पावसाळे

Submitted by फूल on 21 July, 2013 - 19:46

होते तुझ्या नशीबी भलतेच पावसाळे
नाही तुझे न माझे जुळलेच पावसाळे

लपवून ठेवलेले आहेत मी उन्हाळे
बाहेर दाविले मी भलतेच पावसाळे

दाबून दु:ख सारे कढ आत आत जिरले
तुझिया समोर खुलले हलकेच पावसाळे

कळ आतल्या जिवाची सांगूनही कळेना
मम रिक्त जीवनी या नुरलेच पावसाळे

आयुष्य आठवांचे विसरूनही सरेना
रुतलेच पावसाळे सललेच पावसाळे

जप पावला आता तू रस्त्यात खूप वणवे
असतील मात्र अंती नुसतेच पावसाळे

त्यांचेच दु:ख मोठे डोळ्यात पावसाळे
कढ आत दाबताना सुकलेच पावसाळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"लपवून ठेवलेले आहेत मी उन्हाळे
बाहेर दाविले मी भलतेच पावसाळे" >>> हा सर्वात विशेष वाटला.

होते तुझ्या नशीबी भलतेच पावसाळे
नाही तुझे न माझे जुळलेच पावसाळे<<< छान! 'न' ऐवजी 'नि' घेतल्यास छान वाटावे. आशय आवडला, पण जुळलेच मधील च जर्रा वेगळा वाटला.

लपवून ठेवलेले आहेत मी उन्हाळे
बाहेर दाविले मी भलतेच पावसाळे<<< आहेत हे वर्तमानकाळातील तर दाविले हे भूतकाळातील होते. दर्शवे, दाखवे असे अधिक सुलभ वाटावे. शेर आवडला.

दाबून दु:ख सारे कढ आत आत जिरले
तुझिया समोर खुलले हलकेच पावसाळे<<< सुंदर, दुसरी ओळ फार आवडली.

कळ आतल्या जिवाची सांगूनही कळेना
मम रिक्त जीवनी या नुरलेच पावसाळे<<< हम्म्म! दोन्ही ओळींमध्ये साधारण तसेच सांगितले गेल्यासारखे वाटले.

आयुष्य आठवांचे विसरूनही सरेना
रुतलेच पावसाळे सललेच पावसाळे<<< येथेही, पहिल्या ओळीचे फक्त एक्स्प्लनेशन दुसर्‍या ओळीत आल्यासारखे वाटले.

जप पावला आता तू रस्त्यात खूप वणवे<<< 'आता' चे 'अता' करावे लागेल.
असतील मात्र अंती नुसतेच पावसाळे<<< छान!

त्यांचेच दु:ख मोठे डोळ्यात पावसाळे
कढ आत दाबताना सुकलेच पावसाळे<<< रदीफ दोन्ही ओळीत आल्याने किंचित कमी आवडला. तसाही, आशयाच्या दृष्टीनेही किंचित कमी आवडला.

पण गझल आवडली. रदीफ छान निभावलीही गेलेली आहे.

(विस्तृत प्रतिसादातील काही बाबी आवडल्या नसल्यास क्षमस्व)

पु ले शु

-'बेफिकीर'!

खयाल जवळपास सर्वच आवडले.

पावसाळे ह्या रदीफेला न्याय मिळाल्यासारखे मात्र वाटले नाही

बेफिकीरजी... आणि बाकी सर्वांचेच खूप खूप आभार! आपल्या सूचना कायमच उपयोगी आलेल्या आहेत. मायबोलीवर जे शिकणे अपेक्षित होते ते होत आहे याचा मनःपूर्वक आनंद झाला...

बेफीजींच्या सूचना लक्षात ठेवा खूप फायदा होईल तुमच्या गझलेला

मला मात्र एकही शेर आवडला नाही का ते माहीत नाही

या प्रतिसादाने दुखावले गेल्यास क्षमस्व

गझल पण?
व्वा...
छान प्रयत्नं आहे, फुला... विचार खरच आवडलेत.. मांडणी होईल सुबक... करीत रहा.
मला आवडते मी केलेली पुरणपोळी. पण पट्टीचा खाणारा सांगतोच... सारणाचा गोडपणा, कडेपर्यंत नाही पसरलं इ. इ.
करीत रहायला हवं अन वाढायलाही हवंच. इथे मायबोलीवर नीट समजावून सांगणारे बेफींसारखे आहेत्च.
खूप शुभेच्छा.

क्या बात है. सर्वच शेर आवडले. कोणते खास वाटले असे विचाराल तर-

आयुष्य आठवांचे विसरूनही सरेना
रुतलेच पावसाळे सललेच पावसाळे

जप पावला आता तू रस्त्यात खूप वणवे
असतील मात्र अंती नुसतेच पावसाळे

पैकीच्या पैकी गुण दिले.

असेच सुंदर सुंदर लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

छान आहे गझल…

लपवून ठेवलेले आहेत मी उन्हाळे
बाहेर दाविले मी भलतेच पावसाळे
आणि
दाबून दु:ख सारे कढ आत आत जिरले
तुझिया समोर खुलले हलकेच पावसाळे

हे दोन शेर खूप आवडले…

काही ठिकाणी काफियातील 'च' अनावश्यक वाटला. ( चुभूद्याघ्या )

शुभेच्छा…