न धावणारा मिल्खा सिंग (Bhaag Milkha Bhaag - Movie Review)

Submitted by रसप on 13 July, 2013 - 03:38

राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग ह्या तिघांसाठी हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे गेल्यावर दिसलं, मीच नाही शेकडो लोक आले होते, ह्याच तिघांसाठी. प्रवेशद्वाराबाहेर तोबा गर्दी होती. अशी गर्दी मी फक्त 'वाँटेड', 'एक था टायगर' ह्या सलमानपटांसाठी पाहिली होती. दरवाजा उघडण्यासाठी सगळेच आतुर होते. शर्यत सुरु होण्यापूर्वी 'गेट सेट गो' च्या वेळी सगळे स्पर्धक जसे असतात तसेच होते का? कदाचित ! कारण मी तर होतोच. दरवाजा उघडला. गर्दी इतकी होती की आम्ही - आई, बाबा, बायको, मी आणि मित्र विनायक - जागेवर पोहोचेपर्यंत नामावली सुरूही झाली.

वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग - द फ्लाईंग सिख - बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. ही एक मोठी बातमी असते. 'मिल्खा हरला.' अशी चित्रपटाची रोमांचक सुरुवात होते. किंचितशी 'चक दे' ची आठवण होते. पण किंचितशीच आणि थोडा वेळच. कारण ह्या रोमांचक व वेगवान सुरुवातीनंतर चित्रपट पुन्हा हा वेग पकडत नाही. आपण 'भाग मिल्खा भाग' बघत असतो, पण मिल्खा रमतगमत चालतो. मध्येच थोडासा धावतो, पण लगेच पुन्हा थांबतो. संपूर्ण पुढचा प्रवास असाच 'थांबा - पहा - पुढे जा' आहे.

'मिल्खा सिंग' भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आज क्रिकेटव्यक्तिरिक्त कुठल्याही क्षेत्रात भारताला अजिबात भाव मिळत नाही. पण एके काळचा हॉकीतला दादा भारत, त्याच काळात अभिमानाने एक खेलरत्न मिरवत होता. 'धावपटू मिल्खा सिंग'.

सध्याच्या पाकिस्तानातील मुलतान भागात मिल्खा सिंगचा जन्म होतो. फाळणीची भयंकर झळ लागलेल्या हजारो निरापराध कुटुंबांपैकी एक मिल्खाचं कुटुंब होतं. बालवयातच बेघर, अनाथ झालेला मिल्खा दिल्लीत आला. दिल्लीच्या गल्ल्यांत उलटसुलट धंदे करणारा मिल्खा सिंग एकेक पायरी चढत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू बनला. एक असामान्य प्रवास ! हाच प्रवास, त्यातील अनेक अडथळे, वळणे 'भाग मिल्खा भाग' मांडतो. अर्थातच ह्यात बऱ्यापैकी सूट घेऊन काही काल्पनिक भागही आहेच. ह्यातील काही काल्पनिक व सत्यकथन थरारक आहे, तर काही मनोरंजक. पण काही भाग दिग्दर्शकाला अपेक्षित थरार व मनोरंजन करण्यात कमी पडतो. काही भाग तर अगदीच अनावश्यक वाटतो. उदा. सोनम कपूरची व्यक्तिरेखा. कुठलाही आगा-पिछा न दाखवलेली ही व्यक्तिरेखा चित्रपटात येते आणि जाते. कहाणीत विशेष फरक पडत नाही. असे लहान-मोठे तुकडे मिल्खाला धावूच देत नाहीत. चित्रपटभर प्रेक्षक मिल्खाच्या वेगाची अपेक्षा करत राहातो. सव्वा तीन तास उलटून जातात, पण वेग सापडत नाही. सुरुवातीच्या दृश्यात मिल्खा हरतो आणि शेवटच्या दृश्यात चित्रपट. अगदीच शेवटचा वगैरे येत नाही, पण पदकही मिळत नाही व नैराश्य पदरी पडतं.

Bhaag-Milkha-Bhaag-Mp3-Songs-Free-Download-2013.jpg

मिल्खा सिंगना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. तरी त्यांची कामगिरी अद्वितीयच होती. ज्या परिस्थितीवर मात करून व जी मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकेतर स्पर्धांत भारताचं नाव केलं, ते निश्चितच 'क़ाबिल-ए-तारिफ़' होतंच. तद्वतच, चित्रपट चांगला असला तरी अपेक्षेइतका चांगला नसला तरी, 'मिल्खा' मन जिंकतो. फरहान अख्तरची मेहनत फक्त त्याच्या 'पॅक्स'वरूनच दिसत नाही. तर त्याची देहबोलीसुद्धा एखाद्या सैनिकाची व खेळाडूचीच वाटते. शर्यतींत धावणारा फरहान अख्तर खरोखर एखाद्या व्यावसायिक धावपटूसारखा, ते तंत्र समजून घेऊन, धावत असतो. त्याचं चालणं, बोलणं आणि आपल्या लक्ष्याला वाहून घेणं कधीच हे जाणवू देत नाही की हा 'फरहान अख्तर' आहे. आपण पूर्ण वेळ फक्त आणि फक्त 'मिल्खा'च पाहात असतो. तरुणपणी स्वतःच्या मूळ गावी आल्यावर हमसून हमसून रडणारा मिल्खा मात्र जरा कमी पडल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे. ती अभिनयाचा मनापासून प्रयत्न करते. पण ती 'मनापासून प्रयत्न करत आहे' हेच जाणवत राहतं.

दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला. मिल्खावर आईसारखी माया करणारी मोठी बहिण तिने अप्रतिम साकारली आहे. तिचं प्रत्येक दृश्य ती जिंकते. दिग्दर्शक दिव्या दत्ता पडद्यावर असताना इतर कुणाला मुद्दामच जास्त वाव देत नाही. कारण इथे कदाचित फरहानचा मिल्खा कमी पडलाच असता. त्यामुळे जिथे जिथे दिव्या दत्ता आहे, तिथे तिथे ते ते दृश्य तिच्यावरच जणू एकवटलं आहे.

पवन मल्होत्रा हाही एक अत्यंत गुणी कलाकार. त्यालाही इथे बराच वाव मिळाला आहे. त्याच्यातला सैनिक त्याने खूप भावनिक बनवला आहे मात्र. दिव्या दत्ता आणि पवन मल्होत्रा निम्म्याहून अधिक दृश्यात गहिवरतात व गहिवरवतात.

इतर भूमिकांतून दिलीप ताहिलने साकारलेले पं. नेहरू लक्षात राहतात. फार काही काम नाहीये. पण एकदम डिट्टो वाटतात !

शंकर-एहसान-लॉयला बऱ्याच दिवसांनी ऐकलं का ? बहुतेक हो. हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत. खासकरून 'घुलमिल घुलमिल' ऐकत असताना मनातल्या मनात आपण जरासं नाचूनही घेतो ! गाण्यांचे शब्द समजत नाहीत. पण आजकाल बहुतांश गाण्यांचं तसंच असतं !

राकेश मेहरा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी अशी काही नावं आहेत ज्यांचे चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे. ती कदाचित मी केली नव्हती म्हणून असेल पण मला असं वाटलं की इतपत कहाणी अडिच तासात सांगता येऊ शकली असती. फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं. पण ह्या सगळ्यावर चित्रपटाची लांबी व वेग मात करतात. चित्रपट अगदीच कंटाळवाणा नसला तरी कमी रंजक करतात.

संवाद लेखनाची बाजू ह्या चित्रपटात सगळ्यात कमकुवत असावी. हवा तर अशी होती की काही वादग्रस्त संवाद आहेत. पण एकही ओळ लक्षात राहात नाही. सपक संवादांमुळेही अपेक्षित नाट्यनिर्मिती काही ठिकाणी मार खाते.

एखादा अंतिम सामना, आपल्या आवडीच्या संघ जिंकतो. निकाल आपल्या पसंतीचा लागतो, पण सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो. अश्या सामन्याने जितका आनंद मिळतो; तितका आनंद 'भामिभा' देतो.

रेटिंग - * * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/bhaag-milkha-bhaag-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्लॅशबॅक्समधून कहाणी उलगडत जाण्याचं तंत्र, कॅमेऱ्याचे विशिष्ट कोण मेहरा सुंदर वापरतात. त्यांची मेहनत व त्यांचं 'व्हिजन' दिसून येतं.
हवन करेंगे, घुलमिल घुलमिल आणि रंगरेज ही गाणी छान आहेत.
चित्रपट तीन - साडेतीन तास चालतातच. जातानाच त्याची मानसिक तयारी करून जायला हवे.
सामन्यात रंजकता कमी असते. अगदीच एकतर्फी झाला असतो.
सोनम कपूर एका छोट्या व अनावश्यक भूमिकेत आहे.
दिव्या दत्ता ह्या गुणी अभिनेत्रीला अखेरीस बऱ्यापैकी वाव मिळाला आहे, ह्याचा मला खूप आनंद झाला

<<<<<<<<<<<<< ह्या सर्व वाक्यांसाठी + १००००

अजून एक ते "बेड्सीन " वगैरेही दाखवायची गरज नव्हती त्यामुळे मिल्खाच्या व्यक्तिमत्त्वाला जरा हिणकसपणा आलाय असे मला वाटत होते ते सीनही कट करून / जास्त साग्रसंगीत न खुलवता आले असते तरी लांबी कमी झाली असती व चित्रपट जरा सुखकर झाला असता

मलातरी सिनेमा अतिशय आवडला. फक्त मुलांना घेऊन बघण्यासारखा आहे के नाही हे मुलांच्या वयावर अवलंबून आहे. आमचा मुलगा फाळणीच्या संदर्भाने येणार्‍या प्रसंगांनी जरा घाबरला आणि मोठ्या माणसांच्या प्रसंगांमुळे वैतागला. Wink बाकी आपण नावे ठेवण्यास जागा नाही असे वाटले. फरहानची मेहनत (आणि दिग्दर्शकाचीही) प्रत्येक प्रसंगात दिसत होती.

त्याचं गुडघ्यावर बसून रडणं जवळजवळ अर्धा मिनिट तरी कॅमेरा स्थिर ठेवून दाखवलं आहे>>> हा चित्रपट राकेश मेहरा यांचा आहे.. हे विसरु नका रसप....

असाच काहीसा शॉट रंग दे बसंती मधे सुध्दा आहे...... बहुतेक अश्या प्रसंगाच्या वेळेत वाढ केल्यामागचे कारण बहुदा त्या प्रसंगाचे गांभिर्य आणि त्यातला "डीप इफेक्ट" .. असे लांब प्रसंगाच्या वेळी अभिनेत्याबरोबर प्रेक्षकांची चलबिचला किती होते हे महत्वाचे असते.......कधी कधी असे प्रयोग फसतात सुध्दा ...

रेनकोट .. मधे असे सायलेंस शॉट आहेत...

मी काल पाहिला. फार छान सिनेमा आहे!
फरहान अख्तर तर लाजवाब! फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ह्या दोन कारणांसाठी मी बघायला गेले. प्रचंड मेहनत घेतली असणार दोघांनीही. फाळणीची दृश्य उत्तम चित्रित केली आहेत.
मला रंग दे बसंतीची आठवण होत होती. दोन्ही सिनेमांमधे फ्लॅशबॅक तंत्राचा वापर मस्त केलाय. काही डायलॉग आहेत जे प्रसंग अजुनच फुलवतात. काही दृश्य पाहताना पानसिंग तोमरचीही आठवण झाली.

दिव्या दत्ता खरी हिरोईन म्हणता येईल. बहिणीचा रोल काय सुंदर केलाय! आणि लहानपणीचा मिल्खा साकारणारा बालकलाकार कोण आहे? त्याचेही काम आवडले.

थोडा संथ वाटू शकतो पण त्यामुळे सगळ्या गोष्टी नीट कळतात असे मला वाटते. काही चांगले चित्रपट २ तासात संपतात तेव्हा फार लक्ष देऊन बघावे लागते आणि सगळ्या लिंक्स लक्षात ठेवाव्या लागतात.
पानसिंग तोमरमधे इरफानला आणि भाग मिल्खा भागमधे फरहान अख्तरला जीव तोडून पळताना पाहून आपल्या समोर खरचं ती रेस चालू आहे असे वाटते आणि एक्साईट्मेंट वाटते.

शिवाय चेन्नई एक्सप्रेस, बजाते रहो, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई आणि मद्रास कॅफेचे प्रोमोज् पाहिले. Happy

स्पॉयलर अलर्ट
काही अंशी रसप यांचे म्हणणे पटते...
चित्रपट नक्कीच काही ठिकाणी जाम म्हणजे जाम रेंगाळतो...
पण घरासमोर येऊन रडतो त्या ठिकाणी तो प्रसंग आवश्यकच होते...वर्षानुवर्षे साचलेले दुख निचरा होण्यासाठी त्याचा तितका वेळ घालवला नाही तर फक्त अश्रू ढाळून गेला हे पटले नसते...त्याठीकाणी रडणारा हा धावपटू मिल्खा नसतो तर वडीलांना डोळ्यासमोर मारले गेलेले पाहणारा मिल्खा असतो आणि त्याचा आकांत खरा वाटतो...
पण नंतरचा त्याचा मित्राबरोबरचा प्रसंग फारच अनावश्यक...आधीच्या रडण्याचा सगळा इपॅक्ट त्या सीनने घालवला....मला तर वाटले त्याची बायको म्हणून सोनम कपूरच येते का काय....तसे झाले असते तर चित्रपट तिथेच सोडून मी घरी निघून आलो असतो.

अजून एक म्हणजे...फरहानने जसा एकदम सिक्स पॅक अॅब्स वाला, पिळदार, देखणा, ज्याच्या रुपावर भाळून एका पाठोपाठ एक तरुणी त्याला येऊन बिलगू पाहतात हे जरा अतिशयोक्ती वाटले...मिल्खा सिंग अजूनही हयात आहेत आणि त्यांचे आधीचे फोटो पाहिले तरी ते असे रोमन गॉड सारखे दिसणारे नक्कीच वाटत नाहीत.

गाण्यांचा भडीमार पण कधी कधी नकोसा वाटतो...

पंडीत नेहरु आणि विमानाचा पायलट यांची पात्रनिवड अत्यंत चुकीची आणि संतापजनक...

सगळ्यात आवडला तो लहानपणचा मिल्खासिंग....काय अभिनय केलाय त्या पोराने...अक्षरश सगळा सिनेमा पाहून झाल्यावर लहानपणचाच, दंगलीत अनाथ झालेला, रिफ्युजी कँपमध्ये खाणे मिळवण्यासाठी धडपडणारा प्रसंग जगलाय तो पोरगा.....हॅट्स ऑफ...
फरहान अख्तरबरोबरच त्या पोराने सिनेमा उचललाय...अन्यथा अवघड होते.

रसप, छान लिहिलय. तुमची परिक्षणं मला आवडतात (वादग्रस्त असली किंवा नसली तरिही) Happy

चित्रपटाचा वेग कुणाला खटकू शकतो, तर कुणाला आवश्यक वाटू शकतो. हा नुसता 'धावपट' होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. इथं 'मिल्खा' हे व्यक्तिचित्र उभं केलं आहे. त्याच्या आयुष्यात बर्‍या-वाईट, सामान्य-अतिसामान्य-असामान्य अशा घटना घडल्या आहेत. बॉलिवुडी स्पीड, स्टाईल आणि मेलोड्रामा घुसडला असता तर 'मिल्खा' या व्यक्तीला, त्याच्या व्यक्तिचित्राला न्याय मिळाला असता का.. असं वाटून गेलं.>>>>> +११११११११११११११११११११११

खुपच छान आहे चित्रपट...... must watch आहे...

पंडीत नेहरु आणि विमानाचा पायलट यांची पात्रनिवड अत्यंत चुकीची आणि संतापजनक...

<<< +१/ दलिप ताहिलमधे नेहरूंचा रूबाब, स्टाईल आणि बॉडी लँग्वेज काहीही नाही.

रसप यांचा चांगल्या सिनेमाचा अजून एक निगेटीव्ह रीव्ह्यु!!! चित्रपट परीक्षण लिहत असताना "आपण दिग्दर्शक नाही, प्रेक्षक आहोत." हे कायम ध्यानात ठेवा. यंव करायला हवे होते नी त्यंव करायला हवे होते असे म्हणणे अगदीच बालिशपणाचे आहे.

Wink
ऑम्लेटबद्दल बोलताना, आपल्याला अंडी घालता येत नाहीत हे कायम लक्षात ठेवावे.
(पिक्चर नामक प्रकाराशी दूरान्वयानेही संबंध नसलेला) इब्लिस.

रसप यांचा चांगल्या सिनेमाचा अजून एक निगेटीव्ह रीव्ह्यु!!! >>> +१

माझ्या मते या चित्रपटाला बॉलिवूडचा 'टिपीकल मसाला' नाही बनवला, हे महत्त्वाच. Happy

ऑम्लेटबद्दल बोलताना, आपल्याला अंडी घालता येत नाहीत हे कायम लक्षात ठेवावे.
(पिक्चर नामक प्रकाराशी दूरान्वयानेही संबंध नसलेला) इब्लिस.>>

तरी पुढच्या वेळेस जोर काढून बघीन ! Sad

योगराज सिंग यांचे नाव अजूनपर्यंत आले नाही?
इंडियन एक्स्प्रेसच्या शुभ्रा शर्मा फरहानच्या अभिनयाबद्दल म्हणतात : Farhan Akhtar is consistently likeable but not always believable as the eponymous hero. He does everything he needs to. You can see Akhtar’s hard work, both on his physique, and the way he runs on the track and field and everywhere else, as well as his accent. But the moment you place him alongside a Pawan Malhotra, who plays his Army coach, and who speaks Punjabi just the way it ought to be spoken, guttural, from the heart, that you know that difference between acting a part and the real deal.

भरत शेवटच वाक्य नीटसं कळलं नाही. मराठीत अनुवाद करता का जरासा. म्हणजे स्तुती पवन मल्होत्राची आहे की फरहानची

रसप योग्य परिक्षण चित्रपट थोडा कमी लांबीचा हवा होता. येथे लोक रसप यांच्या मागे हात धुवून लागतात. चित्रपटापेक्षा त्यांच्या परिक्षणाचीच जास्त चिरफाड करतात. असो पण रसप या टिकेला भीक न घालता परिक्षण लिहितात ते आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना आवाडते. लगे रहो रसपः-)

नंदिनी, तुमचा रसप विषयी काही वैयक्तिक आकस आहे का? मागे त्या धनुष च्या चित्रपटाच्या रिव्ह्यू ला देखिल तुम्ही बरीच नावं ठेवली होती.

ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू तुम्ही चांगला लिहिलाय, तुम्हाला आवडलेला सिनेमा आहे हे तुमचं मत कळतं त्यातून. चांगलय. त्याच न्यायाने, रसपने हा रिव्ह्यू लिहून स्वतःचं मत नोंदवलय. ते देखिल तितकच योग्य आहे.

मी वैयक्तिक पातळीवर तुम्हा दोघांनाही ओळखत नाही, त्यामुळे कृपया ही तुमच्यावर टीका आणि रसप ह्यांची भलावण आहे असा अर्थ काढू नका. मला तुमच्या दोघांचही लिखाण आवडतं आणि ही एक सहज जाणवलेली बाब म्हणून नोंदवली. तसं काही नसल्यास जाऊ द्या, सोडून द्या.

ऑम्लेटबद्दल बोलताना, आपल्याला अंडी घालता येत नाहीत हे कायम लक्षात ठेवावे.
Rofl

तरी पुढच्या वेळेस जोर काढून बघीन ! अरेरे
Rofl Rofl

मला आवडला. फरहान अख्तरचं काम छान झालं आहे. राकेश मेहराचे सिनेमे आवडतात त्यामुळे हाही आवडेल असं वाटत होतंच.

नंदिनी, तुमचा रसप विषयी काही वैयक्तिक आकस आहे का? मागे त्या धनुष च्या चित्रपटाच्या रिव्ह्यू ला देखिल तुम्ही बरीच नावं ठेवली होती.

<< नाही, कसलाही वैयक्तिक आकस नाही पण मुद्दामून खुसपटं काढायची म्हणून कुणी निगेटीव्ह लिहत काहीही विधाने करत असेल तर ते परीक्षण हास्यास्पद होत जातं. हे याआधीच एकदा रसप यांना मी सांगितलेलं आहे. तिथे त्यांनी "नॅशनल अ‍ॅवॉर्ड काय कुणाला पण मिळतं. देव डीला पण मिळालं" वगैरे विधाने केली होती. नंतर अमित त्रिवेदी महान आहे असं पण लिहिलं. (देवडीचे संगीत अमित त्रिवेदीचे होते) शिवाय धनुषच्या अभिनयापेक्षा तो रजनीकांतचा जावई आहे म्हणून त्याला हा सिनेमा मिळाला अशी बायस्ड विधाने देखील त्यांनी केली होती. रसप यांनी धनुष यांच्या २५-२६ चित्रपटांपैकी एकही चित्रपट न पाहता केलेली ही विधाने वाचून हसू तर आलंच होतं... असो.

इथेदेखील विनाकारण हा सीन पाच दहा सेकंदच दाखवायला हवा होता, अमुक करायला हवे होते अशी विधाने आहेत. आपण प्रेक्षक आहोत, दिग्दर्शक नव्हे. दिग्दर्शकाने जी कलाकृती आपल्यासमोर ठेवली त्याचे आपण परीक्षण लिहत आहोत, त्याने काय करायला हवे होते हे सांगणे हे आपले काम नव्हे. रसप "चित्रपट कसा वाटला?" हे लिहत नाहीत. चित्रपट परीक्षण लिहितात. चित्रपटांना स्टार रेटिंग देतात, असे असताना त्यांच्याकडून थोड्यातरी समजूतदार आणि प्रगल्भ लेखनाची अपेक्षा ठेवणे चूक आहे का? अतिशच्य धादांत चुकेची आणि बायस्ड विधाने लिहिल्याने आपलेच हसे होत जाते.

नंदिनी आकसाने लिहितात की बायस्ड लिहितात की प्रामाणिक, ते असो. मी त्यांच्याही मताचा आदर करतोच. आणि मला प्रोत्साहन देणार्‍या सर्व वाचकांचाही.
बाकी एक प्रेक्षक म्हणून चित्रपटाचं परीक्षण लिहिताना मला कुणालाही ठोकताना काहीही कमीपणा वाटत नाही, वाटणारही नाही... कुणी काहीही बोलो. मी विचार करत नाही की तो धनुष आहे की बाण... रजनीकांत की राजपाल किंवा त्याला किती व कुठले पुरस्कार मिळालेत..

बादवे, कालच कळलं की रफीला केवळ एकच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता... तोही 'क्या हुआ तेरा वादा...' साठी ! रफीने ह्याहून शेकडो अप्रतिम गाणी गायली असतील!! ऑन द अदर हॅण्ड, येसुदासला सात का आठ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय ! Uhoh

पण असो !!

Happy

रसप "चित्रपट कसा वाटला?" हे लिहत नाहीत. चित्रपट परीक्षण लिहितात. >> अनुमोदन.
'चित्रपट' ग्रुपात स्वतंत्र धागा काढून, शीर्षकातून आणि शब्दखुणांमध्ये Review असा शब्द लिहून केलेले हे लिखाण आहे, त्यामुळे जरा जबाबदारीने लिहिले जावे, अशी अपेक्षा असते इतकेच. बाकी वेगळी मते असायला हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही कुठे.

रैना, अनुमोदन. Happy

बाकी एक प्रेक्षक म्हणून चित्रपटाचं परीक्षण लिहिताना मला कुणालाही ठोकताना काहीही कमीपणा वाटत नाही, वाटणारही नाही... कुणी काहीही बोलो>>> एक्झॅक्टली, तुम्ही ठोकण्यासाठीच लिहिल्यासारखे लिहत असता. माझा आक्षेप यावर आहे. वाईट सिनेमाला वाईट म्हणा- ते कुणीही म्हणेलच. पण चांगल्याला चांगलेदेखील मुक्तपणे म्हणा ही अपेक्षा. मायबोलीवर अचाट आणि अतर्क्य सिनेमा असा एक विभाग आहे, तिथे लिहिलेली परीक्षणे तुम्ही वाचलीत का? त्या सिनेमांची तिथे प्रचंड खिल्ली उडवलेली असते, पण कुणाबद्दलही वैयक्तिक टिप्पणी न करता. तो भाग तर जुन्या सिनेमांबद्द्लचा आहे, आपण इथे अजून चित्रपटगृहामधे लागलेल्या सिनेमांबद्दल बोलतोय.

तुम्ही जर "चित्रपट आस्वाद" अथवा कसा वाटला असे लिहत असता तर प्रश्नच नव्हता, पण तुम्ही त्य्का "रीव्ह्युचे" लेबल देत आहात, स्टार रेटिंग देत आहात, मात्र हे करताना त्या कामच्या जबाबदारीचे भान तुम्ही बाळगत नाही. लिहिताना तुम्ही समीक्षकी शब्द वापरता, पण त्याचा अर्थ जाणून घेत नाही. एक परीक्षक म्हणून आपल्याला सर्वसाधारण प्रेक्षकापेक्षा सिनेमा जितका समजलाय तो इतर प्रेक्षकांना दाखवून देणे हेच तर परीक्षकाचे काम. त्यासाठी दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे ते कसलाही पूर्वग्रह न ठेवता समजून घ्यायला पाहिजे. सिनेमाची भाषा आणि व्याकरण या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. सिनेमाच्या तांत्रिक आणि कलात्मक बाजू समजून घ्यायला हव्यात. समीक्षक हा जाणकार असतो आणि त्याच्यावर सर्वसमान्य प्रेक्षकांची अभिरूची उंचावण्याची अघोषित जबाबदारी असते. चित्रपटविषयक माध्यम साक्षरता ही प्रेक्षकापेक्षा समीक्षकाकडे जास्त असायला हवी. "मला आवडले नाही, म्हणून ते वाईट आहे" हा पवित्रा समीक्षकाला घेता येत नाही. वैय्क्तिक आवडीनिवडीच्या पलिकडे जाऊन ती कलाकृती समजून घेण्याचा, त्यातल्या अधिक बाजू खुलवण्याचा आणि उणीवा दाखवून देण्याचा समीक्षकाचा प्रयत्न असला पाहिजे.

तुमच्याबद्दल वैयक्तिक आकस ठेवून लिहत नाही, पण तुम्ही मी जे सांगते आहे ते कधी समजून घ्यायचादेखील प्रयत्न करत नाही ना. प्रॉब्लेम तिथे आहे.

कुणाला इच्छा असल्यास मॅजेस्टिक प्रकाशनचे पत्रकारिता विद्या हे पुस्तक आणि रमा गोळवलकर यांनी लिहिलेले जनसंवाद सिद्धांत आणि व्यवहार ही दोन पुस्तके अवश्य वाचा. यामधे चित्रपट समीक्षण यावर अगदी बेसिक माहिती दिलेली आहे.

मिल्खा (चित्रपट) धावो वा न धावो, ईथले वाचून धाप लागली मात्र..

बाकी, चित्रपटात मिल्खा एखाद्या जागी, स्थळी, वेळी अंमळ जास्तच वेळ 'बसला', तर फार गहजब व्हायचे कारण नसावे Happy

'पान सिंग तोमर' बघितला तोही अध्ये मध्ये बराच रटाळ वाटला- पण त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले बहुदा? नेहेमीच्या बॉलीवूड मसाल्यापेक्षा काहितरी वेगळे बघायला मिळाल्याचा आनंद जास्ती होता. मिल्खा चे तसेच असावे असे वाटते.

मला फरहान ची संवादखेच अजीबात आवडत नाही, त्यामूळे शक्यतो फक्त त्याची भूमिका असलेले चित्रपट बघणे मी टाळतो.

बादवे, कालच कळलं की रफीला केवळ एकच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता... तोही 'क्या हुआ तेरा वादा...' साठी ! रफीने ह्याहून शेकडो अप्रतिम गाणी गायली असतील!! ऑन द अदर हॅण्ड, येसुदासला सात का आठ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय ! <<<

रफीला (पात्रता असूनही) एकच का मिळाला, याचा शोध घ्या. तेच गाणं का, याचा पण शोध घ्या. येसुदासला एवढे पुरस्कार मिळाले ते चुकीचे आहे, असे म्हणू नका.

नंदिनीजी,

मी ठोकण्यासाठीच लिहितो, चांगल्याला चांगलं म्हणतच नाही, जबाबदारी(?)चे भान बाळगत नाही, कोण काय सांगतं त्याकडे लक्ष देत नाही... वगैरे विधानं तुमच्या वरील प्रतिसादात आहेत. ह्या वाक्यांवरून असं वाटतंय की तुम्ही माझ्याविषयी एक मत बनवून घेतले आहे.

'मी असा नाही, तसा आहे' वगैरे टाईप युक्तिवाद मला जाम केविलवाणे वाटतात. यास्तव जिथे संवाद अश्या वळणावर येतो, तिथून मी तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाही.

तुमच्या मतांचा आदर आहे, सर्वांच्याच मतांचा आदर आहे व राहील.

धन्यवाद.

Pages