द व्हाईट टायगर आणि बुकर !!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
1’

एखादे पुस्तक, जे एरवी विकत घेतले नसते, ते त्याला पुरस्कार मिळाल्यावर आवर्जुन घेणारे काही लोक असतात. आणि मग ते वाचणारेही काही असतात. असा सध्या 'द व्हाईट टायगर' चा खप वाढला आहे, आणि मीही त्याला एकाने हातभार लावला आहे.

खरे खोटे माहिती नाही, पण मागे मी असे वाचले होते की अरुंधती रॉयच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' च्या विमानतळावर विकायला ठेवलेल्या शंभर प्रतींच्या साधारण शेवटच्या पानांमध्ये कुठेतरी तीनशे रुपयाचा चेक ठेवला होते. हेतू असा की किती जण तिथपर्यंत पोहोचतात ते कळावे, प्रती तर सगळ्या खपल्या पण वर्षभरात फक्त दोन चेक एन्कॅश झालेले आढळले.

यात वाचकांचाही फार दोष नसावा असे वाटते, पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे छानच असेल या उत्सुकतेने वाचक घेतात आणि पहिल्या पन्नास पानातच क्लिष्ट भाषा अथवा आशयाने संयम संपतो. मान बुकरसारखा पुरस्कार देतांना तर त्यांच्या इतर लिखित नियमांबरोबर क्लिष्टतेब्द्दलही काही अलिखित नियम असावा की काय असे गेली काही पुरस्कारप्राप्त पुस्तके वाचून वाटले होते.

आपण फक्त भारतीय वंशाच्या विजेत्यांच्या लेखनाचा विचार केला तरी व्ही एस नायपॉलचे 'इन अ फ्री स्टेट', नंतर सलमान रश्दीचे 'मिडनाईट्स चिल्ड्रन', अरुंधती रॉयचे 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज', किरण देसाईचे 'द इनहेरिटन्स ऑफ लॉस' या सगळ्यांनीच मनाची पकड घेईपर्यंत जवळ जवळ अर्धे पुस्तक संपून गेले होते. अर्थात क्लास आणि मास याचा हा वाद न संपणारा आहे.

पण अरविंद अडिगाचे या वर्षीचा बुकर मिळालेले 'द व्हाईट टायगर' मात्र अपवाद आहे, अगदी पहिल्या पानापासून वाचकांना पुढे वाचण्यास प्रवॄत्त करणारी शैली आहे. उकृष्ट साहित्यिक वगैरे म्हणता येणार नाही अशी थोडी 'टपोरी' शैली असली तरी मी एका बैठकीत वाचलेले पहिलेच बुकरप्राप्त पुस्तक म्हणून याची इतिहासात नोंद व्हायला हरकत नाही Happy

एका तळागाळातून आलेल्या मनुष्याची, त्याच्या विशेष काही न घडणार्‍या, विशेष किंमत नसलेल्या आयुष्याची, एका गुन्ह्याची अशी ही कहाणी आहे. मूळ कथेत फार काही नवे वा विशेष नाही पण ती उपरोधिक विनोदी शैलीत हाताळली आहे. भारतातले दारिद्र्य, विषमता, जातीव्यवस्था, माणासांना माणसांसारखे न वागवणे याबद्दलच्या आपल्या संवेदना बहुधा केंव्हाच मरून गेल्या आहेत, पण बाहेर अजूनही त्याचे नावीन्य आणि सेलेबिलिटी आहे असे दिसते. आणि तेच अधिक बटबटित स्वरूपात विकण्याचा या लेखकाचा प्रयत्न आहे.

काही वर्षांपुर्वी भारतीय सुंदर्‍यांना एकदम चांगले आंतरराष्ट्रीय दिवस आले होते, आता लेखकांची पाळी....

विषय: 
प्रकार: 

अरे वा. व्हाईट टायगर वाचायलाच पाहिजे मग. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' मला आवडली होती. फक्त एव्हढ्या मोठ्या सन्मानास पात्र नाही वाटली. अर्थात विक्रम सेठ, शोभा डे ह्यांच्या कादंबर्‍यांपेक्षा नक्कीच सरस होती ती..

