माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्‍यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

मागे कधीशी पित्रू-दिन येऊन गेला. माझ्या मायबोलीने त्या बद्दल लेखनाचा एक सुंदर उपक्रम सुरू केलेला. मला लिहायच होत पण माझ्या बापाचा मुलगा फारच व्यस्त होता. इतका व्यस्त की त्याला स्वत: च्या बापाकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. लिहायच तर सोडाच त्याला बापाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता. सदा कदा बापावर डाफरत असायचा. बाप आतून दुखायचा पण बोलून दाखवायचा नाही फक्त गप पडून रहायचा. आणि मग असाच तो आषाढातला पहिला ढग आला आणिक बापाला घेऊन गेला. बापाचा मुलगा बघतच राहीला त्या ढगाकडे हताश निशब्द.

बापाचा मुलगा बेवारश्या सारखा भतकत राहीला. बापाचे मित्र सांगत राहीले बाप किती मोठ्या मनाचा होता तो. बापाचा मुलगा ऐकत राहीला. बाप म्हणे डायलीसीसच्या आजारपणात पार्ल्यावरून मिरा रोडला एकटा जायचा ट्रेनने. का तर मित्राला पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून. आणि मग ती पुस्तके परत आणायला , नवीन पुस्तके द्यायला. माझ्या बापाचा मुलगा तर एका खोलीतल वर्तमानपत्र सुद्धा बापाला दुसर्‍या खोलीत बापाला आणून द्यायचा नाय. फक्त ओरडायचा त्याच्यावर. बापाला खाण्या-पिण्याची फार आवड होती. पण एकटा कधी खायचा नाही. सर्वांसाठी खायला आणायचा. बापाचा मुलग मग त्याच्यावर चिडायचा वायफळ खर्च करतो म्हणून पण स्वतः कधी बापसाठी खायला आणायचा नाही. बापाला नाटक-सिनेमाची भारी आवड पण बापसाठी कधी चुकून कधी तिकीट घेऊन आला नाही. बाप तिकीट काढून आणायचा एक कधीच नाही दोन आकडी. सर्व नातेवाईकांना बोलावयचा फोन करुन बोलावायचा नाटकाला. घरी जाऊन तिकीट पोचती करायचा. नातेवाईक आपापसात हसायचे 'नाटकाचे वेड' म्हणून. मग माझ्या बापाचा मुलगा चिडायचा नातेवाईक हसतात म्हणून. पण माझा बाप ऐकून न ऐकल्यासारख करायचा आणि पुढच चांगल नाटक लागल की पहाटे उठून तिकीट काढायला जायचा रांगेत उभ रहायला म्हणून.

माझा बाप एकदा बापाचा मुलगा परीक्षेला जाताना घड्याळ घालायला विसरला म्हणून आंघोळ अर्धवट टाकून फक्त टोवेल गुंडाळून सोसायटीच्या गेटपर्यंत धावत आला फक्त घड्याळ द्यालला म्हणून. लोक बापाला हसले. बापाच्या मुलाला माझ्या बापाची खुप लाज वाटली. स्वतः ची वाटायला हवी होती खर तर.

माझा बाप स्वतः फारसा शिकला नाही पण त्याने माझ्या बापाच्या मुलाला खुप शिकवल. म्हणायचा माझी नौकरी आहे तो पर्यंत वाटेल तेवढा शिक घरी बसून. घरची काळजी करू नकोस. लोक बापाला सांगायचे बापाच्या मुलाला नोकरी करायला सांग म्हणून पण बाप काही बधायचा नाही. मग बापाचा मुलगा खुप शिकला, बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही.

मग आता आषाढात बाप एकदम गेला. बापाचा मुलगा बापाला जाऊन अग्नी देऊन आला. अग्नी संस्काराला अगदी मोजकी माणस होती फार तर ८-१० असतील. माझ्या बापाच्या मुलालाही मग माझ्या बरोबरीने खुप वाईट वाटल. अरे रस्त्यावरचा कुणी फाटका माणूस अगदी मार्केटातला भाजीवाला जरी गेला तरी ह्यापेक्षा अधिक माणस जमतील आणि माझ्या बापाचा लोकसंग्रह तर खुप मोठा होता. मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. पश्चातापाने कदाचित पित्रु हत्येच्या पापाच्या भितीने. तिकडे माझा बाप लाकड आणिक आगीज जळून गेला. इकडे माझ्या बापाच्या मुलाची शरीराची लाकड आणिक मनाची आग झाली पण तरीही तो जळून गेला नाही. होरपळत राहीलाय. माझ्या बापाच्या मुलाने आजकाल आयुष्य 'आंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तस भिरकावून दिलय. तो ही असाच कधीतरी मरुन जाईल पटकन.

मला कधी कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै 'आषाढस्य प्रथम दिवसे ' चा अर्थ माझ्या कडून समजून घे म्हणून.

मी (दिनांक १२/०७/२०१३)

प्रकार: 

केदार काळजी घ्या . मला माझ्या आजोबांची आठवण आली आणि डोळे भरून आले .
लिहितांना तुम्ही खूप रडला असाल . मनात घर करणारा सल पुढे दिशा दाखवत राहतो .

केदार,

हृदय अगदी हेलावून गेल तुझ हे यथार्त चित्रण वाचून. ह्यातून तू हळूहळू बाहेर पडशील.वडीलांच्या स्मृतींना आठवून फार कालवाकालव होऊ देऊ नकोस. लगेच स्वतःला आवरायला शिक. वडील परत येणे शक्य नाही. मग अशावेळी आपल्याला जी चांगली लोक मिळालीत त्यांच्याचकडून प्रेम घ्यायचे नि द्यायचे.

कधीही वाटल तर मन मोकळ कर आमच्यापाशी.

केदारच्या ह्या मनोगतानं पाठ सोडली नाही.
आपण खरेच असं विनाकारण वागतो का? आई-वडिलांशी, भावंडांशी, मित्रांशी जेव्हा जेव्हा आपण विखारानं वागलोय तेव्हा तेव्हा जगाचा कुठला तरी त्रागा मोकळा करण्याची जागा म्हणून आपण त्यांना वापरून जातो असं आहे का? (बरोबर का चूक हे त्या त्या नात्यावर ठरतं.)
मी वृत्तीनच वाईट, हीन आहे आणि निव्वळ त्रास देण्यासाठीच वाईट वागलो असं आपल्यातले किती जण वागतात?

केदार,
तुला आत्ता जे आठवतय ते तुझं (तुझ्यामते) वाईट अन वडिलांचं चांगलच वागणं. तुझ्या तशा वागण्यामागची त्यावेळची कारणं तू आत्ता दु:खामुळे विसरलायस का?
चांगल्या आठवणी घडवाव्यात अशी माणसं आपल्या सभोवती असताच. काही कारणावश आपण भलतच काहीतरी वागून बसतो. सुधारायची, माफी मागायची संधी गमावत रहातो... अन एका क्षणात माणूसच हरवून जातं.
मग हातात उरतं नुस्तंच आपल्या भलत्या वागण्याच्या आठवणी... संधी गमावल्याचं दु:खही. त्याबरोबरच आपल्या तशा वागण्यामागची कारणंही हरवून बसलेले असतो आपण... किंबहुना तेव्हा ज्या कारणांनी/परिस्थितीनं जितक्या तीव्रतेनं आपल्याला तसं वागायला भाग पाडलेलं असतं, त्या कारणांची ती तीव्रता, अन कधी कधी कारणंच... क्षुल्लक होऊन बसतात.

पण म्हणून ती कारणं अन ती परिस्थिती नाकबूल करता येणार नाही.
केदार, तू तशी ती परिस्थिती नाकबूल करतो आहेस का? शोधून बघ. तशी कारणं सापडली तर स्व्तःला नक्की अन लगेच माफ कर.
त्या काळातच काय पण अगदी आताही तुझ्या आई-वडिलांना तू सुखी-समाधानी अन अपराध-मुक्तं मानसिक आयुष्यं जगावं ह्यातच संतोष असेल. तो मिळवायचा प्रयत्नं कर.
इथे मन मोकळं केलच आहेस. हीच सुरुवात समज... त्या प्रवासाची.
मला तुझ्याकडून "मी, माझा बाप अन आम्ही" अशी एक छान गोष्टं ऐकायचीये. ह्यात तू "मुलगा" असशील, एक माणूसही असशील, तुझे वडील... एक वडील अन माणूसही... अन तुम्ही दोघेही असाल... एकमेकांचे.

केदार,
यातून सावरायला हवे आणि आपले संस्कार १२ दिवसानंतर नेहमीचे आयूष्य सुरु करायला सांगतात.
सातीच्या पोस्टला अनुमोदन.

केदार,

मला सांगायला चांगले वाटले असते की It gets better. पण दुर्दैवाने It doesn't.

वडील गेल्याचे दु:ख काही काळाने कमी होइल पण तुमच्या मनातील सल/Guilt ही तशीच राहणार. आणि ती मनात घेउन पुढील आयुष्य जगणे हेच याचे प्रायश्चित्त.

पण असे असले तरी त्या दु:खाचा त्रास तुमच्या इतर आप्ताना झाला तर ते काही योग्य नाही. आता जे इतर जवळचे नातलग आहेत त्याना आनंदी ठेवणे हे मात्र तुम्ही नक्की करु शकता.

दिनेशदाना अनुमोदन..

खरय केदार, माझे वाबा पन मागिल वर्शि गेले. आता त्याना फोतोतच पाह्यचे. आनि आथवायचे सुधा. एकता असलो कि खुप भरुन येते. असो.

आपल्या माणसांना इतकं शाश्वत नी गृहीत धरतो की ते माणूस गेल्यावरच आपल्याला राहून गेलेल्या गोष्टींची
आठवण येते.वीज असताना तिचे महत्व कळत नाही.पण वीजपुरवठा बंद पडल्यावर त्याची जाणीव होते.
कालांतराने सल कमी होईल.काळ हेच औषध!
साती व दादच्या पोस्टला अनुमोदन.

Kedar,

Lekh vachtana vatala nahi ki tumhi tumchamanatla boltay mhanun.
Pudhache pratisaad vachale aani umagala.
Tumchya dukkhad sahabhagi.

Aani dhanyavaad tumcha lekh vachala aani lagech babana phone lavala.

Ata kusumagrajanchi kavita athavali,

ugavatich unha ata mavaltil pochla aahe
margakraman ata margat adhik sathale aahe,
takrar nahi khant nahi mukti sathi pravas asato,
kadhitRi mitanyasathi kaljatla shwas asato.

take care

केदार. भिडलं मनाला.
आतापर्यंत सावरला असशील, नसल्यास लवकर सावरावास हीच अपेक्षा.

Pages