ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

Submitted by रसप on 22 July, 2013 - 03:22

ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा
मन माझे माझ्या घरात लागत नाही मित्रा

शेजार कधी पक्ष्यांचा होता किलबिल किलबिल
रात्रीस सोबती तारे होते झिलमिल झिलमिल
खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

प्राजक्त अंगणी गंध प्रितीचे सांडत होता
तो चाफा राजस रंग उषेचे माळत होता
आता दगडांतुन अंकुर हासत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

मी दूर दूरच्या नवीन देशी जावे म्हणतो
आवडते गाणे विसरुन दुसरे गावे म्हणतो
ह्या सुरांत आता रंगत वाटत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

….रसप….
२१ जुलै २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_22.html

('हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा' ही 'वैवकु'ची ओळ मनात घर करून आहे. 'नाही मित्रा' हा अन्त्ययमक माझ्याच नकळत वैभवच्या त्या कवितेचा परिणाम म्हणून जुळून आला. ह्याच रदीफेची वैभव गझल लिहितो आहे. तिची वाट पाहतोय……. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिडकीत डहाळी आता वाकत नाही मित्रा
................ ह्या घरात शीतल वारा वाहत नाही मित्रा

वा!!!! क्या बात है..