थीम बघून मी वाचायला घेतले होते खरे पण सुरूवातीलाच उगाच काहि विचित्र उल्लेख (a**** of thirty three crore gods etc ) बघून ठेवून दिले. एरवी माहित नाही पण तेंव्हा तरी मला ते खटकले. उगाच घुसडल्यासारखे असे उल्लेख बघून पुढे वाचावेसे नाही वाटले. भारतातले दारिद्र्य, विषमता, जातीव्यवस्था, माणासांना माणसांसारखे न वागवणे ह्यांची सेलेबिलिटी वापरणारे पुस्तक नाहि वाचावेसे वाटले.
*No offense meant to Gs1, just personal decision*

GS आणि आसामि ह्या दोघांनी लिहिलेले वाचून आता उत्सुकता चाळवली आहे. बघूयात हे पुस्तक (माझ्यातर्फे) कुठल्या बाफवर वर्णी लावते Wink

असामी, अरे मी तुझ्या भावनेशी सहमत आहे. परदेशी प्रशंसा आणि पुरस्कार मिळवण्यासाठी भारतातले दारिद्र्य आणि जातीव्यवस्था 'सेल' करावे लागते हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न होता.

सिंडरेला, पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही, पण विकत घेउ नका असा माझा अभिप्राय आहे Happy

मी विकत घीणार नाहीच... कधी वाचायला देतोस ते सांग... Happy

मिडनाईट बाळे मी खूप सहनशीलता ठेवून वाचण्याचा प्रयत्न केला पण अर्ध्याच्यावर नाहीच जाऊ शकलो. त्यमानाने व्ही एस नायपईतचे अमंग द बिलिव्हर्स खूप आवडले मला..
;_________________________
-Impossible is often untried.

मी सुधा पुस्तक विकत घेतले आणि वाचले. पुस्तक छान आहे पण बक्शिस मिलवन्यासाठी लिहलाय अस वाटत राहात. सत्याच्या विपर्यास करन्यात आलाय. बाहेर्च्या लोकान्ना गरिब भारत वगैएरे आवाडतो म्हनुन तश्या प्रकारे लिहन्यात आलय. अजुन एक अपेक्शाभन्ग. बाकि पुस्तक गोश्ट म्हनून ठिक आहे.

मिडनाईट बाळे मी खूप सहनशीलता ठेवून वाचण्याचा प्रयत्न केला पण अर्ध्याच्यावर नाहीच जाऊ शकलो. त्यमानाने व्ही एस नायपईतचे अमंग द बिलिव्हर्स खूप आवडले मला..
>>>>
गिरी, अरे कुठे नायपॉल आणि कुठे रश्दी Happy थोडे विषयांतर पण, मला नायपॉलच्या फिक्शनपेक्षा नॉन-फिक्शनच जास्त आवडते.. त्याचे फिक्शन 'ए हाउस फॉर मिस्टर बिस्वास' आणि 'मिग्वेल स्ट्रीट' ह्या दोन मध्येच आहे.. बाकी सगळी पुस्तके ह्यांची ऑफशूट वाटतात.. (ते आफ्रिकेत नवीन व्यापार सुरु करणार्‍या नायकाचे पुस्तक सोडून)

काही वर्षांपुर्वी भारतीय सुंदर्‍यांना एकदम चांगले आंतरराष्ट्रीय दिवस आले होते, आता लेखकांची पाळी....
>>
अगदी अगदी जीएस.. तसेही बूकरच्या विजेत्यांबद्दल नेहेमीच एक वाद असतो..

इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक/लेखिका दोन प्रकारच्या आहेत - एक तर भारतातलं दारिद्र्य, जातियता, रुढी, अंधश्रध्दा याचं भडक वर्णन करुन भारत म्हणजे 'साप गळ्यात घालुन फिरणार्‍यांचा देश' असं चित्र उभे करणारे लेखक तर एकीकडे विक्रम सेठ, शोभा डे याच्यासारखे कोणतंही सशक्त कथाबीज नसताना समारंभांची, लग्नबाह्य चविष्ट संबंधाची वर्णनं करुन एका विशिष्ट वाचकवर्गाला आपलंसं करणारे. मालगुडी डेज सारखं एखादंच पुस्तक याला अपवाद..

सहमत आहे सरिता आणि टण्या.
मी पहिले पोस्ट घाईघाईत लिहिल्याने ते पुरेसे स्पष्ट न लिहिता बरेच संक्षिप्त लिहिले गेले आहे असे नंतर मलाच वाटले. हे सर्व मुद्दे मला घ्यायचे होते त्या पोस्ट्मध्ये..

गिरी, आधीची सर्व परत दिलीस की मग मिळेल हे Happy

मी विकत घीणार नाहीच... कधी वाचायला देतोस ते सांग...

वा वा... ह्याला म्हणतात खरा वाचक....

मी इंग्रजीत लिहिणा-या भारतीय लेखकांची पुस्तके खुपच कमी वाचलीत. पण जे काही वाचले ते फारसे इंटरेस्टींग वाटले नाही.... Sad बहुतेक सगळीच सरिविनाने लिहिल्याप्रमाणे दोघांपैकी कुठल्यातरी एका गटात मोडतात.. Sad

खरंच, असं का? ह्या विचारात पडले आहे मी - बहुतेक भारतीय भाषांमध्ये सशक्त लेखन नेहेमीच होत आले आहे - बदलत्या काळातही. मग इंग्रजीचा एवढा उदोउदो होत असतानाही इंग्रजीत भारतीय चांगल्या कथा, कादंबर्‍या का लिहित नाहीत? एक कारण असं असु शकतं का की आपल्या मातृभाषेत माणुस जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो म्हणुन तो साहित्यनिर्मितीसाठी मातृभाषेची निवड करतो. जर तसं असेल तर सगळ्या भारतीय भाषांना नामशेष होण्याची चिंता नसावी कारण साहित्यनिर्मितीसाठी तरी त्या जगतीलच.. तुम्हा सगळ्याना काय वाटते.

मग इंग्रजीचा एवढा उदोउदो होत असतानाही इंग्रजीत भारतीय चांगल्या कथा, कादंबर्‍या का लिहित नाहीत?

मलाही हा प्रश्न नेहमीच पडतो.. इंग्रजीत लिहिणारे नेहमीच एवढे उथळ का लिहितात देव जाणे... पण त्यांचे मार्केटींग मात्र भरपुर असते. त्यामानाने इतर भाषांत चांगले लिहिणारे असल्या गजबजाटापासुन दुर असतात.

जर तसं असेल तर सगळ्या भारतीय भाषांना नामशेष होण्याची चिंता नसावी कारण साहित्यनिर्मितीसाठी तरी त्या जगतीलच..

हे खरेच असुदे देवा.. म्हणजे मराठी जगेल तरी, सगळे घरी दारी ईंग्रजी बोलतील, पण वाचतील मात्र मराठीच.

साधना

सरिविना, टिकास्वयंवर ह्या टिकासंग्रहामध्ये भालचंद्र नेमाडे ह्यांनी इंग्रजी मधून लिहिणारे भारतीय लेखक आणि त्या लिखाणाच्या मर्यादा ह्यावर एक सुंदर लेख लिहिलेला आहे. हा लेख बहुतेक ६०च्या दशकातला आहे. तेव्हा आजच्या एव्हडे भारतीय इंग्रजी लेखक नव्हते पण तो लेख आजही लागू पडेल.

साधना, वाचतील मात्र मराठी - हे मात्र तितकेसे खरे नाही हं. आपल्या पिढीपर्यंत शिक्षणाचं माध्यम कोणतंही असलं तरी मराठी लिहा-वाचायला शिकवलं जायचं, वाचन अधिकतः मराठीत व्हायचं मात्र आता जवळजवळ ८०% मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात आणि घरी आई-वडलांशी इंग्रजाळलेल्या मराठीत बोलतात. बाहेर तर मराठी बोलायची त्याना लाज वाटतेच. ते मराठी पुस्तकं हातात घेतील, वाचतील, चर्चा करतील हा आशावाद फोल आहे गं. १०-१२ वर्षाच्या मला भेटलेल्या बहुतेक मुला-मुलींनी मराठी वाचता येत नाही किंवा फक्त पेपरमधल्या हेडलाइन्स वाचता येतात असंच सांगितलं.

मी विकत घीणार नाहीच... कधी वाचायला देतोस ते सांग >>> तुझं नाव सिंड्रेला आहे का ?

आधीची सर्व परत दिलीस की मग मिळेल हे >>> Rofl त्यातलेच एक त्याने मला इशानच्या बारशात आहेर म्हणून दिले वाट्टे Wink

गोविंद, अगदी खरे. भारतातील दारिद्र्य आणि जातीयता बाहेरच्या वाचकांना आ़कर्षित करण्यासाठी वापरले जाते.

<<१०-१२ वर्षाच्या मला भेटलेल्या बहुतेक मुला-मुलींनी मराठी वाचता येत नाही किंवा फक्त पेपरमधल्या हेडलाइन्स वाचता येतात असंच सांगितलं.>>

हे मात्र अगदी खरं आहे.... माझाही अनुभव हाच आहे... इंग्रजी माध्यमातुन शिकलेली मुलं मराठी पुस्तकांना हात लावत नाहीत... ह्याउलट मराठी माध्यमातुन शिकलेली मुलं (पुढे आयुष्यात) मराठीबरोबरच बर्‍यापैकी इंग्रजी वाचताना आढळतात... असो. विषयांतर झाले...

टण्या, तुझं वाचन जोरात आहे रे.... कुठले कुठले संदर्भ असतात तुझ्याकडे...

१०-१२ वर्षाच्या मला भेटलेल्या बहुतेक मुला-मुलींनी मराठी वाचता येत नाही किंवा फक्त पेपरमधल्या हेडलाइन्स वाचता येतात असंच सांगितलं.

पालकांचा आळस, दुसरे काय, स्वतः वाचत नाहीत, मुलांना वाचायची सवय लावत नाहीत...

आपण आपल्या मुलांबाबत ही काळजी घेऊया म्हणजे झाले.....

<एक तर भारतातलं दारिद्र्य, जातियता, रुढी, अंधश्रध्दा याचं भडक वर्णन करुन भारत म्हणजे 'साप गळ्यात घालुन फिरणार्‍यांचा देश' असं चित्र उभे करणारे लेखक तर एकीकडे विक्रम सेठ, शोभा डे याच्यासारखे कोणतंही सशक्त कथाबीज नसताना समारंभांची, लग्नबाह्य चविष्ट संबंधाची वर्णनं करुन एका विशिष्ट वाचकवर्गाला आपलंसं करणारे. ><>

विक्रम सेठ यांच्या एकाही पुस्तकात वरीलप्रमाणे वर्णन, कथानक नाही.
From heaven lake हे प्रवासवर्णन आहे, Two lives त्यांच्या मामा-मामींचं चरित्र आहे. A suitable boy, An equal music, Golden Gate या कादंबर्‍याही अव्वल आहेत.. यांत कुठेही विवाहबाह्य संबंधांबद्दल अस्थानी वर्णनं नाहीत..

भारतातील अंधश्रद्धा, जातीयता यांचा उल्लेख अनेकांच्या कादंबर्‍यांत येतो हे मान्य, पण हे टाळून भारताबद्दल अतिशय उत्तम लिखाण करणारे लेखक मोप आहेत.
An anthology of Indian Writing in English आणि The Vintage Book of Indian Writing, 1947-1997 ही दोन पुस्तकं वाचावीत.

सरिविना:
विक्रम सेठ अन शोभा डे एकाच वाक्यात सुद्धा म्हणू नयेत अन त्या दोघांना एकाच गटात ? विक्रम सेठ ची भाषा सुद्धा शोभा डे च्या भाषेपेक्षा किती प्रगल्भ आहे. शोभा डेचं सगळं लिखाण हे टाईम्स ची रविवार पुरवणी किंवा स्टार डस्ट, फेमिना यात शोभेल असं असतं. तिने इलस्ट्रेटेड वीकली च्या लेव्हलचं सुद्धा काही लिहिलं नाही Sad

अरे कुठे नायपॉल आणि कुठे रश्दी
>>>> नाही रे टणोबा.. दोघांमध्ये कम्प्यारिजन नाही करायचीये मला तर एक फिक्शन असूनही किती रद्दड आहे तर दुसरे थोडे सिरियस विषयावरचे प्रवासवर्णन असूनही किती सुंदर आहे हेच म्हणायचे आहे.
ते आफ्रिकेतल्या नायकावरचं पुस्तक म्हणजे 'अ बेन्ड इन द रिव्हर आहे'..

त्यातलेच एक त्याने मला इशानच्या बारशात आहेर म्हणून दिले वाट्टे>>>> त्याचे हे नेहेमीचे आहे... फ्रान्सच्या राजाने इंग्लंडच्या राणीला भारताची मुंबई आंदण देण्याचा प्रकार! Happy

_________________________
-Impossible is often untried.

चिन्मय, इंग्रजीत लिहिणारे सगळेच भारतीय लेखक वाईट लिहितात असं मला म्हणायचं नाही. पण बर्‍याचशा पुस्तकांत दारिद्र्य, जातियता, रुढी, अंधश्रध्दा ह्याभोवतीच फिरणारी कथानकं असतात. त्या पलिकडे जाऊन काही वेगळा भारत नाहीये का? कारण नकळत मन मराठीतल्या लेखकांशी, त्यांच्या लिखाणातल्या वैविध्याची आणि इंग्रजीत लिहिणार्‍या भारतीय लेखकांशी तुलना करतच.
शोनू, मला नाही आवडलं suitable boy. खुप फिल्मी वाटलं त्यामुळे मी शोभा डे, सेठ एकाच पंक्तीत बसवले..

(टण्ण्)टण्या, आख्खा लेख नाही, पण त्यातले मेचके मुद्दे दे की इथे जमल तर! Happy

>>>>मात्र आता जवळजवळ ८०% मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात
सरी, तो प्रश्न आहेच, पण तरीही आशेला जागा हे कारण शहरी ३०% प्रजा सोडली तर गावाकडे इतर जण अजुनही झेडपीच्या कशाही का असेना, मराठी माध्यमात शिकतात! Happy (त्यातुन, पहिलीपासुन इन्ग्रजी या धोरणाचा एक चान्गला फायदा असाही होईल की उठसुठ आपल्या पोरान्ना कॉन्व्हेण्टमधे घालू पहाणे थाम्बेल, कॉन्वेण्ट सन्स्कृती खेडोपाडीदेखिल झिरपणे थाम्बेल, इन्ग्रजी बद्दलचा न्युनगन्ड बदलेलच शिवाय मराठी भाषाही शिकली जाईल! [या बीबीचा विषय नाही हा, तरीही रहावले नाही])
(बायदिवे, माझ्या बाचे, माझे, माझ्या पोरान्चे शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले/होते आहे, म्हणजे किमान पुढच्या एका पिढीपर्यन्त तरी मला मराठीच्या अस्तित्वाची माझ्याकडून चिन्ता नाही! कस? Proud )
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिम्बु, पुस्तक घरी आहे.. मी डिसेंबर दुसर्‍या आठवड्यात त्या लेखाचे सार लिहितो Happy

बुकर चे निकष काय आहेत?