मायबोली भटक्यांचा "सह्यमेळावा"

Submitted by Yo.Rocks on 18 July, 2013 - 06:45

७ वर्षापुर्वी मी जेव्हा नुकताच मायबोलीवर आलो होतो.तेव्हा मायबोलीच्या माध्यमातूनच जमलेले एक टोळके भटकंती करायला जात असत... खरे तर याबद्दल आधी माहितच नव्हते पण नंतर मायबोलीवर नुकतीच ओळख झालेल्या इंद्रधनुष्य (इंद्रा) ने या ग्रुपबद्दल सांगितले.. दुर्दैवाने मला कधी त्यांच्याबरोबर जाणे जमले नाही.. जिएस, दिनेशदा, गिरिराज, आरती इत्यादी मंडळीबरोबर भटकंती करायची राहूनच गेली..
आता मात्र बहुतांशी ट्रेक होतात ते मायबोलीच्या मोजक्या सवंगडयाबरोबरच.. एकीकडे मायबोलीवर एकेका दर्दी भटक्याची भर पडत गेली.. मुंबई, पुणे वा नाशिक वा अजुन कुठलाही प्रांत असो पण जो तो जमेल तसे आठवणीतल्या वा नुकत्याच केलेल्या ट्रेकचा सचित्र अनुभव लिहू लागला.. सादप्रतिसादांमधून नविन ओळखी झाल्या...नि मग हळुहळू सगळ्यांनाच वाटून गेले की मायबोलीवरील भटक्यांचा एक जिटीजी ट्रेकच्या निमित्ताने झालाच पाहीजे !! प्रस्ताव मांडला गेला पण दोन वर्षापासून नुसताच धुळ खात बसला होता..

कामानिमित्त परदेशात असणार्‍या 'सेनापती' (सेना, रोहन, पक्या इ.) चे नुकतेच भारतात आगमन झाले.. कधी सह्याद्रीशी गळाभेट करतोय असे त्याला झाले होते.. शिवाय मायबोलीकरांबरोबर ट्रेकही करायचा होता.. झाले पुन्हा प्रस्तावाला हात घालण्यात आला.. त्यातही वरुणराजाची कृपादृष्टी चांगली असल्याने इंद्रधनुष्य (इंद्रा) प्रसन्न झाले.. त्वरीत समस्त भटक्या परिवाराला ई-तार पाठवण्यात आली.. तारखांचा अपेक्षित धुराळा उडाला.. पण चमत्कार म्हणा वा वरुणराजाच्या झालेल्या जोरदार आगमनाचे निमित्त म्हणा.. धुराळा फारकाळ न टिकता तारीख ठरली पण १३-१४ जुलै ! त्यातही 'सह्याद्रीमित्र' (ओंकार) ने ठरलेल्या घाटवाटेचा ताजातवाना 'चिंब' फोटो सगळ्यांसाठी शेअर केला.. मग ठिकाणावर पण शिक्कामोर्तब झाले 'केळद-मढे घाट- उपांडया घाट'.. त्यातही नेहमीच मुक्तविहार करण्यात तरबेज असणार्‍या 'स्वच्छंदी' (मनोज) ने मुंबईकरांसाठी 'गोप्या घाट' लाही सामावून घेण्याची योजना आखली.. नि अखेरीस बर्‍याच चर्चाचर्वणानंतर मायबोली भटक्यांचा सह्य मेळावा १३ जुलैच्या (शनिवार) रात्री करण्याचा ठरला - मेळाव्याचे मुख्य ठिकाण 'केळद' ! मुंबईहून येणार्‍यांसाठी बापट्रेक ठरला.. कोकणातून चढून पुण्यात जायचे नि दुसर्‍यादिवशी दुसर्‍या मार्गाने उतरुन पुण्याहून कोकणात म्हणजेच 'शिवथरघळ- गोप्या घाट - केळद- मढे घाट- कर्णावाडी- रानवाडी -शिवथरघळ' असा भन्नाट प्लॅन ! तर पुण्याहून येणार्‍यांसाठी धुंदमस्त ट्रेक ठरला गेला 'केळद- मढे घाट - उपांडया घाट' !

अगदी पुरातन काळापासून कोकणातून वरती देशात येण्यासाठी ह्या घाटरस्त्यांचा वापर केला जात आहे.. सिंहगडाच्या लढाईत वीरमरण पत्करलेल्या तानाजी मालुसरे यांचा पार्थिव तळकोकणातील उमरठ या त्यांच्या गावी या मढे घाटातूनच नेण्यात आला होता म्हणूनच 'मढे घाट' असे नाव पडल्याचे ऐकीवात आहे..

असो.. ठिकाण ठरले वा ट्रेकची तारीख जवळ आली की एक भिती नेहमी असते ती टांगारुंची ! सुदैवाने न येणार्‍यांचा आकडा अगदीच नगण्य ठरला ! तुर्तास दोन तुकडया सज्ज झाल्या.. पुण्याहून येणार्‍या तुकडीची जमवाजमव वा फोनाफोनीची जबाबदारी ओंकार ने घेतली तर मुंबईहून ईंद्राने ! बाकी निसर्ग खुलवण्याची जबाबदारी पावसाने अधिकच गांभीर्याने घेतली होती.. शुक्रवारपासूनच तुफान पाउस सुरु झालेला..

ठरल्याप्रमाणे शनिवारी मुंबईहून दोन गाडया एव्हाना महाडहून 'शिवथरघळई'च्या रस्त्याला लागल्या.. तुकडीमध्ये सामिल झालेले - स्वच्छंदी(मनोज), सेनापती(रोहन/ सेन्या), गिरीविहार (गिरी/नरेश), विनय भीडे (विन्या), इंद्रधनुष्य (इंद्रा), इन मिन तीन (नितीन), यो रॉक्स (यो) नि रोहित एक मावळा (रो.मा)
दुसरीकडे पुण्याहून एक गाडी दुपारच्या सुमारास 'केळद' गावी पोहोचणार होती.. तुकडीत सामिल असणारे - आशुचँप(आशु/चँप), ज्यु. आशुचँप (दर्शन), कोकण्या (कोकण्या), पवन (पवन्या) नि सह्याद्रीमित्र (ओंकार/ओंक्या)

तुकडीत समतोल साधावा म्हणून की काय मुंबईचा जिप्सी (जिप्स्या/योगेश) पुण्याच्या तुकडीत सामिल होणार होता.. तर पुण्याहून सुन्या आंबोलकर(सुन्या) व दिपक डी (दिपक/ डिंगु) बाईकने मुंबईच्या तुकडीत सामिल होणार होते ! शिवाय या घाटवाटांसाठी अगोदरच चालू पडलेला Discoverसह्याद्री (साई/डिस्क्या) आपल्या तीन मित्रांसोबत आम्हाला भेटण्यासाठी रात्री केळदला हजेरी लावणार होता..

'शनिवार' पावसाच्या धुक्यातच उजाडला नि मायबोली भटक्यांच्या एका अभुतपुर्व सह्य मेळाव्याची वाटचाल सुरु झाली.. त्यात पावसाने आमच्या(मुंबईहून येणार्‍या) गाडयांना अगदी बोट धरून शिवथरघळाला आणून सोडले होते..

इथवर येइपर्यंत सभोवतालच्या निसर्गाने भलतेच स्वागत केलेले..अगदी चिंब करुन सोडले होते.. हिरव्या सृष्टीने मनाला कधीच भुरळ पाडली होती.. शिवाय आजुबाजूच्या डोंगरांनी आपापल्या माथ्यावरुन धबधबारुपी शुभ्रपांढर्‍या माळा सोडून आगामी धुंदमय वातावरणाचे सुतोवाच दिले होते.. अगदी दुरवर मढे घाटावरचा सुसाट असलेला धबधबाही दिसत होता.. !

शिवथरघळईला पोहोचलो तर तेथील धबधब्याचा प्रचंड आवाज शांततेला भंग करत होता.. पार्कींग व जेवणाचे आधीच फोनाफोनी करुन ठरले असल्याने आम्ही जाधवांच्या हॉटेलपरिसरात गाडया पार्क केल्या.. आमच्यापाठोपाठ पुण्याहून आलेले बाईकस्वार दिपक व सुन्याही येउन मिळाले.. धुंदवातावरणात अत्यावश्यक अशा 'पिठला-भाकरी व चवळीची झणझणीत उसळ' या मेनुचा आस्वाद घेतला नि ट्रेकींगला सुरवात केली..

खरे तर गोप्या घाटचा प्लॅन हा पाउस कितपत पडतोय नि वाटाडया कोणी मिळेल यावर बराचसा अवलंबून होता.. पुण्याच्या ओंकारने 'गोप्या घाटाने येउ नका.. नदी ओलांडता येणार नाही.. उपांडया घाटानेच थेट केळदला या' इति अगोदरच सांगून ठेवलेले.. पण आम्ही सगळे सभोवताच्या वातावरणात मशगूल झालेलो.. त्यात जाधवांकडे विचारपुस केली असता 'गोप्या घाट सुरु आहे.. पण या पावसात जरा सांभाळून..' असा दुजोरा मिळाला नि आम्ही 'गोप्या घाट गोप्या घाट' म्हणत सुटलो !

- -

आम्ही वाटेला लागलोय हे पाहताच आतापर्यंत काही काळ वामकुक्षी घेणार्‍या पावसानेदेखील हजेरी लावली... पायाखालची चिखलवाट तुडवत ओढे पार करत आम्ही शेतमळ्यांमध्ये घुसलो.. तिथे गावकर्‍यांना विचारले असता त्यांचे बोट गोप्या घाटवाटेच्या डोंगराकडे जात होते.. पण ढगांनी यथेच्छ धुमाकूळ घातलेला असल्यामुळे फक्त दिशाच कळली. माथा काही दिसला नाही.. मागे वळून पाहिले तर भरपावसात एकाच डोंगररांगेच्या दोन्ही टोकाला धबधब्यांचा कल्ला सुरु होता.. एकीकडे 'आम्ही दोघे भाऊ भाऊ' म्हणणारे दोन धबधबे तर दुसर्‍या टोकाला एकटा टायगरच्या आवेशात गर्जणारा जलप्रताप !

- -

दिवसभरात आतापर्यंत सगळे १०० फुटाच्या घरातलेच धबधबे बघितले होते ! याहून सुख कुठले... अगदी धबधब्यांची वस्तीच इथे थाटलेली दिसत होती.. परिणामी शेतमळ्यांच्या बाजूने वाहणार्‍या ओढयांची साहाजिकच दादागिरी सुरु होती..हे सगळे पावसापासून कसाबसा बचाव करत कॅमेर्‍यात नजरकैद करत होतो.. पुढे गेले असता वाटेत कळले की 'डोंगराच्या एका नाळेतून वरती वाट जाते.. पण पुढे एक नदी ओलांडावी लागते नि पाउस बघता ओलांडणे कठीण !' हे जरा लक्षात ठेवूनच आम्ही पुढे जाउ लागलो.. वाटेत शेतकामात व्यस्त असणारी मंडळी दिसत होती.. त्यांच्याकडून वाटेची खातरजमा करत पुढे निघत होतो..

शेवटी बर्‍यापैंकी उंची गाठून अगदी शेवटच्या टप्प्यात आलो जिथून गोप्या घाट खर्‍या अर्थाने सुरु होणार होता.. त्याच टप्प्यात शेतकाम करणार्‍या मंडळीकडे वाटाडयाची विनंती केली कारण पुढे वस्ती थेट गोप्या घाट चढून गेल्यानंतरच लागणार होती.. पुढची वाट दाट जंगलातून जात होती शिवाय धुकेही पसरलेले त्यामुळे परत एकटे येण्याची भिती वाटल्याने पंधरा मिनीटाच वाटाड्या म्हणून आलेला छोटु परतण्याची भाषा करु लागला.. तिथेच मग त्याच्याकडून पुढची वाट नीट समजून घेतली.. त्याचा मोबदला त्याला 'जबरदस्ती'ने चुकता केला नि आम्ही चालू पडलो.. आमच्या पाठमोर्‍या उभ्या असणार्‍या डोंगररांगेवरील ते धबधबे आता आपली 'टोटल' उंची दाखवत होते ! कितीही पाहिले तरी समाधान नव्हते.. पण वेळही तितका नव्हता. ! आम्ही लगेच चढणीच्या वाटेने जंगलात शिरलो..

नेहमीच्या ट्रेकप्रमाणे वाटेला आता चढण लागले होते.. त्यात पावसाने झोडपायला सुरवात केलेली.. कारवी व काटेरी झुडूपाच्या जंगलातून जाणार्‍या निमुळत्या वाटेवरुनदेखिल पावसाचे पाणी वाहू लागले.. अजुन किती टप्पा गाठायचा आहे हे मात्र दाट धुके व जंगल यांमुळे काही कळत नव्हते.. एकमेकाच्या संपर्कात राहून जो तो आपापल्या परिने दम घेत चढत होता.. साहाजिकच अशा परिस्थितीत आतापर्यंत आमच्या गप्पाटप्पांचा असणारा आवाज खूपच क्षीण बनला होता.. लवकरच आम्ही शेवटच्या टप्प्यातल्या नाळेत पोहोचलो नि ही नाळेची वाट चढून गेलो की थेट गोप्या घाटावर जाणार हे कळताच अधिक जोमाने चढू लागलो.. त्याचवेळी नाळेत पोहोचल्यामुळे वाटेतल्या वाहत्या पाण्याचा जोरही वाढलेला..

- -

वाहत्या पाण्याची गडबड तशी फारच होती पण त्यातही वाटेत एखादा धबधबा लागला की पाण्याचा खळखळाट अगदी कानफटात मारत होता..! सभोवतालचे दाट जंगल पुर्णतः धुक्यात बुडाले होते.! अश्या मदमस्त वातावरणात कोण नाही सुखावणार ! यालाच तर म्हणतात पावसाळी ट्रेक ! शिवथरघळाहून निघाल्यापासून तब्बल तीन तास पावसाशी झुंज देत आम्ही गोप्या घाटचा माथा गाठला ! माथ्यावर येताना अगदी जंगलाच्या बोगद्यातून बाहेर आल्यासारखे झाले.. स्वागतासाठी दाट धुके होतेच !

- -

माथ्यावर आल्याने चढण संपले नि पुन्हा एकदा विनोद,थटटामस्करी अशा विविधरंगी असलेल्या गप्पाटप्पांचा आवाज सुरु ! पठारावर आलो खरे पण दहाफुटा पलिकडचे काहीच दिसत नव्हते.. निरव शांतता होती ! अगदी दुरवरुन वाहत्या जलप्रवाहाचा आवाज कानावर पडत होता.. दाट धुक्यातच आम्ही वाटचाल सुरु ठेवली.. लवकरच एक छोटी वाडी लागली.. कुणाचाही मागमूस नव्हता.. संध्याकाळच्या वातावरणात धुक्याने थैमान घातलेले नि त्यात कौलारु घर व आजुबाजूंच्या झाडांच्या उमटणार्‍या आकृत्या अगदी वेगळ्याच दुनियेत नेउ पाहत होत्या...

- -

आम्ही त्या घरांमध्ये आवाज देउन पाहिला पण कोणाचीच जाग नव्हती.. शांतता इतकी धीरगंभीर वाटत होती की इकडची लोक घरं तर नाही ना सोडून गेली असा विचारही येउन गेला.. शेवटी रो.मा ने 'कोणी आहे का?' असे विचारताच मात्र घरातला कुत्रा लगेच भुंकला..! Lol त्या घरातूनच मग बाहेर आलेल्या एका बाईला रस्ता विचारला.. तेव्हा कळले ही गोप्या घाटाची वरची वाडी.. आम्हाला केळदसाठी खालच्या वाडीत उतरुन पुढे नदी ओलांडावी लागणार होती.. पण नदीला उतार नाही तेव्हा नदीच्याच बाजूने पुढे चालत वानेराकडच्या साकवावरून नाहीतर निगडिच्या बंधार्‍यावरून नदी ओलांडण्याचा सल्ला त्या बाईने दिला..

संध्याकाळचे पाच कधीच वाजून गेले होते... शिवाय धुक्यामुळे अंधारही लवकर पडण्याची शक्यता होती.. तेव्हा हातात असलेल्या दोन तासांमध्ये आम्हाला वाट तुडवत केळद गाठणे अपरिहार्य होते ! अन्यथा सह्यमेळावा होणे नाही हे पक्के जाणून होतो.. नि अडसर होता नदीचा ! बघू म्हणत आम्ही झपाझप पावले टाकत पुढे निघालो.. वाटेतच वेगात धावणारा एक छोटा जलप्रवाह आडवा आला.. पण त्याचे पात्र बघून मनात उगाच वाटून गेले की ती नदी पण अशीच असावी.. Happy

ओढा ओलांडून पुढे आलो तर अगदी दुरवर पसरलेले पठार दिसले.. सभोवतालच्या धुक्यामुळे कोणच दिसेना.. पण अचानक धुके बाजुला झाले तर समोरच शेतमळ्यामध्ये गावकरी काम करत होते.. त्या गावकर्‍यांना विचारले तर 'नदी ओलांडू नका, पुढे साकव लागेल त्यावरुनच जा' हा सल्ला मिळाला..

- - -

पुढेच लागणार्‍या वाडीतल्या एका ताईंना विचारले तर त्यांनी अगदी व्यवहारिक दृष्टीकोन ठेवून 'नदीला हात लावू नका.. मी तर म्हणते आता जाऊच नका.. पण इथच रव्हा' चा सल्ला दिला.. कुणी नवखा ट्रेकर असता तर लागलीच घाबरुन एकही पाउल पुढे गेला नसता इतक्या भितीयुक्त शब्दात त्या ताई सांगत(घाबरवत) होत्या..! साकव नदीच्या पाण्यात कधीच वाहून गेला हेदेखिल इथेच कळले.. पुढच्या घरातल्या ताईंना विचारले तर त्यांनी एकच वाक्य कुठलाही पुर्णविराम न देता आम्ही अगदी त्यांच्या नजरेआड होईपर्यंत पुन्हा पुन्हा चालूच ठेवले.. जल्ला मला तर सगळेच डोक्यावरुन गेले फक्त 'वयल्या अंगाने.. वयल्या अंगाने' इतकेच तिचे शब्द कानावर पडले.. मनोजच्या मात्र लक्षात राहीले..काय तर' "आंब्याच्या" वयल्या अंगाने इरा ओलांडून माळरानाच्या वयल्या अंगाने शिवत्याच्या बाजूच्या वानेराकडच्या साकवावरून नाहीतर निगडिच्या बंधार्‍यावरून जावा... हेपण नाय जमले तर नदीच्या बाजू बाजूने सरळ केळद पर्यंत जावा आणी मग पुलावरून नदी ओलांडा'' इति... पुढे अजुन एक मोठा शेतमळा लागला जिथे मोठया संख्येने शेतकरी डोईवर इरली नाचवत 'लावणी महोत्सवात' सहभागी झाले होते..

- - -

आम्ही इथे पोहोचताच गोंधळ उडाला.. कोण काय सांगत होते ते फारसे कळत नव्हते.. पण नदी ओलांडू नका हे मात्र अगदी ठणकावून सांगत होते.. अगदी दूर गेलो तरी मागून 'नदीss ओलांडूss नकाss' असे आवाज कानावर पडत होते..

वाटेत भेटणार्‍या प्रत्येकाने नदी पार करण्याच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला होता.. तेव्हाच नदीच्या भीषण रुपाचा अंदाज आला होता.. पण जल्ला प्रत्यक्षात नदी अजुन सामोरी आलीच नव्हती.. सहा वाजून गेले नि थोडयाच वेळात कानावर जलप्रवाहाचा आवाज ऐकू आला.. हळुहळू नदीचे पात्र समोर आले.. जवळ जाउन पाहिले तर धुवाधार पावसामुळे जितका गढुळ तितकाच बेभान झालेला नदीचा जलप्रवाह अगदी वीजेच्या वेगाने सुसाट पळत होता.. काय हिंमत त्या प्रवाहात उतरण्याची ! हातात फारच कमी वेळ होता नि आता काहितरी मार्ग काढणे आवश्यक होते..

ठरल्याप्रमाणे आम्ही मग त्याच पात्राच्या बाजूने वाटचाल सुरु ठेवली.. नदीच्या पल्ल्याड केळदला जाणारा रस्ता दिसत होता.. एसटीसुद्धा दिसली... पण जाणे शक्य नव्हते.. जिथे कुठे जलप्रवाह शांत वाटेल वा ओलांडणे सुरक्षित वाटेल तिथेच पल्ल्याड जाण्याचे पक्के केलेले.. नि अशी जागा कुठेतरी मिळेल या आशेच्या बळावर आम्ही पटापट चालू लागलो.. बरीच तंगडतोड केली पण नदीचे पात्र प्रथमदर्शनी दिसले अगदी तसेच होते.. उलट मध्येच पावसाची मोठी सर आल्याने नदीला अधिकच उधाण आलेले.. हळुहळू अंधाराने पण धुक्यासहीत जमवाजमव करण्यास सुरवात केली तेव्हा केळदला ठरलेला सह्यमेळावा हुकणार अशी चिन्हे दिसू लागली.. आजुबाजूच्या शेतमळ्यातील शेतकरीदेखील घरी परतलेले.. कुणाची जाग नव्हती नि आम्ही आता बहुदा नदीच्या तीरावर एखादी वाडी बघून मुक्काम करण्याचा विचार करत होतो.. अगदी स्टोव्हपासून खाणे बरोबर असल्याने बिनधास्त होतो.. पण मग नदीच्या अल्ल्याड एक नि पल्ल्याड एक असे दोन सह्यमेळावे घडले असते..

आम्ही पुर्णतः अंधार पडेपर्यंत हार मानणारे नव्हतो.. नि प्रयत्नाअंती परमेश्वर म्हणतात तेच खरे.. पुढे काय करायचे ह्या विचारात असतानाच नदीकाठच्या त्या सुनसान जागेत एक गावकरी भेटला.. विचारले असता म्हणाला 'चला लवकर.. याचवेळेला दिवसभरच्या शेतकामासाठी पलिकडून आलेले शेतमजूर नदी ओलांडून घरी लोटतात...ते भेटतील तुम्हाला' बस्स त्याचे एवढे शब्द ऐकूनच पुन्हा हुरुप चढला.. आमच्यातला सुन्या तर त्या लोकांना गाठण्यासाठी पुढे धावतच गेला नि खरच 'बाणेर'च्या वाडीतून पुढे गेले असता ती माणसं भेटली..आम्हाला पाच-दहा मिनीटे उशीर झाला असता तर तो भला माणूस भेटला नसता वा ही नदी ओलांडणारी देवमाणसंही..

त्या माणसांनी बघता बघता नदी ओलांडायला घेतली.. त्यांना फार घाईच होती.. अंधार जो पडत चालला होता.. पण आमचा ग्रुप अजुन एकत्र आला नव्हता.. त्यांना विनवण्या करुन थांबवले नि मग सगळे एकत्र आल्यावर त्यांच्या सुचनेप्रमाणे रांगेत नदी ओलांडायला घेतली.. नि काय सांगावे.. आतापर्यंत रौद्ररुप दाखवणारी नदी इथे पुर्णतः शांत होती.. ना पाण्याला जास्त जोर ना खोली.. अगदी कमरेपर्यंत पाणी लागले.. पाण्यात पायाखाली अगदी रेतीजमिन.. अडथळा आणणारे खड्डे वा दगडधोंडेपण नव्हते.. !! आम्ही इतक्या सहजतेने नदी ओलांडतोय हेच मुळी अविश्वसनीय वाटत होते.. अगदी मोक्याच्या क्षणी ही सगळी देवमाणसं भेटली नि आम्ही बाजी मारली..

एकेक करुन नदीच्या पल्ल्याड पोहोचलो पण ! काय ती जादुमय जागा शोधून ठेवली होती जिथे त्या बेभान झालेल्या नदीचे काहीच चालत नव्हते ! बस्स अगदी विश्वचषक जिंकल्याचा आनंद आम्हा प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहू लागला. ! प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व अनुभव पणाला लावून मायबोली भटक्यांनी डाव साधला होता.. कोकणातल्या डोंगरमार्गे शेवटी पुणे जिल्ह्यात प्रवेश मिळवला होता..

याउलट परिस्थिती केळदला दुपारपासूनच ठाण मांडलेल्या पुण्याच्या मायबोली भटक्यांची होती.. गाडीरस्त्याने ते तिथवर आरामात पोहोचले होते.. आम्ही येइस्तोवर मढे घाटाच्या धबधब्यावरच टाइमपास करणार होते.. आम्ही मुंबईहून निघतानाच 'संध्याकाळी पाच-सहावाजेपर्यंत येउ' इतकेच कळवले होते.. पण कुठल्या घाटाने ते निश्चित सांगितले नव्हते.. तेव्हा आता अंधार पडला नि आम्ही अजुन पोहोचलो नाही बघून तेही थोडेसे चिंताग्रस्त झाले.. मोबाईलला आज दिवसभरात नेटवर्क नसल्यामुळे तो असुनही नसल्यासारखा.. !

आम्ही नदीच्या पल्ल्याड 'कुंबळे' गावात असल्याने आता मात्र अगदी निश्चिंत होतो.. 'आधी खाउ नि मग जाउ' म्हणत खादाडी करुन घेतली.. दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमानंतर खादाडी झालीच नव्हती ! इथूनच 'केळद' गावात पोचवणारा अगदी सरळ दगडी रस्ता आहे... अंदाजे पाच-सात किमीचे अंतर असेल पण गावातून टमटम मिळू शकेल असे कळले.. त्या टमटमवाल्याने अगदीच वाजवी दर सांगितल्याने चालतच 'केळद' गाठू म्हणत अंधारातच चालू पडलो..!!

एव्हाना पुण्याहून आलेल्या भटक्यांना आम्ही गोप्या घाटातूनच चढून येत असणार असा दृष्टांत झाला होता.. म्हणूनच की काय आम्ही पाच-दहा मिनीटे चाललो नि समोर आशुचँप नि ओंकार गाडीला घेउन हजर !! भेट घडवण्यासाठी काय जल्ला मोबाईलच उपयोगी पडतो असे नाही ! आमच्या अर्ध्या तुकडीला गाडी घेउन गेली.. पुढे जाईस्तोवर मग डिस्क्याचा मित्र व पवन्या गाडीसोबत हजर.. !

आता कुठे मायबोली भटक्यांचा सह्यमेळावा रंगणार होता.. ओंकारने आदल्या दिवशीच फोनाफोनी करुन चोख बंदोबस्त ठेवला होता.. राहण्यासाठी मंदीराच्या बाजूच्या शाळेतील एका वर्गाची खोली मिळाली होती.. रात्रीच्या जेवणाचीसुद्धा एका गावकर्‍याकडे सोय केलेली..

आम्ही जाताच वर्गात एकच कल्लोळ माजला.. जणुकाही रात्रशाळा भरलेली.. वर्गातले बेंच एकाबाजूस एकावर एक ठेवून तिथे कपडे सुकवण्यासाठी सोय झाली होती तर बाकी मोकळी जागा आमच्या सह्यमेळाव्यासाठी शिल्लक होती.. दिवसभरच्या ओल्या कपडयांतून मुक्त झालो नि एक सूप हो जाये म्हणत स्टोव काढून सूपच्या तयारीला पण लागलो.. तर एकीकडे कोपर्‍यात चूलीवर पापड भाजण्याचे काम पवन्या अगदी मन लावून करत होता.. नि त्याला जळणासाठी अगदी छोटी लाकडं द्यावीत म्हणून 'कोकण्या' कधीपासून एका चाकूने लाकडाची पिसे काढत जागा अडवून बसला होता.. त्यावर विन्याने वैतागून 'कोकण्या.. झालं का रे तुझं काष्ठशिल्प ? म्हणजे आम्हाला बसायला जागा होईल ' अशी कोटी केली नि एकच हशा पिकला ! Lol

मग एकेक करुन थट्टामस्ती सुरु झाली.. हास्यकल्लोळ सुरु झाला.. या गरदोळात तिथेच एका बाजूस गाढ झोपलेल्या ज्यु. आशुचँपकडे लक्ष गेले.. नि हा बच्चा पण आलाय म्हणून खुष झालो.. लवकर सूप तयार झाले नि सामुहिक सुपप्राशनचे निमित्त साधून नाममात्र ओळखपरेड झाली ! गळाभेट तर आधीच झाली होती.. डिस्क्याचे तीन मित्र धरुन तब्बल वीस जणांच्या साक्षीने सह्यमेळावा चांगलाच रंगात आला.. एरवी फक्त नेटवर गाठभेट चर्चा चालायची आता मात्र मांडीला मांडी लावून गप्पा काय भोजन काय ! पिठला भाकरीचे भारदस्त असे सामुहिक भोजन उरकले नि पुन्हा झोपताना गप्पांचा कार्यक्रम रंगला.. त्यात सेन्याने गुडनाईट पेशल म्हणून श्रीखंडाच्या डब्या बाहेर काढल्या.. मग जिभल्या चाटतच मायबोलीवरचे विषय चघळले गेले.. आता भटके म्हटल्यावर दुर्गभ्रमंतीबद्दल गोष्टी हव्यातच.. त्यात 'ओंकार म्हणजे संगणक' हे विन्याचे बोलणे सगळ्यांनीच उचलून धरले.. काय हा माणूस.. आम्हाला आम्ही लिहीलेले वृत्तांत लगेच आठवत नाही नि ह्याला मात्र आमच्या वृत्तांतील सहभागी भटक्यांची नावेपण लक्षात ! उगीच नाही काय गिरिमित्र संमेलनाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत पहिले बक्षिस मिळवलेय..त्याही प्रश्नांवर प्रश्नोत्तरे झाली.. आशूचँप आहे म्हटल्यावर सर्वात शेवटी 'अमानवीय' गोष्टी सुरु झाल्या नि गप्पांना अगदीच उत आला.. गप्पा करता करता डोळा कधी लागला ते कळलेच नाही.

दुसर्‍या दिवशी जाग आली तेव्हा बाहेरचे धुके अगदी आमच्या वर्गखोलीत शिरकाव करु पाहत होते.. सगळ्यांचे आटपून होईस्तोवर चहा नाश्त्याचा बेत सुरु झाला.. प्रत्येकाने आणलेला खाउ एकत्र केला तर नाश्ता खूपच वाटत होता.. पण खरी मजा उपीट बनवून खाण्यात होती.

- -

सक्काळीच' केळद' सोडण्याच्या तयारीत असणारे डिस्क्या व त्याचे मित्र यांना नाश्ता दिल्यानंतरच बाहेर सोडले.. सुन्याही त्यांच्याबरोबर पुण्याकडे जाण्यास निघाला.. बाकीचे आम्ही सगळी आवराआवर करुन ग्रुप फोटोसेशन पार पाडले.. अर्थात यावेळी डिस्क्या व सुन्या नव्हते.. पुढे आम्ही मढे घाटाकडे प्रयाण केले.. आमच्यात सर्वात जास्त उत्सुकता तर ज्यु. चँपला लागली होती..

आमचा हा एकत्रित ट्रेक मढे घाटातून कर्णावाडीत उतरेपर्यंतच मर्यादीत होता.. पुढे कर्णवाडीला ताटातूट अढळ होती.. पुण्याचे भटके तिथून पुन्हा उपांडयाने वरती जाणार होते शिवाय दाट धुके होते म्हणून त्यांनी 'लक्ष्मण जनार्दन' या वाटाडयाला बरोबर घेतलेले... आम्ही कर्णवाडीतून आणखीन खालच्या बाजूस असलेल्या रानवाडी गावात व तेथून पार्क केलेल्या गाडयांसाठी शिवथरघळला जाणार होतो..

प्रहरीच्या वेळेस धुक्याला नेहमीच जोर येतो.. पण याच धुक्याचा आस्वाद घेत आम्ही निवांतपणे मढे घाटाचा ट्रेक सुरु केला.. आज पावसाने जरी उघडीप दिली असली तरी धुके काही हटायला तयार नव्हते त्यामुळे केळदहून दरीत कोसळणार्‍या धबधब्यांचे विहंगमय दृश्य बघायचे राहूनच गेले..

- -

ओंकारचा 'अमानवीय' कवायतप्रकार !

मढे घाटाची वाटही 'गोप्या' घाटासारखीच खडकाळ वाटेने दोन डोंगराच्या नाळेतून उतरणारी.. या वाटेने उतरायला घेतले नि ज्यु. चँपचे खरच कौतुक वाटून गेले.. पण त्याच्या चिमुकल्या पायांना ते खडक अगदीच मोठ्ठे पडत होते.. शेवटी त्याला उचलला नि पाठीवर घेतला.. आशुचँपने नव्हे तर वाटाडयाने.. जल्ला चँप काय काय म्हणून सांभाळणार होता.. Wink

ही वाट गोप्या घाटाच्या मानाने बर्‍यापैंकी शांत वाटली.. अगदी सुरवातीलाच उतरताना डावीकडे मढे घाटाची ओळख पटवून देणारा असा एक महाकाय जलप्रताप कोसळतो त्याचाच काय तो अगदी 'डॉल्बी साउंड' कानावर पडतो.. आज पाउसही नसल्यामुळे गोप्या घाटाची लज्जत या वाटेला आली नाही.. जेमतेस तीस मिनीटांची चढण उतरुन खाली पठारावर आलो.. सारे काही वेळेत होतेय असे वाटतानाच घडायचे ते घडले.. मागून येणार्‍यांची गप्पांच्या ओघात चुकामूक झाली नि जिथे कधीच चुकतील असे वाटले नसते नेमके तिथेच चुकले नि डावीकडे वळण्याऐवजी सरळ वाटेने गेले.. झाले आम्ही पुन्हा एकत्र येइपर्यंत आमचा तासभर वेळ वाया गेला.. त्यावेळेत गिरी, रो.मा व पवन्याने बाजुच्याच छोटया धबधब्यात डुंबून घेतले..

वर पाहीले तर मढेघाटाचा डोंगर ढगांच्या ग्रहणातून सुटला होता नि तेथील अगदी झोकात कोसळणारा धबधबा लक्ष वेधून घेउ लागला.. बाजूलाच उपांडया घाटेची डोंगररांग दिसून आली.. तर डावीकडे 'गाढवकडया'चा सह्याद्रीकडा अगदी मान उंचावून उभा होता..

- -

- -

- -

- - .

गाढवकडा

इथेच डुंबाडुंबी करत फोटोग्राफी उरकेपर्यंत चुकलेली मंडळी परतली नव्हती.. त्यांना परत आणण्यासाठी वाटाडयाही गेला होता.. शेवटी पुढे कर्णावाडीत जाउन थांबू म्हणत आम्ही निघणार तोच 'एओ' साद ऐकू आला.. ही मंडळी वाट चुकले खरे पण अगदी उंचावरुन पडणार्‍या एक सुंदर धबधब्याचे दुरदर्शन घेउन आले. त्यासाठी उलट सुलट तंगडतोड करावी लागली म्हणून त्रस्तही झाले.. पुन्हा एकदा खादाडी उरकून घेतली नि आम्ही कर्णवाडीच्या दिशेने कूच केले..

अखेरीस तो क्षण जवळ आला जिथे पुण्यातील भटके मायबोलीकर उपांडया घाटाने पुन्हा वरती केळदला चढून जाणार होते नि तिथूनच पुण्याला परतणार होते.. तर आम्ही मुंबईतले भटके मायबोलीकर पुढे रानवाडीच्या दिशेने निघणार होतो.. आतापर्यंत मनसोक्त गप्पा झाल्या होत्या नि पुन्हा भेटूच म्हणत एकत्रित आलेल्या तुकडयांची ताटातूट झाली..

आम्ही रानवाडीच्या दिशेने उतरायला घेतले.. रानवाडी फाटयावरुन शिवथरघळई गाठण्यासाठी पुन्हा ५-६ किमी अंतर चालावे लागणार होते.. पण मनोज व सेना पुढे जाउन गाडी घेउन येतो म्हणत वेगानेच खाली उतरले... तर बाकीचे थकलेभागलेले जीव अगदी निवांतपणे उतरत होते.. इथून मढेघाट तर उठून दिसत होताच पण आजुबाजूचा परिसरही तितकाच सुंदर भासत होता.. घाटरस्त्यांचा हा एकूण हिरवा प्रदेश म्हणजे धबधब्यांचे राज्य ! साहाजिकच इथेही धबधब्यांची तोरणं हरितडोंगरावर लागलेली.

मी एकटा या हिरव्या जगात.. !

- -

- -

हा देखावा म्हणजे अगदी शोकेसमधली वस्तू वाटत होती !

इथूनच दुरवरच्या प्रदेशात पडणारा पावसाचे दृश्य आवर्जून बघण्यासारखे..

रानवाडीत उतरल्यावर गर्दरानातून खळखळाट करत जाणारा ओढा पार करावा लागतो.. त्यासाठी बांधलेला एक लांबसडक अरुंद पुल, समोर एक उंचच उंच धबधबा नि सगळा भवताल हिरव्या जंगलानी व्यापलेला.. काय सुंदर जागा वाटत होती..

- -

तो ओढा ओलांडलो नि मागे पाहिले तर सुंदर दृश्य उमटले होते.. ढगांनी वातावरण काळवंडून गेले तरी धबधब्याचा तिहेरी पटटा मात्र हिरव्या डोंगरावर अगदी आभूषण वाटत होता.. आमच्याइथे मात्र मस्त ऊन पडले होते.. नि या घटनेस आम्ही उडी मारुन साक्ष दिली..

शिवथरघळईच्या रस्त्यावर रानवाडी फाटयाला आम्ही गाडी घेउन येणार्‍यामनोज व सेन्याची वाट पाहत बसलो.. काल दिवसभरात चिंब पाउस अनुभवला होता म्हणून आताचे उन अगदी नकोसे होउन बसले होते... घामाच्या धारा सुरुच होत्या.. मग अशातच गिरीला रस्त्याच्या कडेलाच अगदी चिमुकल्या झर्‍यावर अंघोळ करण्याची हुक्की आली.. !

त्याचे आटपेपर्यंत मनोज व सेना गाडी घेउन आले. पण त्यांच्याकडून कळले की 'शिवथरघळाला जत्रेचे स्वरुप आलेय.. गर्दी उसळली आहे.. दर्शन-जेवण होईस्तोवर अजुन दिड-दोन तीन तास मोडणार! ' तेव्हा इथूनच सर्वानुमते मुंबईला माघारी जाण्याचे ठरले.. विन्या त्याची गाडी व दिपक त्याची बाईक घेउन येइपर्यंत मग इतरांनी 'गिरी'चाच कित्ता गिरवला नि शंभो केले.. त्यातच पावसाची जोरात एक सर येउन गेली. अगदी यादगार ठरलेल्या ट्रेकमधली शेवटची चिंब करणारी सर !

मायबोली भटक्यांच्या सह्यमेळावाचे निमित्त म्हणून आज एक अविस्मरणीय ट्रेक घडून आला होता.. कितीतरी दिवसापासून एकाच ट्रेकमध्ये सगळ्यांना भेटायचे राहून गेले होते ते आज गळाभेटीने मन तृप्त झाले होते.. ह्या मेळाव्यात जवळपास सगळ्याच मायबोली भटक्यांची उपस्थिती असणे हा तर एक दुग्धशर्करायोग होता.... पुन्हा असा मायबोली भटक्यांचा सह्यमेळावा केव्हा होईल हे ठाउक नाही.. पण इंद्राने म्हटले ते अगदी खरे "या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात."


(वरील ग्रुप फोटो : इंद्रा व जिप्सीकडून साभार)

- - -
सह्यमेळाव्याचे आणखीन रंग-अनुभवः

भटक्यांचा सह्य मेळावा...
क्षणचित्रे - गोप्याघाट ते मढेघाट
भटक्यांचा सह्यमेळावा…कवितेच्या रुपात….
भटक्यांचा सह्यमेळावा — मढे घाट ते शिवथरघळ
=======================================================================
=======================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट यार... फोटो पण क्लासच!!!!

त्या दिवशी आपण काहि तरी तुफानी करुन गेलो... एक अविस्मरणिय ट्रेक्/सहमेळावा...

परत एकदा कल्ला करण्याची संधी लवकर येवो!!!! Happy

यो.. खरच तुझ्या लेखणीला तोड नाही... परत एकदा सगळ जिवंत केलंस. जी'यो' Happy

वर्षभर पुरतील असे अफलातून किस्से या भेटीत घडले आहेत... त्यांचा मी साक्षिदार झालो.. धन्य झालो... धन्य झालो.

अरे यो रात्री विन्याच्या अंगात आलेले पत्रकार श्री नि.वा. ना कस बर विसरलास ? आणि तुझे फेवरेट बोंबील Proud
मी गिरीभाऊ आणि माझ्यासाठी दोन टिशर्ट मागावलेत
त्यावर छापल असेल ' बॅलेंस फाईव पॅक्स कमिंग सुन ' Wink

भन्नाट यार... फोटो पण क्लासच!!!!

त्या दिवशी आपण काहि तरी तुफानी करुन गेलो... एक अविस्मरणिय ट्रेक्/सहमेळावा...

परत एकदा कल्ला करण्याची संधी लवकर येवो!!!!
>> दिपक + १०० Happy

आयला…. भन्नाट खतरनाक… जबरी… फोटो तर कमाल आणि वृत्तांत तर त्याहूनही सरस… गोप्या घाटात तुमच्याबरोबर नसूनही सगळा ट्रेक जिताजागता अनुभवला !!!

बादवे माझा आयडी बदलून संगणक करावा असा विचार करतोय Wink

जल्ला ते काष्टशिल्प आणि शिल्पकाराचा फोटो कोणी नाही काढला काय ? ...

मस्त मस्त मस्त .....

गिरी चा फोटो मंदाकिनीला लाजवणारा आहे ....

मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त!

सगळ्यात जास्त कौतुक दर्शनचं Happy

धन्यवाद Happy

त्या दिवशी आपण काहि तरी तुफानी करुन गेलो... एक अविस्मरणिय ट्रेक्/सहमेळावा...परत एकदा कल्ला करण्याची संधी लवकर येवो!!! >> दिपक +१

वर्षभर पुरतील असे अफलातून किस्से या भेटीत घडले आहेत... त्यांचा मी साक्षिदार झालो.. धन्य झालो. >> इंद्रा वर्षभर नाही पण पुर्ण पावसाळ्यात पुरतील असे म्हण.. आता कुठे आपला ट्रेकऋतू सुरु झालाय.. Wink

Pages