठाकुर, पोलीस ह्यांचाच डाकुंबरं गोटमेट असतंय "
" आं ? नवलच म्हणा कि !"
" नवल कसलं त्यात? आर त्या बिहारात तर पोलीसच डाका घालत्यात "
" अगं बाब्बो ! त्याना कोन पकडायचं बाबा ? पन का रं जय, त्यो ठाकुर जरा येडा व्हता का रं ?"
" का रं ?"
" खिशातलं पैकं घालुन डाकु पकडायला लागलं म्हनल्यावर येडंच म्हनायचं कि "
" ह्ये बग इ-या, आता त्येच्या घरातली समदी मानसं गब्बरनी मारली म्हनल्यावर त्यो पिसाळनार न्हाय व्हय ?"
" खरं हाय ! पन मी म्हनतु, ते ब्येनं जेलातुन पळालंच कसं ?"
" त्या च्या मनात तसंच व्हतं "
" त्याच्या कुनाच्या ? जावेदभाय का सलीमभाय ?"
" येडा का खुळा तू ? वरच्याच्या मनात म्हनतुय मी "
" आस्स ! पन येव्हडा शिकल्येला गडी. पोलीसच्या नोकरीत काळ्याचं पांढरं झाल्यालं. तरी बी येकलाच घोड्यावं बसुन गब्बरच्या अड्यात घुस्ला. मंग मला सांगच, येडाच न्हाय का ठाकुर ? अनं येव्हडं करून काय केलं तर हात तोडुन घित्लं "
" आपल्याला काय करायचं ? पैकं मिळालं ना दाबून ?"
" लैच उमाळा येतुय जणु. आरं लै बेनं निगालं लास्टला ते. तुला नादाला लावलं. जया भागदौडीचं तुज्याबरं लगीन लावुन देतो म्हनला, अन लास्टला तु मेला व्हता का तवा त्याचीच लई घाई चालली व्हती तुला जाळायची. आत्ता माज्या टकु-यात समदं येतंय "
" च्यामारी, असा डाव टाकला व्हय ? बारामतीचं हाय न्हवं बेनं ? आयला, आपुन आनायचं का जयाला ?"
" इसर आता तिला. "
" थांब वाईच. टॉस करू"
" आह रं भावड्या ! तुजा खोटा शिक्का तवाच फेकुन दिला म्या "
" ओह नो ! "
" आता रेखाकडं नीट ध्यान दी "
" ए ! काय बोलतुस वंगाळ ?"
" आरं तुज्या हातावरल्या रेखाकडं ध्यान दी म्हटलं. काय नशिबात हाय आपल्या काय बी कळंना, असं किती दीस चालायचं ?"
" व्हय. आता कुनाचा आधार न्हाई राह्यला. जावेदभाय गानी लिव्हतु, सलीमभाय रिटायर झाला, रमेशभायचं तर काय बी नीट न्हाई जालं. समदी शान शेनात गेलीया "
" कुटं तरी लै म्होट्टा हात माराय पायजे गड्या "
" कुटं मारनार ? मंत्र्यासंत्र्यानं काय शिल्लक ठिवलं असंल तर म्होट्टा हात मारनार ना ?"
" ब्यांक लुटायची का?"
" येडा हाईस. आधिच लुटून झाल्यात ब्यांका. आपुन जानार लुटायला अन क्यामे-यात घावानार. नगंच ते"
" पटलं मर्दा. पन त्ये लोक क्यामे-यात का न्हाई गावलं "
" आरं त्यांनी राजरोस लुटल्यात ब्यांका. बुडीत खातं ऐकलंय न्हवं ?"
" म्हंजी ?"
" बसंती गेल्यापस्नं तुजं चित्त था-यावर न्हाय लका. आरं कर्ज घियाचं अन द्यायचंच न्हाय. सरकार बी म्हनतंय राहुंद्या तुमालाच. अन मंग समदे मिळुन स्विस ब्यांकेत पैकं ठिवतात. कळ्ळं का आता ?"
" च्यायला ! आपुन येडंच म्हनायचं मंग. फुकटच जेलाच्या वा-या करत बसलु. आपुन बी बुडीत खात्यातलं कर्ज मागु"
" शाना हैस ! तू काय नाटा, कुर्ला, गोदी, पित्तळ, चिंगानिया, मंबानी हायेस का आंधी हायेस ?"
" मला लैच इन्फण्ट्री कोम्प्लेस येतुया "
" इन्फण्ट्री कोम्प्लेस ?"
" तुला न्हाय कळायचं "
" तुच शैना. "
" आपुन असं करु. आपुनबी येक पार्टी काढु. विलेक्शन लडवु अन पॉवरमधि येवु. मग राजरोस लुटायला भेटल "
" पायात जोडं हायेत का घालाय ? अनवानीच चालला व्हय विलेक्शन लडाय ? त्वांड बगा पीयेम बनणा-याचं "
"मंग आता काय करायचं ? असं टकुरं खाजवन्यापरीस जावेदभायला उचारायचं का ?"
" काय उपेग न्हाई "
" का रं ? "
" मला भेटलं व्हतं. म्हनत व्हतं त्या टायमाला गब्बरला बॅकिंग नव्हतं म्हनुन जमलं समदं. आता म्या काई सांगायला जायचु याला धर, त्याला धर अन तुमालाच गोळ्या घालतील अतिरेकी म्हनुन "
" म्हंजी त्येचं बी डोस्कं औट झालं म्हनायचं "
" मग काय करायचं रं?"
" काय नाय. गब्बर सुटुन आल्ता ना जेलातुन. त्यो आता लैच म्होट्टा मानुस झालाय. जावेदभाय म्हनलं जमवुन घ्या. त्येला बी तुमच्यासारकी मानसं पायजेल. म्हनत व्हता, लै पैका मिळंल "
" कसलं काम हाय ?"
" हप्तावसुली, डान्सबार, ठर्रे असल्या अड्ड्यावर जायाचं. दिल्यालं पैकं आनायचं. गब्बरशेठच्या बंगल्यावर निम्म द्यायचं, उरल्यालं दोन हिश्शात पोलीसदादा अन आमदारभाऊना द्यायाचं "
" आयला, लैच डोस्कं चालवलं कि गब्बरभायनी"
" मग काय ठरलं ? टॉस करायचा?"
" येड्या, फेकुन दिला न्हवं ? उद्या सांभा यायचा हाय इचारायला. काय सांगायचं त्येला ?"
" आता काय विलाज उरलाय व्हय मर्दा ? माजं तर हा हाय"
" मंग माजं बी हा च हाय "
" चल मग आता गल्लीत गाणं म्हनुन येवु. "
" ये दोस्ती हम नही तोडेंगे..."

- बाबूराव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy