म्हणे राजकारण करू नका.

Submitted by मी-भास्कर on 18 July, 2013 - 04:55

म्हणे राजकारण करू नका.
निव्वळ बकवास!
"आम्ही या प्रश्नावर राजकारण करीत नाही तुम्ही पण राजकारण करू नका." असे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बजावत प्रछन्न राजकारण करीत असतात.
अरे तुम्ही राजकारण करण्यासाठीच राजनीतीमध्ये उतरलात ना? मग "ताकाला जाऊन भांडे का लपवता"? आणि राजकारण करणे हेच जर गैर असेल तर गेलात कशाला कडमडायला तिथे? महानंदासारख्या जुलमी राजाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी चाणक्याने जे राजकारण केले त्या राजनीतीने या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तसे राजकारण कराच.
सध्या जगाचे बाजूला ठेवू. जर राष्ट्राचे, राज्याचे, आपल्या भागाचे, आपल्या गावाचे, गावातील आपल्या भागाचे उल्लेख केलेल्या अग्रक्रमाने भले व्हावे यासाठी राजनीतीत आला असाल तर ठणकाऊन सांगाना, " हो. आम्ही राजकारण करणारच. तुमच्या भ्रष्टाचारी राजनीतीने जर वाटोळे होत असेल तर आम्ही काय स्वस्थ बसायचे? तुम्हाला एक तर योग्य वाटेने जायला भाग पाडण्यास आणि तसे होत नसेल तर सत्तेवरून खाली ओढण्यास आम्ही राजकारण करणारच!"
तसे पाहिले तर प्रत्येक जीवाची आपल्याच मताप्रमाणे सर्व काही व्हावे, आपल्याच इच्छांची पूर्ति व्हावी, आपली स्वप्ने साकार व्हावीत यासाठी चाललेली धडपड पूर्ण थांबवणे कोणाला तरी शक्य आहे का? या धडपडीत राजकारणाचे अनेक फंडे वापरले जातच असतात. " तो ना? महा राजकारणी आहे बरं!" असे म्हणून तो "उचापती" करून स्वार्थ साधणारा आहे हेच लोक सांगत असतात.
वैयक्तिक पातळीवर आपल्या मनातच आपल्यावरच परिणाम करणारा राजकारणाचा आखाडा चालू असतो. तेथे सकारात्मक/नकारात्मक , विवेकी/अविवेकी विचारांचा, आशा/निराशेच्या विचारांचा आखाडा चालू असतो. कधि सकारात्मक विचार बाजी मारतात तर कधी नकारात्मक! बरं हे सर्व आपल्याच मनात निर्माण होत असतात. हे त्यांच्यात चाललेलं राजकारणच कि! हे कसं थांबवणार? जोवर या विचारांचं योग्य संतुलन असतं तोवर याचे परिणामदेखील हितावहच असतात.
याचीच पुढच्या पायरीवरील राजकारण म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अधिक प्रभावी ठरण्यासाठी चाललेली धडपड. पती-पत्नी, सासू-सून, भाऊ-भाऊ यांच्यामध्ये अधिक प्रभावी ठरण्यासाठी चाललेली धडपड हे राजकारणच! जोवर ते उभयतांच्या उत्कर्षासाठी केले जाते तोवर ते सहकार्य ठरते नाहीतर ते वैमनस्य होते.
त्यानंतर कुटुंबात आपलेच सर्वांनी ऐकावे यासाठी प्रभाव टाकण्यासाठी केलेली खटपट हे राजकारणच!
यात विवेकाने सर्व झाले तर कुटुंबाचे कल्याण होते, नाहीतर वाटॊळे! पूर्वी कुटूंबातील सदस्यसंख्या मोठी असायची. तेथे कुटुंबप्रमुखावर छाप टाकण्यासाठी राजकारणच चालायचे.
त्यावरच्या पायरीवर कुटूंबांच्या समुहात चालणारे गावाचे राजकारण. ते सामंजस्याने झाले तर गावाची प्रगती करण्यास कारणीभूत होते नाहीतर विनाशास.
निव्वळ वैयक्तिक स्वार्थापोटी नसलेली राजनीती तर प्रत्येक ठिकाणी व्हायला हवी. पण राजनीतीमध्ये उतरलेल्यांनीच वैयक्तिक लाभापायी राजनीतीला घृणास्पद केल्यानेच त्यांना "आम्ही या प्रश्नावर राजकारण करीत नाही तुम्ही पण राजकारण करू नका." असे एकमेकांना बजावण्याची वेळ आली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली काय दोष होता ह्या मुलांचा ? कुणाच्या जीवाशी खेळता ह्याचा थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. छपरा लालूप्रसादांचा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि त्या ठिकाणी हा प्रकार घडतो , लालू तर ह्या भूमीला भार झाला आहे. त्याने जनावरांचा चारा खायचा सोडला नाही. म्हणूनच हे बिहारी नेते आता जनावरासारखे वागायला लागले. ज्या राज्यात सरकार ला आपल्या लहान मुलांची काळजी नाही,असे नालायक नेत्यांच मरण हे जनावर सारख झाल तरी ह्या निष्पाप मुलांच्या नातेवाईकांच समाधान होणार नाही. एवढ भयानक काम ह्या नालायक नेत्यांनी पैशा साठी केले आहे. मृत विद्यार्थ्याच्या आत्म्यास शांती लाभो हि तमाम भारतीय शाळेतील विद्यार्थ्या कडून ईश्वर चरणी प्रार्थना

आता कळले का बिहार ची लोकं का देशभर परराज्यात काम शोधत फिरतात..बिहार कमालीचा मागासलेला आहे आणि त्याला प्रथम कारणीभूत तो नालायक लालूप्रसाद आहे..नितीशकुमार पण त्याच मार्गावर चालेला दिसतोय..नितीश ने भा.ज.प. ला लक्ष्य करण्या पेक्षा त्याच्या राज्यातल्या भ्रष्टाचाराला आणि सरकारच्या गलथान कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे..ज्या राज्यात सरकार ला आपल्या लहान मुलांची काळजी नाही, जेवणात ह्यंची सरकारी लोकं कीटक नाशक घालतात, डझनाने मुलं मेली तरी सरकार ला त्यची खंत नाही, असे राज्य कसे काय पुढे जाणार..??
45 3

राज्यकारभारच जेंव्हा राजकारणाचंच एक अंग होवून बसतं - जें आतां सर्वत्र होतंय - तेंव्हां सगळा घोळ होतो. 'राजकारण करूं नका', याचा खरा अर्थ ज्या गोष्टी सर्वार्थाने 'राज्यकारभारा'च्या कक्षेत येतात त्यावरील निर्णय व कार्यवाही चांगल्या कारभाराचे निकष लावूनच व्हावे, असा असावा. राजकारण अपरिहार्य व स्वाभाविक असलं तरी त्याची परिणती शेवटीं चांगल्या राज्यकारभारात व्हावी, हेंच तर सर्वच शासनव्यवस्थांचं उद्दीष्ट असतं - मग ती राजेशाही असो, लोकशाही असो कीं हुकूमशाही. 'राज्यकारभार' राजकारणाची बटीक झाली कीं अनागोंदी आलीच समजा ! आणि, जिथें राजकारणाचं अधिष्ठानच स्वार्थ व भ्रष्टाचार आहे तिथं तर .... !!!

Omkar Deshmukh | 19 July, 2013 - 08:11
आता कळले का बिहार ची लोकं का देशभर परराज्यात काम शोधत फिरतात..बिहार कमालीचा मागासलेला आहे ...........
<<

खरंतर बिहार नैसर्गिक साधनसंपत्ती, जमीन, पाणी यांनी समृद्ध आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः' अशी परिस्थिती आहे. चारा खाणारे, 'कभि टोपी भी पहननी पडती है, कभी टीका भी लगाना पडता है ' असे म्हणणारे सत्तालोलुप ढोंगी सेक्युलर नेते लाभल्यावर बिहारची वाट लागली नाही तरच नवल!
[ आम्ही आमच्या लोकांना असेच मागास ठेवतो ] आम्हाला विशेष राज्याचा दर्जा द्या अशी मागणी करायलाही लाज न वाटणारे आपले विकासाचे मॉडेल कसे श्रेष्ठ आहे याचा गाजावाजा करताहेत.
या घटनेने तर त्यांचे पितळच उघडे पडले आहे. सर्व पक्षानी "आम्ही या प्रश्नावर राजकारण करीत नाही तुम्ही पण राजकारण करू नका." असे एकमेकांना बजावत जोरदार राजकारण सुरू केले आहे.

भाऊ नमसकर | 19 July, 2013 - 08:48
राज्यकारभारच जेंव्हा राजकारणाचंच एक अंग होवून बसतं - जें आतां सर्वत्र होतंय - तेंव्हां सगळा घोळ होतो.
>>
सहमत

राज्यकारभार म्हणजे काय याचे यत्किंचितहि जाणीव नसलेले लोक बसले आहेत राज्यकारभार करायला!
त्यांना फक्त गुंडगिरी, पैसा खाणे नि स्वतःची सत्ता टिकवणे एव्हढेच कळते.
जगातल्या बहुतेक सर्वच राजकारणी असेच असतात - कमी अधिक प्रमाणात. सत्तेवर जर चुकून चांगले लोक आले, तर कदाचित् काही चांगले होते. नाहीतर कुठल्याहि देशाचे वाटोळे व्हायला वेळ नाही.

झक्की | 26 July, 2013 - 17:58नवीन
सत्तेवर जर चुकून चांगले लोक आले, तर कदाचित् काही चांगले होते. नाहीतर कुठल्याहि देशाचे वाटोळे व्हायला वेळ नाही.
<<
बदल करण्याची संधी सातत्याने खर्‍या लोकशाहीत मिळत असते. ती संधी वापरणार्‍या जनतेच्या लायकीचे सरकार तिला मिळत राहते. आपण वाटोळ्याच्या दिशेने जातो आहोत कि प्रगतीच्या दिशेने हे फारच ढोबळ मानाने तिला कळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सत्तेवर आलेल्यांच्या गुणवत्तेवरच सर्व अवलंबून राहते हे मत रास्त आहे. प्रश्न आहे कि असे लोक नेमके तेथे नेऊन कसे बसवायचे!